मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय १२

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १२

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

होता कृष्णामेघगर्जना ॥ नाचती भक्तमयुर नाना ॥ अभाविक पायाळू तयांना ॥ थारा मिळेना कोठेही ॥१॥

सांगे ऋषींसि मयूरवाहन ॥ दंडशतांवर रामतीर्थाहून ॥ जान्हवीतीर्थ पापनाशन ॥ ऐका कथानक तयाचे ॥२॥

पौलस्त्य दालभ्य प्रजापति ॥ सदा करी जान्हवीभक्ति ॥ भीमशर्मा महामती ॥ पुत्र तयासी जाहला ॥३॥

अभिमानी म्हणे मी पंडित ॥ वाद करोनि जिंकीन समस्त ॥ सदा विप्रांची हेलना करित ॥ अति उन्मत्त होऊनी ॥४॥

ऐसे वर्तता एके दिवशी ॥ सभेमाजी उपमन्यूसि ॥ भीमशर्मा म्हणे तुजसी ॥ मति कायसी मतिमंदा ॥५॥

ऐसा उपहासिता मन्यु ॥ येऊन म्हणे उपमन्यू ॥ होई झडकरी गोमायू ॥ निंद्य आयुष्य पामरा ॥६॥

ऐकोनिया उपमन्युशाप ॥ भीमशर्मास सुटे कंप ॥ म्हणे मी महापाप ॥ मायबाप तू माझा ॥७॥

विद्यामदे धुंद जाहलो ॥ आत्मसुखालागी मुकलो ॥ विप्रावमानडोही बुडालो ॥ शरण आलो दयाळा ॥८॥

आम्ही दुर्जन महाखल ॥ पूर्वसुकृते चरणकमल ॥ तुझे देखिले अति शीतल ॥ विमल करी सज्जना ॥९॥

होता साधूंचे दर्शन ॥ तात्काल जाती पापे निरसून ॥ आता साष्टांग करतो नमन ॥ शापमोचन करी गा ॥१०॥

ऐसी ऐकोनिया बोली ॥ उपमन्यूस दया उपजली ॥ नोहे मिथ्या कदाकाळी ॥ वाणी बोलली असे म्यां ॥११॥

जंबूक होऊनि राहशील जरी ॥ तरी ज्ञान राहील अंतरी ॥ दैवयोगे दाखवील तरी ॥ अगस्तिऋषी तराया ॥१२॥

ऐसे ऐकता कोल्हा होऊन ॥ हिंडत असता पडे रानोरान ॥ पूर्वपापाचे असे स्मरण ॥ अग्निनंदन म्हणतसे ॥१३॥

तो अकस्मात चिंतामणी ॥ दरिद्रिया पडे दर्शनी ॥ की आला वासरमणी ॥ रजनी दूर कराया ॥१४॥

तैसा कृपानिधि अगस्ती ॥ भेटता लोळे चरणावरती ॥ ऋषी म्हणती कोण जाती ॥ काय चित्ती वसे बा ॥१५॥

ऐसे ऐकोनि मुनिभाषण ॥ भरून आले तयाचे नयन ॥ कंठ सदगदीत होऊन ॥ निवेदन करी वृत्तांत ॥१६॥

विचार करोनि कुंभज ॥ जंबुका म्हणे तुवा आज ॥ आपुले साधावया काज ॥ जावे सह्यजा कृष्णेसी ॥१७॥

तिचे करिता स्नानपान ॥ मुक्त होती पापी जन ॥ याचिकारणे जलप्राशन ॥ करोनि मुक्त होसी तू ॥१८॥

यापरी ऐकोनि करी नमन ॥ कृष्णेसी जाई स्नानपान ॥ करिता झाले शापमोचन ॥ भीमशर्माद्विजाचे ॥१९॥

शापातून मुक्त होता ॥ चिरकाल झाला तेथ राहता ॥ पुत्रवियोगे तयाचा पिता ॥ दुःखित येता जाहला ॥२०॥

देखोनिया स्वपुत्रासी ॥ चकित जाहला निजमानसी ॥ म्हणे कृष्णादर्शनासी ॥ येता सुतासी देखिले ॥२१॥

काय वानू कृष्णामहिमा ॥ कुंठित होय विधि सुभामा ॥ अगम्य जो का निगमागमा ॥ इच्छित कामा लाधलो ॥२२॥

येणेपरी त्रिमास राहिला ॥ इकडे गंगामाता वत्सला ॥ भक्तिवियोगे दर्शनाला ॥ आली घ्यावयालागि पै ॥२३॥

रामाश्रमाचे समोर ॥ रामकुंडा शतदंड अंतर ॥ जान्हवीस फुटले प्रेमपाझर ॥ दालभ्यमुनिवर पाहता ॥२४॥

मातेसी देखोनिया डोळा ॥ सेविता झाला पादकमला ॥ दालभ्य म्हणे दिवस आला ॥ आजि मंगल सोन्याचा ॥२५॥

ऋषींस म्हणे षडानन ॥ भीमकुंड तेचि जाण ॥ कृष्णेमाजी जेथ निर्माण ॥ जाहली कृष्णपादजा ॥२६॥

माघमासी प्रयागासी ॥ कार्तिकी सेतुबंधेसि ॥ करिता षडब्द स्नानासी ॥ जे का फल बोलिले ॥२७॥

तेचि सोमवासरी श्रवण ॥ येता भीमकुंडी स्नान ॥ नित्य करिता चांद्रायण ॥ तेचि फल पावती ॥२८॥

ऐसे जान्हवीसंगमात ॥ भीमेश्वर महातीर्थ ॥ भक्तियुक्त ऐकता चरित ॥ परमगती पावती ॥२९॥

मुनींसी म्हणे कमलोद्भव ॥ सत्रांमाजी सर्व देव ॥ ब्रह्मयासि पूजिती सभाव ॥ ब्रह्मह्रद जाण तो ॥३०॥

सत्रांत पूर्णाहुती करून ॥ तृप्त करिता हुताशन ॥ अमृतपात्र पंचानन ॥ देत गायत्रीसह विधीसी ॥३१॥

हाती घेऊन कृष्णाबाई ॥ गायत्रीकडे विधि पाही ॥ गायत्री म्हणे कर्म फलदायी ॥ अमृतरूपी हा शिव ॥३२॥

गायत्रीचे ऐकोनि वचन ॥ अघोराचे संपुटीकरण ॥ हुःकारसह करोनि द्रुहिण ॥ स्थापन करी शिवाशी ॥३३॥

देव गंधर्व ऋषिवर ॥ देखोनिया अमृतेश्वर ॥ हरहर गर्जती वारंवार ॥ थोर आनंद जाहला ॥३४॥

यज्ञ कर्माचे शेवटी ॥ अवभृत करी परमेष्ठी ॥ देवांगनांची होय दाटी ॥ आनंद पोटी न समाये ॥३५॥

नाना वाद्यांचे होत गजर ॥ दुंदुभिनादे कोंदले अंबर ॥ अभिषेकार्थ ऋषीश्वर ॥ सरस्वतीसी पाचारिती ॥३६॥

येरी घालोनि प्रदक्षिणा ॥ होमशाळेसी जेथ कृष्णा ॥ तेथ मिळाली ऋषिजना ॥ अपर्णासुत सांगत ॥३७॥

गायत्रीसहित विधीसी ॥ स्नान घालिती देवऋषी ॥ तेही करोनि स्नानासी ॥ संगमी शिवा पूजिती ॥३८॥

अमृतेश्वराचे पश्चिमेसी ॥ विष्णुकुंड नैऋत्येसी ॥ ब्रह्मकुंड दक्षिणेसी ॥ शिवकुंड विधिनिर्मित ॥३९॥

जी का करिती पापनाशन ॥ तयांमाजी स्नान करून ॥ अमृतेश्वराचे करी पूजन ॥ नामाभिधान विधि करी ॥४०॥

कृतयुगी ब्रह्मामृतानंद ॥ त्रेतायुगी अमृतेश प्रसिद्ध ॥ द्वापारी सत्यधर्मेश सुखद ॥ भद्रेश वदती कलियुगी ॥४१॥

आता कृष्णचरणी माथा ॥ ठेवूनि सांगेल नारद कथा ॥ ऐकता पापे जातील सर्वथा ॥ पुरुषार्थ चारी पावाल ॥४२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ द्वादशोऽध्याय वर्णिला ॥४३॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये भीमकुंडवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP