स्कंध ३ रा - अध्याय १३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६५
मैत्रेयासी बोलला विदुर । मनूचें चरित्र प्रेमें कथा ॥१॥
भक्तचरित्रें ती ऐकावीं सप्रेम । ज्ञानफल जाण हेचि वाटे ॥२॥
मुनि म्हणे मनु प्रार्थी विरंचीसी । आज्ञापीं मजसी सेवा कांहीं ॥३॥
ब्रह्मा म्हणे पितृआज्ञेचें पालन । सेवा हेचि जाण, प्रजा निर्मी ॥४॥
सद्धर्मे पालन करावें पृथ्वीचें । यत्नें ईश्वरातें तोषवावे ॥५॥
मनु म्हणे आज्ञा मान्य, तरी ताता । उद्धार भूमीचा प्रथम व्हावा ॥६॥
जलमग्न पृथ्वी पाहूनियां ब्रह्मा । चिंती पूर्णकामा वासुदेवा ॥७॥
वासुदेव म्हणे नासापुंटातून । वराह होऊन प्रगटे हरी ॥८॥

६६
पाहतां पाहतां वाढला वराह । ब्रह्मा म्हणे देव प्रगटला हा ॥१॥
पर्वताकार तो होऊनि गर्जला । पाहूनि तोषला ब्रह्मदेव ॥२॥
ऊर्ध्वलोकस्थित मुनींनीं प्रार्थिलें । रुप तें शोभलें वराहाचें ॥३॥
उभारिलें पुच्छ थरारती केश । विजेसम अंग हालतसे ॥४॥
क्षुराघातें मेघ होती अस्ताव्यस्त । पसरे दिव्यतेज दंष्ट्रेचें त्या ॥५॥
भूमिशोधास्तव उदक हुंगित । प्रवेशे जळांत खवळे सिंधु ॥६॥
लाटांवरी लाटा उसळती तेचि । सिंधु कर जोडी ऐसें वाटे ॥७॥
वासुदेव म्हणे सिंधूच्या तळाशीं । पृथ्वी वराहासी दिसली तदा ॥८॥

६७
अतर्क्यसामर्थ्य वराह तो भूमी । उद्धरी, घेऊनि दंष्ट्रेवरी ॥१॥
इतुक्यांत दैत्य हिरण्याक्ष धांवे । चिंती अडवावें वराहासी ॥२॥
वराह तैं क्रोधें सोडी सुदर्शन । घेई दैत्यप्राण तत्काळचि ॥३॥
आरक्त मृत्तिका उधळूनि गज । शोभे तैं वराह शोभा पावे ॥४॥
शुभ्र दंतावरी घेउबियां पृथ्वी । काढिली बाहेरी लीलामात्रें ॥५॥
वासुदेव म्हणे विरंची प्रभृति । वेदसूक्तें त्यासी स्तविती तदा ॥६॥

६८
जयजयकार असो अपार्जिता तव । घेई नमस्कार आमुचा हा ॥१॥
रोमरंध्रीं तुझ्या सर्व यज्ञ लीन । पृथ्वीचें तारण केलेंसी त्वां ॥२॥
आदि वराहा नमस्कार तुज । पातक्यांसी रुप दुर्लभ हें ॥३॥
छेंद, अंग, दर्भ केश, दृष्टि घृत । तूंचि यज्ञरुप विश्वेश्वरा ॥४॥
मुखनासिकादि सर्व अवयव । यज्ञांगें सकळ देवदेवा ॥५॥
मत्त मतंगज कमलिनीलागीं । उचली, हे तैसी भूमी तुज ॥६॥
वासुदेव म्हणे गिरिशृंगीं मेघ । तैसी दंष्ट्रास्थित पृथ्वी शोभे ॥७॥

६९
देवा, इष्टमार्गे करीं भूस्थापना । स्थावरजंगमा अनुकूल ॥१॥
सर्वलोकमाता पृथ्वी, पिता तूंचि । वंदन तुजसी प्रेमें असो ॥२॥
अरणींत अग्नि तेंवीं तुझें तेज । स्थापिलेंसी अद्य भूमीमाजी ॥३॥
अनंत ब्रह्मांडें रोमरंध्रीं ज्याच्या । विक्रम हा त्याचा सहज क्रीडा ॥४॥
देवा, हालवूनि अंग उदकासी । सिंचूनि आम्हांसी पुनित केलें ॥५॥
अनंत अपार संपूर्ण त्वदगुण । शोधितां संभ्रम पावे बुद्धि ॥६॥
त्वन्मायामोहित सकल हे जन । करावें कल्याण देवा, त्यांचें ॥७॥
असो जळामाजी स्थापूनि अवनी । जाई निजधामीं परमेश्वर ॥८॥
वासुदेव म्हणे तया ईश्वराची । लीला अगाधचि गावी नित्य ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP