मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नाव तुझे साळू चल आज खेळू ...

सगनभाऊ - नाव तुझे साळू चल आज खेळू ...

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


नाव तुझे साळू चल आज खेळू उभी द्वारी नार नखर्‍याची ।

चाल तुझी मर्‍हाट मोळ्याची ॥ध्रु०॥

नको वर पाहु दुरदूर जाऊ गाठ पडली आज बोल जरा ।

प्रितीचा लाउन तोरा ॥

नाकि नथ हलती नागिन डूलती श्रृंगाराचा काय नखरा ।

कधि होइल संकेत खरा ॥

फार दिस झाले न्हाण तुज आले करू दे गडे आज इष्क पुरा ।

सुभक चांदण्यामधे ठरा ॥

कधि गडे येसी भेटून जासिल खुणगाठ आपले आंतरची ॥१॥

कुंकु कपाळी राजसबाळी बांधा बिन अरवा ॥

बुचड्यामधे खोऊन मरवा ॥

पेंडे तन्मणी जीवलग गडणी शालु नेसुन आज हिरवा ।

सजणाकडे मोहरा फिरवा ॥

घडिभर जाऊ दर्शन घेऊ बोलू त्यासी बेपर्वा ।

भेट सख्याची आज कर्वा ॥

लई मन मिळले नाही कधी टळले आण घाला माझ्या रक्ताची ॥२॥

चंचळ मैना बांधुन पैना आली सजनाला भेटाया ।

चला उभयता रंग पाह्या ॥

राजसरूपडे जिवीचे ठिकडे भेटताच लागन पाया ।

आहे मजवर त्याची माया ॥

आड पडद्याने बहु युक्तिने मुख कुर्वाळिन पतिराया ।

तप्त शरिर जाहली काया ॥

घ्या मांडीवर मला हो कवळून आग्न जाहली आज विषयाची ॥३॥

रंगमहालात पलंग फुलात गुलाबदाण्या तबके भरून ।

उजवा हात स्वामिचा धरून ॥

आडपडद्याने बहु युक्तीने सजन मोहिला प्रिती करून ।

आनंदवृत्तिने वसा ठरून ॥

राग रंग नित्य असावा नार सजनाचा पदर धरून ।

गाई सगन चाल करून ॥

प्रित उभयता मजवर ममता असावी या प्रभुरायाची ।

चाल तुझी मर्‍हाट मोळ्याची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP