स्कंध ३ रा - अध्याय २८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१५८
माते, सबीज निर्बीज । योग जाणावा द्विविध ॥१॥
सगुण ध्यानें तो सबीज । मूर्तिविहीन निर्बीज ॥२॥
सबीज तो सुलभ मार्ग । व्हावें धर्ममार्गीं रत ॥३॥
सदा संतुष्ट असावें । चित्त प्रसन्न राखावें ॥४॥
साधूनियां स्थिरासन । आंवरावा नित्य प्राण ॥५॥
मूलाधारीं वा अन्यत्र । प्राणांसवें जडो चित्त ॥६॥
अति चंचल हें मन । व्हावें सदा सावधान ॥७॥
गोंजारुनि तयाप्रति । गुंतवावें ईशपदीं ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसा । मार्ग कपिलोक्त साचा ॥९॥

१५९
माते, शुद्धस्थानीं मांडावें आसन । उंचनीचही न असणें योग्य ॥१॥
दर्भासनीं मृगचर्मावरी वस्त्र । बैसावें सरळ तयावरी ॥२॥
अग्नितापे जेंवी सुवर्णाची शुद्धि । तेंवी चित्तशुद्धि प्राणायामें ॥३॥
त्रिदोशशमन होई प्राणायामें । तेंवी धारणेंने पापनाश ॥४॥
प्रत्याहारें घडे विषयविराग । ध्यानें राल लोभ नष्ट होती ॥५॥
ऐशा योगमार्गे होई चित्तशुद्धि । नासिकाग्र दृष्टि करणें स्थिर ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती मूर्तिध्यान । वर्णिती सप्रेम मुनिराज ॥७॥

१६०
शंखचक्र गदाधारी प्रसन्न वदन । कमलगर्भासम ज्याचे आरक्त लोचन ॥१॥
कृष्णकमलपत्रासम नीलवर्ण शोभे । कमल केसरांपरी तो पीतांबर साजे ॥२॥
कंठीं कौस्तुभाची कांति श्रीवत्सलांछन । वनमालेवरी धुंद मधुपांचें गान ॥३॥
माणीक-मोत्यांचीं मूल्यवान तीं भूषणें । कटिप्रदेशीं मेखला । झळके तेजानें ॥४॥
हृदयकमलसिंहासनीं देवराणा । शांत गंभीर स्वरुपें तोषवी भक्तांना ॥५॥
लोक लोकपालही त्या करिती वंदन । कृपासिंधु अवलोकीं भक्तांसी सप्रेम ॥६॥
वासुदेव म्हणे वर द्यावया उत्सुक । कपिल कथिती ऐसा घ्यावा भगवंत ॥७॥

१६१
आवडीचें ध्यान करुनियां चित्त । रंगूनियां तेथ जावो सदा ॥१॥
हृदयमंदिरीं स्थिर होतां ध्यान । करावें चिंतन अवयवांचें ॥२॥
वज्रांकुश ध्वज, पद्म पादचिन्हें । आरक्त नखाग्रें तेजोमय ॥३॥
चरणसरोजापासूनि ते गंगा । उद्भवूनि जगा पुनित करी ॥४॥
जंघाद्वय लक्ष्मी घेऊनियां अंकीं । सेवा कोमलांगी करी त्यांची ॥५॥
ऊरु गरुडाच्या विराजती स्कंधीं । कटिप्रदेशासी पीतांबर ॥६॥
कमरपट्टा तो शोभे तयावरी । नाभीच्या विवरीं कमलनाल ॥७॥
पाचूसम स्तन पुष्पवर्णे गौर । भव्य वक्षस्थल लक्ष्मीसवें ॥८॥
कौस्तुभासी शोभा येई त्या कंठानें । शोभती भूषणें पुष्ट बाहु ॥९॥
वासुदेव म्हणे चक्र पांचजन्य - । हंसासम, पद्म रक्त, गदा ॥१०॥

१६२
वनमालेवरी क्रीडती मधुप । चैतन्यस्वरुप कौस्तुभ तो ॥१॥
सरळ नासिका तरल कुंडलें । कपोल शोभले कांतीनें त्या ॥२॥
नेत्र काळेभोर पहा मस्त्याकृति । त्यांवरी रुळती कुरळे केश ॥३॥
भुंवया पावती स्फुरण यापरी । चिंतावें अंतरीं नित्य ध्यान ॥४॥
दया करी ऐसी करुनि भावना । टक लावूनियां अवलोकावें ॥५॥
दु:खनिवारक हास्यही चिंतावें । वासुदेव भावें शरण तया ॥६॥

१६३
भ्रुकुटीमंडल ध्यावें श्रीहरीचें । कदाही न बाधे काम जेणें ॥१॥
मोहित कराया कामासी प्रभूनें । रचिलें मायेनें मंडल हें ॥२॥
पुढती मोठ्यानें हांसे प्रभु ऐसें । ध्यान योगियातें भक्तिप्रद ॥३॥
कुंदकळ्यांसम दंतपंक्तीवरी । कांति विराजली अधरोष्ठाची ॥४॥
किंचिदारक्तता दंतांवरी तेणें । ध्यान हें प्रेमानें हृदयीं भरो ॥५॥
अन्यदर्शनाची इच्छा न पुढती - । धरितां, प्रगटती अष्ट भाव ॥६॥
काष्ठ दग्ध होतां अग्नि स्वस्वरुपीं । ध्याता ध्येयामाजी तैसा लीन ॥७॥
वासुदेव म्हणे ऐशा योगियासी । नसेचि देहाची शुद्धि कांहीं ॥८॥

१६४
प्रारब्धकर्मे तो वर्ते पूर्वीसम । परी भासमान संसार त्या ॥१॥
पुत्र धनासी तो मानीतसे प्राण । असूनि विभिन्न तयांहूनि ॥२॥
स्फुलिंग, निखारे, धूमासही कोणी । मानिताती अग्नि असूनि भिन्न ॥३॥
तेंवी मन, बुद्धि, इंद्रियांचा द्रष्टा । अलिप्त सर्वदा भिन्न असे ॥४॥
जारज, स्वेदज भूतभावें एक । तेंवी ईशतत्त्व सकल भूतीं ॥५॥
र्‍हस्व दीर्घ काष्ठासम अग्नि भासे । देहभेदें तैसे भेद जनीं ॥६॥
बाधक हे माया निवारुनि ऐसी । योगी स्वस्वरुपीं लीन होई ॥७॥
वासुदेव म्हणे ध्यानयोग ऐसा । पुत्र कर्दमाचा स्पष्ट करी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP