मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २९

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २९

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

सोडोनिया संभोगतृष्णा ॥ भजा भजा हो माऊली कृष्णा ॥ देईल तुम्हा अन्न वसना ॥ अन्य वासना पुरवील ही ॥१॥

निर्धार कृष्णाचरणारविंदी ॥ असता जोडे तात्काळ सिद्धी ॥ स्कंद म्हणे हो आता अधी ॥ अवधान द्यावे कथेसी ॥२॥

पूर्वाध्यायी ब्राह्मणांनी ॥ उपदेश केला की मनी ॥ अनुताप होता पुरतेपणी ॥ पापहानी जाहली ॥३॥

असे जयाची निर्मळ मती ॥ कृष्णाचरणी निष्काम भक्ती ॥ स्नान करिता मानसतीर्थी ॥ परम गतीते मेळवी ॥४॥

काम क्रोध मद मत्सर ॥ इयांचा नसे जेथ अंकुर ॥ तेथेचि नैमिष कुरुक्षेत्र ॥ पुष्करादि राहती ॥५॥

ऐसा उपदेश केला जरी ॥ तथापि राहिला संशय अंतरी ॥ जाणोनि ऐसे पुढे यापरी ॥ कथन करिती विप्र ते ॥६॥

तुम्ही जावे कृष्णावेणीसी ॥ कोपेश्वराचे दक्षिणेसी ॥ तीर्थ प्रभास नाम ज्यासी ॥ तेथे माते घेउनी ॥७॥

तेथे करितांचि तुम्ही स्नान ॥ होईल तुमचे शुद्ध मन ॥ कोपेश देखोनि तया नमन ॥ भक्तिपूर्वक करावे ॥८॥

उग्र पातक जाईल कैसे ॥ तुम्ही म्हणाल जरी ऐसे ॥ तरी तीर्थफळ पांचासि नसे ॥ ऐका कवण ते सांगतो ॥९॥

पापिष्ठ संशयी आणि तार्किक ॥ अविश्वासी आणि नास्तिक ॥ तीर्थफळाचा लेशही एक ॥ यांसि कधीही न लाधे ॥१०॥

यास्तव तुम्ही आमुचे वचनी ॥ विश्वास ठेवोनि जाता क्षणी ॥ करील कृपा कृष्णावेणी ॥ आदिजननी जगाची ॥११॥

यापरी बोलोनि ते बोल ॥ देती चौघांसी कृष्ण तिल ॥ म्हणती होतांचि हे शुक्ल ॥ पाप गेले जाणिजे ॥१२॥

ऐसे ऐकोनि ते चौघे ॥ मातेसी घेवोनिया संगे ॥ प्रभासतीर्थी येवोनि वेगे ॥ स्नान करिती त्रिवार ॥१३॥

उदकापासाव बाहेर आले ॥ तंव कृष्ण तिल शुक्ल देखिले ॥ यास्तव शुक्लतीर्थ म्हणितले ॥ तया तीर्थासि मुनी हो ॥१४॥

मातेसहीत चौघे जण ॥ शुक्लतीर्थी करोनि मज्जन ॥ करिती कोपेश्वरपूजन ॥ तव विमान पातले ॥१५॥

पंचवदन देवदूत ॥ आले न्यावया पांचाप्रत ॥ बैसवोनिया विमानी त्वरित ॥ नेले मिरवीत शिवपदा ॥१६॥

यापरी शुक्लतिर्थप्रसिद्धी ॥ मध्यान्हकाळी उदकवृद्धि ॥ होते सदा का हेचि आधी ॥ तुम्हांलागी सांगतो ॥१७॥

मध्यान्हकाळी कृष्णेप्रती ॥ पाहू म्हणे भागीरथी ॥ गोदा यमुना सरस्वती ॥ तीर्थे येताती सर्वही ॥१८॥

ऐसी कृष्णा पुण्यापावना ॥ शुक्लतीर्थ हा तीर्थराणा ॥ मध्यान्हकाळी करितांचि स्नाना ॥ ब्रह्महत्या नुरतसे ॥१९॥

यापरी सत्यवतीसुते ॥ याज्ञवल्क्या सांगोनि तेथे ॥ स्नान करोनि कोपेश्वराते ॥ पूजिते जाहले उभयता ॥२०॥

उभयतांनी तेथ तपा ॥ करोनि जोडिली ईशकृपा ॥ रुद्रसूक्ते स्नान पुष्पा ॥ गंध धूपासि अर्पुनी ॥२१॥

नमन करोनि कोपेश्वरा ॥ गेले उभयता चंद्रेश्वरा ॥ जेथे जाहली मुक्ति चंद्रा ॥ गुरुदारपातकापासुनि ॥२२॥

चंद्रतीर्थ ते पापनाशन ॥ तेथे करोनिया स्नान ॥ पूजोनि चंद्रेश्वरा तेथुन ॥ गया क्षेत्रासि पातले ॥२३॥

चार दिवस राहोनिया ॥ तेथे करावी रामगया ॥ ऐसे सांगता याज्ञवल्क्या ॥ बरे तयाने म्हणितले ॥२४॥

स्नान करोनि प्रेततीर्थी ॥ म्हणे याज्ञवल्क्य व्यासाप्रती ॥ कैची शिळा सांग निगुती ॥ सत्यवतीचे नंदना ॥२५॥

स्कंद म्हणतसे व्यास आता ॥ याज्ञवल्क्या सांगे कथा ॥ तेचि तुम्हीही देवोनि चित्ता ॥ पुढे ऐका मुनी हो ॥२६॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकोनत्रिंशोऽध्याय हा ॥२७॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये शुक्लतीर्थवर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP