स्कंध ३ रा - अध्याय २१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०४
मैत्रेयासी क्षत्ता म्हणे स्वायंभुव । मनूचा सकल वंश कथा ॥१॥
प्रियव्रत तेंवी उत्तानपादाचें । देवहूत्यादीचें कथा वृत्त ॥२॥
रुचि कर्दम तैं दक्षप्रजापति । निर्मिती जी सृष्टि तेही कथा ॥३॥
मैत्रेय बोलती कर्दमासी ब्रह्मा । करीतसे आज्ञा तप करीं ॥४॥
दशशस्त्राब्दें सरस्वतींतीरीं । मुनि तप करी आज्ञेसम ॥५॥
तपानें त्या ईश होऊनि संतुष्ट । जाहला प्रगट चतुर्भुज ॥६॥
वासुदेव म्हणे कर्दम आनंदें । स्तवन देवांचे करीतसे ॥७॥

१०५
पूर्वपुण्य माझें उदयासी आलें । सफल जाहले नेत्र माझे ॥१॥
संसारसागरीं तूंचि देवा, नाव । निष्काम जो भाव प्रिय तुज ॥२॥
परी चतुर्विध पुरुषार्थसाधक । कांता देईं मज नारायणा ॥३॥
ऋणत्रयमुक्त होईन मी तेणें । त्वद्‍गुण कीर्तनें भक्तां सौख्य ॥४॥
कालही तयांसी न बाधे कदापि । इहपर देसी तयांप्रति ॥५॥
सकाम निष्काम दर्शनें कृतार्थ । कांता देईं मज नमन असो ॥६॥
वासुदेव म्हणे हांसूनि ईश्वर । बोलला साचार ऐका आतां ॥७॥

१०६
कर्दमा, तुज मी जाहलों प्रसन्न । तृतीय दिनीं पूर्ण हेतु तव ॥१॥
देवहूती कन्या राजर्षि मनूची । अनुरुप पती इच्छीतसे ॥२॥
शतरुपेसवें मनु येऊनियां । अर्पितील कन्या तुजलागीं ॥३॥
नवकन्या तुज होतील पुढती । मरीच्यादिकांसी अर्पिसील ॥४॥
देवहूतीचा मी होऊनियां पुत्र । निवेदीन शास्त्र तिजप्रति ॥५॥
आश्रमधर्मे तूं होसील पावन । करी गुणगान वासुदेव ॥६॥

१०७
ईश्वरदर्शनें प्रेमाश्रु जे आले । बिंदु नामें झालें सरोवर ॥१॥
तीरावरी त्याच्या रम्यवनशोभा । मनु शतरुपा येती तेथें ॥२॥
कर्दमासी तया पाहूनि आनंद । कर्दम मनूस वदती प्रेमें ॥३॥
विष्णूचा तूं अंश घेईं हे वंदन । वर्णाश्रमधर्म संरक्षिसी ॥४॥
संचारें रक्षिसी धर्म तूं नृपाळा । नास्तिकांचा झाला मोड तेणें ॥५॥
आगमनहेतु कथीं करीं आज्ञा । होईल ते मान्या मान्य मज ॥६॥
वासुदेव म्हणे थोरांचा विनय । पाहूनियां आर्य नम्र होती ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP