मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय १८

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १८

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

उगवता कृष्णाशारदेंदु ॥ किंचित्तमाचा न राहे बिंदु ॥ उचंबळिला भक्तसिंधु ॥ कृष्णाचंद्रासि पहाया ॥१॥

स्कंद म्हणे मुनिवरांसी ॥ शकुंताहून चार कोसी ॥ कृष्णावेणीसंगमासी ॥ महातीर्थासि ऐकावे ॥२॥

सकल जगाची व्हावया शांति ॥ कृष्णेसि निर्मी प्रजापति ॥ होता दक्षिणवाहिनी ती ॥ वेणासंगती जाहली ॥३॥

तिन्ही लोकी जे प्रसिद्ध ॥ जया सेविती पितरसिद्ध ॥ देव मानव आबालवृद्ध ॥ महासुखद तीर्थ ते ॥४॥

तीर्थ कृष्णावेणासंगम ॥ कलियुगी जे प्रयागासम ॥ पापनाशक मोक्षधाम ॥ मनकामनापूरक ॥५॥

कन्याराशीस गुरु येता ॥ संगमी श्राद्ध क्षौर करिता ॥ पितरा होय अखंड तृप्तता ॥ सायुज्यता पावती ॥६॥

ऐसे ऐकता ऋषींचा मेळा ॥ प्रश्न करी शंभुबाळा ॥ संगमी कवण मुक्त जाहला ॥ सांग दयाळा आम्हांसी ॥७॥

तदा स्कंदमनी स्फूर्ति ॥ होऊनि म्हणे पुण्यकीर्ति ॥ कृष्णा साक्षात विष्णुमूर्ती ॥ वेणा धूर्जटी प्रत्यक्ष ॥८॥

नंदिग्रामी एक ब्राह्मण ॥ नामे देवशर्मा सधन ॥ तयाचा यज्ञशर्मा नंदन ॥ कृतघ्न कामुक असे तो ॥९॥

सदा द्यूतक्रियारत ॥ परस्त्रियेसी अतिलंपट ॥ उपदेश केला जरी बहुत ॥ नायके तरी कोणाचे ॥१०॥

पिता तुझा महा ज्ञानी ॥ मोळापोटी तू केरसुणी ॥ वृथा शिणविली तुझी जननी ॥ उमज मनी अद्यापि ॥११॥

ऐसे बोलती परी दुष्ट ॥ ऐसेचि करी पापवृत्त ॥ ब्रह्मद्रोह असंख्यात ॥ केले नित्य तयाने ॥१२॥

तव निर्धना द्रव्यघट ॥ सांपडे तैसा आला वसिष्ठ ॥ देखोनि तयाची मति भ्रष्ट ॥ ऋषिश्रेष्ठ बोलिला ॥१३॥

अरे मनुष्यदेह दुर्लभ ॥ नाही विप्रजन्म सुलभ ॥ दैवे लाधला तत्कुळी गर्भ ॥ थोर भाग्य तयाचे ॥१४॥

साधुवंशी जन्म जाहले ॥ परी दुर्दैव असे आपुले ॥ तरी विषयकर्दमी लोळे ॥ पापबळे पातकी ॥१५॥

दुराचरणी क्षणिक सुख ॥ परी कल्पवरी नरक ॥ करोनिया असा विवेक ॥ पुण्यकर्म करावे ॥१६॥

विप्रकुळी जन्म घेऊन ॥ करी जो का दुराचरण ॥ तोचि निश्चये चांडाळ जाण ॥ ब्रह्मराक्षस होय पुढे ॥१७॥

ऐकोनि ऋषीचे बोल ऐसे ॥ तात्काळ गेले तयाचे पिसे ॥ हस्त जोडोनिया पुसे ॥ कैसे करू सद्‍गुरो ॥१८॥

गुरु म्हणती माघमासी ॥ कृष्णावेणीसंगमासी ॥ जावोनि करिता स्नान होसी ॥ सिद्धकार्य ब्राह्मणा ॥१९॥

कृष्णावेणीस्नान बापा ॥ करिता होय नाश पापा ॥ संसार दावानले तापा ॥ कदा न पावसी फिरोनी ॥२०॥

परिसोनि यापरी अमृताक्षर ॥ वसिष्ठा करी नमस्कार ॥ यज्ञशर्मा संगमावर ॥ स्नान कराया निघाला ॥२१॥

येवोनि कृष्णावेणीप्रति ॥ नमन करी आनंद चित्ती ॥ स्नान करोनि संगमावरुती ॥ तीस दिवस राहिला ॥२२॥

त्रिकाळ संगमी करी स्नान ॥ संगमेश्वराचे नित्य पूजन ॥ करिता यापरी तप ब्राह्मण ॥ दिव्य विमान पातले ॥२३॥

चतुर्भुज पीतांबर ॥ आले विष्णुदूत सत्वर ॥ घेवोनि विप्रा विमानावर ॥ नेला मिरवीत वैकुंठी ॥२४॥

मुक्त जाहला यज्ञशर्मा ॥ ऐसा कृष्णावेणीमहिमा ॥ धर्म अर्थ मोक्ष कामा ॥ पावती कृष्णाप्रसादे ॥२५॥

कृष्णावेणासंगमी कपिला ॥ सवत्स देता सोमवतीला ॥ सहस्त्र धेनू देता द्विजाला ॥ एक फळ होतसे ॥२६॥

इंदुवासरी येता श्रवण ॥ संगमेशाचे करी पूजन ॥ होय तयाचे वंशवर्धन ॥ अग्निनंदन म्हणतसे ॥२७॥

संगमी सूर्यग्रहण येता ॥ ब्राह्मणासि जो भूमिदाता ॥ कृष्णाप्रसादे राज्य भोक्ता ॥ सलोकताही मेळवी ॥२८॥

कृष्णावेणीसंगमाख्यान ॥ ऐकता करी दुःखहरण ॥ पुढिले अध्यायी पवित्र कथन ॥ कोयना कृष्णेसि मिळेल ॥२९॥

कृष्णाकथा इक्षुदंद ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अष्टादशोऽध्याय हा ॥३०॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये कृष्णावेणासमागमो नामाष्टादशोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP