मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३९

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३९

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जया जाहली भवरोगबाधा ॥ तेणे भजावी कृष्णासुधा ॥ जन्ममरण अन्यथा कदा ॥ न सरे साधा योग हा ॥१॥

म्हणे शिवाचा ज्येष्ठ तनय ॥ पूर्वाध्यायी याज्ञवल्क्य ॥ ऐकोनि उःशाप चकित होय ॥ प्रश्न व्यासा करीतसे ॥२॥

माता तुझी गा सत्यवती ॥ होवोनिया मत्स्यजाती ॥ कैसी मनुष्य जाहली पुढती ॥ नवल चित्ती वाटतसे ॥३॥

जो का साक्षात जगजेठी ॥ तो तू उत्पन्न तियेचे पोटी ॥ कैसी जाहली ही सांग गोठी ॥ सत्यवतीकुमारा ॥४॥

ऐसी ऐकोनिया भाक ॥ व्यास म्हणे मी भूपजनक ॥ घरी तयाचे निघालो देख ॥ यज्ञार्थ याज्ञवल्क्यजी ॥५॥

कृष्णामहिमा श्रवण करावा ॥ ऐसे इच्छिसी तरी तुवा ॥ जावोनि उत्तंका पुसावा ॥ तो आघवा कथील ॥६॥

व्यास बोलोनि यापरी ॥ नमोनि गेला विदेहनगरी ॥ याज्ञवल्क्यही कृष्णातीरी ॥ उत्तंकदर्शना निघाला ॥७॥

यौवनाश्व राजयाकरवी ॥ धुंधुदैत्यासि जो मारवी ॥ तो उत्तंक साक्षात रवी ॥ परी हारवी स्वतेजा ॥८॥

आला पुढे जो पापराहू ॥ तयापासाव दूर होऊ ॥ चिंतोनि ऐसे म्हणे पाहू ॥ तीर्थे कृष्णातटीची ॥९॥

जी जी सह्याद्रिपासाव तीर्थे ॥ स्नान करोनि तेथतेथे ॥ कृष्णादक्षिणतटी पंथे ॥ येवोनि कुटी करीतसे ॥१०॥

जेथे राहोनि तो मुनि ॥ कृष्णास्नान प्रतिदिनी ॥ करोनी तुळसीमंजिरींनी ॥ करी पूजन हरीचे ॥११॥

जेथ तुळसीचिया मंजिरी ॥ वाहोनि पूजिला सदा हरी ॥ होय तेथे तीर्थमंजिरी ॥ मंजिरीश्वरसन्निध ॥१२॥

मंजरीशा कोटिमंजिरी ॥ वाहे भक्तीने तोचि हरी ॥ ऐसी अपार तीर्थे थोरी ॥ पाहे याज्ञवल्क्य मुनी तो ॥१३॥

मग तेथेचि करी स्नान ॥ करी मंजिरीश्वरपूजन ॥ उत्तंकमुनीचा मठ देखून ॥ गेला तयाभीतरी ॥१४॥

जेथे हरिण आणि सिंह ॥ प्रेमे क्रीडती दोघे सह ॥ तेथे तेजे अतिदुःसह ॥ देह शोभे जयाचा ॥१५॥

ध्यानस्थ बैसला पद्मासनी ॥ तोचि पाहिला उत्तंकमुनी ॥ धन्य धन्य आपुले मनी ॥ मानी याज्ञवल्क्य तो ॥१६॥

अहो साधुसंगतीचा ॥ काय महिमा वदू वाचा ॥ दोष जाय चित्ताचा ॥ दग्ध होती पातके ॥१७॥

भूमीवरी जितुकी तीर्थे ॥ साधिती ती बहिःशुद्धिते ॥ परि साधुसंगमतीर्थ ते ॥ शुद्ध करी मनासी ॥१८॥

याज्ञवल्क्य यापरी ॥ मनी आनंदोनि भारी ॥ जाताचि उत्तंकशेजारी ॥ अभ्युत्थान घेतसे ॥१९॥

करोनिया नमस्कार ॥ आलिंगिती ते परस्पर ॥ याज्ञवल्क्या बैसकार ॥ केला आसन देऊनि ॥२०॥

कृष्णोदके पाय धुतले ॥ मस्तकी ते तीर्थ घेतले ॥ गंधादिके मग पूजिले ॥ याज्ञवल्क्यऋषीसी ॥२१॥

ऐसेचि याज्ञवल्क्याने ॥ तया पूजोनि परम भक्तीने ॥ उत्तंकमुनीला नंतर म्हणे ॥ एक विनंती असे गा ॥२२॥

सत्यवती ही व्यासमाता ॥ कैसी पराशर कैसा पिता ॥ सांग मला ही विचित्र कथा ॥ बाबा उत्तंक मुने रे ॥२३॥

व्यासासि हेचि विचारिले ॥ परी तेणे मज धाडिले ॥ आता कर्ण तृषित झाले ॥ कथारसाळे तोषवी ॥२४॥

आता पुढे तो उत्तंकमुनी ॥ व्यासोत्पत्ति व्यासा नमोनि ॥ सांगेल सादर तुम्ही श्रवणी ॥ असा मुनिश्रेष्ठा हो ॥२५॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकोणचाळिसावा अध्याय हा ॥३६॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये मंजिरीतीर्थवर्णनं नाम एकोनचत्वारिंशोऽध्यायः ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP