मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षाप्रत । गजासुर मस्तक धरणाचें इंगित । कथा त्या मागची अद्‌भुत । महेश नृपाची त्या समयीं ॥१॥
त्या धर्मप्रिय राजाचें सदनांत । साक्षात्‍ गुरु एकदा येत । त्याच्या कीर्तीनें मोहित । राजा सन्मान त्याचा करी ॥२॥
त्यानेंही नृपास वर दिधला । बृहस्पति त्या समयीं म्हणाला । महीपाला तुझापुढें स्वशिराला । विनम्र मीं करीन ॥३॥
सर्व पूज्य जो बृहस्पति । स्वगृहीं परतुनी जाता नृप सांगती । एकदां राजर्षि नारद पाहून प्रणती । न करी त्यास अनादरें ॥४॥
अवमान करुन पुढें जात । तें नारद त्या नृपाधमा शाप देत । राजशार्दूला तूं मदोन्मत्त । अनादर करुन माझा जाशी ॥५॥
म्हणोनि आसुर योनींत । जन्मशील तूं निश्चित । तदनंतर तो नृप मृत्यु पावत । गजयोनींत नंतर जन्मला ॥६॥
गजासुर नामें होत ख्यात । नर कुंजराचा वेष घेत । तो शंभूचें तप करित । विशेषें मंत्र जपतसे ॥७॥
नियमांत राहून रत । हजार वर्षे तप आचरत । तदनंतर शिव प्रसन्न होत । म्हणे दैत्येशा वर माग ॥८॥
जें असेल इष्ट तुझ्या मनांत । तें सत्वर सांग मजप्रत । तो गजासुर तें आगत । त्रैलोक्याचें राज्य देई ॥९॥
सर्वश्रेष्ठ बळ मजप्रत । आरोग्य देई शंकरा जगांत । सर्वपूज्यता लाभून अंत । मोक्षलाभे माझा व्हावा ॥१०॥
तथाऽस्तु ऐसें शंकर । गजासुरा तुझें मस्तक जगांत । सर्वपूज्य होईल निश्चित । वर मीं ऐसा तुज देई ॥११॥
म्हणून गजासुराचें मस्तक धारण । गणपति करी हें जाणून । शंकराचा वर सत्य व्हावा म्हणून । तैसा शब्द बृहस्पतीचा ॥१२॥
अन्यही एक पुरातन । इतिहास ऐक प्रजानाथा पावन । एकदा शंकरेंच होते पूजन । केलें गणनायकाचे ॥१३॥
मूर्तिसंस्थ विघ्नप देत । शिवास निर्माल्य प्रसन्नचित्त । त्या निर्माल्याचे माहात्म्य अद्‌भुत । स्वप्नांत सांगे तयासी ॥१४॥
श्रीगणेश म्हणे शंभूप्रत । भक्तीनें पूजिलेंस मज अनन्यचित्त । प्रसन्न मी स्वमूर्तिस्थित । ऐक हितकर माझें वचन ॥१५॥
निर्माल्य माझ घेई पुनीत । सर्वसिद्धिप्रद जो असत । जयें हे धरिलें मस्तकीं पुष्प उदात्त । सर्वपूज्ये तो होईल ॥१६॥
सर्व श्रेष्ठ यशवंत । तो भक्तिबळें होईल निश्चित । ऐसें सांगून अंतर्हित । जाहला ढुंढी गजानन ॥१७॥
शिवाचें स्वप्न संपत । त्यास जाग तेव्हां येत । फूल पाहून हातांत । विस्मय शंकरा जाहला ॥१८॥
विचार करी स्वचित्तांत । काय हें देव भाकित । गणाधीश सर्वपूज्य असत । त्यासम अन्य ना ब्रह्मांडी ॥१९॥
म्हणोनि परीक्षा पाहण्यासी । प्रभू हें कौतुक दावी मजसी । शिवानें निर्माल्य स्वमस्तकासी । लाविलें नाहीं त्या वेळ ॥२०॥
माझी भक्ति तो पारखीत । ऐसा विचार करुन मनांत । पूजेंत ठेविलें दक्षा तें पुष्प मुदित । सर्वद त्या महाभक्तें ॥२१॥
नंतर अत्रिसंभव येत । दुर्वास तेथें अवचित । दर्शनार्थ शिवाच्या जात । शंकरें फार मान केला ॥२२॥
शिव विचार करी चित्तांत हा योगी सर्व योग जाणत । वर्णाश्रमविहीन असत । साक्षात्‍ देव विनायक ॥२३॥
हा निर्माल्यास योग्य असत । ऐसें ठरवून त्यास तो देत । विघ्नराजाचें यश वर्णित । दुर्वासें तो स्वीकारला ॥२४॥
सदाशिवा प्रणाम करित । तदनंतर दुर्वास वनांतरें हिंडत । पाहिलें त्यानें देवनायका अवचित । योगी तो मनीं विचार करी ॥२५॥
स्वहितावह विचार मनांत । सर्व पूज्य गणेश जगांत । त्याच्याहून अन्य कोणी नसत । श्रेष्ठ नाहीं कदापि ॥२६॥
आम्हीं गणेशाचे भक्त । अनन्यमनें त्यास भजत । म्हणून मींही शंकरासम वसत । योग्य निर्माल्य धारणासे ॥२७॥
तरी हा साक्षात्‍ इंद्रदेव भक्त । सत्त्वगुणें सदैव युक्त । योग्य हा यांत संदेह नसत । गणनाथाचा निर्माल्य देई ॥२८॥
त्यास पाहून ऐरावत स्थित । इंद्र प्रभू वंदन करी विनत । आज्ञा करी महामुने मजप्रत । दास मीं तुमचा महाभागा ॥२९॥
नंतर तोही प्रसन्नचित्त । गणनाथाचा निर्माल्य देत । नंतर त्यास माहात्म्य सांगत । गणेशाचें हें महत्त्व ॥३०॥
इंद्र राज्यश्रीनें युक्त । घेऊन निर्माल्य ठेवित । आपुल्या गजाच्या मस्तकीं पुनीत । आपुल्या कामा मग जाई ॥३१॥
त्या निर्माल्याचा अपमान । करिता भ्रष्ट इंद्रदेव महान । त्याची सत्त्वमयी लक्ष्मी जाऊन । गज तेजयुक्त झाला ॥३२॥
तदनंतर तो राजेंद्र करित । तिरस्कार महेंद्राचा श्रीमंत । अन्य सुरांसी मारुं जात । स्वच्छंन्दे तो वनांतरीं ॥३३॥
नंतर होऊन अति संतप्त । इंद्र श्रीहीन होत । दैत्यराज उपभोगित । स्वर्गाचें राज्य बळानें ॥३४॥
ऐसा बहु काळ जात । तें बृहस्पति देवांसी उपदेश करित । त्यांच्यासह तो तोषवित । गणेशासी उपासनेनें ॥३५॥
सहस्त्र वर्षे गेल्यावर । गणेश प्रकटला त्यांच्या समोर । पूजन कैर्ती अमर । स्तविती तें प्रसन्न वरद ॥३६॥
श्रीगणेश म्हणे तयांप्रत । माझ्या निर्माल्याचा जो अवमान करित । त्यास पीडा अत्यंत होत । महेंद्रा निर्माल्य तूं दूषविला ॥३७॥
भक्तांच्या मीं अधीन । आतां तुम्हांवरी झालों प्रसन्न । लक्ष्मी समुद्रतनया होऊन । तारील तुम्हां अमरांसी ॥३८॥
ती तुम्हां सिद्धि होईल । ती लाभतां श्रीयुक्त व्हाल । पूजेचें जें असतें फळ । निर्माल्यांत एकवटतें तें ॥३९॥
त्या निर्माल्यास करतां वंदन । साफल्य लाभून सुखी जीवन । जो नर मस्तकीं धारण करुन । स्थापी शुद्ध भूमीवरी पुनः ॥४०॥
निर्मांल्यास आदरें नमून । नंतर तो ठेवावी शुद्धजागीं नेऊन । अथवा जळांत द्यावा सोडून । जेथ पायदळीं न येईल ॥४१॥
ऐसेंकरितां फळ लाभत । जर तो मद्रूप होत । सदा तुझ्या कार्यांत । विघ्न आणीत मीं होतों ॥४२॥
माझ्या निर्माल्याचा अपमान । केलास तूं मदोन्मत्त होऊन । परी बृहस्पतीचा उपदेश ऐकून । सांप्रत माझी भक्ति करिसी ॥४३॥
म्हणोनि मी तुझा अपराध । सहन करतों निर्वेध । मलाच आलास ऐकून सुबोध । ऐसा विचार मीं केला ॥४४॥
म्हणून बहुकाळानंतर मीं होत । क्रोधहीन प्रसन्नचित्त । आज येथें मीं प्रकटत । तुम्हां सर्वांस दर्शन देण्या ॥४५॥
ऐसें सांगून गणाधीश जात । स्वानंदक पुरीं आपुल्या परतत । इंद्र राज्यश्रीयुक्त । जाहला दक्ष प्रजापते ॥४६॥
निर्माल्याचें महत्त्व जाणून । सदैव करी गणेशाचें भजन । राज्य केलें आमरण । निर्विघ्नपणें महेंद्रानें ॥४७॥
आताम ऐरावत गजाचा वृत्तान्त । सांगतो तुज उर्वरित । इन्द्राचा त्याग करुन वनांत । स्वेच्छेनें तो फिरत होता ॥४८॥
हत्तिणींच्या समवेत । विहार करी तो मोहयुक्त । अत्यंत दुर्जय प्रख्यात । विविध भोग भोगितसे ॥४९॥
ऐसा तो कालक्रमणा करित । सदा मोहमदें धुंद असत । कांहीं काळानंतर प्रवेशत । उदरांत गणेश त्याच्या ॥५०॥
पार्वतीच्या वरदान प्रभावें तोडित । दैत्य त्याचें शिर अवचित । मस्तकविहीन जन्मत । गणनायक उदरीं पार्वतीच्या ॥५१॥
त्यासमयीं विष्णु अवतरत । त्या स्थळीं शोक संतप्त । ध्यानयोगें सर्व जाणत । ऐरावताचें शिर तोडी ॥५२॥
नंतर तें त्या धडावरी लावित । ॐकारास मंत्रें आमंत्रित । विघ्नराजास करी पुनर्जीवित । हर्षित झाले देव सर्व ॥५३॥
दैत्यानें पार्वतीगर्भाचें जें शिर तोडलें । तें नर्मदा नदींत टाकलें । तेथ कुंड उत्पन्न झालें । गणेशमहिम्यानें युक्त ॥५४॥
त्या स्थळीं जे होते पाषाण । ते रक्तानें माखून । गणेशरुप पावून । नर्मदेंत विसावले ॥५५॥
तें नर्मदा गणपति प्रख्यात । सर्व सिद्धिप्रद जगांत । ऐसें मुद्‌गल सांगत । दक्ष प्रजापति तें विचारी ॥५६॥
रेवा नदीच्या पात्रांत । महामुनें जें दृषद असत । ते गणेशरुप लाभत । ऐसें आपण सांगितलें ॥५७॥
धन्य ती जगीं सरिता । जिची एवढी महत्ता । ती संपूर्ण कथा आता । मजसी सांगा मुनिश्रेष्ठा ॥५८॥
मुद्‌गल तेव्हां ती कथा सांगती । ब्रह्मकमंडलुप्त चार नद्या वाहती । गंगा यमुना नर्मदा सरस्वती ॥५९॥
तो ऐकून नर्मदा देवी संतप्त । आपुल्या मनांत ती जळत । म्हणोनि ती घोर तप करित । शंकर देवाचें शंभर वर्षे ॥६०॥
तदनंतर शंभू प्रसन्न होत । वर तिजला देत । ती शंभूस भक्तिभावें स्तवित । मनीषा आपुली व्यक्त केली ॥६१॥
तिच्या जळांतील सर्व पाषाण । व्हावे शिवमय शोभन । ती इच्छा होता पूर्ण । गंगेसम तेज नर्मदेचें ॥६२॥
परी तिचा संतोष न होत । ती पुनरपि तीव्र तप आचरित । विघ्नेश्वरासी तोषवित । एक सहस्त्र वर्षें तप केलें ॥६३॥
विघ्नेश्वर झाला प्रसन्न । देई इच्छित वरदान । सर्व पाषाण रक्तवर्ण । केले गणेशरुप नर्मदा जळीं ॥६४॥
त्या योगे ती सरिता । माहात्म्ययुक्त तत्त्वता । केवळ तिच्या दर्शनें मान्यता । गंगास्नान फळाची ॥६५॥
निचल जळीं संस्थित । दृषद ते शंकरात्मिक पुजीत । रक्त गणेशरुप त्या लाभत । समत्व त्या नदींचे कोणा ॥६६॥
तिच्यासम अन्य नदी नसत । तिचा महिमा वर्णनातीत । कोण वर्णनीं क्षम असत । गणेश शिव युक्ता ती महानदी ॥६७॥
ऐसें हें सर्व विस्तरें सांगितलें । गणपाचें चरित्र भलें । सर्व पाप सर्व संशयनाशक असलें । दक्षा तुजसी समक्ष ॥६८॥
प्रथम दक्षा गणेश करी धारण । दैत्याचे बनून भूषण । ऐरावताचें मुखही शोभून । राखाया त्यानंतर भक्तमहिमा ॥६९॥
त्या ऐरावताचें शिर छेदिलें । कैसे कां तें तुज सांगितलें । बृहस्पतीचें चरित्र वर्णिलें । निर्माल्य महिमा तुज कथिला ॥७०॥
भक्त वचनबद्ध गणपती । कोणती न करील कृती । भक्ताधीन हा गणेश जगतीं । प्रख्यात असे ही कीर्ती ॥७१॥
ज्यानें आपुला शिरच्छेद । करविला भक्ताकारणें विशद । मलज गजवक्त्र मोदद । भक्तिमोहित तो झाला ॥७२॥
ऐसें हें परमाद्‌भुत । कथिलें तुज मीं विचेष्टित । आतां ऐका गजानन चरित्र । उर्वरित दक्ष प्रजापते ॥७३॥
पार्वती प्रेमसंयुक्त । पूजी आपुलय सुता प्रकटित । देवही झाले हर्षयुक्त । होऊन गेले स्वगृहासी ॥७४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते गणेशभक्ताधीनत्ववर्णनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP