मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २१

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २१

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णारामाविलासिनी ॥ पापी शततुंडरावणार्दिनी ॥ मोहमलासुराघातिनी ॥ नमन चरणी तियेचे ॥१॥

कृष्णेत तीर्थे असंख्य असती ॥ परी मुख्य यथामती ॥ सांगतो आता तुम्हाप्रति ॥ म्हणे उमापतिबाळक ॥२॥

ब्राह्मण एक वेदपारगु ॥ वंश ज्याचा असे भृगु ॥ संततीवीण होय पंगु ॥ काय सांगू दुःख ते ॥३॥

विप्रे वेचिले धन अपार ॥ पत्‍नी झिझवी बहुत पार ॥ वार्धक्य येता दैवे कुमार ॥ लाधला परी दुर्गुणी ॥४॥

बाळ असता पिता तयाचा ॥ पंचत्व पावला बैसोनि वाचा ॥ मातेसी सती जावयाचा ॥ पंथ रुचला तेधवा ॥५॥

मातापितारहित बाळु ॥ देखोनि एक द्विज दयाळु ॥ होता करीत सांभाळु ॥ मन मवाळू तयाचे ॥६॥

जेणे केले मौजीबंधन ॥ तोहि पोषक पावला मरण ॥ वय होते बारा हायन ॥ बाळकाचे तेधवा ॥७॥

ऐसा निराधार बाळक ॥ भिल्लदेशी जावोनि देख ॥ भिल्लसंगे मार्गी पथिक ॥ लुटी दुःख देउनी ॥८॥

भिल्लकन्या देखोनि सुंदर ॥ तियेसी जाहला रत पामर ॥ तिये ठायी बहु कुमर ॥ उत्पन्न करी भ्रष्ट तो ॥९॥

कुटुंबपोषण हिंसा करून ॥ करी सदा तो द्विजनंदन ॥ एकदा कृष्णातटी येऊन ॥ पाहे ब्राह्मणवरांसी ॥१०॥

यज्ञपात्रे देखोनि बहुत ॥ द्यावी म्हणे मज समस्त ॥ अन्यथा घेईन तुमचे जीवित ॥ होईन कृतांत आजि मी ॥११॥

यापरी बोलोनि भिल्लिणीपति ॥ बाण जोडोनि धनुष्याप्रति ॥ उभा ठाकला तयांपुढती ॥ देखोनि बोलती ऋषिवर ॥१२॥

घेई आमुचे सर्वस्व बापा ॥ अंतरी पावू नको तापा ॥ परी देशील कवणा सांग पा ॥ तू एकटाचि भाससी ॥१३॥

येरू म्हणे बाइल माझी ॥ सुना लेकरे सर्व माझी ॥ ऋषि म्हणती पापओझी ॥ घेतील तुझी काय ती ॥१४॥

बरे असो जावोनि आता ॥ विचारी आपुले बाइलसुता ॥ की मी करितो तुम्हांकरिता ॥ जीवहत्या अनेक ॥१५॥

तया पापासि विभागी मी ॥ एकटाचि की सकल तुम्ही ॥ पुसोनि येसी तोवरी आम्ही ॥ सत्य येथेचि बैसतो ॥१६॥

ऐसी ऋषींची ऐकोनि मात ॥ पळोनि जातील कदाचित ॥ म्हणोनि तयां बांधोनि ठेवित ॥ वृक्षासि दुष्ट घातकी ॥१७॥

घरी जाऊनि कुटुंबासि ॥ विचारिता ती उत्तर तयासि ॥ देती काय ते अहो ऋषी ॥ ऐका स्वस्थ होवोनी ॥१८॥

आम्ही तरी पोष्यवर्ग ॥ नेणो शुभाशुभ तुझा मार्ग ॥ जैसे जयाचे कर्मभोग ॥ लाधे तोचि तयापरी ॥१९॥

तू आपुले पातकासी ॥ आम्हा विभागी करू पाहसी ॥ परी अनीति घडेल ऐशी ॥ कैशी सांग तूचि रे ॥२०॥

ऐसे ऐकतांचि झाला खिन्न ॥ फेकोनि दिधले धनुष्यबाण ॥ मुनींसि आला तात्काळ शरण ॥ घाली लोटांगण भूमीसी ॥२१॥

ठार जाहलो स्वामी आता ॥ कवण तुम्हाविणे त्राता ॥ तुझे कर्म तूचि भोक्ता ॥ ऐसे म्हणितले सुतादिकी ॥२२॥

ऐसा पश्चात्ताप होऊन ॥ शरण आला असे पाहून ॥ दया उपजली ऋषींकारण ॥ दीनोद्धरण कराया ॥२३॥

तारकमंत्र उपदेशूनि ॥ जातांचि ऋषी तात्काळ वनी ॥ राम रामजप आसनी ॥ करीत बैसला तो द्विज ॥२४॥

ऐसा जपता मंत्र अंतरी ॥ वारूळ वाढले तया उपरी ॥ शिष्या पहाया कालांतरी ॥ तेचि गुरुवर पातले ॥२५॥

तव वाढले तेथ वल्मीक ॥ देखोनि शिंपिता कृष्णोदक ॥ उत्पन्न जाहला ऋषि वाल्मीक ॥ भंग होवोनी तत्काळ ॥२६॥

वाल्मीकेश्वर कृष्णातटी ॥ स्थापोनि राहे तयानिकटी ॥ वाल्मीक ऋषि ज्ञानदृष्टी ॥ गुरुकृपे जाहला ॥२७॥

वाल्मीकतीर्थी स्नान करिता ॥ वाल्मीकेश्वरा पूजोनि नमता ॥ संसार होय तया परता ॥ मुक्ति हाता येतसे ॥२८॥

पुढले अध्यायी पापनाशन ॥ तीर्थमहिमा अंबिकास्तवन ॥ करिता जयाचे श्रवण पठण ॥ पूर्ण मनोरथ होतील ॥२९॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकविंशोऽध्याय वर्णिला ॥३०॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये वाल्मीकतीर्थवर्णनं नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP