मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४६

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४६

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जयजय जगदघनिवारिणी ॥ तूचि कृष्णे तृष्णेधनाग्नि ॥ सदा सदाशिव तुझे जीवनी ॥ वेणिरूपे मिळाला ॥१॥

नरहरीची ऐकोनि कथा ॥ म्हणती ऋषी शंकरसुता ॥ कृष्णामृतासि पिता पिता ॥ वाढे तहान आमुची ॥२॥

कृष्णेमाजी पिंडदान ॥ आहे कराया काल कवण ॥ जेणे जोडे नारायण ॥ सांगा लक्षण तयाचे ॥३॥

प्रश्न ऐकोनि ऐसा ऋषींचा ॥ म्हणे आत्मज पार्वतीचा ॥ कृष्णातटी पिंडदानाचा ॥ काल ऐका मुनी हो ॥४॥

अधिकमासी जन्मदिनी ॥ गुरुशुक्रअस्तमानी ॥ सिंहस्थ गुरूही असोनी ॥ श्राद्ध करावे भक्तीने ॥५॥

तरी विशेष पुण्यकाल ॥ तुम्हा सांगतो आता सकल ॥ शतपटीने पुण्यकाल ॥ इंदुक्षयी पिंडदा ॥६॥

राहुपर्वी फल सहस्त्र ॥ संक्रांतीसी शतसहस्त्र ॥ व्यतिपात असंख्य पुण्यकर ॥ अग्निकुमर म्हणतसे ॥७॥

सूर्यग्रहणी पर्वकाळी ॥ सुदेह असता गंगाजळी ॥ न करी स्नानासि तयाजवळी ॥ दुःखे सकळ राहती ॥८॥

रोगी होय जन्म सप्त ॥ न करी स्नानासि जो नदीत ॥ स्नानदाने फल अनंत ॥ प्राप्त होय मानवा ॥९॥

सोमसूर्यग्रहणवेळी ॥ पातसंक्रांती पुण्यकाळी ॥ मृत्यु येता आपुला जवळी ॥ दान सत्वर करावे ॥१०॥

मरण येईल कदा न कळे ॥ कदा जाईल द्रव्य सगळे ॥ जाणोनि ऐसे ज्ञानडोळे ॥ दान सत्वर करावे ॥११॥

विष्णु सर्व देवमय ॥ विप्र सकळ धर्ममय ॥ गया सकळ तीर्थमय ॥ होय मुक्तियोग हा ॥१२॥

कृष्णेमाजी स्नान करिता ॥ भक्तिपूर्वक दान देता ॥ भोग भोगोनि मुक्ति हाता ॥ येतसे मुनी हो ॥१३॥

कृष्णामहिमा काय वानू ॥ जेथे थक्क सहस्त्रवदनू ॥ परी यथामती यश पावनू ॥ करू वर्णन तियेचे ॥१४॥

ज्वालातीर्थापासोनिया ॥ पंच बाण प्रमाण जया ॥ म्हणती रुद्रतीर्थ तया ॥ भयापहारक जे असे ॥१५॥

रुद्रतीर्थापासाव धनु ॥ दहा असे जया प्रमाणु ॥ ते कौशिकतीर्थ गहनू ॥ कौशिकतपस्थान ते ॥१६॥

कृष्णाकौशिकसंगम जियेते ॥ करिती स्नानासि जे तेथे ॥ गंगामध्यगत शिवाहराते ॥ पूजिती ते मुक्तचि ॥१७॥

पुढे सप्तकुलोद्धार ॥ तीर्थ असे महाथोर ॥ जेथे सप्तकुलोद्धार ॥ स्नान करिता होतसे ॥१८॥

शौनकतीर्थ पापनाशन ॥ पुढे भारततीर्थ पावन ॥ जेथे दुष्यंतनंदन ॥ भरत ज्ञान लाधला ॥१९॥

जेथे उत्तंक याज्ञवल्क्य ॥ पूर्वी स्नानासि मुनिद्वय ॥ गेले असता नवल होय ॥ तेचि तुम्हा सांगतो ॥२०॥

स्नान करिता कृष्णावेणी ॥ होय उत्तरवाहिनी ॥ देखोनि जाहले तटस्थ मनी ॥ स्वस्थ तत्क्षणी बैसले ॥२१॥

तव तेथेचि बहुत ऋषी ॥ आले स्नान करायासी ॥ देखोनि तेही निजमानसी ॥ चकित जाहले मुनी हो ॥२२॥

सकळांसी आनंद होवोनिया ॥ म्हणती प्रत्यक्ष पूजा करू या ॥ म्हणोनि स्तविती नमोनि पाया ॥ मूर्ति पहाया तियेची ॥२३॥

जय जय कृष्णे भक्तवत्सले ॥ भक्तांसि गोचर तुझी पाउले ॥ आता धन्य करी डोळे ॥ दर्शन माते देई गा ॥२४॥

भक्तब्राह्मणप्रेमरक्षण ॥ करावे म्हणोनि तुझे जनन ॥ येरवी तू ब्रह्म निर्गुण ॥ दर्शन माते देई गा ॥२५॥

ऊर्ध्वरेतमुनी तुसी ॥ ठेविती निज ह्रदयकलशी ॥ भक्तांसि अजरामरचि करिशी ॥ दर्शन माते देई गा ॥२६॥

तू महा अमृतवाहिनी ॥ मोक्षधर्मार्थदायिनी ॥ सर्वकामसंजीवनी ॥ दर्शन माते देई गा ॥२७॥

आश्रय वर्णआश्रमांना ॥ तत्वज्ञ म्हणती हीच कृष्णा ॥ नको नको या विषयवासना ॥ दर्शन माते देई गा ॥२८॥

कृष्णादर्शना जो का निघाला ॥ तेणे ज्योतिष्टहोम केला ॥ पदोपदी हो नमितो तुला ॥ दर्शन माते देई गा ॥२९॥

एकदिनी तरी तुझे तीरी ॥ भक्तिपुरःसर कर्म जरी ॥ केले अछिद्र होय तरी ॥ दर्शन माते देई गा ॥३०॥

तेजोराज्यजयादि ही ॥ तुझे सेवने साधितो गृही ॥ जगदंबिके मां पाहि पाहि ॥ दर्शन माते देई गा ॥३१॥

तुझे माहात्म्य सदाशिव ॥ नेणे अनंत ब्रह्मदेव ॥ किंचित जाणी तो अग्निसंभव ॥ दर्शन माते देई गा ॥३२॥

असती जिचे आनंदगुण ॥ भासे शुभ्र कपिल दुरून ॥ तिला आम्ही पातलो शरण ॥ दर्शन माते देई गा ॥३३॥

शेषाकृती जी पातली येथ ॥ ती तू अपराध पोटी समस्त ॥ घालोनि करी हो आता कृतार्थ ॥ दर्शन माते देई गा ॥३४॥

स्तवन करिता यापरी ती ॥ उदकापासाव प्रसन्न मूर्ती ॥ निघे बाहेर दिव्यकांती ॥ पद्म हाती धरियेले ॥३५॥

शंखचक्रगदापाणी ॥ भक्तवरदा तिचे चरणि ॥ नमोनिया जय जय ध्वनी ॥ मुनी करिती सकळ हो ॥३६॥

सुवासिनी आबालवृद्ध ॥ करिती पूजेसि प्रेमबद्ध ॥ देखोनि तयांचा भाव शुद्ध ॥ देवोनि वर जाय ती ॥३७॥

मध्ये सकळ मुनीप्रती ॥ करोनिया महानदी ती ॥ दुभंग होवोनिया पुढती ॥ एक होवोनि जातसे ॥३८॥

मधु दूध दही साखर ॥ घृते पूजिली तेथ मधुर ॥ नामकतीर्थ होय सुंदर ॥ स्नाने यज्ञफळ देतसे ॥३९॥

देखोनि तो मधुर डोह ॥ इंद्रादि देव अप्सरांसह ॥ क्रीडार्थ राहिले म्हणे गृह ॥ एक महिना तेथ हो ॥४०॥

याचि तीर्थी मुनी कंक ॥ होता गायत्रीजापक ॥ तदा संतुष्ट होवोनि देख ॥ माग वर म्हणतसे ॥४१॥

तदा कंक गायत्रीसी ॥ म्हणे जो या संगमासी ॥ येवोनि तूझिये करी जपासी ॥ भक्तिपूर्वक अंबिके ॥४२॥

इच्छा तयाची करी पूर्ण ॥ ऐसे ऐकोनि कंकवचन ॥ बरे बोलोनि सुप्रसन्न ॥ अंतर्धान पावली ॥४३॥

तये वेळी कंकमुनीला ॥ आला पहाया विप्रमेळा ॥ पुढे प्रकार काय जाहला ॥ उत्तराध्यायी कथिन ते ॥४४॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ शेचाळिसावा अध्याय हा ॥४५॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये अंबिकादर्शनं नाम षट्‌चत्वारिंशोऽध्यायः ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP