स्कंध ३ रा - अध्याय ३१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१७७
माते, आतां ऐकें जन्माची कहाणी । पूर्वकर्मे प्राणी जन्म पावे ॥१॥
योग्य वेळीं तया ईश्वर प्रेरक । प्रवेशे देहांत अन्नद्वारा ॥२॥
रेत:कणरुपें मातेच्या उदरीं । जातां प्रथम रात्रीं रुधिरसंग ॥३॥
पंचमदिनीं त्या बुद्‍बुदाचें रुप । दशदिनीं देख बदरीफळ ॥४॥
मांसपिंडरुप होई एक मासें । अंडरुप त्यातें तिर्यग्देहीं ॥५॥
पुढती मस्तक हस्तपादादिक । होतां दोन मास तयाप्रति ॥६॥
अस्थि रोम त्वचा तृतीयांत होती । घडे त्याचि मासीं लिंगभेद ॥७॥
चतुर्थमासीं त्या सप्तधातु होती । क्षुधा, तृषा, त्यासी पंचमांत ॥८॥
चर्मयुक्त ऐसा दक्षिण कुक्षींत । फिरुं लागे गर्भ षष्ठ मासीं ॥९॥
वासुदेव म्हणे सप्तधातुवृद्धि । मातेच्या अन्नेंचि पुढती होई ॥१०॥

१७८
विष्ठा मूत्र जेथें जंतूंची उत्त्पत्ति । तेथेंचि प्राण्यासी वास घडे ॥१॥
तया कोमलासी यातना अपार । येई वारंवार मूर्च्छा तेणें ॥२॥
कट्‍वाम्ल लवण भक्षील जें माता । पदार्थ ते अंगा झोंबताती ॥३॥
गर्भाशयाचें त्या असे आवरण । माहेरी वेष्टण आंतडयाचें ॥४॥
पृष्ठ मस्तकातें द्रोणासम वांक । चलनसामर्थ्य नसे अंगीं ॥५॥
दैवयोगें तया शतजन्म स्मृति । होई काय त्यासी सौख्य तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे सप्तमांत ज्ञान । होऊनि चिंतन करी प्राणी ॥७॥

१७९
प्रसूतिवायूचे आघात तयासी । संचरे उदकीं कीटासम ॥१॥
पूर्वकर्माचा त्या होई पश्चात्ताप । उपाय तयास न सुचे परी ॥२॥
सद्‍गदित चित्तें प्रार्थी श्रीहरीसी । शरणागतासी रक्षीं म्हणे ॥३॥
तुझ्यासम नित्य शुद्ध मीही । अभिमानें येई अवस्था हे ॥४॥
त्रिकालज्ञान हें सांप्रत मजसी । लाभलें हे तुझी कृपा असे ॥५॥
तूंचि एक देवा, संरक्षक आम्हां । तापनिवारणा नमन तुज ॥६॥
मलमूत्रकूपींमग्न माझा देह । जठराग्निदाह करी त्याचा ॥७॥
वासुदेव म्हणे सुटकेची इच्छा । धरुनियां ईशा प्रार्थी जीव ॥८॥

१८०
अधीर मी देवा, सोडवीं त्वरेनें । दयाळुवा, ज्ञानें पुनित केलें ॥१॥
केवळ वंदनें पूजितों मी तुज । उपकारें नित्य संतुष्ट तूं ॥२॥
अनाथांच्या नाथा क्लेशांतही एथ । जाणतों मी तुज, जन्म नको ॥३॥
सुटतां एथूनि मोह मी पावेन । मायाजाळीं मन गुतूंनियां ॥४॥
यास्तव एथेंचि राहूनियां तुज । ध्याईन मी नित्य ऐसें करीं ॥५॥
तेणें तरी गर्भवास हा चुकेल । यातना संपेल सकळ माझी ॥६॥
वासुदेव म्हणे प्रार्थी ऐशापरी । मातेच्या उदरीं गर्भ, देवा ॥७॥

१८१
माते, इतुक्यांत गर्भवायु तया । देई लोटूनियां अधोभागीं ॥१॥
आघातें त्या येई मूर्च्छना जीवासी । रक्त - मूत्रामाजी लोळतसे ॥२॥
नष्टज्ञान तदा होऊनि आक्रंदे । उपाय तयातें करिती जन ॥३॥
क्षुधार्त तो होतां पाजिती औषध । अज्ञानें विपरीत करिती क्रिया ॥४॥
प्रतिकारशक्ति नसे जीवाप्रती । वेष्टिती सर्वांगी मलिन वस्त्रें ॥५॥
मत्कुणादि जंतु करिताती दंश । निवारण त्यास करितां न ये ॥६॥
वासुदेव म्हणे बाल्यावस्था ऐसी । पराधीनतेची दु:खरुप ॥७॥

१८२
पुढती पौगंड अवस्था लाभतां । करणें विद्याभ्यासा प्राप्त होई ॥१॥
पराधीनतेनें इच्छा न पुरती । वारंवार चित्तीं क्रोध येई ॥२॥
यथाक्रम येई पुढती तारुण्य । बाधा करी काम अंतरासी ॥३॥
शरीरासवेंचि विकार वाढती । वैर इतरांसी कामबळें ॥४॥
कलहाग्नि तेणें पेटूनियां, नाश । ऐशा मायापाशमग्न होई ॥५॥
पांचभौतिक या देहास्तव ऐसी । अवस्था जीवाची अज्ञानानें ॥६॥
शिश्नोदरपरायनसंगतीनें । सज्जनही भ्रमे मायापाशीं ॥७॥
वासुदेव म्हणे दुर्जनसंगती । दैवी सद्‍गुणांसी नष्ट करी ॥८॥

१८३
आसक्त विमूढ विषयलंपट । दुर्जनांचा संग न घडो कदा ॥१॥
पाळींव पशु ते जाणावे स्त्रियांचे । स्त्रियांसम नसे इतरां बळ ॥२॥
अनिवार मोह जाणूणि स्त्रियांचा । जाणूनि तयांचा न घडो संग ॥३॥
पिता ब्रह्मदेव कन्यासक्त होई । रुप तदा घेई हरिणीचें ती ॥४॥
हरिणरुपें तैं धावूं लागे ब्रह्मा । जिंकितील कामा इतर केंवी ॥५॥
मोहमुक्त एक नारायणऋषि । अन्य न मजसी दिसला कोणी ॥६॥
महायोद्ध्यांतेंही जिंकिते कटाक्षें । कामिनीचें ऐसें बल श्रेष्ठ ॥७॥
वासुदेव म्हणे मोह कामिनीचा । वर्णीतसे ऐका कपिलदेव ॥८॥

१८४
नरकद्वार ते साधकासी नारी । ईश्वरें निर्मिली मायाचि हे ॥१॥
लडिवाळपणें दाविते ही प्रेम । सन्निध येऊन नाश करी ॥२॥
तृणाच्छन्न कूपासम भयप्रद । मोहक सहवास कामिनीचा ॥३॥
मुमुक्षु नारीनें चिंतावें स्वमनीं । चिंतिती कामिनी, कामिनी ते ॥४॥
चिंतितां पुरुष होईन मी नरे । नित्य ऐसें चक्र फिरतां बंध ॥५॥
द्रव्य, गृह, अर्पी पती तोचि मृत्यु । आमिष या वस्तु प्रापंचिक ॥६॥
वासुदेव म्हणे कामना हे ऐसी । पतीपत्नीरुपी बंधकारी ॥७॥

१८५
माते, व्यापकही जीव लिंगदेहें । भिन्न भिन्न पावे कर्मे गति ॥१॥
भोगितांही कर्मे करी तो नूतन । जाणावें मरण दुर्बलत्व ॥२॥
स्थूलदेह दौर्बल्यें तो सूक्ष्म देह । पावतां क्षीणत्व मरण येई ॥३॥
पुनरंपि देह लाभे तोचि जन्म । वास्तविक जन्म नसे जीवा ॥४॥
मृत्युभय कदा न धरावें मनीं । जीविकेंत जनीं रमूं नये ॥५॥
अज्ञात गतीचा सदा घ्यावा बोध । त्यागूनियां संग संचरावें ॥६॥
अनासक्ति देहीं, तेंवी योगाभ्यास । हाचि सर्वसंगपरित्याग ॥७॥
अभ्यास वैराग्यें सुटे देहासक्ति । वासुदेवा मुक्ति लाभो तेणें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP