स्कंध ३ रा - अध्याय २२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०८
स्वायंभुव मनु तदा कर्दमासी । निर्मी ब्राह्मणांसी म्हणे ब्रह्मा ॥१॥
हृदय ते बाहु क्षत्रिय ब्रह्ययाचे । संरक्षण त्यांचें एकमेकां ॥२॥
वेदमार्ग तेणें संरक्षित राही । विनंती त्वत्पायीं करितों एक ॥३॥
प्रिय कन्या मम मुने, देवहुति । बंधु भगिनीही असती तिज ॥४॥
नारदमुखानें आपुलें वर्णन । ऐकतांचि मन जडलें पायीं ॥५॥
विरक्तही प्राप्त विषय सेविती । इच्छा तुम्हांप्रती हेचि असे ॥६॥
यास्तव कन्येचा स्वीकार करावा । हेतु पूर्ण व्हावा हाचि मम ॥७॥
वासुदेव म्हणे ऐकूनि कर्दम । बोलला वचन अत्यानंदें ॥८॥

१०९
राया, सकलांचे हेतु हेचि जरी । स्वीकारीन तरी कन्या सौख्यें ॥१॥
प्रथव विवाह हाचि जगामाजी । आचरावा आजी वेदमार्ग ॥२॥
लावण्यवती हे पाहूनि गंधर्व । विश्वावसु आर्य भुलला होता ॥३॥
ऐसी हे सुंदरी अनुकूल जरी । स्वीकारीना तरी कोण सांगें ॥४॥
परी गर्भवती होतांची मी वनीं । जाईन निघूनि तपास्तव ॥५॥
ऋणत्रयमुक्त होतांचि संन्यास । घ्यावा हें विष्णुस मान्य असे ॥६॥
वासुदेव म्हणे मनु तें मानुनि । सिद्ध होई मनीं कन्यादाना ॥७॥

११०
कांतानुमोदनें मनु कन्या अर्पी । आंदण मुनीसी देई बहु ॥१॥
अलंकार वस्त्रें चीज वस्तु पात्रें । अर्पी जामात्यातें प्रेमें राव ॥२॥
विदुरा, लाडकी कन्या जरी होई । प्राप्तचि ते पाहीं अन्या देणें ॥३॥
साहणेंचि प्राप्त वियोग तियेचा । प्रिय योग्य भर्ता हेंचि सौख्य ॥४॥
वासुदेव म्हणे कन्येचा विरह । पित्याचें हृदय विदारितो ॥५॥

१११
सोडूनि जाण्याची वेळ यदा येईं । भरुनियां येई हृदय तदा ॥१॥
प्रेमें कवटाळी पोटाशीं तियेसी । म्हणे देवहूती माझें तान्हें ॥२॥
सोडूनियां जातों एथें आम्ही तुज । बोलतां सहज भरले नेत्र ॥३॥
निरोप घेऊनि अंतीं कर्ममाचा । आपुलिया काजा जाई राव ॥४॥
मार्गांत आश्रम पाहूनि नृपासी । समधान चित्तीं वाटे बहु ॥५॥
ब्रह्मावर्त देशीं बर्हिष्मतीपुरीं । आनंद अंतरीं प्रजेप्रती ॥६॥
तेथेंचि वराहें हालवितां अंग । कुश काश केश गळले तेचि ॥७॥
वासुदेव म्हणे यज्ञसंरक्षण । करिती ब्राह्मण याचि कुशें ॥८॥

११२
वराहें मनूसी, अर्पिली हे भूमी । यज्ञ तयास्थानीं बहु ॥१॥
स्वागत नगरीं करी सर्व प्रजा । प्रवेशला राजा निजमंदिरीं ॥२॥
परिवारासवें राहिला सुखानें । अनासक्त कर्मे कंठी काळ ॥३॥
प्राप्ताचें महत्त्व न वाटे नरासी । तैसेंचि मनूसी विषयसौख्यीं ॥४॥
अतर्क्य सामर्थ्ये अप्राप्त न कांहीं । यास्तव विषयीं न रमे मन ॥५॥
वासुदेव म्हणे समर्थाही भोग । त्यागूनि वैराग्य सुलभ नसे ॥६॥

११३
ईशचिंतनीं वा सत्कथाश्रवणीं । सद्‍ग्रंथलेखनीं काळ सार्थ ॥१॥
क्षणही न व्यर्थ ऐशा रीती त्याचा । ईशचिंतनाचा ध्यास सदा ॥२॥
एकाधिक सप्तदश महायुगें । कंठिलीं या मार्गे स्वायंभुवें ॥३॥
विदुरा, भक्तासी आधिव्याधिबाधा । न होई सर्वदा सौख्य तया ॥४॥
दयावंतें केला मुनिंस्तव ग्रंथ । मनुस्मृति तेच ख्यात जनीं ॥५॥
वासुदेव म्हणे देवहूतीवृत्त । देऊनियां चित्त पुढती ऐका ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP