स्कंध ३ रा - अध्याय २५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३०
बिंदुसरोवरीं राहिले कपिल । मातेचा उद्धार करावया ॥१॥
माता म्हणे तया एकदां, तूं देव । हरीं मायामोह सकल माझा ॥२॥
नमस्कार तुज असो हे ईश्वरा । प्रभो सर्वाधारा ज्ञानरुपा ॥३॥
वासुदेव म्हणे मातेलागीं बोध । कपिलांचा साड्ग ऐका आतां ॥४॥

१३१
मोक्षमार्ग एक, माते, ज्ञानयोग । विषयविराग उपजे तेणें ॥१॥
पुरा ऋषींप्रति कथिला तो ऐकें । बंधन जीवातें अंत:करण ॥२॥
विषयासक्त तें बंधासी कारण । चिंती नारायण तदा मुक्ति ॥३॥
अहं ममोत्पन्न काम क्रोधादिक । नष्ट होतां चित्त शुद्धि पावे ॥४॥
शुद्धचित्त होई सुख-दु:खातीत । निरपेक्ष, शांत, ज्ञानयोग्य ॥५॥
भक्ति-ज्ञान वैराग्याची तैं उत्पत्ति । जेणें आत्मस्थिति बिंबे मनीं ॥६॥
वासुदेव म्हणे प्रकृतीसी पर । सूक्ष्म परात्पर स्वयंप्रभ ॥७॥

१३२
निष्काम भक्तीनें घडे ब्रह्मप्राप्ति । योग्यांची विश्रांती हेचि एक ॥१॥
सज्जनसंगती धरावी सर्वदा । संग विषयांचा सुटे तेणें ॥२॥
सहनशील ते दयाळु सज्जन । सद्धर्माचरण दक्ष सदा ॥३॥
सुशीलता हेंचि भूषण तयांचें । सर्व कर्मे मातें अर्पिती ते ॥४॥
आप्तांचाही संग त्यागिती मदर्थ । दोष संगतीनें झडती त्यांच्या ॥६॥
वासुदेव म्हणे सज्जनसंगति । घडो अहर्निशीं हेचि इच्छा ॥७॥

१३३
सज्जनसंगानें ईशशक्तिबोध । मानवा यथार्थ होत असे ॥१॥
अज्ञाननिवृत्ति घडे कथालाभे । तोचि मोक्ष ऐसें म्हणती ज्ञाते ॥२॥
आस्तिक्यभाव तो उपजे श्रवणें । ईशपदीं तेणें प्रेम जडे ॥३॥
दृढभक्ति चित्तीं होई यथाक्रम । सृष्ट्युत्पत्तिज्ञान पुढती होई ॥४॥
नश्वर सुखाचा येई तिरस्कार । योगमार्ग थोर पुढती क्रमी ॥५॥
वासुदेव म्हणे सर्वांतर्यामीचा । बोध क्रमें ऐसा मनुजा घडे ॥६॥

१३४
देवहूति म्हणे पावेन मोक्षासी । कथीं ऐसी भक्ति सुलभचि जे ॥१॥
कथिलासी योग कैसा तो करावा । साड्ग तो कथावा मजप्रति ॥२॥
ऐकूनि मातेसी प्रकृत्यादि तत्व - । युक्त, सांख्य शास्त्र कथिती मुनि ॥३॥
वासुदेव म्हणे मातेचा उद्धार । कपिल साचार करिती आतां ॥४॥

१३५
माते, विषयग्रहण । करिती इंद्रियें तीं जाण ॥१॥
कार्य तितुकेंचि न त्यांचें । विहित कर्म घडो साचें ॥२॥
तेणें घडे चित्तशुद्धि । जेणें सुटे विषयासक्ति ॥३॥
वृत्ति ईश्वरीं निष्काम । माते, तेचि भक्ति जाण ॥४॥
अष्टसिद्धींहूनि श्रेष्ठ । सहज लाभे तेणें मोक्ष ॥५॥
अन्न जेंवी जठराग्नीनें । लिंगदेह तैं भक्तीनें - ॥६॥
नष्ट होई, माते भक्त । तुच्छ लेखिती मुक्तीस ॥७॥
ईश्वरार्थ करुनि कर्म । गाती ऐकती तद्‍गुण ॥८॥
वासुदेव म्हणे दिव्य । दर्शन त्यां घडे नित्य ॥९॥

१३६
देवांसवें ज्या भाषण । मुक्ति तयां इच्छेविण ॥१॥
सिद्धी त्यांच्या चरणदासी । परी निरिच्छ ते योगी ॥२॥
वैकुंठींचेही विषय । तुच्छ तयां ईश प्रिय ॥३॥
त्याच्या चरणसेवेविण । रुचे कांहीं न त्यां अन्य ॥४॥
माते, ऐसा भक्तियोग । नसे तुजसी असाध्य ॥५॥
पुत्र, मित्र, गुरु, आप्त । मानी ईश्वरासी भक्त ॥६॥
कालचक्र सकलां ग्रासी । त्याचें भय न भक्तांसी ॥७॥
सूर्य, इंद्र, वायु, यम । असती ईश्वरा भिऊन ॥८॥
तया नित्य शरण जावें । आत्मकल्याण साधावें ॥९॥
वासुदेव म्हणे भय । भक्तालागीं करी काय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP