मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जे का कृष्णातरंगिणी ॥ निशिदिनी धरिती अंतःकरणी ॥ तेचि देखती मोक्षसरणी ॥ ब्रह्मसदनी जावया ॥१॥

ऐकावया तीर्थे थोरी ॥ सादर देखोनी तयावरी ॥ कृष्णा स्मरोनि ह्रदयांतरी ॥ ब्रह्मनंदन बोलत ॥२॥

सह्याद्रीचे उत्तरेसी ॥ ब्रह्मगिरी नामे श्रृंगेसी ॥ जेथे तपोनी विष्णुपदासी ॥ मेळविले विधीने ॥३॥

तयाचे दक्षिण अंगावरी ॥ नामे असे वेदगिरी ॥ वेद वसती जयावरी ॥ अंगेसहित साक्षात ॥४॥

उभयगिरींचे मध्ये एक ॥ महातीर्थ असे आमलक ॥ जेथे देवचि सकळिक ॥ वृक्ष आमलक पहाती ॥५॥

आमलकी वृक्षाचे पदी ॥ वेणानाम महानदी ॥ तेथेचि कृष्णा अश्वत्थपदी ॥ उदयासि पावत ॥६॥

कृष्णाप्रवाह जेथोनि होत ॥ ते स्थली असे विष्णुतीर्थ ॥ तेथे जो स्नान करीत ॥ विष्णुरूप होतसे ॥७॥

अमावास्येसी गुरुवासरी ॥ करी दर्शन निर्धारी ॥ रुद्र विरिंची तयावरी ॥ कृपा करी जाण पा ॥८॥

रिघे वेणाप्रवाह तेथोन ॥ जो का सिद्धांचे साधन ॥ कृष्णावेणा हे अभिधान ॥ याचि कारणे पडियेले ॥९॥

जगाची व्हावया शांती ॥ ब्रह्मे केली कृष्णोत्पत्ती ॥ शेष होय कुंठितगती ॥ अगम्य महिमा जियेचा ॥१०॥

वेणा कृष्णेसी मिळाली ॥ म्हणोनि महत्वासि लाधली ॥ ककुद्मतीही धन्य झाली ॥ कृष्णामाउलीसंगमे ॥११॥

वारुणीमंत्र जपता तेथ ॥ की गायत्री अष्टशत ॥ निरसोनी जाती पापे समस्त ॥ संगममहिमा ऐसा हा ॥१२॥

मिळावया कृष्णेस ॥ सत्या येता एक राक्षस ॥ शिला होऊन अति धाडस ॥ आड आला तियेसी ॥१३॥

सत्या भयंकर धारांनी ॥ पाठवी तया यमसदनी ॥ कृष्णेसी मिळे येवोनी ॥ विहंगतीर्थ तेच पै ॥१४॥

जेथे विहंगम करिता स्नान ॥ पावता झाला वैकुंठभुवन ॥ ऐसे अनिर्वाच्य पुण्यपावन ॥ विहंगतीर्थ बोलती ॥१५॥

जेथे एक स्वयंभूस्थान ॥ शंभूचे असे पुरातन ॥ तेणे त्या तीर्थाचे महिमान ॥ अधिकाधिक होतसे ॥१६॥

पुढे वाहता कृष्णा ऐसी ॥ वेदनद करी संग तिशी ॥ जो का निघाला उत्तरेसी ॥ वेदगिरीच्या ॥१७॥

जेथे कृष्णावेदसंग ॥ तेथे असे धूर्जटिलिंग ॥ जयाचेनि दर्शने चतुर्वर्ग ॥ फल भर्गकृपेने ॥१८॥

तेथुनि काही अंतरावर ॥ रुद्रतीर्थ मनोहर ॥ जेथे गोकर्णऋषीश्वर ॥ तपे मोक्ष पावला ॥१९॥

यापरी नारदोक्ति परिसोन ॥ ऋषि म्हणती गोकर्ण कवण ॥ काय केले तपाचरण ॥ ऐकू श्रवण इच्छिती ॥२०॥

ऐकोनि ऋषींचे वचन ॥ बोलता झाला ब्रह्मनंदन ॥ भारद्वाजकुलोत्पन्न ॥ ज्ञानसंपन्न धार्मिक ॥२१॥

मानापमानाची नसे वसती ॥ अखंड राहे उदासवृत्ती ॥ ह्रदयी आठवोनी गिरिजापती ॥ समाधान चित्ती निरंतर ॥२२॥

ब्रह्मचारी परोपकारी ॥ अखंड वास कृष्णातीरी ॥ निरापेक्ष सदाचारी ॥ अर्चन करी शिवाचे ॥२३॥

ऐसा गोकर्णभाव निर्मळ ॥ पाहोनि प्रसन्न जाश्वनीळ ॥ बोले माग वर दुर्मिळ ॥ इंद्रादि सकल देवां जो ॥२४॥

ऐकोनि शिवाचे वचन ॥ गोकर्ण बोले कर जोडून ॥ सदा होवो तुझे स्मरण ॥ कपालभूषण गिरीश ॥२५॥

श्लोक ॥ ॐनमो भवाय रुद्राय शर्वाय पशुपाय च ॥ उग्राय महते नित्यं भीमाय शंभवे नमः ॥२६॥

ऐसे हे मंत्राष्टक ॥ प्रणवादि नमोन्तक ॥ जपे तया इष्टदायक ॥ व्हावे पिनाकपाणी गा ॥२७॥

ज्या नारी पुत्रहीन ॥ की असती पतिवाचून ॥ करिता गोकर्णतीर्थस्नान ॥ शीघ्र पावन होती पै ॥२८॥

माझे नामे लिंगमूर्ति ॥ सदा असावे पशुपति ॥ ऐशी पुरवी माझी आर्ती ॥ आश्रमे वसती करून ॥२९॥

स्नान करूनि गोकर्णी ॥ पितर तुष्टती पिंडदानी ॥ ऐसे करी तुझे चरणी ॥ एवढी मागणी दयाळा ॥३०॥

संतोषोनि गौरीरमण ॥ ह्रदयी आलिंगी तपोधन ॥ म्हणे मागीतले जे वरदान ॥ दिधले जाण निश्चये ॥३१॥

ऐसे बोलोनि गोकर्णमुनी ॥ पुष्पके नेला कैलासभुवनी ॥ नारद म्हणे ऋषीलागोनि ॥ ऐसे गोकर्णमहात्म्य ॥३२॥

गंगाद्वाराचे निकटी ॥ कृष्णानदी दक्षिणतटी ॥ चार सहस्त्र धनुष्कोटी ॥ गिरीपासाव गोकर्ण ॥३३॥

हे कुष्णागोकर्णाख्यान ॥ जो करी सकाळी नित्य पठण ॥ त्यासी शिवाचे संनिधान ॥ सायुज्य सदन मिळतसे ॥३४॥

पुढले अध्यायी कथा विशद ॥ गणिकातीर्थ बहु पुण्यद ॥ सांगेल मुनीसी नारद ॥ महाप्रसाद कृष्णेचा ॥३५॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चतुर्थोऽध्याय वर्णिला ॥३६॥

॥इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडस्थ कृष्णामाहात्म्ये गोकर्णतीर्थवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP