स्कंध ३ रा - अध्याय २६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३७
भक्तिमार्ग ऐसा कथिला तो माते । तत्वबोध ऐकें कथितों आतां ॥१॥
तयाज्ञानें मायागुण न बाधती । अहंकारग्रंथी तुटूनि जाई ॥२॥
जयापासूनि हें विश्व अभिव्यक्त । पुरुष तयास म्हणती ज्ञाते ॥३॥
स्वयंप्रकाश तो प्रकृतीसी पर । अनादि साचार निर्गुण तो ॥४॥
व्यापका तयानें गुणमयी शक्ति । जवळी येतांचि स्वीकारिली ॥५॥
जीव ईश्वर हे भेद तयाचेचि । द्विविध प्रकृति कथितों आतां ॥६॥
अविद्या माया हे प्रकृतीचे भेद । वासुदेव सांख्य तत्व कथी ॥७॥

१३८
प्राक्तनक्षयानें जीवचि ईश्वर । अविद्या साचार ओळखितां ॥१॥
अविद्यामोहानें भूल पडे जीवा । उपाधी जाणावा आच्छादक ॥२॥
संसारभ्रमण तेणेंचि जीवासी । त्रिविध हे सृष्टि रची माया ॥३॥
ईशशक्ति माया तयाच्या आधीन । अकर्ताचि जाण जीव नित्य ॥४॥
सर्वसाक्षी सुखस्वरुप असूनि । परतंत्र जनीं अविद्येनें ॥५॥
गुणकार्यकर्ता मीचि ऐसें मानीं । भोक्तृत्व तें ज्ञानी म्हणती जीवा ॥६॥
कार्यकारणत्व कर्तृत्वही पाहीं । अहंभावें येई जीवावरी ॥७॥
वासुदेव म्हणे प्रकृतीचे धर्म । जीवासी बंधन अहंभावें ॥८॥

१३९
देवहूति म्हणे अविद्या जीवांची । लक्षणें हीं साचीं कळलीं मज ॥१॥
प्रकृति पुरुष कथावे ते आतां । विश्वोत्पत्यादिकां कारण जे ॥२॥
कपिल मातेसी म्हणे हे प्रकृति । विशेष धर्मासी आधारचि ॥३॥
घटपटांलागीं नभाचा आधार । तैसीच साचार प्रकृति हे ॥४॥
त्रिगुणात्मिका हे इंद्रियां न कळे । कार्यकारण हें रुप तिचें ॥५॥
नष्ट न ते कदा प्रधान हें नाम । तिजलागीं अन्य असे एक ॥६॥
वासुदेव म्हणे प्रकृतीचें रुप । कथिती मातेस ऐसें मुनि ॥७॥

१४०
स्थूल सूक्ष्म भूतें मन बुद्धि चित्त । तेंवी अहंकार दशेंद्रियें ॥१॥
चतुर्विंशति या तत्वांसी प्रधान - । कार्यरुपी ब्रह्म संज्ञा असे ॥२॥
पृथिव्यादि स्थूल शब्दादि तीं सूक्ष्म । भूतें तेंवी जाण कर्णादिक ॥३॥
ज्ञानेंद्रियें तैसीं हस्तपादादिक । कर्मेंद्रियें देख ऐशापरी ॥४॥
संकल्प, निश्चय, अभिमान, चिंता । वृत्ती मनादींच्या ध्यानीं घ्याव्या ॥५॥
कालतत्व कोणी मानिती आणिक । अवस्थाविशेष प्रकृतीचा ॥६॥
वासुदेव म्हणे काळही द्विविध । कपिल मातेस निवेदिती ॥७॥

१४१
देहाहंभावेसी जीवा भयप्रद । संहारकारक काळ एक ॥१॥
गुणवैषम्यासी मूळ जो कारण । उत्पादक जाण माते, दुजा ॥२॥
अंतर्यांमी काळरुपें अंतर्बाह्य । व्यापूनि हें विश्व आत्मा वसे ॥३॥
चतुर्विंशति हे प्रकृतीचे भेद । जीव - शिवरुप पुरुष भिन्न ॥४॥
जीव पूर्व कर्में होतां फलोन्मुख । होई गुणक्षोभे तेणें बळें ॥५॥
ईशचैतन्यें तैं होई महत्तत्व । प्रथम अंकुर विश्वाचा हा ॥६॥
वासुदेव म्हणे महत्त्वत्व । प्रलयींही नाश न घडे त्याचा ॥७॥

१४२
माते, चतुर्व्यूह उपासना आतां । निवेदितों चित्ता स्थिर करीं ॥१॥
रागद्वेषहीन निर्मल तें स्थान । वासुदेव नाम महत्तत्वा ॥२॥
अधिभूतरुपें संज्ञा महत्तत्व । अध्यात्में ते चित्त संज्ञा त्यासी ॥३॥
उपास्यरुपानें वासुदेव तोचि । क्षेत्रज्ञ चित्तासी अधिष्ठाता ॥४॥
वासुदेव म्हणे प्रथम हा व्यूह । ऐसा मुनिराय निवेदिती ॥५॥

१४३
नि:संपर्क जल जेंवी शुद्ध शांत । होई तें विकृत संबंधेंसी ॥१॥
अवस्था चित्ताची जाणावी हे तैसी । नसतां वृत्युत्पत्ति चित्त शांत ॥२॥
वृत्त्युद्भवें कामक्रोधाधिसंयुक्त । होऊनियां चित्त मलिन होई ॥३॥
महत्तत्वकालगतीनें विकृत । होतांचि त्रिविध रुप धरी ॥४॥
सत्वांशे तें मन इंद्रियें रजानें । भूतें तमोगुणें निर्मियेलीं ॥५॥
त्रिविधरुपा या संज्ञा अहंकार । अनंत, सहस्त्रवदन, हाचि ॥६॥
संकर्षण हाचि व्यूह हा द्वितीय । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥७॥

१४४
अधिभूतरुपें भूतादि त्या संज्ञा । अहंकार संज्ञा अध्यात्में त्या ॥१॥
उपास्यरुपानें संज्ञा संकर्षण । अधिष्ठाता जाण रुद्र यासी ॥२॥
कर्तृत्वही याचें देवतास्वरुपें । इंद्रियस्वरुपें करणत्व ॥३॥
भूतांच्या स्वरुपें कार्यत्व ये यासी । शांति ते क्रौर्यादि गुणांसम ॥४॥
वासुदेव म्हणे अहंकाराचीं हीं । लक्षणें नित्याचीं ध्यानीं घ्यावीं ॥५॥

१४५
सात्विकाहंकारें मनाची उत्पत्ति । मूळ वासनांसी तेंचि असे ॥१॥
अनिरुद्ध नामें इंद्रियाधिप तो । वर्ण त्या शोभतो कमलनील ॥२॥
आराधूनि वश करिती या योगी । तृतीय व्यूहाची स्थिति ऐसी ॥३॥
अधिभूत अध्यात्महि एथ मन । उपास्य तो जाण अनिरुद्ध ॥४॥
अधिष्ठाता यासी जाणावा तो चंद्र । राजस विकार परिसें आतां ॥५॥
वासुदेव म्हणे सांख्यांचें हें गूढ । देऊनियां चित्त ध्यानीं घ्यावें ॥६॥

१४६
राजसाहंकार पावतां विकार । बुद्धितत्व थोर उपजे तेथें ॥१॥
वृत्तिभेदें भिन्न भिन्नरुप यासी । विशिष्ट ज्ञानचि वस्तु बोधी ॥२॥
इंद्रियांवरी तैं विषयानुग्रह । संशय निश्चय विपर्ययही ॥३॥
स्मरण तैं निद्रा लक्षणें हीं ऐसी । चतुर्थ व्यूहासी रुप ऐसें ॥४॥
अधिभूत तेंवी अध्यात्म त्या बुद्धि । प्रद्युम्नचि त्यासी उपास्य तें ॥५॥
अधिष्ठाता तया ब्रह्मचि जाणावा । व्यूह वासुदेवा श्रेयस्कर ॥६॥

१४७
क्रियाशक्ति प्राणा ज्ञान तें बुद्धीसी । कार्ये हीं रजाचीं ध्यानीं घ्यावीं ॥१॥
ज्ञानकर्मेंद्रियें यास्तव रजाचीं । तामसाहंकारेंचि सूक्ष्म शब्द ॥२॥
महाभूत तेणें जाहलें आकाश । विषय त्या शब्द श्रोत्रेंद्रिय ॥३॥
अर्थाधार बोधचिन्ह प्रेक्षकासी । सूक्ष्म रुप यासी लक्षणें हीं ॥४॥
अंतर्बाह्य व्यवहारा स्थान तेंचि । तेंवी मनादींसी अधिष्ठान ॥५॥
कार्यरुप ऐसीं लक्षणें नभाचीं । विस्तारे पुढती स्पर्शादिक ॥६॥
वासुदेव म्हणे स्पर्शादि गंधान्त । पावतसे रुप पुढती स्थूल ॥७॥

१४८
पंचतत्वें महत्तत्व अहंकार । जाहलीं एकत्र ईशेच्छेनें ॥१॥
अंड एक तदा जाहले निर्माण । प्रसवे तें जाण विराटासी ॥२॥
विशेष त्या संज्ञा तयामाजी जग । विस्तारलें देख विविध रुपें ॥३॥
देवतांसवें त्या मुखादिक होती । परी विराटासी चलन न ये ॥४॥
हृदयीं जैं अंतीं प्रवेशला जीव । तदा चेतनत्व येई तया ॥५॥
श्रवण कीर्तनें यदा चित्तशुद्धि । गळूनि आसक्ति जाई तदा ॥६॥
प्रकृतिपुरुषभेदज्ञानें तदा । शरीरीं आत्म्याचा बोध घडे ॥७॥
निश्चल बुद्धीनें चिंतावें तयासी । योगसाधनें जी स्थैर्य पावे ॥८॥
वासुदेव म्हणे मातेसी कपिल । आत्म्याचा निश्चल करिती बोध ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP