स्कंध ३ रा - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५४
सृष्ट्यारंभी ब्रह्मा निर्मि पंचवृत्ति । त्या तममोहादि वेदाधारें ॥१॥
स्वरुपज्ञान ते तमवृत्ति होय । मोह अहंभाग देहादिकीं ॥२॥
भोगइच्छा तेचि महामोहवृत्ति । इच्छाभंगें वृत्ति तामिस्त्र ते ॥३॥
भोगभंग होतां मानी सर्व नाश । ते अंधतामिस्त्र वृत्ति असे ॥४॥
पंचपर्वा ऐसी सृष्टि पापरुप । पाहूनियां खेद विरंचीतें ॥५॥
वासुदेव म्हणे पुढती विरंची । सनत्कुमारांसी निर्मीतसे ॥६॥

५५
प्रथम सनक, सनंदन दुजा । सनातन तिजा पुत्र जाणा ॥१॥
सनत्कुमार तो चतुर्थ जाणावा । मोक्षचि त्यां ठेवा वाटतसे ॥२॥
सृष्ट्युत्पत्ति करा ऐसी पितृआज्ञा । येईचि न मना तयांचिया ॥३॥
तदा ब्रह्मदेव कोपला बहुत । अनावर क्रोध होई त्याचा ॥४॥
नील लोहित तैं लल्लाटीं त्या पुत्र । जाहला शंकर म्हणती तया ॥५॥
रुदन तयानें आरंभिलें थोर । नामें आणि स्थळ मागतसे ॥६॥
वासुदेव म्हणे तदा ब्रह्मदेव । नामें आणि स्थळ अर्पी तया ॥७॥

५६
रोदनें तूं रुद्र, मन्यु, महीनस । महान्‍, ऋतुध्वज, उग्ररेत ॥१॥
मनु, ध्रुवव्रत, काल, वामदेव । शिव आणि भव नामें तुज ॥२॥
हृदय, इंद्रियें, प्राण, सूर्य, चंद्र । पंचभूतें, तप, स्थानें जाण ॥३॥
धी, वृत्ति, उमा, उशना, नियुत्सर्पी । इला, अंबिका ती सुधा, दीक्षा ॥४॥
दूरावती तेंवी रुद्राणी या स्त्रिया । ‘निर्मी’ रुद्रा, प्रजा, वदे ब्रह्मा ॥५॥
ब्रह्मदेव ऐसें बोलतां शिवानें । प्रजा तद्वचनें निर्मियेली ॥६॥
दाहकारक ती पाहूनियां प्रजा । ब्रह्मा धाडी तपा शंकरातें ॥७॥
वासुदेव म्हणे पुढती विरंची । निर्मी निजांगेंसी दशपुत्र ॥८॥

५७
अंकीं तो नारद, अंगुष्ठीं तो दक्ष । निर्मिला वसिष्ठ प्राणांतूनि ॥१॥
त्वचेमाजी भृगु, ऋतु हस्तांतूनि । सुनाभीपासूनि पुलहा जन्म ॥२॥
कर्णद्वयांतूनि पुलस्त्य जाहला । वदनीं अंगिरा, नयनीं अत्रि ॥३॥
मनापासूनि तो मरीचीचा जन्म । वासुदेव धन्य श्रवणें होई ॥४॥

५८
दक्षिण हस्तेंसी निर्मियेला धर्म । साक्षात्‍ नारायणस्वरुप तो ॥१॥
मृत्युकारक तो अधर्म तत्पृष्ठीं । हृदयीं कामासी निर्मियेलें ॥२॥
भ्रुकुटीपासूनि निर्मियेला क्रोध । अधरोष्ठीं लोभ प्रगटला ॥३॥
मुखापासूनि ते देवी सरस्वती । सागर उपस्थीं, असुर गुदीं ॥४॥
छायेपासूनियां प्रगटे कर्दम । देवहुती जाण कांता त्याची ॥५॥
वासुदेव म्हणे पुढती आश्चर्य । ऐका झालें काय शांतचित्तें ॥६॥

५९
महापराक्रमी काम । भ्रमलें विरंचीचें मन ॥१॥
शांत विकाररहित । रम्य सरस्वतीरुप ॥२॥
ब्रह्मा पाहूनि तिजसी । कामपीडित तो चित्तीं ॥३॥
जाणूनि तें मरीच्यादि । बोध करिती तयासी ॥४॥
आजवरी पूर्वजांनीं । ऐसें कर्म केलें नाहीं ॥५॥
ताता, आचरती थोर । तैसे वागती इतर ॥६॥
ऐसें बोलूनि सुबुद्धि - । लाभास्तव, प्रार्थिताती ॥७॥
तदा विरंची लज्जित । करी निजदेहत्याग ॥८॥
वासुदेव म्हणे धुकें । मृत शरीर ब्रह्मयाचें ॥९॥

६०
मैत्रेय क्षत्त्यासी प्रश्नोत्तरें देती । ब्रह्मा एका कल्पीं चिंती वेद ॥१॥
पूर्वादि क्रमानें मुखांतूनि त्याच्या । ऋग्वेदादिकांचा उगम होई ॥२॥
आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्वही । स्थापत्य तो पाहीं त्याचि क्रमें ॥३॥
चारही मुखांनीं इतिहासपुराणें । विविध यज्ञ जाणें त्याचि क्रमें ॥४॥
विद्या, दान, तप, सत्य, धर्मपाद । आश्रम साचार यथाक्रम ॥५॥
वासुदेव म्हणे प्रति आश्रमीचें । चतुष्प्रकार ते ऐका आतां ॥६॥

६१
तीन दिन गायत्र्यध्ययनास्तव । जाणें ब्रह्मचर्य सावित्र तें ॥१॥
एक संवत्सर प्राजापत्यरुप । वेदाध्ययनार्थ ब्राह्म जाणें ॥२॥
आमरण जें तें बृहत्‍ ब्रह्मचर्य । प्रकार हे चार ध्यानीं घ्यावे ॥३॥
वार्ता कृषिकर्मादि ते अनिषिद्ध । वृत्ति ते संचय पौरोहित्य ॥४॥
आयाचितवृत्ति शालीन जाणावी । उंच्छ ते जाणावी धान्यकणें ॥५॥
वासुदेव म्हणे गृहस्था या चार । उत्तर उत्तर श्रेष्ठ वृत्ति ॥६॥

६२
वैखानस वालखिल्य, औदुंबर । फेनप या चार वानप्रस्थीं ॥१॥
अनासायसलब्ध वृत्ति ते प्रथम । लाभतां नूतन प्रथम दानें - ॥२॥
वालखिल्य नामें द्वितीय ते वृत्ति । उठतांचि दृष्टि दिशेसी ज्या ॥३॥
दिशेचीं त्या कंदमुळें फळें सेवी । तृतीय जाणावी वृत्ति तेचि ॥४॥
गलितपणें वा फळेंचि सेवावीं । चतुर्थ जाणावी वृत्ति थोर ॥५॥
वासुदेव म्हणे संन्यासही चार । ऐकावे साचार वृत्तिरुपें ॥६॥

६३
आश्रमधर्म ते ‘कुटीचक्र’ वृत्ति । ‘बहूदक’ वृत्ति पुढती ऐका ॥१॥
आवश्यक कर्माविण सर्व काल । करावा सफल ज्ञानाभ्यासें ॥२॥
ज्ञानाभ्यासास्तव सर्वकर्मत्याग । ‘हंसवृत्ति’ चांग निवेदिती ॥३॥
‘निष्क्रिय’ वृत्ति ते पूर्ण ज्ञानरुप । यथाक्रम श्रेष्ठ वृत्ति ऐशा ॥४॥
वासुदेव म्हणे चतुर्मुखें ब्रह्मा । निर्मी विद्या नाना कला शास्त्रें ॥५॥

६४
आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता, दंडनीति । पूर्व - पश्चिमादि मुखांतूनि ॥१॥
तैशाचि व्याहृति भूर्भव: स्वरादि । प्रणव हृदयाकाशी प्रकटे त्याच्या ॥२॥
नीहारदेह तो नष्ट होतां पुरा । अन्य देह ल्याला ब्रह्मदेव ॥३॥
द्विविध तो  होतां आश्चर्य जनांसी । मनु शतरुपेची उत्पत्ति ते ॥४॥
उत्तानपाद तैं प्रियव्रत पुत्र । जाहले, मनूस कन्या तीन ॥५॥
आकूति, रुचीतें, दक्षासी प्रसूति । कांता देवहूती कर्ममातें ॥६॥
वासुदेव म्हणे त्या कालापासूनि । मैथुनधर्मेही प्रजा बहु ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP