खंड ९ - अध्याय २८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढची सांगत । गार्ग्य वंशय एक ब्राह्मण असत । शंभू त्याचें नांव ख्यात । वंध्यभावें दुःख त्यासी ॥१॥
नाना उपाय तो करित । वंध्यादि दोषपरिहारार्थ । तथापि त्यास न प्राप्त । पुत्र अथवा सुता एकही ॥२॥
तेव्हां अति दुःखित होऊन । गौतमाकडे करी तो गमन । स्त्रीसहित तयासी नमून । पुत्रकामार्थ प्रार्थितसे ॥३॥
गौतममुनींद्र सत्कार करित । शंभु त्याच्या आश्रमीं राहत । स्वगुरूच्या सेवेत । यत्नशील तो झाला ॥४॥
एकदां गौतम सुखांत । बसला होता स्वस्थ । तेव्हां शंभु ब्राह्मण त्यास म्हणत । पुत्रप्राप्तीची विवंचना ॥५॥
म्हणे मी नाना यत्न केले । परी ते सर्व व्यर्थ गेले । मजला संतान कां न लाभलें । काय त्याचें कारण सांगा ॥६॥
ज्या उपायें मज सुत । होईल तो महामते सांगा मजप्रत । तो उपाय मी करीन भक्तियुक्त । आपुली आज्ञा पाळीन ॥७॥
तूं गुरु माझा परम । पराकाष्ठा अनुपम । तुजहून अन्य न मनोरम । मज तारी गुरुराया ॥८॥
वंध्यादोषयुक्त मी दुःखित । मज व्हावा उत्तम सुत । त्याचें तें ऐकून म्हणत । महामुनि गौतम त्यासी ॥९॥
सर्व तत्त्वज्ञ तो शंभूस म्हणूत । चिंता करूं नको मनांत । द्विजोत्तमा तुज होतील तीन सुत । प्राज्ञ वेदज्ञ गणेशप्रिय ॥१०॥
माझ्याकडून करी श्रवण । सर्वसिद्धिप्रद तूं मुद्‍गलपुराण । त्यायोगें अनंत जन्मीचें पाप नष्ट होऊन । त्वरित होशील पुण्यवंत ॥११॥
तूं स्वयं पुण्यराशी होशील । तारक अन्या तूं निर्मल । यांत संदेह नसत सबळ । सर्वसिद्धियुक्त होशील ॥१२॥
अंतीं गणेश्वराप्रत जाशील । ब्रह्मभूत तूं होशील । रहा येथ ज्येष्ठ मासांत अमल । मौद्‍गल तुज ऐकवीन ॥१३॥
ऐसें त्याचें वचन ऐकून । शंभु ब्राह्मण हर्षयुक्त्त मन । सुशील स्त्रीसहित तेथ राहून । गुरुसेवा करितसे ॥१४॥
तदनंतर स्वल्प काळांत । ज्येष्ठ मास लागत । अन्य मुनिगणही तैं येत । मुद्‍गल पुराण श्रवणासी ॥१५॥
त्यास पाहून हर्षित । शुंभु झाला स्त्रीसहित । सर्व श्रोते विधियुक्त । तत्पर बसले पुराणश्रवणीं ॥१६॥
ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेस । योगिवर गौतम करी प्रारंभास । मौद्‍गल वाचनीं अति सरस । सर्वसिद्धद जें पुराण ॥१७॥
यथार्थ विवरण मौद्‍गल करित । ऐकून सर्व विस्मित । जाहले पुराणश्रवणीं रत । नित्य नियमें भक्तियुक्त ॥१८॥
तेथ एके दिनीं परम अद्‍भुत । एक घडे वृत्तान्त । एक गाढव अति दुःखित । आलें सत्वर पीडित तेथ ॥१९॥
तें दूर उभें राहून ऐकत । मौद्‍गलाचे श्लोक पुनीत । जरी होतें ज्ञानवर्जित । तरी पीडा शमली त्याची ॥२०॥
ह्रदयांत आनंद लाभून । तो गर्दभ करी श्रवण । पुढें गौतमाचें सार्थ पारायण । समाप्त झालें योग्य वेळीं ॥२१॥
सर्व जन स्वकर्म आचरित । पुनः प्रातःकाळीं येत । गर्दभ तो दुःखहीन होत । तत्क्षणीं हे महामुने ॥२२॥
तो गर्दभ स्वेच्छेनें जात । कालवश पुढें मरत । तेव्हां गणेशदूत येत । त्यास न्यावया स्वानंदलोकीं ॥२३॥
त्यास ते ब्रह्मभूत करिती । पुराणश्रवणाची ही महती । देवविप्रादी स्वर्गांत करिती । त्यास पाहून अति आश्चर्य ॥२४॥
नंतर आषाढ पूर्णिमेस करित । गौतम पुराण वाचन समाप्त । पारणा प्रतिपदेस करित । द्विजांसहित मोदभरें ॥२५॥
नंतर ते हर्षयुक्त परतत । त्यास नमून स्वाश्रमाप्रत । शंभु ब्राह्मण सुशीलेसहित । आपुल्या गृहासी परतला ॥२६॥
गणेश भजन करी सतत । जाणून त्याचा योगदेह मनांत । तदनंतर अल्प काळानंतर होत । सुशीला गर्भवती सुमुदित ॥२७॥
तीस गर्भवती पाहत । तैं शंभु अति विस्मित । नंतर शुभ मुहूर्तावर होत । पुत्र एक उत्तम त्यांना ॥२८॥
सर्व लक्षणयुक्त तीन सुत । त्यांस यथोचित काळीं होत । वेदज्ञ सर्वमान्य गणेशभक्त । तें पाहून शंभू तोषला ॥२९॥
आठवलें त्यास गौतमाचें वचन । मुद्‍गल पुराणीं झाला लीन । नित्य नेमें आदरपूर्ण । करी वाचन तयाचें तो ॥३०॥
अंतीं विघ्नेश्वराची प्राप्ती । होऊन तयासी लीणमति । जाहला ऐसी ही महती । मौद्‍गल पुराणाची ह्या ॥३१॥
नान जन गणेशाप्रत । पोहोचले श्रवणपठनें नियमित । किती वर्णावे तें समस्त । महिमा वर्णनातीत हा ॥३२॥
हें विप्रा तुज सांगितलें । ज्येष्ठ सार्धमासाचे भलें । मौद्‍गल श्रवणाचें महिमान केलें । स्वल्पभावें तुज कथन ॥३३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे मुद्‍गलदक्षसंवादे महोदरचरितमाहत्म्यवर्णनं नामाष्टाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP