मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २७

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २७

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णामुरलीरव ऐकता ॥ भक्तमनाची वृत्ति अवचिता ॥ तटस्थ जाहली अंतर्गता ॥ देहभावना नुरेची ॥१॥

पूर्वी कथियेले अश्वतीर्थ ॥ ते ऐकोनि ऋषि समस्त ॥ प्रश्न करिती स्कंदाप्रत ॥ ऐका श्रोते भाविक हो ॥२॥

पार्वतीह्रदयानंदकंदा ॥ मयूरवाहना भक्तवरदा ॥ तीर्थे कथियली अहो स्कंदा ॥ तुवा बहुत आम्हांसी ॥३॥

तरी तयामाजि जे का ॥ तीर्थ तुजला मान्य कार्तिका ॥ तयाचा महिमा सांग निका ॥ नुरवी शंका आमुची ॥४॥

ऐसे ऐकोन पर्वतीबाळ ॥ म्हणे तुम्हीच तीर्थ केवळ ॥ तुमचेनि दर्शने होती निर्मळ ॥ तीर्थे सकळ मुनी हो ॥५॥

त्रैलोक्यपातकदहनसमर्थ ॥ तीर्थे असती असंख्यात ॥ परी धन्य शुक्लतीर्थ ॥ परमपुरुषार्थबीज जे ॥६॥

आयुष्य जैसे मध्यान्हसाउली ॥ चित्त हे जैसी वावटळी ॥ ऐसे जाणोनि सदाकाळी ॥ शुक्लतीर्थ सेविजे ॥७॥

अमावास्या पौष महिना ॥ शुक्लतीर्थी करा स्नाना ॥ दाने देवोनिया ब्राह्मणा ॥ पितृतर्पण करावे ॥८॥

श्लोक अथवा श्लोकार्धेसी ॥ करा श्रवण पुराणासी ॥ रुद्राभिषेक कोपेश्वरासी ॥ भोजन विप्रांसि भक्तीने ॥९॥

जागर करोनिया वाचे ॥ भजन करावे हरिहरांचे ॥ सफळ जन्म होय तयाचे ॥ निधान मुक्तीचे सर्वथा ॥१०॥

अंतकाळी कोपेशदर्शन ॥ होवोनि मानवे सोडिला प्राण ॥ तरी योगिया दुर्मिळ स्थान ॥ जे ते लाधे सहज तो ॥११॥

अज्ञ असे महापापी ॥ नसे श्रद्धा जया किमपि ॥ होय तयाही मुक्ति सोपी ॥ अंती कोपेश देखता ॥१२॥

जितेंद्रिय जितश्वास ॥ करी अन्यत्र जो तपास ॥ पुण्य तयाचे पौषमास ॥ येता कोपेशदर्शन ॥१३॥

योगास असती अनेक विघ्ने ॥ तैसेचि तपा जाणोन सुज्ञे शुक्लतीर्थाचिया स्नाने ॥ पापावरणे धुवावी ॥१४॥

ऐसे ऐकता सकळ ऋषी ॥ संशय येवोनि मानसी ॥ प्रश्न करिती शिवसुतासी ॥ ब्रह्मसुत म्हणतसे ॥१५॥

अहो स्कंदा मागे आम्हांते ॥ शुक्लतीर्थ कथियले होते ॥ आता आणीकही तयाते ॥ येथे कोठून सांगसी ॥१६॥

ऐशा मुनिचिया बोला ॥ ऐकोनि कार्तिक बहु तोषला ॥ म्हणे सांगतो कथानकाला ॥ व्यासयाज्ञवल्क्यसंवाद ॥१७॥

याज्ञवल्क्य व्यास मुनी ॥ चला पाहू कृष्णावेणी ॥ करोनि ऐसा विचार मनी ॥ दोघे निघाले एकदा ॥८॥

ऋषितीर्थ पापहारक ॥ लोकी आहेत जी अनेक ॥ तीही देखोनि याज्ञवल्क्य ॥ व्यास कृष्णेसि पातले ॥१९॥

उगम जाहला जटाजूटी ॥ तो महाबल देखोनि दृष्टी ॥ तैसेचि चालले कृष्णातटी ॥ तीर्थे पाहत पाहत ॥२०॥

मुक्तितीर्थ अश्वतीर्थ ॥ तैसेचि देखिले नंदितीर्थ ॥ शिव पाणियामाजि जेथ ॥ गुप्त असे सर्वदा ॥२१॥

शुक्लतीर्थासि दोघे मुनी ॥ पातले नंदितीर्थाहुनी ॥ तेथे आश्चर्य एकदिनी ॥ एक मुनी हो जाहले ॥२२॥

याज्ञवल्क्य तपोनिधी ॥ स्नान करोनि कृष्णेमधी ॥ करीत असता तर्पणादि ॥ उदकवृद्धी जाहली ॥२३॥

वस्त्र भिजोनि कमंडलू ॥ भरून वाहू लागले जळू ॥ देखोनि याज्ञवल्क्य नवलु ॥ व्यासासि बोलू लागला ॥२४॥

काय कृष्णामहिमा अगाध ॥ माझे जाहले चित्त शुद्ध ॥ उदक इयेचे का बरे समृद्ध ॥ होते वेदव्यास जी ॥२५॥

ऐसे विचारिता व्यास ॥ म्हणे कृष्णा ह्रषीकेश ॥ वेणा साक्षात व्योमकेश ॥ परिस महिमा इयांचा ॥२६॥

शुक्लतीर्थ परम पवित्र ॥ मुक्त जाहले जेथ विप्र ॥ चौघे होते ते विचित्र ॥ चरित्र तुज सांगतो ॥२७॥

ऋषीस म्हणे कार्तिके ॥ ऐकेल पुढे याज्ञवलक्य ॥ होईल विप्रासि वैराग्य ॥ तीर्थमाहात्म्य सत्य ते ॥२८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ सप्तविंशोऽध्याय हा ॥२९॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये शुक्लतीर्थवर्णनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP