मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २५

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २५

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

प्रगटता कृष्णाचंद्र गगनी ॥ विकास पावली भक्तकुमुदिनी ॥ विधुरकुमतीस गमे तरणी ॥ रजनीमाजीच उगवला ॥१॥

कृष्णानृसिंहसरस्वती ॥ राहो सदा माझिये चित्ती ॥ होता जयाची कृपादृष्टी ॥ मूर्ख होती पंडित ॥२॥

म्हणती ऋषी अहो स्कंदा ॥ कृष्णामृतानंदकंदा ॥ चाखोनि लागलो तुझे छंदा ॥ मकरंदभृंग जाहलो ॥३॥

यापरी ऋषीची ऐकोनि मात ॥ म्हणे शिवाचा ज्येष्ठ सुत ॥ पंचगंगाकृष्णासंगत ॥ चरित आता सांगतो ॥४॥

पंचगंगाकृष्णासंगम ॥ स्थान असे जे निरुपम ॥ मोक्षपुरीचे द्वार सुगम ॥ हेचि असे मुनी हो ॥५॥

जेथे संगमतीर्थ नायक ॥ तेथे सर्वत्र सर्वदा सुख ॥ विप्र सर्वही फलदायक ॥ दानपात्र निश्चये ॥६॥

संगमतीर्थी स्नान करिता ॥ पापे धावती दहा वाटा ॥ हरिण जैसे सिंह देखता ॥ मृत्यु तात्काळ पावती ॥७॥

संगमी श्रद्धायुक्त दान ॥ श्रद्धायुक्त पितृतर्पण ॥ करिता होय नरकोत्तारण ॥ अनंत पुण्य होतसे ॥८॥

पंचगंगा तुम्हाप्रती ॥ सांगतो प्रथम सरस्वती ॥ शिवा भद्रा भोगावती ॥ कुंभी असे पांचवी ॥९॥

आता तयाचे वर्णितो अधिप ॥ गालव गार्ग्य वसिष्ठ कश्यप ॥ पाचवा विश्वामित्र अधिप ॥ गुप्त भोगावती पै ॥१०॥

चारी नद्या उघड वाहती ॥ वेदरूपिणी सरस्वती ॥ भद्रा साक्षात विष्णुमूर्ती ॥ शिवा धूर्जटीस्वरूपा ॥११॥

कुंभी असे ब्रह्मरूपिणी ॥ भोगा सर्वस्वरूपिणी ॥ संगम जाहला कृष्णावेणी ॥ चतुर्मुखाचेनि न वर्णवे ॥१२॥

आडामाजि स्नान करिता ॥ जे का असे पुण्य तत्त्वता ॥ तयाहूनिया शतपटा ॥ पुण्य जोडे विहिरी ॥१३॥

सरोवरी सहस्त्रपटीने ॥ नदीत दशसहस्त्र गुणे ॥ समुद्रगानदीस्नाने ॥ पुण्य अनंत बोलती ॥१४॥

संगमी तरी पुण्य किती ॥ हे सांगता खुंटली मती ॥ काशीमाजी स्नान करिती ॥ दान देती ते कमी ॥१५॥

गोदा नर्मदा भागीरथी ॥ गोमतिस्नाने पुण्यमिती ॥ पंचगंगासंगमावरुती ॥ अमित पुण्य होतसे ॥१६॥

स्नान करोनि संगमी भावे ॥ संगमेशा आधी पूजावे ॥ निष्पाप होवोनि मग वरावे ॥ मुक्तिकन्येसि बाप हो ॥१७॥

संगमापासाव उत्तरेसी ॥ दोन धनुष्य प्रमाणेसी ॥ एक धनुष्य पश्चिमेसी ॥ विशेष महिमा संगमी ॥१८॥

तया षट्‌कुळामाजि जो का ॥ करी स्नानासि समंत्रका ॥ तर्पण करी पितृदेवका ॥ तोचि निका भव तरे ॥१९॥

पंचगंगाकृष्णासंगम ॥ असे ऐसा अतिउत्तम ॥ तेथोनि तीर्थ सर्वनाम ॥ सर्वेश्वरमाहात्म्य ॥२०॥

स्नान करोनि सर्वतीर्थी ॥ सर्वेश्वरा जे पूजिती ॥ सर्व पातके नष्ट होती ॥ तया नरांची अवश्य ॥२१॥

सर्वतीर्थांचा अनंत महिमा ॥ सांगतो तयाची कथा तुम्हा ॥ पूर्वी ब्राह्मण मरीचनामा ॥ होता ज्ञानी धनीही ॥२२॥

सर्ववेद दुजे नाव ॥ असे तयाचेंचि अभिनव ॥ जया होते बहु बांधव ॥ बहुपुत्र जयासी ॥२३॥

सर्वतीर्थी तो ब्राह्मण ॥ राहे पर्णकुटिका करून ॥ सर्वतीर्थी सदा स्नान ॥ ब्रह्मयज्ञ करीतसे ॥२४॥

जे का असती जवळ शिष्य ॥ करी तया ज्ञानोपदेश ॥ ऐसे वर्तता बहुत दिवस ॥ गेले तया द्विजाचे ॥२५॥

शिष्य तयाचा एक एकदा ॥ लीन होवोनि सद्‌गुरुपदा ॥ म्हणे संशयनायक वदा ॥ उत्तर माझिया प्रश्नाचे ॥२६॥

पाप जाळावया समर्थ ॥ असती भागीरथ्यादि तीर्थ ॥ तया सोडोनि सर्वतीर्थ ॥ किमर्थ अंगीकारिले ॥२७॥

ऐसा ऐकोनि शिष्यसंशय ॥ म्हणे सर्ववेद गुरुराय ॥ स्वाधीन जयाचे हातपाय ॥ मनोजय करी जो ॥२८॥

विद्या जयाची देत शांती ॥ जयाची असे निष्पाप कीर्ती ॥ तो महात्मा तीर्थमूर्ती ॥ साक्षात निभ्रांत जाणिजे ॥२९॥

पहिले असे मनोतीर्थ ॥ दुजे जाण भौमतीर्थ ॥ मनोतीर्थ अतिश्रेष्ठ ॥ श्रेष्ठ भौमतीर्थ गा ॥३०॥

श्रद्धा असे जया अंतरी ॥ तोचि तीर्थयात्रा करी ॥ श्रद्धेवाचून तीर्थवैखरी ॥ खरी मुळीच नसे बा ॥३१॥

गुरुवेदवचनी अविश्वास ॥ असे हो जया मानवास ॥ तया आणि जनावरास ॥ अंतर नसे किमपिही ॥३२॥

स्पर्श होता मुक्तिदायक ॥ तीर्थे आहेत जरी अनेक ॥ तरी जे का अभाविक ॥ तया न करिती शुद्ध ती ॥३३॥

आहार निद्रा भय मैथुन ॥ आहे सर्वांसि सदा जाण ॥ परी जे का मुक्तिकारण ॥ तेचि मनुष्यजन्म हे ॥३४॥

जे का असे अतिदुर्लभ ॥ परि दैवे झाले सुलभ ॥ तरी होवोनि विषयवल्लभ ॥ गुरुदेववचन मोडिती ॥३५॥

पाषाण बोलती दैवतेसी ॥ पाणी बोलती सुतीर्थासी ॥ इतर मानवासरिसे द्विजासी ॥ मानिती श्रद्धारहित ते ॥३६॥

ब्राह्मण देव वैद्य गुरु ॥ दैवज्ञ आणि तीर्थमंत्रू ॥ जैसा जयाचा भावनातरू ॥ तैसेचि फल देती हे ॥३७॥

याचि कारणे तुवा बापा ॥ विश्वास धरिता हाचि सोपा ॥ मार्ग असे सकल पापा ॥ नष्ट करायालागि पै ॥३८॥

जरी मानसी विश्वास धरिसी ॥ तीर्थफळाला तरी पावसी ॥ श्रद्धा नसेल तरीही तुसी ॥ कौतुकासी दाखवू ॥३९॥

ऐसे बोलोनि सर्ववेद ॥ धरी शिवाचे घट्ट पाद ॥ म्हणे देवा करी प्रसाद ॥ भक्तवरदा सुरेशा ॥४०॥

समाधिमाजी नारायणा ॥ यापरी करी जव प्रार्थना ॥ तव देवाधिदेवराणा ॥ प्रगट जाहला अवचित ॥४१॥

गंगादि तीर्थे मुर्तिमंत ॥ प्रगट जाहली अकस्मात ॥ देखोनि सर्ववेद हस्त ॥ जोडोनि उभा राहिला ॥४२॥

तधी गंगादि सर्व तीर्थे ॥ म्हणती सदा राहतो येथे ॥ ऐकोनि मुनीचा शिष्य वाक्य ते ॥ चकित जाहला अंतरी ॥४३॥

सत्य मानूनि गुरुवचन ॥ धरी तयाचे तात्काळ चरण ॥ अनन्यभावे जाहला शरण ॥ शंभुनंदन म्हणतसे ॥४४॥

गुरुशिष्य पाहती तव दैवते ॥ गुप्त जाहली गंगादि तीर्थे ॥ ऐसे विख्यात तीर्थ ते ॥ सर्वनामे मुनी हो ॥४५॥

जेथे करिता स्नान नर ॥ भावे पूजिता सर्वेश्वर ॥ मुक्त होतसे भक्तितत्पर ॥ श्रवण करिता कथा ही ॥४६॥

पुढिले अध्यायी सुंदर कथा ॥ कोपेश्वराची जेथ वक्ता ॥ होय शांत यापरी श्रोता ॥ कृष्णामाउलीकृपेने ॥४७॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पायता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचविंशोऽध्याय हा ॥४८॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये सर्वतीर्थवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP