मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढती सांगती । दर्प चढला दानवचित्तीं । ते लोभासुराप्रती जाऊन म्हणती । लोभ दाटुनी हृदयांत ॥१॥
लोभासुर स्वामी ऐका प्रार्थना । देवांची आमुचे शत्रूंत गणना । ऐसी वेदांचीच उक्ति मना । आमुच्या पीडा देत असे ॥२॥
ते देवसंघ शस्त्रास्त्रांनी न मरतील । म्हणोनी अमर नामें ख्यात सबल । ते यज्ञकर्मन्न्नावरी निर्मल । पोषण आपुले करितो सदा ॥३॥
तरी त्यास यज्ञान्न न मिळेल । तरीच ते दुर्बल होतील । महाभागा मग मरतील । स्वाभाविक देव सर्वही ॥४॥
ब्रह्मांडगोल जरी तूं जिंकिला । तरी शत्रुसंघ जिवंत ठेविला । हयायोगें कृतार्थता आपणाला । कदापिही न लाभेल ॥५॥
पूर्वी हिरण्यकशिपूने देवगण जिंकले । त्रिभुवनीं राज्य पसरविलें । तरी देवांसी जिवंत ठेविलें । त्यायोगें पीडा पुढे तयासी ॥६॥
देवांनी प्रयत्न करुन । नरसिंहातें निर्मून । हिरण्यकशिपूनें मारुन । आपुली स्थानें प्राप्त केलीं ॥७॥
हा पूर्वतिहास ज्वलंत । सदैव ठेवावा मनांत । साधावें आपुलें कायमचें हित । तेणें चिर सुख पावाल ॥८॥
अमर संघास मारणें । तरी यज्ञकर्मांचा नाश करणें । आज्ञा द्यावी महाराज जेणें । असुरवीर हें करतील ॥९॥
दैत्यराजेंद्र लोभासुर ऐकत । मंदबुद्धी तें वचन उन्मत्त । कर्मखंडनाची आज्ञा देत । दैत्यवीरांसी तत्काळ ॥१०॥
लोभासुराची आज्ञा लाभत । तदनंतर गजासुरादी दैत्य जात । जेथ तेथ क्रोधसंतप्त । ब्राह्मणांसी पीडा देती ॥११॥
ब्राह्मणांसी धरुन मारिती । यज्ञकर्मे विशेषें खंडिती । यज्ञवृक्ष उपटून टाकिती । गाई मारिते निर्घृणपणें ॥१२॥
तीर्थे सर्वत्र भ्रष्ट करिती । कर्म खंडन व्हावें हें इच्छिती । देवमंदिरें फोडिती । दानवसत्तम मदोन्मत्त ॥१३॥
कोणी धार्मिक जन पाहती । तरी त्वरिताचि त्यासी ठार करिती । लोभासुराच्या मूर्तो जगतीं ।स सर्वत्र त्यांनीं स्थापिल्या ॥१४॥
त्या मूर्तिचीच पूजा करविती । अन्य देव पूजा बंद करिती । स्वाहा स्वधा न मिळती । तेणें देवा पितरांसी ॥१५॥
वषट्‌कार कुठेही  न होत । भूमिमंडळ त्रस्त समस्त । लोभासुराचीच पूजा करवित । असुरवीर जनांकडून ॥१६॥
लोभासुराप्रीत्यर्थ यज्ञकर्म करविती । स्तोत्रें त्याचीच गावविती । पूजा त्याचीच जगतीं । असुर संघ रुढ करिती ॥१७॥
ऐसा हाहाकार माजला । मानवसंघ पीडित झाला । कांही ब्रह्मवृंद वाचला । जो लपला जाऊन वनांतरीं ॥१८॥
त्यांनी मरणाचा निश्चय केला । परी बहुतांश विप्रगण भ्रष्ट झाला । ऐसा बहु काळ लोटला । परम दुःखित देवसंघ ॥१९॥
यज्ञान्न बंद झालें । श्राद्धादे अन्नदान थांबलें । देवां पितरांसी उपवास घडले । अतभीत त्या कालावधींत ॥२०॥
तेव्हां देवगण विचार करित । लोभासुराच्या विनाशाचा मनांत । परी त्यांसी कांहीं न सुचत । उपाय दैत्यविनाशाचा ॥२१॥
होऊनिया अतिदुःखित । काय करावें हा प्रश्न मनांत । विह्रल उपवासपर राहत । पर्वतगृहांत गुप्तपणें ॥२२॥
ऐशियापरी देवेंद्र वीर समस्त । जेथ भूमिगत राहत । तेथ एकदा योगींद्र येत । रैभ्य नामक सर्वप्रिय ॥२३॥
तो अवधूतस्वरुप असत । साक्षात्‍ विघ्नेश्वर वाटत । त्यास प्रणाम करुन विचारित । शिवादिदेव विनम्रपणें ॥२४॥
अस्थिचर्म मात्र अवस्थित । देवगण दीनभावें त्यास विनवीत । असुरनाशाचा उपाय आम्हांप्रत । योगींद्रा कृपया सांगावा ॥२५॥
तेव्हां रैभ्य म्हणे तयांस वचन । विष्णो शंभू ऐका समस्त देऊन मन । लोभासुर महापापी असून । अजिंक्य यांत ना संशय ॥२६॥
तथापि विघ्नराजास भजाल । भक्तिपूर्वंक तोषवाल । तरी हा लोभासुर होईल । सुजेय तुम्हांसी विशेषें ॥२७॥
स्वयं साक्षात्‍ बुद्धिपति । उपाय सुचवील झटिती । गजाननाचा मंत्र चित्तीं । विधिपूर्वक जपावा ॥२८॥
ऐसें बोलून गजाननाचा मंत्र देत । त्या समस्त देवमुनींप्रत । नंतर रैभ्य महायोगी जात । स्वच्छंदानें स्वस्थानीं ॥२९॥
शिवविष्णु आदि देव हर्षित । गजाननाचा मंत्र जपत । विधिपूर्वक ध्यान करित । तोषविती त्यास प्रतिदिनीं ॥३०॥
निराहार उपवासें भक्तिभावित । शंभर वर्षांनंतर येत । गजानन त्या देवांप्रत । आनंदले सुर त्या समयीं ॥३१॥
मुनिगणांसह ते पूजित । हात जोडून गजानना स्तवित । पुनः पुनः प्रणाम करित । स्तुतिस्तोत्र तें गाती ॥३२॥
गजानना तुज नमन । बीजरुपा तुज अभिवादन । निर्बीजा गणेशासी वंदन । विघ्नपतीस नमस्कार ॥३३॥
अनंतासी एकदंतासी । हेरंबासी चतुर्भुजासी । सर्वेशासी सर्वपूज्यासी । सर्वसिद्धिप्रद तुज नमन ॥३४॥
सुरासुरां अभयदात्यासी । उभयतांसी भय निर्मात्यासी । सिद्धिबुद्धि प्रचालकासी । सिद्धिबुद्धिपते तुज नमन ॥३५॥
अगुनासी गुणेशासी । गुणरुपासी गौणीसी । मायामयासी मायाचालकासी । परमात्मा तुज नमन असो ॥३६॥
सर्वोदयासी महोदारासी । पराक्रमपरासी स्वानंदवासीसी । स्वानंददायीसी योगाकारासी। शांतिदात्या तुज नमन ॥३७॥
योगस्वामीसी ब्रह्मस्पतीसी । ब्रह्मांच्या ब्रह्या तुजसी । अनाधारासी सर्वाधारासी । आदिमध्यांतहीना नमन ॥३८॥
परशु अंकुशहस्तासी । त्रिनेत्रासी महोदरासी । मूषक वाहनासी मूषकध्वजासी । सकलधारासी नमन असो ॥३९॥
सदा सुखानंदकरासी । सकल संहारकर्त्यासी । सुपात्रासी स्त्रष्टयासी । गुणविहीना गणाधिपा ॥४०॥
विदेहरुपासी परासी । भोक्तासी बोधासी हीनासी । सुसांख्याकासी गजात्मरुपासी । सदा स्वबुद्धि संस्थिता नमन ॥४१॥
बोधहीनासी ब्रह्मासी । गजवाचकासी गजचिन्हासी । योगींद्रा योगींद्रा ऐशा रुपे दिससी । नमस्कार तुज गजानना ॥४२॥
जैसें मुखचिन्हांवरुन । मानवांदीचे होतें ज्ञान । तुझे तैसें विदेहचिन्ह । योगी जाणती त्यानें तुला ॥४३॥
विदेह गजरुप असत । तें तुझें मुख वर्णित । गणेशाचें जें प्राप्तिकर पुनीत । गजानना तुज नमन ॥४४॥
किती स्तुति करावी सांप्रत । वेदादीही मौन स्वीकारीत । योगीजनही शांति धरित । तुला शरण सर्व आम्हीं ॥४५॥
ऐसी स्तुति करुन सुरगण । घालिती प्रेमें लोटांगण । हर्ष मानसीं वाटून । गणाधीश म्हणे तयांसी ॥४६॥
देवांनो मुनींनो स्तोत्र रचिलें । माझें तुम्हीं तें मज आवडलें । सर्वसिद्धिप्रद होईल भलें । निरंतर या जगतीं ॥४७॥
जें जें भक्त वांछित । तें तें मी देईन भक्तितोषित । स्तोत्रपाठें मी वर देत । इच्छित समस्त पाठकांसी ॥४८॥
गजाननाचें ऐकून वचन । आनंदले देवर्षि मुनिजन । प्रणाम करुन म्हणती वचन । सर्वसुखप्रद स्वरुप ॥४९॥
देवर्षि विनविती विनत । स्वामी भुवनत्रय त्रस्त । लोभासुराच्या प्रभावें सांप्रत । कर्मविहीन आम्हींही ॥५०॥
कर्मविहीन म्हणोनि उपवास । घडती आम्हांसी अनुदिवस । कृपा करोनी त्या दैत्येशास । ठार करावें गजानना ॥५१॥
तुझी दृढ भक्ति आम्हांप्रत । देई लोभहीनासी सांप्रत । त्याचें हें ईप्सित ऐकून म्हणत । गजानन तयांसी ॥५२॥
प्राज्ञांनो भय न धरा चित्तांत । महासुराला मारीन निश्चित । लोभहीन ऐसी भक्ति सतत । तुमच्या हृदयीं दृढ होवो ॥५३॥
आतां त्या दानवेंद्रा जिंकीन । ऐसें माझें तुम्हां वचन । कार्यसिद्धि होण्यास उत्सुक मन । तेथचि राहिला गणाधीश ॥५४॥
देवास मुनीस ऐसें सांगून । देव संतुष्ट गजानन । प्रतापवंत तो त्यास नमन । सारे करिती पुनः पुन्हां ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते गजाननप्रादुर्भावो नाम चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP