मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३६

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३६

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णे कृष्णे हाचि घोष ॥ आम्हा लागला रात्रंदिवस ॥ आता कदा पुरविसी सोस ॥ आसरहित करिशी गे ॥१॥

कार्तिक म्हणे मुनिवराला ॥ पूर्वाध्यायी वीर तोषला ॥ उपदेश केला प्रजापतीला ॥ भज शिवाला म्हणोनि ॥२॥

पुढे कथा जाहली काय ॥ तेचि विचारी याज्ञवल्क्य ॥ पराशराचा तदा तनय ॥ सांगे कृष्णेसि नमोनी ॥३॥

वीरभद्र कृपानिधी ॥ तया विनविती देव द्विजदि ॥ तुवा रहावे कृष्णानदी ॥ तटी क्षेत्रामाजि या ॥४॥

प्रजापतीचे यज्ञमंडपी ॥ साक्षात तू यज्ञस्वरूपी ॥ तुझे दर्शने पूजने पापी ॥ मुक्त होईल सुवीरा ॥५॥

करी भक्तीने तुला नमन ॥ होय तयाची कामना पूर्ण ॥ ऐसे ऐकता बरे बोलून ॥ अंतर्धान पावला ॥६॥

तदा सकळ देव पाहत ॥ तव कुंडापासाव अवचित ॥ पिंगट जटाजूटमंडित ॥ नीलकंठ प्रगटला ॥७॥

सुर भूसुर तये वेळी ॥ नमोनि वर्षती पुष्पांजळी ॥ गुग्गुल धूप दीपावली ॥ ओवाळिती भक्तीने ॥८॥

गाती गंधर्व पंचम स्वरा ॥ नृत्य करिती सर्व अप्सरा ॥ पठिती नानाविध स्तोत्रा ॥ हरा शंकरा बोलती ॥९॥

स्वयंभू लिंगाला स्थापून ॥ अभिषेक करिती ज्ञानसंपन्न ॥ शैवदीक्षापरायण ॥ ब्राह्मण सिद्ध मुनी हो ॥१०॥

देवेश होवोनि तदा तोषित ॥ म्हणे अहो ऐका समस्त ॥ तुम्ही केलिया स्तोत्रे पूजित ॥ माते जो का भक्तीने ॥११॥

पीडा तयाची मी नाशिन ॥ तैसेचि आख्यान हे पठण ॥ करील तोही शतवर्ष पूर्ण ॥ वाचेल निश्चये देव हो ॥१२॥

फाल्गुनमासी जी यात्रा भरे ॥ स्नान करी ते कृष्णानीरे ॥ वीरभद्रासि पाहोनि नेत्रे ॥ पूजी प्रेमभरे जो ॥१३॥

ब्राह्मणभोजन यथाशक्ति ॥ घाली तया देईन मुक्ती ॥ ऐसी शिवाची ऐकोनि सूक्ती ॥ देव चकित राहिले ॥१४॥

परिसोनि यापरी याज्ञवल्क्य ॥ तदा पावला परम विस्मय ॥ वीरभद्रा पहाया जाय ॥ व्याससहाय्य मुनी हो ॥१५॥

घेवोनि वीरभद्रदर्शन ॥ नंतर करीतसे स्तवन ॥ जय जयाजी चंद्रभूषण ॥ नमन पाया तूझिये ॥१६॥

कृष्णातटी राहोनि भक्ता ॥ तूचि भुक्तिमुक्तिदाता ॥ तूचि दर्शने दुःखहर्ता ॥ नमन पाया तुझिये ॥१७॥

त्रियंबका त्रिपुरहरा ॥ भुवनैकसाक्षी तू ईश्वरा ॥ दुरितौघनाशना वीरभद्रा ॥ नमन पाया तूझिये ॥१८॥

स्तवोनि यापरी याज्ञवल्क्य ॥ करी अभिषेक शतरुद्रीय ॥ गंध धूप दीप माल्य ॥ अर्पी नैवेद्य भक्तीने ॥१९॥

पुष्पांजळी नमस्कार ॥ करोनि उभयता तदनंतर ॥ पुढे निघाले मुनिप्रवर ॥ तीर्थे पाहत पाहत ॥२०॥

म्हणे ऋषीला शंभुकुमर ॥ पुढे तीर्थ पराशर ॥ सांगेल सत्यवतीपुत्र ॥ याज्ञवल्क्य ऋषीसी ॥२१॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ छत्तिसावा अध्याय हा ॥२२॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये वीरभद्रेश्वरमाहात्म्ये दक्षयज्ञविध्वंसवर्णनं नाम षट्‌त्रिंशोऽध्यायः ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP