मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४०

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४०

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

चित्तउंदरावर बैसुनी ॥ संसारसिंदुरासुरमर्दिनी ॥ भक्तआनंदकंद खाणी ॥ हेरंबकृष्णावेणी जी ॥१॥

नमोनि तिजला अहो श्रोते ॥ तुम्हा सांगतो व्यासजन्म ते ॥ सकळ सुखाचेचि जे पुरते ॥ भांडवल निश्चये ॥२॥

उत्तंक याज्ञवल्क्या ॥ पराशराची धर्मजाया ॥ शापे पतीचे आपुली काया ॥ टाकी योगबळे हो ॥३॥

पुढे भारद्वाज ऋषी ॥ स्नानासि आला कृष्णावेणीसी ॥ पंचशरे तव तन्मानसी॥ केला प्रवेश अवचित ॥४॥

तदा तयाचे रेत जळी ॥ पडतांचि गिळी मासोळी ॥ गर्भ राहिला तये वेळी ॥ दैवयोगे मुनी हो ॥५॥

जाळे टाकोनि धीवरे ॥ तिला धरोनि कापिली शस्त्रे ॥ तव अकस्मात पाहिली नेत्रे ॥ कन्या उदरी तियेचे ॥६॥

मग नेवोनि आपुले घरी ॥ नाम ठेविले मत्स्योदरी ॥ हर्ष माइना धीवरांतरी ॥ सुंदरी ती पाहुनी ॥७॥

धीवराचे अन्न उदक ॥ कदा न घे ती कन्यका ऐक ॥ कंद सेवोनि शमवी भूक ॥ राहे कृष्णातटींचि ॥८॥

दैवयोगे तिचे शरीरी ॥ सुटे मत्स्यगंध भारी ॥ मत्स्यगंधा अशी वैखरी ॥ म्हणोनि पडे तियेसी ॥९॥

ऐसे पाळिता तिला कोळी ॥ घरी तयाचे यौवना आली ॥ तदा तयाने बहुत शोधिली ॥ स्थळे कन्येसी आपुले ॥१०॥

परी तियेचे स्वरूप जैसे ॥ तैसे वराचे कोठे न दिसे ॥ तदा पिता म्हणे कैसे ॥ देव निद्रिस्त जाहले ॥११॥

मत्स्यगंधिका कृष्णातीरी ॥ तपे देहासि कृश करी ॥ दुःख देखोनि ते अंतरी ॥ सदय पराशर होतसे ॥१२॥

वचन दिधले सत्यवतीसी ॥ ते आठवे निजमानसी ॥ सत्य करावे आता तयासी ॥ म्हणोनि तेथे पातला ॥१३॥

मत्स्यगंधेसि म्हणे तिजला ॥ घेवोनि नावेत ने कडेला ॥ बरे बोलोनि ती अबला ॥ तया नावेत बैसवी ॥१४॥

मग हाकोनि ती नाव ॥ मध्यभागी आणिली तव ॥ मत्स्यगंधेसि विप्रराव ॥ इच्छी भोगावयासी ॥१५॥

म्हणे वृक्षावीण वल्ली ॥ शोभे अशी कधी पाहिली ॥ काया तुझी तशी सुकली ॥ नरालिंगन न होता ॥१६॥

ऐसे बोलोनि पराशर ॥ धरी तात्काळ तिचा कर ॥ तदा सुटे सुगंध फार ॥ शरीरकांतीहि पालटे ॥१७॥

पूर्वजन्मीचे होवोनि ज्ञान ॥ करी मुनीला शीघ्र नमन ॥ पराशरही आलिंगन ॥ देवोनि रममाण जाहला ॥१८॥

अमोघ वीर्यस्खलन होता ॥ वाटे आनंद तिचे चित्ता ॥ गर्भी हरीतेहि देखिता ॥ ऋषी सानंद होतसे ॥१९॥

पराशराचे तपोबळे ॥ श्रीहरीचे जन्म जाहले ॥ वेद जेणे विभागिले ॥ व्यास तोचि जाण हा ॥२०॥

तदा पराशर तीर्थाटण ॥ कराया निघे ते देखुन ॥ चकित होवोनि धरी चरण ॥ व्यासजननी तयाचे ॥२१॥

म्हणे टाकोनि मला तूते ॥ जाणे उचित की सांग दिसते ॥ केले नष्टही कौमार्याते ॥ नाते पतीचे न सोडी ॥२२॥

जरी सोडिसी तरी आता ॥ करी कुमारी मज तत्वता ॥ जेणे वरीलचि भूमिपाता ॥ दुःखहर्ता यापरी ॥२३॥

यापरी करिता तिने विनंती ॥ म्हणे पराशर तदा तीप्रती ॥ जे का तुवा इच्छिले चित्ती ॥ तैसेचि होईल नान्यथा ॥२४॥

म्हणे ऋषीला शिवनंदन ॥ जेथे व्यासनारायण ॥ प्रगटे कृष्णातटी पावन ॥ व्यासतीर्थ जाण ते ॥२५॥

स्नान करोनी व्यासतीर्थी ॥ खलखलेश्वरा जे चिंतिती ॥ ज्ञान निर्मल ते लाधती ॥ खलखलेश्वरकृपेने ॥२६॥

आतापुढे उत्तंक ऋषी ॥ काय सांगेल याज्ञवल्क्यासी ॥ तेचि सांगेन मी तुम्हासि ॥ म्हणे शिवाचा आत्मज ॥२७॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चाळिसावा अध्याय हा ॥२८॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये व्यासोत्पत्तिकथनंवर्णनं नाम ऽध्यायः ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP