स्कंध ३ रा - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४३
पुढती ब्रह्मयानें शत वर्षे तप । करुनि हें विश्व निर्मियेलें ॥१॥
उदकासवें त्या प्रलयवायूतें । प्राशूनि रचिलें भुवनत्रय ॥२॥
महलोंक, जन-तप-सत्यलोक । अनासक्तां प्राप्त्ल, इतर अन्यां ॥३॥
त्रैलोक्यविनाश प्रति कल्पीं पावे । द्विपरार्ध जाणावे इतर चार ॥४॥
ईश्वराचें निवेदावें कालरुप । प्रश्न मैत्रेयांस विदुर करी ॥५॥
वासुदेव म्हणे कालाचें स्वरुप । देऊनियां चित्त परिसा आतां ॥६॥

४४
विदुरा, हा काल अरुप अनंत । गुणभेदें रुप तया भासे ॥१॥
विलीन हें विश्व पुरा विष्णुरुपीं । निमित्त कालासी करितां व्यक्त ॥२॥
कार्यानुमेयचि जाणावा हा काल । कार्य हें विशाल जग त्याचें ॥३॥
यथापूर्व जग कालही तैसाचि । दशविध सृष्टि तन्निमित्तें ॥४॥
प्राकृतिक सहा, विकृतीचे तीन । संयुक्त तो जाण दशम भेद ॥५॥

४५
नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक ऐसे । त्रिविध सृष्टीचे प्रलय जाणें ॥१॥
कालकृत नित्य, शेषमुखअग्नि । प्रलय मेघांनीं नैमित्तिक ॥२॥
स्वस्वकार्यग्रासें गुणकृत ऐसा । तृतीय तो साचा प्राकृतिक ॥३॥
गुणन्यूनाधिक्य, महत्तत्त्व तेंचि । प्रथम ते सृष्टि द्वितीय ऐकें ॥४॥
अहंकार द्रव्य - ज्ञान क्रियात्मक । स्थूल सूक्ष्मभूत तृतीय सृष्टि ॥५॥
ज्ञानकर्मेंद्रियें चतुर्थ ते सृष्टि । देवता मन तीं पुढती जाणें ॥६॥
तामिस्त्रादि पंचविध ते अविद्या । पुढती जीवाचा साक्षात्‍ बंध ॥७॥
महत्तत्त्व, अहंकार तैं अविद्या । प्राकृतिक त्रिधा प्रमुख भेद ॥८॥

४६
वैकृतिक सृष्टि जाणावी त्रिविध । जाणावी षड्‍विध प्रथम भागीं ॥१॥
वनस्पति तेंवी ओषधी त्या लता । त्वक्सार वीरुधां वृक्षांसवें ॥२॥
आहार तैं गति ऊर्ध्व असे यांसी । अस्पष्टचि शक्ति चैतन्याची ॥३॥
अंतर्यामी स्पर्श बोध तयांप्रति । विशेष धर्मेसी युक्त तेंवी ॥४॥
‘स्थावर’ हे सृष्टि आतां ‘तिर्यक्‍’ ऐका । अष्टाविंशति त्यामाजी भेद ॥५॥
सामान्यत्वें तयां नसे दूरदृष्टि । आहार भयादि मात्र ज्ञान ॥६॥
घ्राणज्ञ संस्काराक्षमचि स्वभाव । नामें वासुदेव कथी ऐका ॥७॥

४७
वृष, अज, गवा, महिष, हरिण । रुरु, मेंढा जाण, सूकर, उष्ट्र ॥१॥
द्विशफ हे नऊ, एक शफ सहा । गर्दभ तो पहा अश्व गौर ॥२॥
खेचर, शरभ, वनगाय तेंवी । पंचनख घ्यावी सृष्टि ध्यानीं ॥३॥
श्वान जंबुक तैं वृक, व्याघ्र साळ । गज तैं मार्जार शश सिंह ॥४॥
वानर, कांसव, तेंवी घोरपड । पंचनख भेद जाणावे हे ॥५॥
जलचर तेंवी पक्षी आतां अंत्य । वासुदेव स्पष्ट पुढती कथी ॥६॥

४८
तृतीय भेद तो मानव जाणावा । रज तो जाणावा अधिक तेथ ॥१॥
कर्ममग्न भवसुखांतचि रत । जाण वैकृतिक सृष्टि ऐसी ॥२॥
देवसृष्टि तेही जाण वैकृतिक । सत्त्वगुण तेथ अधिक असे ॥३॥
प्रथम ते देव पितर द्वितीय । दैत्य ते तृतीय ध्यानीं धरा ॥४॥
गंधर्व अप्सरा जाणावे चतुर्थ । राक्षस ते यक्ष पंचमही ॥५॥
पिशाचभूत ते षष्ठ तैं चारण - । सिद्ध ते सप्तम, विद्याधर ॥६॥
किन्नरादि जाण अष्टम तो भेद । ऐसी अष्टविध देवयोनी ॥७॥
वासुदेव म्हणे कुमार दशम । सृष्टि कथिती भिन्न ऐशा भेदें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP