मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४९

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४९

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

रज तम सत्त्व जिचे ठायी ॥ लय पावता नुरे काई ॥ दावा तुमची तीच आई ॥ कृष्णाबाई संत हो ॥१॥

म्हणे कार्तिक मुनिवराला ॥ याज्ञवल्क्यादि विप्रमेळा ॥ भृगुतीर्थापासाव गेला ॥ जंबुतीर्थासि पुढेची ॥२॥

सिद्धि पावला जांबवान ॥ जेथे तयाचे चरित्रकथन ॥ करितो तुम्हाला सावध मन ॥ करोनि ऐका मुनी हो ॥३॥

दैवत जयाचे घनश्याम ॥ लक्ष्मणाग्रज दयाब्धि राम ॥ तो जांबवंत भक्त परम ॥ बिळामाजि वसतसे ॥४॥

पुढे युगांतरी कृष्ण ॥ स्यमंतकाचा हेतू धरून ॥ येता बिळामाजि कदन ॥ करी जांबवान तयासी ॥५॥

युद्धाशेवटी कृष्णमूर्ती ॥ दिसे साक्षात दाशरथी ॥ तदा होवोनि चकित चित्ती ॥ चुकलो चुकलो म्हणतसे ॥६॥

करोनि साष्टांग दंडवत ॥ कन्यारत्‍न मग तया देत ॥ यापरी कृष्णासि करोनि शांत ॥ जांबवंत बोळवी ॥७॥

परी लागला मनी चटका ॥ स्वामिद्रोह घडला निका ॥ म्हणे आता ह्या पातका ॥ जाळू काय तर्‍हेने ॥८॥

तव दरिद्रियासी चिंतामणी ॥ तैसे भेटती अवचित मुनी ॥ पाय तयांचे प्रेमे धरोनी ॥ वृत्त निवेदन करीतसे ॥९॥

म्हणे आता उद्धरा स्वामी ॥ पापसागरी बुडालो मी ॥ कुळदैवत सीताभिरामी ॥ अभेद मन व्हावया ॥१०॥

प्रार्थना ऐकोनिया ऐसी ॥ ऋषी म्हणती धन्य आहेसी ॥ परी जावे कृष्णावेणीसी ॥ पापनिष्कृती कराया ॥११॥

कृष्णेमाजी महातीर्थ ॥ असे विरजानाम विख्यात ॥ तेथ राहता पाप नष्ट ॥ होईल निश्चये तुझे बा ॥१२॥

ऐसा मुनींचा बोल ऐकून ॥ सवेंचि गेला जांबवान ॥ तेथ भार्गवतीर्थाहुन ॥ तीन बाणांवरी असे जे ॥१३॥

कृष्णास्नान सहा मास ॥ करी श्रीरामपूजनास ॥ तदा कृष्णा समक्ष त्यास ॥ होवोनि म्हणे मुनी हो ॥१४॥

रामभक्ता जांबवंता ॥ निष्पाप जाहलासि तू आता ॥ होईल तुझे नाम तीर्था ॥ या आजपासुनी ॥१५॥

ऐसे बोलोनी विष्णुरूपिणी ॥ गुप्त जाहली तेच क्षणी ॥ जांबवंते आश्रम करोनी ॥ तीर्थी तेज ठेविले ॥१६॥

म्हणे मुनीला शिवकुमार ॥ जंबुतीर्थी स्नान कर ॥ करोनि पाहे शंकरा जर ॥ तरी शुद्ध मन होतसे ॥१७॥

जंबुतीर्थ परम पवित्र ॥ आख्यान तयाचे अति विचित्र ॥ ऐकोनि मिळे भोग इह परत्र ॥ भक्ति मात्र असावी ॥१८॥

उत्तराध्यायी सर्व मुनी ॥ प्रश्न करतील शंका येऊनी ॥ उत्तर तयाचे देवसेनानी ॥ सांगेल प्रेमपूर्वक ॥१९॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकुणपन्नासावा अध्याय हा ॥२०॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये जंबुतीर्थवर्णनं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP