खंड ९ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष विचारी मुद्‍गलास । योगशांति लाभूत योगाभ्यास । जो नित्य करी त्या योग्यास । योगभ्रष्टता येत कैसी ॥१॥
जो योगी ब्रह्मभूत ब्रह्मांत । मायामय हें जग जाणत । नाना भ्रमांनी युक्त । जाणून स्वयं भ्रष्ट हो कैसा ॥२॥
हें कौतुक मज न समजत । करावें दिशद संशयातीत । मुद्‍गल तेव्हां त्यास सांगत । ऐक त्याचें रहस्य ॥३॥
ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । ऐश्या योग्याच्या ब्रद्धींत । बिंबसंस्थितांत । विमोहें होत्त । मोहाचा जेव्हां उदय ॥४॥
तेव्हां विविध भोग पाहून । स्वयं मोहित होऊन । मोहानें रसयुक्त मन । ते ते भोग वांछितसे ॥५॥
तेथ त्याच्या ह्रदयांत । दक्षा जो विवेक वसत । त्याचें रूप तुज सांगत । ऐक रे बुद्धिविशारदा ॥६॥
मीं ब्रह्मांभूत । योगसामर्थ्यें जरी सतत । पापपुण्यादिक मज नसत । शुभ अशुभ कृताकृत ॥७॥
जेव्हां भोग त्यागून । मीं आदरें नित्य राहीन । तेव्हाम योगाचें वर्धन । होणार नाहीं निश्चित ॥८॥
जेव्हां भोग नानाविध भोगत । नित्य पापपुण्यातीत । तेव्हां योगक्षय न होत । तरी मीं कां दुःखयुक्त ॥९॥
योग याहून शांतींत । विधिनिषेधयुत राहत । ऐसा मनीं विचार करित । होतो लालस भोगांत ॥१०॥
ऐश्या विचारें विविध भोगांत । योगी क्रमानें रसयुक्त । हाच मोह असे ख्यात । योग्यांस ह्रदया भ्रांतिप्रद ॥११॥
त्यायोगें शांति त्यागित । पापपुण्यपर होत । तदनंतर कामाचा आश्रय घेत । इच्छितो विविध भोग तो ॥१२॥
देहास जें सौख्य देत । पुण्य पापपरायण ते भोग वांछीत । त्या भोगांच्या पूर्वीत । जर कोणी विघ्न आणिलें ॥१३॥
तर तो होत क्रोधयुक्त । भिन्नभावपरायण होत । ज्यानें विघ्न केलें त्याच्यांत । भोगांत । स्वतः न भेद मानी ॥१४॥
त्य विघ्नकर्त्यास शत्रू मानत । तैं अज्ञान उपजत । क्रमानें त्याच्या नाशार्थ । प्रसत्न करीतसे योगी तैं ॥१५॥
शत्रूस दंड देण्यास्तव होत । नाना भावांनी युक्त । त्या शत्रूस जिंकून भोगित । विविध भोग यत्नानें ॥१६॥
स्वपरज्ञानहीनत्व नष्ट । त्याचें प्रजापते त्या अवस्थें । तीच अज्ञानसंभूति ज्ञात । शत्रुमित्र जी दाखवी ॥१७॥
तदनंतर शांतीचि विस्मृति । क्रमानें होत याच्या चित्तीं । त्या विस्मृतीनें युक्त चित्तीं । स्वतःस देह मानतो तो ॥१८॥
देहांत होता संतोश मानित । कृतकृत्य परी स्थित । विपरीत घडतां मानित । आपणा भाग्यविवर्जित ॥१९॥
तदनंतर योग परित्यागित । स्वयं बिंबी तो होत । बिंबांत तन्मयभावयुक्त होत । यांत संशय नसे ॥२०॥
ऐश्या क्रमानें शांतिहीन । तो योगी होतां दुःखपूर्ण । योगाचा आश्रय जाऊन । योगभ्रष्ट होतसे ॥२१॥
जेव्हां देह सुखयुक्त । तेव्हां स्वतःस मानी सुखांत । दुःख शरीरास होत । तें आत्म्यास मानी तो ॥२२॥
लेशमात्रहीं शांति न लाभत । भोगलालसेनें सतत । भ्रमण करी तो असंतुष्ट । पापें करी बहुविध तैं ॥२३॥
भोगप्राप्तिस्तव आचरत । पापपुण्यें विधिनिषेधवर्जित । वर्णाश्रमयुत योगी त्यागित । स्वधर्म आपुला त्या वेळीं ॥२४॥
पाप करी अथवा पुण्य करित । स्वधर्माच्या समन्वित । मोहयुक्त निरंतर होत । भोग भोगी बहुविध तो ॥२५॥
योगभ्रष्ट ऐसा नर होत । योगाचा जें त्याग करित । त्याच्या ह्रदयी विवेक राहत । परी तो विवेक मोहप्रद ॥२६॥
पुण्यपापविहीन । ब्रह्म मीं ब्रह्मभावित महान । ऐसें म्हणून आचरण । भोगपूर्ण तो करी ॥२७॥
ऐसा योगभ्रष्ट जात । नरकांत द्वंद्वदुःखदायकांत । यातना घोरर्प भोगित । पुनरपि जन्म धरातलीं ॥२८॥
दक्ष म्हणे मुद्‍गलाप्रत । योगभ्रष्टगति सांगा मजप्रत । योगींद्रा तूं दयायुक्त । नरकयातना कैशा तयास ॥२९॥
कर्मफळाचा जो त्याग करित । तरी पुन्हां येथ कैसा जन्म पावत । याचा विस्मय मनांत । योगिचरित्र हें ऐकून ॥३०॥
मुद्‍गल त्यास उत्तर देत । ब्रह्मांत योगी ब्रह्मभूत । पुनः विषय सेवित । भक्तिहीन तैं होतो ॥३१॥
ब्रह्माच्या भक्तीनें हीन । त्याला न मिळे शाश्वत स्थान । अपार पुण्ययोगें रसोत्पत्ति शोभन । सर्वश्रेष्ठ वाटते जीवासी ॥३२॥
देहविषयांच्या संयोगवश । द्वंद्वभावाच्या होत वश । नाना पापादियोगें नाश । अल्प पुण्याचा होत असे ॥३३॥
होता हा योगभ्रष्ट मृत । तेव्हां तो पडे शिवलोकांत । वैकुंठांत वा सौर शक्तींत । अंतकाळीं निःसंशय ॥३४॥
शोकहर्षप्रद असत । विश्व नाना द्वंद्वयुक्त । योग्यांभ्रष्टास लाभत । नरकवास हा या रूपें ॥३५॥
उत्पत्तिनाश संयुक्त । त्यागून जो ब्रह्मभूत । ब्रह्मपरायण ब्रह्मांत । तो पुनरपि द्वंद्वंपर योगभ्रष्ट ॥३६॥
वैकुंठादि पदीं स्थित । द्वंद्व निरंतर तो भोगित । उत्पत्ति नाश संयुक्त । नानाभोगपरायण ॥३७॥
म्हणून योगी भोगित । स्वर्ग नरकाख्य द्वंद्व सतत । नंतर पुनर्जन्म लाभत । योग्यांच्या कुळीं वा तापसकुळीं ॥३८॥
ऋद्धिमतांच्या कुळांत । अथवा तो जन्म लाभत । पुनरपि योग आचरित । परी भोगांत मन रमे सदा ॥३९॥
पूर्व संस्कारयोगें चित्त । महायोग्याचें तैं होत । स्वल्पयोग प्रभावें पुनीत । पुनः न जन्मे योगभ्रष्ट ॥४०॥
शांतियुक्त स्वभावें पोषित । शरीर त्यामुळें हर्षयुक्त । अंतीं तो योगी ब्रह्मांत । तदाकार होत असे ॥४१॥
योगसंस्कार पुण्य लाभत । महामति तो स्थिति शाश्वत । ऐसें हें योगभ्रष्टाचें चेष्टित । सांगितलें तुज संपूर्ण ॥४२॥
आतां आणकी काय ऐकूं इच्छिसी । सांग प्रजापते तूं मजसी । सांगेन तें जिज्ञासूसी । जेणें समाधान चित्ताचें ॥४३॥
ॐ तत्सदिति  श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे योगभ्रष्टचरितनिरूपणं नाम अष्टमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP