खंड ९ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगत । माधव नाम श्रत्रिय असत । अवंती नगरीपाळ माळव्यांत । स्वधर्मनिरत सर्वदा ॥१॥
कांबोज कर्णक राजा हल्ला करित । युद्ध दारूण तेव्हां होत । तो अवंतीचें राज्य जिंकित । कांबोजाचें वर्चस्व आलें ॥२॥
तेव्हां माधव नृप जात । स्त्रीप्रधानासह वनांत । पुत्रांसहित तो हिंडत । दुःखयुक्त तेथ लपला ॥३॥
तेथ महावनीं तो वीर राहत । ज्यांत व्याघ्र होते हिंडत । नाना हिंस्त्र पशु वसत । ऐशा घोर वनीं गेला ॥४॥
तेथ मुनिवरा कश्यपा पाहून । साष्टांग केलें अभिवादन । अति विह्रल करी रुदन । कश्यप तें पाहून म्हणे ॥५॥
दुःख कां तूं येथ करिसी । कोण तूं येथ कां आलासी । तेव्हां माधव नृप तयासी । सांगे सकल वृत्तान्त ॥६॥
तो ऐकून कश्यप सांगत । चिंता करूं नको मनांत । स्वराज्यप्राप्तीस्तव तुजप्रत । सांगतों तो उपाय करी ॥७॥
समीपा असे माघमास पुनीत । मौद्‍गल पुराण त्यांत । पारायणरूपें मी वाचित । तें ऐक तूं श्रद्धेनें ॥८॥
त्याचें तें वचन ऐकून । हर्षयुक्त मनीं होऊन । मधाव तेथ सर्वासह राहून । ऐकता झाला पुराण हें ॥९॥
माघमासांत तेथ येत । मुनिगण क्षत्रियादि जन समस्त । त्यांस पाहून हर्षभरित । माधव नृप जाहला ॥१०॥
विनायकास शुक्ल प्रतिपदादिनीं । महामुनी तें पूजोनी । उपोषणपर राहूनी । माघमास पारायण आरंभ करी ॥११॥
पारायण विधिसंयुत । मंडपी तो करी प्रशस्त । महायोगी कश्यप भक्तियुक्त । सर्व तत्त्ववेत्ता मुनी ॥१२॥
तेथ एक आश्चर्यं घडत । एक नकुल तेथ येत । भूमीवरी पडून ऐकत । भयसंकुल तें पुराण ॥१३॥
अकस्मात्‍ दुःखपीडित । तें मुंगुस मृत होत । तैं गणेशदूत तेथ येत । तयास नेण्या स्वानंद लोकीं ॥१४॥
त्यांस पाहून कश्यप विचारित । गणेशदूतांनो सांप्रत । किमर्थ आलात सांगा मजप्रत । आम्हीं दास गणेशाचे ॥१५॥
आपलें कार्य करूं त्वरित । भक्तिभावें आम्हां समसत । कश्यपाचें वचन ऐकत । तेव्हां ते उत्तर तयास देती ॥१६॥
हें मुंगूस पहा येथ मृत । भूमीवरी पडलें असत । त्यास स्वानंदलोकांत । नेण्यास आलों येथ आतां ॥१७॥
विप्रेशा मुद्‍गल पुराण श्रवण । या नकुलानें केलें म्हणून । एक अध्याय संपूर्ण । अज्ञानानें यानें केला ॥१८॥
द्वितीय अध्याय प्रारंभ होत । तेव्हां हा नकुल बहु पीडित । मृत झाला परी पुण्यसंचित । केवल पुराण श्रवणाचें ॥१९॥
म्हणून यास ब्रह्मभूत । आतां करूं आम्ही निश्चित । मौद्‍गल सिद्धिद ऐकिले असत । अन्तकाळीं या नकुलानें ॥२०॥
त्या गणेशदूतांचें ऐकून वचन । विस्मित अत्यंत होऊन । त्यांसी करितसे वंदन । पुनरपि पारायण सुरूं करी ॥२१॥
गणेशदूत नकुळास घेऊन । करिती स्वानंदपुरीं गमन । गणेश्वराम तेथ पाहून । ब्रह्मभूत तें मुंगूस झालें ॥२२॥
चार दिवसांचें पारायण । केलें कश्यपानें संपूर्ण । विघ्नेशाचें करून पूजन । पंचमीस करी पारणा ॥२३॥
षष्ठी तिथीस स्वस्थानाप्रत । निमंत्रित सर्व जन जात । माधव तृप्त प्रणाम करित । प्रधानांसहित कश्यपासी ॥२४॥
तदनंतर तो महाराष्ट्र देशांत । आपुल्या मित्र नृपास भेटत । भद्रक नृप बळवंत । करी स्वागत तयाचें ॥२५॥
तो आपुल्या देशावर । महाबळी राज्य करी वीर । त्याच्यासह तो माधव नृपवर । सैन्य जमवून तयारी करी ॥२६॥
नंतर मोठें सैन्य घेऊन । संग्रामार्थ करी प्रयाण । गणेशाचें मनांत स्मरण । तैसेंचि स्वगुरू कश्यपाचें ॥२७॥
कंबोजराजास जिंकित । दारूण युद्ध करूनियां सतत । तेव्हां तो कांबोजकर्णं पराजित । पळून गेला भयानें ॥२८॥
माधवासी स्वराज्य लाभत । मित्रांसह तो राज्य करित । भोग नानाविध भोगित । पुत्रपौत्रांसहित सुचिर ॥२९॥
गणेशास नित्य भजत । मौद्‍गल पुराण नित्य ऐक्त । अंतीं स्वानंदलोकीं जात । तेथ पाहे गजाननासी ॥३०॥
त्या दर्शनमात्रें ब्रह्मभूत । जाहला माधव नृपति त्वरित । पारायणश्रवणमाहात्म्यें होत । उद्धार त्या नरोत्तमाचा ॥३१॥
ऐसे नाना जन लाभत । सिद्धि त्यांची न गणना असत । कोण वर्णन करण्या असे समर्थं । मौद्‍गलश्रवण पुण्य फल ॥३२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादें माघमासपारायणचरितवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP