मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ८

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ८

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

वाहता कृष्णाप्रभंजन ॥ नष्ट होती दुरितघन ॥ कामक्रोधादि वृक्ष सघन ॥ पडती मोडोनि कडाडा ॥१॥

आता श्रोते एकचित्त ॥ होवोनि ऐका कथामृत ॥ महा पापीही होय पुनीत ॥ विरिंचिसुत म्हणतसे ॥२॥

मागील अध्यायी सत्यकथा ॥ तुम्हा जाहलो मी सांगता ॥ योगसंसिद्ध ऐकोनि भ्राता ॥ वेदे अहंता सोडिली ॥३॥

वेदासी बोले सत्यतात ॥ जावे तुवा अग्रजाप्रत ॥ भेटी होता तुज त्वरित ॥ दुःखविमुक्त होशील ॥४॥

तदा तातासी नमस्कार ॥ करोनि निघाला तपनकुमार ॥ अग्रजा पाहोनि हरहर ॥ म्हणे भूभार जाहलो ॥५॥

ऐसा अनुतापी जाणून ॥ सत्य हासोनि बोले वचन ॥ श्रीकृष्णेचे करी सेवन ॥ एकाग्रमने करोनी ॥६॥

बरे बोलोनि कृष्णेवर ॥ स्नान करी द्विजवर ॥ पूजीतसे सत्येश्वर ॥ गौरीहर पशुपति ॥७॥

जितश्वास निराहार ॥ मानसी जपे मंत्र अघोर ॥ बारा वर्षे होता वर ॥ माग म्हणे पिनाकी ॥८॥

ऐशी ऐकोनिया उक्ति ॥ वेद नमोनी शिवाप्रति ॥ म्हणे द्यावी गा सद्‌गति ॥ योगी वंदिती जियेसी ॥९॥

माझे नामे हा पर्वत ॥ राहो देवा सदोदित ॥ आणि जे का मी याचित ॥ उमाकांता द्यावे गा ॥१०॥

माझा पिता जो तपन ॥ नाम तयाचे करोनी धारण ॥ येथे वसावे जी आपण ॥ माझी आण महेशा ॥११॥

आम्हा उभयतांचे मधी ॥ महापुण्या कृष्णानदी ॥ असावी हे कृपानिधि ॥ येवढी आधी दयाळा ॥१२॥

सत्यतीर्थी करोनि स्नान ॥ घेती जे तुझे दर्शन ॥ तयां मिळो परमस्थान ॥ हेचि मागणे पुरवी गा ॥१३॥

तपनेश्वर आणि वेदगिरि ॥ मध्ये कृष्णेत देह जरी ॥ पडे तरी अंधकारी ॥ मुक्त करी दयाळा ॥१४॥

ऐसे म्हणोनी स्वस्तिकासनी ॥ बैसोनि चिंती शूलपाणी ॥ प्राणापानैक्य करोनी ॥ चैतन्य चित्ती ठेविले ॥१५॥

तपन तपे शतरुद्रीय ॥ प्रसन्न होवोनि मृत्युंजय ॥ म्हणे बापा इच्छिसी काय ॥ सांग निर्भय मानसे ॥१६॥

ऐकोनि म्हणे तपन देवा ॥ देई मज हाचि मेवा ॥ सदा घडो चरणसेवा ॥ प्राणविसावा तूचि मज ॥१७॥

सर्व जंतूत तुझी वसति ॥ म्हणोनि बोलती श्रुतिस्मृती ॥ सर्वशांत त्रिगुणमूर्ति ॥ वर्णू किती मी वाचे ॥१८॥

वाणीमनाचा अविषय ॥ सर्वज्ञ जो योगगम्य ॥ जो का चिदात्मा योगवंद्य ॥ तोच करी जगदीशा ॥१९॥

ऐसा स्तविला जयाशी ॥ स्पर्शी तोचि तपनासी ॥ बोलता झाला योगऋषी ॥ ऋषिप्रती तेधवा ॥२०॥

नित्यानंद पराशांति ॥ वरेण्य अमृत मज बोलती ॥ ऐशी अद्वैत शिवस्फूर्ति ॥ जाण निश्चिती परात्मा ॥२१॥

ऐसे बोलोनि तपनाप्रति ॥ तात्काळ बैसे नंदीवरती ॥ गमन करी कैलासपति ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥२२॥

तया तपनेश्वरापासाव ॥ होय गंगासमुद्भव ॥ अगस्त्याश्रमी येता स्त्राव ॥ कृष्णासंगम पावली ॥२३॥

सत्य तीर्थाचे महिमान ॥ करिता जयाचे संस्मरण ॥ महापापीही उद्धरून ॥ कैलासभुवन पावती ॥२४॥

तेथोनी एक कोसावरी ॥ विष्णुतीर्थ असे निर्धारी ॥ अश्वत्थरूपी नरहरी ॥ वास करी ज्या ठायी ॥२५॥

करोनि वनस्पतीमंत्रोच्चार ॥ प्रदक्षिणा शत अष्टोत्तर ॥ प्रातःकाळी करिता नर ॥ दोशवर्जित होतसे ॥२६॥

विष्णुतीर्थी द्वादशीसी ॥ श्राद्धादि करी उपवासी ॥ पितर होती वैकुंठवासी ॥ जे का नरकासी पावले ॥२७॥

पुढिले अध्यायी कथा सुंदर ॥ मुक्त झाला सप्तकर व अग्नितीर्थ सिद्धेश्वर ॥ महिमा जेथ वर्णिला ॥२८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ अष्टमोऽध्याय वर्णिला ॥२९॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये तपनोद्धारवर्णनं नाम अष्टमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP