खंड ९ - अध्याय ९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मुद्‍गलासी । विषयपरायण चंचल । चित्तासी । दुर्ग्रहयुक्तासी अशांतिपूर्णासी । मुनिसत्तमा कैसें जिंकावें ॥१॥
योगप्राप्तर्थ उपाय सुगम । सांग चित्तजयार्थ अनुपम । मुद्‍गल म्हणती ऐक एकमन । सांगतों सारें सविस्तर ॥२॥
जें बिंब भ्रांतीनें समन्वित । पंचचित्तांत असे स्थित । चिंतामणीचें भजन अविरत । तेव्हां करावें मुमुक्षूनें ॥३॥
त्यानें चित्तजय लाभत । अन्य उपाय मज न ज्ञात । चित्तजयाविना न मिळत । योगसिद्धि हें निश्चित असे ॥४॥
दक्ष पुनरपि प्रार्थित । सुगम मार्ग सांगा मजप्रत । जो सेवितां जगतांत । ब्रह्मीभूत प्राणी होतो ॥५॥
मुद्‍गल म्हणती तयाप्रत । अज्ञानानें जो नर युक्त । तो विषयलंपट होत । शिश्नोदरपरायण ॥६॥
नित्य अन्य कांहीं जो न वांछित । सकाम कर्म सुखद वाटत । अलभ्यप्रापक ह्रद्य आचरित । लोभाविष्ट चित्तानें तो ॥७॥
अलभ्य लभ्याचा लोभ धरून । महाखल जें पाप प्रतिदिन । करीतसे तें त्यागून । सत्कर्मात निरत व्हावें ॥८॥
निरंतर पुण्य आचरावें । त्या एकभावें पाप नष्ट व्हावें । शुद्ध कर्म नरें करावें । सकास जरी तें असलें तरी ॥९॥
तदनंतर अलभ्य ह्रद्याची कामना । सोडून द्यावी वंचना । विश्वास संपन्नता मना । आणून कर्म करावें ॥१०॥
अथवा अलभ्य न प्राप्त । तेव्हां अधिक सत्कर्म उपदिष्ट । म्हणावें स्वचित्तास अनुतप्त । जीवा तूं पापें केलीस ॥११॥
अनंत जन्मांचीं पातकें असतीं । त्यांची अपार विघातशक्ती । असे कर्मपर सांप्रती । तथापि दूःखित म्हणोनि तूं ॥१२॥
पापनाशार्थ आनंदें आचरण । सत्कर्माचें करून । शुद्धांत होशील सुजाण । सत्कामिक कर्में करी ॥१३॥
सत्काम कर्में करित । तेव्हां बुद्धि निष्काम होत । जन्ममृत्युप्रद भोग भोगित । विविध जन्मांत मी सगळे ॥१४॥
परी अपार सुखद न मिळालें । ब्रह्म देहधारकासी भलें । अलभ्य तें मज न लाभलें । प्रारब्धाधीनतेनें ॥१५॥
प्रारब्ध पुसण्यास समर्थ । कोणीही नसे जागंत । म्हणून निःकाम कर्में करित । नित्य आदरें मीं चित्तें ॥१६॥
त्यायोगें जन्ममृत्युविहीन । होईन मी पावन । ब्रह्मसुख अपार लाभून । होईन ब्रह्मपरायण मीं ॥१७॥
ब्रह्मीभूत मीं होईन । जर करीन प्रयत्न । ऐसा विचार । मनीं ठसवून । विविध काम त्यागावें ॥१८॥
नंतर गणेशमुख्य देवपंचक । पूजन त्याचें भक्तिपूर्वक । सालोक्यादि सुख पावक । नित्य आदरें इच्छी मग ॥१९॥
क्रमानें तपश्चर्यायुक्त । मानवाचा प्रभाव पडत । ब्राह्माच्या नाना विभूति असत । तेथ त्याचें मन रमतें ॥२०॥
ऐश्वर्ययुक्तभावें आकर्षित । त्या विविध विभूतींत । तीं सर्व परमात्म्याचीं वर्तत । नानारूपें ब्रह्माचीं ॥२१॥
हे अंशतः तेजोधर । सर्वाधीश असती । खरोखर । ऐसा करून विचार । त्या विभूती पूजाव्या ॥२२॥
त्यायोगें चित्तशुद्धि लाभत । विचारानें गणेशास जाणत । सर्व पूज्यादि चिन्हांनीं युक्त । श्रेष्ठ त्या देवांत रत व्हावें ॥२३॥
स्वानंदनाथा त्या जाणून । स्वानंदार्थ विशेषें भजन । गणराजाचें करी ध्यान । निष्कामभक्तियुक्त तो ॥२४॥
तदनंतर अहर्निश अत्यंत । भजावें तयास तपोयुक्त । मोक्षार्थ सर्वभावें विरक्त । विषयादींत दक्षतेनें ॥२५॥
गणेशकृपेनें तैं होत । त्याची चित्तशुद्धि उदात्त । त्यायोगें सर्व स्वभावें भजत । गणनायका त्या सर्वदा ॥२६॥
हें विश्व चराचर समस्त । जाणावें त्याचेंच रूप सतत । सर्वांच्या हितास्तव भक्तियुक्त । द्विरदानना त्या भजावे ॥२७॥
ज्यायोगें कोणास दुःख होत । ऐसें कांहीं तो भक्त न करित । द्वंद्वज सुखदुःखा सहन करित । ऋजुस्वभावें युक्त तो ॥२८॥
देवकार्याविना पत्रादिक । साधु तो न तोडी साशंक । विश्वरूपपरायण एक । दुःख वृक्षांचें जाणूनियां ॥२९॥
एकांतांत निर्जन स्थानांत । नमून गजाननास ध्यात । भक्तिभावें पूजित । ध्यान करावें विशेषें ॥३०॥
अनन्य मनानें भजन । करावें देवाचें भावपूर्णमन । शमदमपर राहून । चित्तनिग्रह आचरावा ॥३१॥
चित्त हें दुर्जय अत्यंत । वायुनिरोधें प्राणायाम करित । त्यायोगें चित्तास जिंकित । यांत संशय कांहीं नसे ॥३२॥
आतां वायु निरोधाची रीती । सांगतो उत्तम तुजप्रती । ज्यायोगें पाप त्यागून होती । शुद्धचित्त नर सदा ॥३३॥
डाव्या नाकपुडींत । वायु खेंचावा नियंत्रित । त्याचें धारण चतुर्गुण करित । आपुल्या उदरीं नियतपणें ॥३४॥
पूरकाचा जेवढा वेळ । त्याच्या दुप्पट रेचक सबळ । उजव्या नाकपुडींतून उच्छ‍वासाचा मेळ । जमवावा साधकानें ॥३५॥
ऐश्याच परी उजव्या नाकपुडींत । श्वास खेचावा आंत । कुंभक तें आचरित । डाव्या नाकपुडीनें ॥३६॥
ऐसा प्राणायाम करावा । तेणें पापहीन नर व्हावा । तीन वेळा करावा । प्राणायाम विशेषें ऐसा ॥३७॥
परी अति निरोधयुक्त । वायु न धरावा हठसहित । संरुद्ध अतिहठानें होत । वायू निःसृत रोमांतून ॥३८॥
तैं नराची त्वचा कुष्ठयुक्त । होत असे निश्चित । नाभिमूळस्थित असत । एक इडा दुसरी पिंगला ॥३९॥
सुषुम्नेचा रोध होत । तैं मार्ग निर्मळ वर्तत । अपान नाभिमूलस्थित । अधोभागीं जात असे ॥४०॥
प्राणवायू ऊर्ध्व जात । नाडी प्रेरित सतत । मार्गरोधनभावें होत । नाडयांत मार्ग निर्विघ्न ॥४१॥
वायु नंतर मूलाश्रित । राहतो क्रमशः सतत । बारा लघु अक्षरें उच्चारित । तेवढा वेळ रोधित वायु ॥४२॥
तो लघु प्राणायाम म्हणत । योगिजन योग साधित । त्याहून द्विगुणित राहत । तो वायु सुरोधित जाणा ॥४३॥
मध्यम तो असे ख्यात । त्रिगुण उत्तमोत्तम ज्ञात । ऐसा प्राण अपान नेत । स्वमूळस्थानीं योगी ॥४४॥
त्यांच्या रोधनभावानें पावन । मूलगत ते होऊन । ऐशा क्रमानें मूळ स्थान । हा वायु जेव्हां मुहूर्त स्थित ॥४५॥
तेव्हां समानगा नाडी तेथ स्थित । भेदत तिचे होत । ती सुषुम्णा प्रख्यात । संमिलित तेथ होई ॥४६॥
प्राणापान सम होत । तद्रूप ते उभय वर्तत । वायुसाधनपात्रत्वें होत । योगी तेजःसमन्वित ॥४७॥
त्रिकालज्ञ स्वयं सिद्ध होत । नरोत्तम तो जगांत । नंतर प्राणायाम स्वाधीन करित । विशेषें क्रम साधून ॥४८॥
उभय जाती तेथ महान । तदनंतर योगी ध्यानपर होऊन । करून षट्‍चक्राचें भेदन । चक्रस्थ स्वरूप पाही ॥४९॥
तेथ वायुसाहाय्यें प्रवेशत । ऐशा क्रमें भेदून जात । सहस्त्रार चक्रातीत । तेव्हां पाहे गजाननासी ॥५०॥
तेथ क्रमानें वायु स्थापित । सुसमाधियोगें राहत । परात्पर । विघ्नेश्वरास संतुष्ट । योगी तेव्हां होतसे ॥५१॥
क्रमें वायुबलानेंच होत । योगी तो शुद्धचित्त । सर्वत्र भावांत स्थित । पाहतसे ब्रह्म सनातन ॥५२॥
नंतर स्वाधीनतायुक्त । प्रभाव त्याचा स्वतेजें पडत । जें जें इच्छी तें तें लाभत । त्वरित ऐसा योगसिद्ध ॥५३॥
ऐश्या समयीं कांहीं न वांछित । तेव्हां अंतिम योग प्राप्त । अन्यथा स्वच्छंदरत । होतां भोगयुक्त पतित पुन्हा ॥५४॥
साधन द्विविध असे ख्यात । एक तें क्रियारूप वर्तत । ब्राह्मकर्मस्वरूप युक्त । तपोयुक्त स्वधर्मज्ञ ॥५५॥
आंतरसाधन वायुरोधन । सर्वसिद्धिप्रद महान । त्या उभययोगें चित्त बांधून । स्ववश करावें नरानें ॥५६॥
बाह्मकर्मांत जो रत । त्याला जी सिद्धि लाभत । त्याहून हजारपट प्राप्त । सिद्धि आंतरिक साधनानें ॥५७॥
शीघ्र सिद्धिप्रद आंतर साधन । योगींद्रमुख्यें तें साधून । मिळविल्या सिद्धि महान । आतां तृतीय साधन ऐका ॥५८॥
जें आचरितां साधन । योगींद्रसेव्य तो होऊन । लाभतो सारे ऐहिक मान । साधन तें तुज सांगतों ॥५९॥
चित्तशुद्धिचें कर्म ख्यात । द्विविध कार्य सिद्धिस्तव ज्ञात । शुद्धचित्त नर नंतर पाहत । शाश्वत ब्रह्म निःसंशय ॥६०॥
सर्वत्र पूर्णभावें संस्थित । पर अव्यय जें ब्रह्म असत  अवयवादींनीं हीन वर्तत । तेथ लीन स्वयं व्हावें ॥६१॥
ऐसा हा फलदाता ख्यात । क्रियायोग जगांत । ब्राह्मांतरात्मक तो पूर्ण वर्तत । तदनंतर अन्य साधन करावें ॥६२॥
योग्यांचें चित्त रसयुक्त । होतसे तदनंतर तद‍गत । त्यास ब्रह्मभावें जिंकित । शम दमादींत परायण ॥६३॥
स्वधर्मसंयुत होऊन । देहनिर्वाहक आचरून । देहाचें करिती शमन । त्यास दम म्हणतात ॥६४॥
विषयार्थ मनःसंकल्प आचरित । तें चित्त रोधून करित । ब्रह्मपरायण तो शम ख्यात । त्याचें चित्त स्वाधीन होतें ॥६५॥
स्वाधीन सर्वभाव त्यागून । ब्रह्मपर चित्त करून । हळूहळू विषयांपासून । दूर न्यावें स्वचित्त ॥६६॥
धृति योगमयी धरून । योगी होईल साधक जन । कर्ममार्गाचा त्याग करून । ध्यानयोग योगी आचरत ॥६७॥
मनोवाणीविहीन जें ब्रह्म । तेच ध्यान मनोरम । संकल्प त्यागरूप परम । विषयांत निरंतर ॥६८॥
जो जो संकल्प विषयांत । तो मनांत योगतत्पर करित । संकल्पहीन स्वबलयुक्त । चत्त जेव्हां स्वाधीन होतें ॥६९॥
ऐसें चित्त होतां स्वाधीन । देहेंद्रियाचा संयम करून । भूमिवरी स्थाणूसम साधन । अचल राहून करावें ॥७०॥
कांहीं क्रिया न करावी । संपूर्व निश्चलता पाळावी । जलपानादिक वस्तु खावी । तेथेंच जी मिळेल ॥७१॥
परेच्छेनें समायुक्त । तेथेच रहावें एकव्रत । कोणीही जलपानादि न देत । तैशापरी रहावें ॥७२॥
ह्यासाठीं श्रम न करित । प्रारब्ध कारक न इच्छित । सर्प विंचू व्हाघ्रादिपीडित । तथापि त्यानें न हलावें ॥७३॥
नाना प्रहार जरी झाले । तरी पाहिजे सहन केले । स्वस्थानीं जडवत्‍ राहिलें । पाहिजें राग न मानतां ॥७४॥
पूर्वजन्मींचें माझें कर्म । त्यानें प्रोत्साहन परम । पावून हे मज पीडिती सकाम । यांत यांचा दोष नसे ॥७५॥
ऐसा विचार करित । तैशाची परी जरी सेवित । सात्त्विक जन सर्व भावरत । तथापि त्यानें न हलावें ॥७६॥
पूर्वजन्मकृत जें कर्म । त्यानें प्रेरित हे मानव परम । मज पूजिती हें वर्म । ह्मांचा गुन कांहीं नसे ॥७७॥
ऐसा विचार करून मनांत । त्यांचे शुभ न इच्छित । द्वंद्व सारें रोधून राहत । महायश तो निश्चल ॥७८॥
ऐशा विधानें स्वल्प काळांत । चित्त योगी तो जिंकित । यांत संदेह कांहीं नसत । पूर्ण शांतिलाभ तयासी ॥७९॥
अन्य कांहीं कर्म न करित । घ्यानादिक न अन्य व्रत । शम दम धारण करित । त्याने योगी तो मानव होतो ॥८०॥
तेथ विशेषें ब्रह्माचा विचार । करावा त्यानें समग्र । कैसें ब्रह्म जें माझ्या ह्रदयीं स्थिर । वेदादींत प्रतिपादित ॥८१॥
पंचभूमि उल्लांघून । क्रमानें नाना ब्रह्में पाहून । शांति प्राप्त करावी महान तदनंतर जडावस्था त्यागावी ॥८२॥
यथेच्छेनें पुनरपि संचरावें । ह्रदयीं चिंतामणीस पहावें । शांतियुक्त नित्य व्हावें । पंचभूमिचालका पाहोनियां ॥८३॥
ब्रह्म पाहून स्वयं होत । स्वाधीन ह्रदयरसहीन वर्तत । सर्वत्र शांतीनें संचरत । यांत संशय कांहीं नसे ॥८४॥
ऐशा विधीनें ज्ञानी जन । जरी पापपरायण । क्रमानें योग साधून । योगी परम होईल तो ॥८५॥
ऐसें करण्या जरी असमर्थ । तरी हा योग ऐकून समस्त । रहावें त्यानें निष्ठायुक्त । स्वधर्मांत निरत सदा ॥८६॥
निंद्य भोगांचा भोग घेत । परी अन्तीं स्वानंदरत । गणेश्वरास तेथ पाहत । त्यानें होतो योगयुक्त ॥८७॥
ज्योतिर्देंहधर होऊन । भजावा त्यानें गजानन । ब्रह्मकल्पमय राहून । लीनता पावे तद्देहांत ॥८८॥
तदनंतर ब्रह्मभूत होत । ऐसें जरी करण्या अशक्त । आचरावें तरी धर्मसंयुत । प्रजानाथा कर्म सारें ॥८९॥
तें कर्म करावें ब्रह्मार्पण । त्यानें शुक्लगती लाभून । निःकामयोगमार्गें पावन । सदा तत्पर ब्रह्मांत ॥९०॥
ऐसें करण्या अशक्त । तरी तिविध फल सोडून देत । ब्रह्मभावें तो आचरत । कर्मज योग साघक ॥९१॥
कर्मत्याग बळे मनांत । मी ब्रह्म हा निश्चय करित । क्रमानें कर्मसंयुक्त । होतो अन्य जन्मांत ॥९२॥
निःकाममर्म कर्ता तो होत । नर योगांत समायुक्त । विषय निंदक वर्तंत । ऐशा क्रमें पूर्ण शांतिलाभ ॥९३॥
हें क्रमार्थं रचिलें । नानामतसमन्वययुत झालें । सुगम सर्व भावांत भलें । गणेशभजन परम श्रेष्ठ ॥९४॥
त्यानें योगी होत । निश्चित । हें सर्व शास्त्रांत संमत । जें कांहीं गणराजाचें पूजादि व्रत । कीर्तन श्रवणादिक ॥९५॥
तें तें ब्रह्मीभूत प्रदायक होतें हें साधन एक । नाना विषय संयुक्त सुखदायक । मानवें स्मरावे गनाधिपा ॥९६॥
अहर्निश त्याच्या मुखांत । गणेशस्मरण असावें अविरत । त्यायोगें स्वानंदग होत । योग अभ्यासून तन्मय ॥९७॥
ब्रह्मकल्पान्तानें तो होत । यांत संशय कांहीं नसत । स्मरण गणराजाचें आदरयुक्त । करावें सदा भक्तानें ॥९८॥
त्याच्या अन्तीं स्मृति । गणराजाची सदैव चित्तीं । गणेशस्मरण अहर्निश करिती । नाना योगादिक साध्य तयांसी ॥९९॥
ते योगिसम होत । विनासायास शुद्धि पावत । विषयलंपटही होत । शुक्राचार्यासमान ॥१००॥
शिव विष्णु देवांचे मुख्य स्मरण । करितसे जो नर एकमन । अंतीं त्याच्या चित्तीं स्मरण । विघ्नप आपलें जागवी ॥१०१॥
त्या त्या देवांच्या लोकांत । त्या त्या भक्तांस नेत । तेथ विविध भोग लाभत । अन्तीं पुनर्जन्म लाभती ॥१०२॥
पुराणांत त्रिगुणांचा लय । ख्यात असे त्यांचा उदय । होऊन जन्ममृत्युमय । होतो प्राणी तद्वत ॥१०३॥
म्हणून सार हें सांगत । गणेशभजन श्रेष्ठ असत । त्यानें नर अज्ञानयुक्त । तोही होतो ब्रह्ममय ॥१०४॥
ऐसें हें रहस्य तुजप्रत । दक्षा कथिलें शास्त्रसंमत । ज्यानें अज्ञासही प्राप्त । योग होऊन ब्रह्मपद लाभे ॥१०५॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे अज्ञानिनां क्रमयोगवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणस्तु ।


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP