मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय १०

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १०

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

विकास पावता कृष्णारविंद ॥ गुंजारव करिती भक्तमिलिंद ॥ प्रेमेचि धावती येता सुगंध ॥ मकरंद सेवन करावया ॥१॥

कृष्णामाहात्म्य ऐकता ॥ निर्भय होय श्रोता वक्ता ॥ संशय नुरे मनन करिता ॥ मुक्तता पावे निजध्यासे ॥२॥

ऋषींस म्हणे ब्रह्मतनय ॥ वैराजक्षेत्र महापुण्य ॥ स्मरणे ज्याचिया चित्तजन्य ॥ दोष दहन पावती ॥३॥

जेथे ब्रह्मा वैराजकल्पी ॥ द्वादशाब्द सत्र संकल्पी ॥ बुडो वासना निर्विकल्पी ॥ हाचि हेतू धरोनि ॥४॥

तये सत्रामाजी शब्द ॥ भोजन करा तुम्ही स्तब्ध ॥ दैवे झाला हरी लब्ध ॥ आपुलीये उच्छिष्टे ॥५॥

सुखप्रद असे जे सत्र ॥ सर्वत्र असे सुवर्णपात्र ॥ सभासद ऋषी सकलत्र ॥ यज्ञकर्मी पै असती ॥६॥

वसु मनू विद्याधर ॥ सिद्ध गंधर्व सकल अमर ॥ अप्सरागण सपरिकर ॥ यज्ञकर्मी पै असती ॥७॥

यूप वेदी कनकाची ॥ सुपे उखळी त्यापरीची ॥ स्रुक् स्त्रुवा कल्पतरूची ॥ विरिंची यजमान जयाठायी ॥८॥

चित्रविचित्र मृगाजिन ॥ कंबल आणि दर्भासन ॥ विशाल मंडप शोभायमान ॥ विश्वकर्मे निर्मिला ॥९॥

शंख दुंदुभी वाजती ॥ गंधर्वगण मधुर गाती ॥ ऋग यजू साम पढती ॥ मूर्तिमंत्र जयाठायी ॥१०॥

नैऋत्येस पत्‍नीशाला ॥ आग्नेयदिशी पाकशाला ॥ पश्चिमेस पुष्पमाला ॥ वायव्येसी द्विजतर्पण ॥११॥

उत्तरेस अश्वहत्ती ॥ धनधान्या नाही मिती ॥ ईशान्येस देव वसती ॥ ब्रह्मसभा पूर्वेसी ॥१२॥

ऐशी असे सर्व आयति ॥ परि नसे दाक्षायणीपती ॥ म्हणोनि आसनी कोणी न बैसती ॥ तदा ब्रह्मा बोलला ॥१३॥

रुद्राविण यज्ञप्राप्ती ॥ कैसी होईल मजप्रति ॥ ऐकोनिया देव म्हणती ॥ वायूप्रति सत्वर ॥१४॥

जाऊनिया वाराणशी ॥ उमेसहित शंकराशी ॥ दंडपाणी माधवासी ॥ शीघ्र आणी या ठायी ॥१५॥

ऐसे परिसोनिया वात ॥ काशीस जावोनि जगन्नाथ ॥ तैसाचि विनवी उमाकांत ॥ वंदोनि पाय तयांचे ॥१६॥

कराया चलावे सोमपान ॥ तुम्ही कौस्तुभ सौमार्धभूषण ॥ समारंभी सत्र कमलासन ॥ येऊनि सांग करावे ॥१७॥

स्वाहा स्वधा वषट्‌कार ॥ प्रणव यज्ञ ॐकार ॥ तुजविण कैसे विश्वंभर ॥ परिपूर्ण होती सांगपा ॥१८॥

ऐशी ऐकोनि विनंती ॥ संतोषोनि म्हणे भगवती ॥ त्वरित चलावे यज्ञाप्रति ॥ प्रजापती तोषव ॥१९॥

तदा गौरी त्रिलोचन ॥ लक्ष्मीसहित मधुसूदन ॥ नंदी गरूडारूढ होऊन ॥ वैराजक्षेत्री निघाले ॥२०॥

श्वेत कृष्ण धूम्राक्ष ॥ दंडपाणी पद्माक्ष ॥ गदा खड्‌ग परश धनुष ॥ घेवोनि गण निघाले ॥२१॥

कलावती चंद्रवती ॥ पद्ममालिनि मालती ॥ विश्व आणि हेमकांती ॥ विद्याधरी निघाल्या ॥२२॥

असित भरद्वाजान्वय शिव ॥ देवल व्यास मुनिपुंगव ॥ सस्त्रीक निघाले अभिनव ॥ यज्ञशोभा पहाया ॥२३॥

ऐसा आला पाहोनि शंभु ॥ हर्षे दाटला तो स्वयंभु ॥ म्हणे झाला महालाभु ॥ शीघ्र सन्मुख निघाला ॥२४॥

शंख दुंदुभी वेदघोष ॥ करिती होवोनि अति हर्ष ॥ ऐसा आणिला पार्वतीश ॥ यज्ञयश मिळवाया ॥२५॥

विश्वेश्वर महाविष्णु ॥ पूजोनि बोले कमलासनु ॥ अंबिकेसहित आपुले चरण ॥ लागता पावनु होय मी ॥२६॥

ब्रह्मा बोले हरिहरांस ॥ पूर्ण केले तुम्ही यज्ञास ॥ आता रक्षावे यमसदनास ॥ प्रलयकालपर्यंत ॥२७॥

ऐकोनि ब्रह्मयांचे वचन ॥ तथास्तु बोले गौरीरमण ॥ कृष्णातीरी वास करून ॥ राहते झाले तेधवा ॥२८॥

तयांची आज्ञा घेवोन ॥ यज्ञास आरंभी चतुरानन ॥ ऋत्विजां वरावया कारण ॥ पाचारण करी पत्‍नीसी ॥२९॥

अरुंधती भानुमती ॥ पूजीतसे सावित्री सती ॥ हळदी कुंकुम देत होती ॥ गंध तांबूल कंचुकी ॥३०॥

तदा कोपोनि सरस्वती ॥ बोलती झाली शांडिल्याप्रति ॥ पवित्र व्हावया सत्रपूर्ती ॥ गायत्रीसि पाचारी ॥३१॥

ऐकोनि शांडिल्य गायत्रीसी ॥ आणिता विधि सत्रासी ॥ प्रारंभ करिता अति त्रासी ॥ स्त्रीस्वभावे सावित्री ॥३२॥

कोपोनि म्हणे गायत्रीसी ॥ मजवाचूनि पतिस्थितीसी ॥ कोठेही तू न पावसी ॥ अगे सवती निश्चये ॥३३॥

सावित्री बोलोनि यापरी ॥ अंतर्धान पावे वटाभीतरी ॥ सवेंचि तेथोनि निघे वारी ॥ प्रवाहरूपे जातसे ॥३४॥

पश्चिमाब्धिची धरिता वाट ॥ ब्राह्मण करिती कलकलाट ॥ सवेचि धावती पाठोपाठ ॥ परत भेट व्हावया ॥३५॥

जाती विप्र समुद्रतीरी ॥ तो सागरामाजी प्रवेश करी ॥ ऋषींस म्हणे तारकारी ॥ तीर्थ थोर ते झाले ॥३६॥

सावित्रीसी न देखता ॥ मूर्च्छा पावे सृष्टिकर्ता ॥ महापापी असुर अवचिता ॥ आला क्रियालोपार्थ ॥३७॥

ब्रह्मयासी नाही शुद्धि ॥ आला असे पापबुद्धि ॥ ऐसे जाणोनि दंडपाणि तधी ॥ महादेवासी कळवीतसे ॥३८॥

ऐकोनिया अंधकारी ॥ शूल फेकी तयावरी ॥ असुर चकवोनी झडकरी ॥ सह्यजातीरी बुडाला ॥३९॥

ऐसे जाणोनि पिनाकपाणी ॥ सुदर्शन घेत विष्णूपासोनि ॥ सोडोनि मारिला पापखाणी ॥ रजनीचर तात्काळ ॥४०॥

तेथ जाहले चक्रतीर्थ ॥ स्नाने पावती चारी पुरुषार्थ ॥ त्रिशूळ फेकिला ते तीर्थ ॥ त्रिशूल नामे जाणावे ॥४१॥

सिद्धेश्वरापासून ॥ दंडशते त्रिशूल जाण ॥ वीस धनुष्य तेथून ॥ पतितपावन चक्रतीर्थ ॥४२॥

चक्रतीर्थी अन्नदान ॥ करता तोषे गौरीरमण ॥ पंचवीस धनु चक्रतीर्थाहून ॥ महाभैरव तीर्थ ते ॥४३॥

आश्विनमासी रविवारी ॥ प्रातःकाळी मौन धरी ॥ स्नान करोनि दर्शन करी ॥ फिरोनि उदरी न ये तो ॥४४॥

भैरवतीर्थी करोनि स्नान ॥ घेता कालभैरव दर्शन ॥ पुण्य जोडे काशीहून ॥ यवा आगळे बोलती ॥४५॥

कालभैरव क्षेत्राधिप ॥ देखता पुण्य जोडे अमूप ॥ दग्ध होय महापाप ॥ काय वर्णू ऋषी हो ॥४६॥

चक्रतीर्थ भैरवतीर्थ ॥ मध्ये असे हरिहरतीर्थ ॥ विशालाक्षी कृपा करित ॥ काय वर्णू ऋषी हो ॥४७॥

अष्टमी चतुर्दशी एकादशी ॥ सतिल करता स्नानासी ॥ विशालाक्षी हरिहरासी ॥ तिल बिल्वपत्रे पूजिता ॥४८॥

स्वर्गी राहे तो नर ॥ यावच्चंद्र दिवाकर ॥ ऐसे तीर्थ महाथोर ॥ काय वर्णू ऋषि हो ॥४९॥

अमा रविवारी धेनूसी ॥ देता महाकाल साक्षीसी ॥ मधुकुल्या क्षीरकुल्यासी ॥ भक्षिती पितर तयांचे ॥५०॥

सोमवारी श्रवण येता ॥ स्नान करोनि वस्त्रदाता ॥ त्रिशूलेश्वर तुष्ट होता ॥ सोमलोक मेळवी ॥५१॥

माघशुक्ल द्वादशीसि ॥ मालतीपुष्पे विष्णुसि ॥ पूजिता पावे लक्ष्मीसि ॥ ह्रषीकेशीप्रसादे ॥५२॥

महाशिवरात्री मध्यरात्रीसी ॥ पंचामृते विश्वेश्वरासी ॥ स्नान घालिता त्या नरासी ॥ कैलासवासी मुक्त करी ॥५३॥

कन्याराशीस येता गुरु ॥ बिल्वपत्रे विश्वेश्वरू ॥ पूजिता त्याने महाथोरू ॥ दान दिधले निश्चये ॥५४॥

स्कंद म्हणे ऋषींप्रति ॥ ऐशी तीर्थे अपरिमिती ॥ कृष्णेमाजी पाप हारिती ॥ भक्तजनांचे तात्काळ ॥५५॥

विश्वेश्वर दंडपाणी ॥ माधव कृष्णातटी राहुनी ॥ रक्षण करिती ब्रह्मयज्ञी ॥ भक्तजनांचे सर्वदा ॥५६॥

हा अध्याय वासरमणी ॥ उगवता जाय तम निरसुनी ॥ सत्यज्ञानस्वरूप होवोनि ॥ निरंजनी राहती ॥५७॥

पुढले अध्यायी कथा सुंदर ॥ रामतीर्थमहिमा थोर ॥ ऐकावा तो सपरिकर ॥ अंतर सावध करोनी ॥५८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ दशमोऽध्याय वर्णिला ॥५९॥

॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये भैरवतीर्थवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP