मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नार चंचल मनि घाबरी

सगनभाऊ - नार चंचल मनि घाबरी

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


जाते ग बयानो नार चंचळ मनि घाबरी ॥

पुरुषाचा पोशाक करुनिया झाले रानभरी ॥ध्रु०॥

कर जोडून विनविते सख्यानो मला न्हाऊ घाला ॥

चर्चुन मेलागिरी उंच स्वासीक अत्तर तेला ॥

पांच पेच अलबेली आणा कोणी बांधुन पगडीला ॥

आंगि रेखिला जामा रुंद पट्टीचा बुंद शेला ॥

सजवून तुरुंग खासा वर नखर्‍याचा ठेविला ॥

ढाल लाल गेंड्याचि रंगित हाती समशेर भाला ॥चाल॥

खंजीर ते गा कंबरेस कसुन फाकडी ॥

तीर कमान दुसरी हाती फुलाचा छडा ॥

अश्ववर स्वार जाहली थेट कानडी ॥

रंगिली बत्तिसी घवघवित मूखी बीडी ॥

मित्रिणी उभ्या त्या एकाहुन एक चढी ॥

अश्रुपात वाहती हुंदतात घडिघडी ॥

बोळविसी आवडी का जणू जाते माहेरी ॥

लोभ असु द्या आता मायबहिणी आम्हावरी ॥१॥

घेउन मुशाफर मेष फाकडी अप्रतिम सजली ॥

मर्दानी दागिने आंगवर चमचमाट बिजली ॥

दाही बोटी आंगठ्या डुबवस्तामध्ये गजबजली ॥

थवथवित शिरी केस अत्तर चमेलीमधे भीजली ॥

गुप्तरूपी एकांति मागल्या द्वाराने धजली ॥

निरवानिरव करून सखी जाते मजलोमजली ॥चाल॥

मनि हेत धरून मार्गाने चालली त्वरे ॥

दरकूच निघाली ती विषयाने त्वेर ॥

मग तृषा लागली व्याकुळ जाहली बरे ॥

करी भरून घेतली झारी प्राण घाबरे ॥

त्या वनामधे वृक्षावर वनचरे ॥

किजबिज करिताती जातिवंत पाखरे ॥

मृदु उत्तरे बोलतो का परदेश तिरी ॥

राघु साळूंकीला सांगतो इष्कबाज कुमरी ॥२॥

राघू उत्तर करी पद्मिणी ऐका दृष्टांत ॥

प्रितीत्ती लक्षणे जाणती चतुर गुणवंत ॥

प्रधान कन्या पुत्रसावकाराचा बळिवंत ॥

बाळपणीचा मित्र सखा नित्य रमे एकांत ॥

कोणे एके दिवसी उभयतां उदासले चित्त ॥

वर्तमान कळता राजाला करि प्राणघात ॥

॥चाल॥ तु भ्रतार माझा मैलागिरी चंदन ॥

आले ह्रदय भरून मुखचंद्राकडे पाहून ॥

शामकर्ण वारु तुजसाठी सजविन ॥

घेईन सतीचे वाण म्हणे कामिन ॥

त्या रणांगिणी पाणी तुम्हास पाजिन ॥

घालून मुखामधे मुख दिल्हे वचन ॥

असा हेत परिपूर्ण असेल तर जा खुशाल नारी ॥

कार्याकरण केलि निवेदन पुढे कथा भारी ॥३॥

ऐक राघवा बत्तिस लक्षणी मी चतुर भार्या ॥

तसाच माझा सत्पुरुष तो गुण प्रकाशसूर्या ॥

सर्व संपन्न गुणसंपन्न गुणातित त्याच्या सौंदर्या ॥

उपमा द्यावया न मिळे पुरुष स्वामि ऐश्वर्या

आज्ञा द्यावी मला पाखरा बळखलीस चर्या ॥

निवडून सांगितला चांगला प्रीतीचा पर्या ॥चाल॥

घरि आणिन उचलून ललकारी वारूला ॥

एक वेळ देउन दमचाक करून फेरिला ॥

हे कंटक वन दारूण ऐक दाखला ॥

चालावे घोड्या दूर पंथ राहिला ॥

घोकणी करित तिथे आसल सखा एकला ॥

यास्तव लौकर भेटावे राजबनसीला ॥

मग जीव संतोषला सुखाची रात्र जाइल सारी ॥

रूसरुसुन बोलणे बरे केले हो घरबारी ॥४॥

सख्याकडिल वर्तमान निर्मळ पंचमीच्या दिवशी ॥

वृंदावनी चालले कृष्णाजी द्वारकानिवासी ॥

जे वेळी सय जाहली प्रियकरिण नाही त्यापासी ॥

उदासले अंतरी लागला चरका चतुरासी ॥

अकस्मात येऊन पोहोचली कामिना सुगुण गुणरासी ॥

जवळ नव्हती सुके लोटल्या रत्नाच्या रासी ॥चाल॥

म्हणे उभे असावे चरणावर लोळते ॥

घालुनी गळ्यासी मिठी हो कवटाळिते ॥

मुखचंद्र तुमचा आदरे कुरवाळिते ॥

कल्पना घेऊन सांगा आज्ञा पाळिते ॥

आज रंग सख्या रंग बाहारिने खेळते ॥

मनि इच्छा पुरवुन घ्यावी कसी टळते ॥

राया वोवाळिते मागली कथा प्राणप्यारी ॥

सगनभाऊ म्हणे रत्‍नपारखी ऐकतील सारी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP