स्कंध ३ रा - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


९६

काळाच्याही काळा ब्रह्मदेव मज । कथितो मुहूर्त दैत्यभयें ॥१॥
पाहूनियां हास्य करी देवराणा । भोळ्या चतुरानना मान देईं ॥२॥
दैत्यहनूवरी क्रोधें मारी गदा । प्रतिकार त्याचा दैत्य करी ॥३॥
आघातें त्या विष्णुगदा पडे खालीं । दैत्य तयावेळीं शांत राहे ॥४॥
नि:शस्त्र वीरासी ताडूं नये शस्त्रें । नियम युद्धाचे पाळी दैत्य ॥५॥
प्रशंसूनि तदा वराह दैत्यासी । स्मरीतसे चित्तींझ सुदर्शन ॥६॥
वासुदेव म्हणे नि:शस्त्र देवासी । पाहूनि देवांसी दु:ख वाटे ॥७॥

९७
क्षणार्धांत शोभे करीं त्याच्या चक्र । पाहूनियां दैत्य फेंकी गदा ॥१॥
लीलेनें ती गदा पाहूनियां खालीं । म्हणे घे सत्वरी गदा दैत्या ॥२॥
फोडूनि आरोळी उचलूनि गदा । फेकी दैत्य तदा झेली हरि ॥३॥
कंदुकक्रीडा ते पाहूनियां दैत्य । बळ अंतरांत हरिचें जाणे ॥४॥
पुनरपि प्रभु घेई म्हणे गदा । अपमान दैत्या वाटे तेव्हां ॥५॥
त्रिशूळ तैं दैत्य महावेगें फेंकी । निष्फल तयासी करी देव ॥६॥
जारण-मारण ज्ञात्या विप्राप्रति । तैसी त्रिशूळाची अवस्था ते ॥७॥
वासुदेव म्हणे प्रहार मुष्टीचा । करितां विफलता कळली दैत्या ॥८॥

९८
आसुरी माया तैं योजी दैत्य क्रोधें । मायाचालकातें काय त्याचें ॥१॥
विवेकहीन होई क्रोधहीन । सुटे देहभान क्रोधावेशें ॥२॥
चोहींकडे होई गाढ अंध:कार । धुळीनें सकळ दिशा व्याप्त ॥३॥
पाषाण विष्टा तैं रुधिराची वृष्टि । विक्राळ राक्षसी चोहींकडे ॥४॥
हाणा ! मारा ! शब्द एकचि त्या ठायीं । भयाकुल होई प्रेक्षकगण ॥५॥
सुदर्शन तदा सोडी चक्रधारी । दितीच्या अंतरीं दु:ख बहु ॥६॥
आयानाश यदा सुदर्शनें होई । धांव तदा घेई दैत्य वेगें ॥७॥
वासुदेव म्हणे आंवळूनि दैत्य । मारुं वराहास ऐसें चिंती ॥८॥

९९
क्रोधें आंवळिता बाहेरीच देव । पाहूनि नवल वाटे दैत्या ॥१॥
मुष्टिप्रहार तैं करी हिरण्याक्ष । देई श्रीमुखांत तदा हरी ॥२॥
उन्मळूनि वृक्ष पडावा जैं खालीं । अवस्था ते झाली तयावेळीं ॥३॥
निष्प्राण होऊनि दैत्य पडे खालीं । धन्य धन्य झाली वाणी तदा ॥४॥
प्रभुहस्तें आलें मरण जयासी । वासुदेव त्यासी म्हणे मोक्ष ॥५॥

१००
पुढती देवांनीं वराहस्तवन । करुनि वंदन केलें तया ॥१॥
सकलही अंतीं स्वस्थानासी जाती । मैत्रेय क्षत्त्यासी कथिती वृत्त ॥२॥
शौनकासी सूत म्हणे हें ऐकूनि । विदुरासी मनीं तोष वाटे ॥३॥
पशूतेंही देव पावतो भक्तीनें । न लाभे त्याविणें देवांसीही ॥४॥
पहा गजेंद्रहि संकटविमुक्त । ध्यातां अंतरांत भगवंतासी ॥५॥
वराहावतार कथा हे ऐकतां । पठतां ब्रह्महत्त्यादोष जाई ॥६॥
इहपरसौख्य लाभूनि वैकुंठ - । वास, घडे नित्य पठणें याच्या ॥७॥
वासुदेव म्हणे हरिलीलागान । करितां पावन जीवमात्र ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP