मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २३

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २३

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

धवल रक्त कृष्ण गुण ॥ करी तयाचे आकर्षण ॥ म्हणोनि कृष्णा नामाभिधान ॥ साहमस्मीति भजावे ॥१॥

आता करा एकाग्र चित्त ॥ म्हणे मुनींप्रति अग्निसुत ॥ पापनाशनतीर्थ अद्‍भुत ॥ दुग्धतीर्थ तेथोनि ॥२॥

दधितीर्थ घृततीर्थ ॥ नवनीततीर्थ शुद्धांबुतीर्थ ॥ मधुतीर्थ खगतीर्थ ॥ नागतीर्थ तेथुनी ॥३॥

सिद्धतीर्थ अति पावनु ॥ पुढे असे तीर्थ विष्णु ॥ जयाचे प्रमाण वीस धनु ॥ नागारितीर्थ तेथुनि ॥४॥

कालकूटविषापरी ॥ उग्र असती पातके जरी ॥ तरी तयांचा विनाश करी ॥ नागारितीर्थ जाण पै ॥५॥

पुढे असे अर्कतीर्थ ॥ स्नान करिता दद्रु कुष्ठ ॥ तात्काळ होय समूळ नष्ट ॥ ऋषीतीर्थ तेथुनि ॥६॥

तेथोनिया पूर्व दिशी ॥ मार्कंडेय महाऋषि ॥ पूजन करोनि जगदंबिकेसी ॥ स्तवन करी प्रितीने ॥७॥

सकल जगाची व्हावया शांति ॥ तप करोनि प्रजापती ॥ जी का मेळवी भूमीवरूती ॥ नमन तियेसि पै माझे ॥८॥

स्वर्गासि जावया की पायरी ॥ वाटे जियेच्या उच्च लहरी ॥ हुंकारघोषे गंभीर वारी ॥ पापगिरी खाणि ते ॥९॥

जियेसि म्हणती कृष्णावेणी ॥ कमलाक्षी जी फेनहारिणी ॥ ब्रह्मप्रिया ज्ञानकारिणी ॥ सरस्वतीच की दुजी हे ॥१०॥

नातरी विष्णुरतिप्रिया ॥ कमलहस्त कमलालया ॥ दुर्गतिजरानाशकपया ॥ मातालक्ष्मीच पातली ॥११॥

जगदंबिका सौभाग्यदायिनी ॥ साक्षात वाटे ही मृडानी ॥ जी का शिवांकी सदा बसोनी ॥ कल्याण चिंती जगाचे ॥१२॥

विधात्याने पसरिली ॥ भूमीवरी ही कल्पवल्ली ॥ भक्तजनांसी जी साउली ॥ करी संताप हराया ॥१३॥

अनन्यभावे जिला शरण ॥ जाता पापी पुण्यवान ॥ होवोनि तुटे दुःखबंधन ॥ नमन तिला पै माझे ॥१४॥

झगडता लोहालागी परिस ॥ स्वर्ण होतसे बावन्नकस ॥ तैसा जियेचा होतांचि स्पर्श ॥ होय निष्पाप पातकी ॥१५॥

जी का दक्षिणेकडे गेली ॥ म्हणोनि दक्षिणगंगा बोलिली ॥ तीच कृष्णा माझी साउली ॥ वंदिली अनन्यभक्तीने ॥१६॥

यापरी ऋषीने करिता स्तुती ॥ जलापासाव प्रगटली मूर्ति ॥ प्रसन्न होवोनि ऋषीप्रति ॥ म्हणे इच्छिसी काय बा ॥१७॥

तधी मार्कंडेयऋषि ॥ म्हणे जोडोनि हस्त तिसी ॥ पूर्वी पूजोनि ह्रषीकेशी ॥ दीर्घायुषी जाहलो ॥१८॥

परी भक्तीविण जिणे ॥ गळा शेळीचे स्तन लोंबणे ॥ म्हणोनि द्यावे हेचि देणे ॥ भक्ति चरणी तुझीया ॥१९॥

शिवकृष्णाचरणी अखंड भक्ति ॥ मज असावी हे विनंति ॥ ऐकोनि म्हणे तथास्तु निगुती ॥ कृष्णामूर्ति ऋषीसी ॥२०॥

तुवा माझे स्तवन केले ॥ तेणेचि जेणे मज वर्णिले ॥ येथे जयाने स्नान केले ॥ दीर्घायु मेळवी सत्य तो ॥२१॥

ऐसे बोलोनि कृष्णामाउली ॥ तेथोनि अंतर्धान पावली मार्कंडेय तये वेळी ॥ तप करितचि राहिला ॥२२॥

श्रेष्ठ मार्कंडेयतीर्थ ॥ मार्कंडेयेश लिंग तेथ ॥ स्नाने पूजने पातके नष्ट ॥ होत कृष्णाकृपेने ॥२३॥

पुढले अध्यायी तीर्थ अमर ॥ महिमा सांगेल शंभुकुमार ॥ पावाल ऐकता सुख अपार ॥ निर्धार असावा मानसी ॥२४॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ त्रयोविंशोऽध्याय हा ॥२५॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये मार्कंडेयतीर्थवर्णनं नाम त्रयोंविशोऽध्यायः ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP