स्कंध ३ रा - अध्याय ३३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१९२
मैत्रेय क्षत्त्यासी म्हणती हे सांख्य - । शात्रप्रवर्तक कपिलमुनि ॥१॥
ज्ञानलाभें माता ईश्वरस्वरुपी । स्तवी स्वपुत्रासी परमानंदें ॥२॥
देवा, ब्रह्मा, विष्णु, महेश्वर तूंचि । उदकनिवासी नारायण ॥३॥
विश्वविनायका उदरांत माझ्या । राहिलासी कैसा नवल वाटे ॥४॥
अथवा नवल नसेचि हें तुज । उदरांत विश्व सांठवूनि - ॥५॥
वटपत्रशायी जाहलासी बाळ । भक्तांस्तव खेळ करिसी ऐसा ॥६॥
वासुदेव म्हणे दुष्टनिर्दाळण । भक्तांचें पालन करी देव ॥७॥

१९३
ज्ञानबोधार्थ हा अवतार तुझा । येई कृतार्थता मजलागीं ॥१॥
चांडाळही पुण्यवंत तुझ्या नामें । प्रत्यक्ष दर्शनें कां न लाभ ॥२॥
सर्व साधनांचें फल तुझ्य नांएं । तुझेंचि करणें ध्यान, योग्य ॥३॥
प्ररब्रह्म तूंचि, तूंचि वेदगर्भ । असो नमस्कार तुजसी माझा ॥४॥
मातेसी कपिल म्हणती हा मार्ग । आचरीं सुलभ मोक्षास्तव ॥५॥
क्रमितां हा मार्ग उद्धरती जन । संसारभ्रमण इतरांलागीं ॥६॥

१९४
मैत्रेय बोलती क्षत्त्यासी या रीति । कपिल मातेसी करुनि बोध ॥१॥
वंदूनियां आज्ञा घेऊनि तियेची । इच्छित स्थलासी निघूनि गेले ॥२॥
सरस्वतीतीरीं राही देवहूति । नित्य साधनींती रमूनि जाई ॥३॥
कृष्णकुंतल ते जाहले पिंगट । तेंवी जटारुप स्नानें होती ॥४॥
गोंडस शरीर कृशत्व पावलें । परिधानी वल्कलें त्यजूनि वस्त्रें ॥५॥
पतिसामर्थ्यानें विषय जे भोगी । मानूनि ते त्यागी विषरुप ॥६॥
वासुदेव म्हणे पतीचा विरह । पाहूनि सत्पुत्र विसरे सती ॥७॥

१९५
ज्ञानलाभेंही तें पुत्राचें स्मरण । होतांचि उद्विग्न होई मनीं ॥१॥
ध्यानधारणेचा करुनि अभ्यास । ईशचिंतनांत नित्य रमे ॥२॥
कपिलोक्त मार्गे अवयवध्यान । करुनियां मन स्थिर करी ॥३॥
समाधि साधूनि अहंकार नष्ट । झाला, देहभाव स्पर्शेचि ना ॥४॥
अलौकिक गुप्त तेज अंगावरी । ऐक्यता पावली परब्रह्मीं ॥५॥
सिद्धपूर नामें स्थान तें प्रसिद्ध । देवहूति मुक्त जया स्थानीं ॥६॥
वासुदेव म्हणे सरितापदासी । पावे देवहूति तपोबळें ॥७॥

१९६
सरित्तटाकीं त्या बहु सिद्ध येती । तत्काळ त्यां सिद्धी तयास्थानीं ॥१॥
असो, ईशान्येसी गेले कपिलमुनि । सिद्ध गंधर्वांनीं स्तविलें तयां ॥२॥
सांख्यशास्त्रज्ञानीं गौरविलें त्यांसी । मुनि त्या ठायासी ध्यानमग्न ॥३॥
विदुरा, संवाद कथिला हा तुज । गुप्त कपिलोक्त शुद्धमार्ग ॥४॥
श्रवण जो याचें करील सर्वदा । चित्त एकाग्रता साधूनियां ॥५॥
गरुडध्वज त्या भगवंत जोडे । ऐशा भक्तियोगें सहजपणें ॥६॥
वासुदेव म्हणे तृतीय हा स्कंध । पठणें मुकुंद तोष पावे ॥७॥

इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ३ रा समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP