मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५५

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५५

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

यमदंड भय तोवरी ॥ कृष्णा मृत्युंजय जोवरी ॥ नाही अर्चिला ह्रदयांतरी ॥ संतत निष्काम भक्तीने ॥१॥

म्हणे नारद मुनिवराते ॥ आता अवधान द्यावे कथेते ॥ पूर्वाध्यायी जमदग्निसुते ॥ केले संगमी तप बहु ॥२॥

राम साक्षात विष्णूचा अंश ॥ किमर्थ केले तेणे तयास ॥ ऐसे ते मुनि कार्तिकास ॥ प्रश्न करिती नमोनी ॥३॥

तये वेळी षडानन ॥ म्हणे ऐका चित्त देऊन ॥ एकवीसदा भृगुनंदन ॥ करी निःक्षत्र भूमिसी ॥४॥

जरी मारिले क्षत्र दुष्ट ॥ तरी पाप ते जाहले स्पष्ट ॥ म्हणोनि व्हावया समूळ नष्ट ॥ तीर्थयात्रेसि निघाला ॥५॥

समस्त तीर्थी करी स्नान ॥ करी समस्त सुरपूजन ॥ परी समस्त पापक्षालन ॥ नाही जाहले तयाचे ॥६॥

आला शेवटी मलापहेसी ॥ जी का सकल पाप नाशी ॥ सह्याद्रीपासाव उगमासी ॥ देखोनि करी स्नान तो ॥७॥

तेथोनि चार कोसांमधी ॥ तीर्थे आहेत शतावधी ॥ लिंगद्वय पूजिता सिद्धी ॥ देत तेही पाहिले ॥८॥

ऐसा तीर्थे करित करित ॥ भार्गव पावला संगमी त्वरित ॥ तव कुठारापासाव अवचित ॥ क्षत्रहत्या निघे ती ॥९॥

ज्वालामयी उग्र मूर्ति ॥ म्हणे तदा ती भार्गवाप्रती ॥ आले येथवरी तुझे संगती ॥ परी भीति मज वाटते ॥१०॥

उदकमयी हो आदिमाता ॥ अमृतमयी ही होय भक्ता ॥ असे ज्वालामयी अभक्ता ॥ कृष्णा मलापहारिणी ॥११॥

ऐसे बोलोनि संगमोदकी ॥ लय पावली तात्काळ निकी ॥ अग्निस्पर्शे तप्त कनकी ॥ कैचा मल ठरेल ॥१२॥

तदा भार्गव म्हणे आहा ॥ पुण्यमूर्ति ही मलापहा ॥ दैवे जाहला लाभ हा ॥ पहा हत्या निवटली ॥१३॥

ही उत्तरवाइनी जेथ ॥ तेथे स्नानादि भक्तियुक्त ॥ भानुवासरी करिता अनंत ॥ फलदायक होतसे ॥१४॥

मलापहेची बरोबरी ॥ काय करिती आपगा येरी ॥ विशेष कपिलातीर्थ थोरी ॥ संगमापरियंत हो ॥१५॥

बोलोनि यापरी जगन्नाथ ॥ करी स्नानासि विधियुक्त ॥ पितर देवता तृप्त करित ॥ क्षेत्रेश्वरा पूजोनी ॥१६॥

स्मरण करिता केवळ जयाचे ॥ कदा नसे भय रोगादिकांचे ॥ जे न पूजिती पद तयाचे ॥ तयांचे पुण्य तो हरी ॥१७॥

ऐसा क्षेत्रेश्वरा नमून ॥ मग जेथे उमारमण ॥ तेथे येवोनि स्तोत्रपठण ॥ करी भक्तीने भार्गव ॥१८॥

शंकराचे पदद्वय ॥ पूजोनि मग रेणुकातनय ॥ विडे देवोनि तुष्ट होय ॥ पंचलिंगासि पाहता ॥१९॥

म्हणे मुनीला तो भार्गव ॥ अहो पहा पंचमुख शिव ॥ सद्योजातमुख कैरव ॥ शोभे वायव्येसी ॥२०॥

कामदमन ईशान्येसी ॥ तत्पुरुष आग्नेयी दिशी ॥ अघोर मुख नैऋत्येसी ॥ ईशानमध्ये मुक्तिद ॥२१॥

पहिले धर्मद दुजे सिद्धिद ॥ अर्थद तिजे चौथे शांतिद ॥ ऐसा मंत्रे पूजिता सुखद ॥ भवदावानल देव हा ॥२२॥

एकदा नर पूजिता यांसी ॥ मुक्तपातक जाय कैलासी ॥ सिद्धि पावले येथे सुरर्षी ॥ ब्रह्मर्षि राजर्षि बहुतची ॥२३॥

बोलोनि यापरी रेणुकाकुमर ॥ आला जेथे अमृतेश्वर ॥ तया पूजोनि षोडशोपचार ॥ म्हणे परशुराम तो ॥२४॥

अहो आश्चर्य सर्वा भूता ॥ जो हा सनातन धाता विधाता ॥ तो अमृतेश पूजिता भक्ता ॥ सायुज्यताही देतसे ॥२५॥

पूर्वी करोनि पूजा जयाची ॥ होय वज्रात्मक दधीची ॥ वृत्रा वधाया इंद्र याची ॥ काया दधीचीकारणे ॥२६॥

सवेंचि देई तो शरीर ॥ इंद्रे तयाचे करोनि वज्र ॥ ठार मारिला उग्र वृत्र ॥ अमृतेश्वरकृपेने ॥२७॥

ब्रह्मा विष्णु आदि अंत ॥ पाहता जयाचा दोघे कुंठित ॥ झाले करितो साष्टांगपात ॥ ज्योतिर्लिंगासि तया मी ॥२८॥

करोनि यापरी भक्तीने स्तव ॥ करी प्रदक्षिणा तो भार्गव ॥ क्षेत्रस्थ देखोनि देव सर्व ॥ आला संगमी शेवटी ॥२९॥

मग करोनि माध्यान्हिक ॥ फिरोनि पूजिला अंधकांतक ॥ नमोनिया निज मस्तक ॥ उपटून घेऊ म्हणतसे ॥३०॥

तव ते लिंग न ये हाती ॥ राम जाहला खिन्नमूर्ती ॥ मग तयाची व्हावया प्राप्ती ॥ दिव्य तपासी मांडिले ॥३१॥

तदा ज्योतिर्मय धूर्जटी ॥ प्रगट होवोनि भक्तजेठी ॥ म्हणे होऊ नको कष्टी ॥ येथेचि वस्ती करीन मी ॥३२॥

तू तरी आहेसि माझेचि रूप ॥ ऐसे ऐकोनि भृगुप्रदीप ॥ स्थापी तेथेचि अद्याप ॥ दिसते उत्तर तुंड ते ॥३३॥

रामे लिंग केले कर्षण ॥ ही तयाची असे खूण ॥ वसे यापरी संगमेशान ॥ भक्तकल्याणकारक ॥३४॥

असो भार्गव कित्येक दिवस ॥ राहोनि गेला अमरावतीस ॥ आणि सांगे सुरेंद्रास ॥ पापशमन हेचि हो ॥३५॥

उत्तरवाहिनी मलापहेचा ॥ संगम झाला कृष्णावेणीचा ॥ निवास तेथे गंगादिकांचा ॥ म्हणोनि जावे तुवाही ॥३६॥

नारद म्हणे मुनिवराला ॥ ऐसे भार्गवचरित्राला ॥ कथिले भक्तीने ऐकता तयाला ॥ सायुज्यलाभ होतसे ॥३७॥

भाव असावा आपुले मनी ॥ मग भजावी कृष्णावेणी ॥ सकळ सुखाची उदार जननी ॥ सत्य सत्य मुनी हो ॥३८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचावन्नावा अध्याय हा ॥३९॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये नाम अध्यायः ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP