मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ वसिष्ठासी विचारित । अंगारकयुता श्रेष्ठ कां होत । तें सांगावें स्वामी मजप्रत । संशय माझ्या मनीं असे ॥१॥
वसिष्ठ तेव्हां कथा सांगती । अतिरोचक जी तयाप्रती । भरद्वाजापासून जगतीं । जन्म झाला भौमाचा ॥२॥
तो मंगळ महामती आचरित । गणेशव्रत श्रद्धायुक्त । गणानां त्वा या मंत्रें पूजित । विघ्नपासी भक्तीनें ॥३॥
गजानन देवासि ध्यात । रम्य तपश्चयीं तो करित । पारिनेर नगराच्या पश्चिमेत । वनांत एका राहून ॥४॥
ऐसी शंभर वर्षे जात । तेव्हां गणाध्यक्ष प्रसन्न होत । वर माग महाभाग म्हणत । तेव्हां भूमिसुत पूजी तया ॥५॥
भक्तिभावें करी स्तवन । नंतर भौम म्हणे वचन । मी नरदेहयुक्त सामन्यजन । अमृत ग्रह मज करावें ॥६॥
तुझ्या भक्तीचें एक निलय । मंगल नामें सुखकर अभय । ऋणहर्तां धनप्रद आनंदमय । करी मजला वरदा कृपाळा ॥७॥
माघकृष्ण चतुर्थीदिनी । मजला तव लाभोनी । धन्य झालों जीवनीं । म्हणोनि महापुण्यदाती तिथी होवो ॥८॥
तथास्तु गणनाथ म्हणत । भौम मंगल नामें ख्यात । अभीष्ट सर्वही लाभत । अंगारकी चतुर्थी मुख्य झाली ॥९॥
जेव्हां भाद्रपद शुक्ल चतुर्थी असत । तेव्हां चंद्रदर्शन कां वर्ज्य असत । त्याचा इतिहास तुजप्रत । विशेषयुक्त सांगतों आतां ॥१०॥
हा इतिहास ऐकतां दोषहीन । होशील तूं नृपा महान । गणेश भजनीं निमग्न । भजशील दशरथ त्यास सर्वदा ॥११॥
एकदा देवांसहित मुनिजन । निश्चय करितो मिळून । गणेशांशसमुत्पन्न । पांच देव मुख्य असती ॥१२॥
ते गणेशस्वरुपाहून । कदापिही नसती भिन्न । त्यांच्या स्मरणामात्रें होत प्रसन्न । गणनायक गजानन ॥१३॥
म्हणोनी मुनीश्वर पूजिती । शिवादि देवांसी जगतीं । ऐसें अन्य देवही आचरती । ज्ञानगर्वें सहर्ष ॥१४॥
विष्णु मुख्यांनी प्रतिपादिलें । तें सर्व तैसेंचि भलें । मुनिगण त्या रीतीं करुन झालें । सिद्धिविहीन ॥१५॥
देवगणांसह नंतर जाती । ते ब्रह्मदेवांप्रती । त्याची स्तुति करुन सांगती । वृत्तान्त सारा अद्‌भुत ॥१६॥
तो ऐकतां ब्रह्मा सुविस्मित । चिंतातुर जाहला मनांत । विष्णू शिव अर्यमा शक्तीही होत । आश्चर्यचकित तें ऐकून ॥१७॥
इतुक्या माजीं तेथ उठत । ध्वनि भयंकर तीव्र घोषयुक्त । प्रलयसूचक तो ऐकून होत । भयोद्विग्न देव शंभु मुख्य ॥१८॥
नंतर महाभीम पुरुष अकस्मात । त्यांच्या पुढे प्रकटत । विकराळ त्यास पाहून मूर्च्छित । शंकरादि देव झाले ॥१९॥
मुनि देवता कित्येक पळती । कोणी बेशुद्ध होती । मुहुर्तमात्रें सावध होती । ब्रह्मादिक सुर जेव्हां ॥२०॥
तेव्हां पाहती पुढयांत । गणनायकासी साक्षात । अतिभयसंयुक्त त्यास स्तवित । हृदयीं ध्याऊन गजवक्त्र ॥२१॥
गणनाथासीं विघ्नपतीसी । अनाथांच्या सुनाथासी । विघ्ननिवारणासी निराकारासी । हेरंबा तुज नमन असो ॥२२॥
भक्तांसी सर्वदात्यासी । साक्षीसी अमेय अप्रतर्क्यासी । गजाननासी देवासी । शूर्पकर्णा तुज नमन असो ॥२३॥
महोदरासी सर्वादि पूज्यासी । सर्वांदींसी महादात्यासी । सर्व पूज्यासी ढुंढिराजासी । सर्व भावस्थिता तुज नमन ॥२४॥
स्वानंद निवासासी । योग शांतिमयासी । योग्यासी योगदात्यासी । योगपतीसी नमो नमः ॥२५॥
सृष्टिकर्त्यासी सुपुत्रासी । सृष्टिहर्त्या गणेशासी । गुणचालकासी अनात्म्यासी । आत्म्यासी तुज नमो नमः ॥२६॥
कारणप्रकाशासी ब्रह्मेशासी । सदानाथासी देवपालकासी । निवारण करी महाविघ्नासी । नमन तुजसी पुनः पुन्हां ॥२७॥
हें महाविघ्न सहसा आलें । ग्रासील आम्हां भय वाटलें। जीवित्वही संशयी पडलें । तुला शरण सांप्रत ॥२८॥
तुझ्या पादपद्माचे दास । गजानना आम्हीं उदास । जरी विनाश पावलों या वेळेस । तुझें यश नाथा नष्ट होय ॥२९॥
आतां देवेशा रक्षण करी । तुझें हें उग्ररुप दूर करी । पाहण्या शक्ति नसे शरीरीं । विघ्नेशा रक्षण करी तूं ॥३०॥
ऐसी स्तुति ते करित । तेव्हां त्यांच्यापुढें प्रकटत । उग्ररुप सोडून गणेश रुपांत । सर्वांसी आनंद तें झाला ॥३१॥
ते सारे प्रणाम करिती । अत्यादरें पूजिती । शिवादिक त्यासी अर्पिती । आपापली मानसकन्या ॥३२॥
ब्रह्मा सरस्वती देत । विष्णु पुष्टीसी अर्पित । शंकर योगिनी समर्पित । जगदंबिका मोहिनीस ॥३३॥
भानू संजीवनी देत । सर्व प्रियंकर जो जगांत । ऐसें ते पंचदेव विघ्नेशा पूजित । मानस सुता समर्पूनी ॥३४॥
दशरथा, त्या प्रणतांसी उठवून । विघ्नेश बोलें भक्तिप्रसन्न । मेघासम गंभीर स्वन । विष्णु मुख्य महेशांसी ॥३५॥
शंभुमुख्य देवेंद्रांनो ऐका वचन । माझे अंश तुम्ही महान । वृथा गर्व करुन मन । दूषवूं नका आपुलें ॥३६॥
चराचर हें माझ्या अंशे युक्त । कांहीं नसे माझ्या विरहित । त्या सर्वासी सिद्धि देण्या जगांत । देहधारी मी होतों ॥३७॥
जरी ज्ञानानें मज न जाणत । केवळ तृणरुपीं पूजित । तरी महादेवांनो मजप्रत । ती पूजा कैसी पोहोचेल? ॥३८॥
तेथही माझा तृणांत । अल्पांश जरी वर्तन । परी त्याच्या पूजेनें पूर्ण तृप्त । मी कैसाही होईन ॥३९॥
आपण कलांश माझे जगांत । जे पूजिती विप्र समस्त । त्यानें गुणात्मक तृप्ती होत । केवळ कलांशरुप माझी ॥४०॥
ब्रह्मांड संपूर्ण कोणी पूजित । तरीही माझी पूर्ण तृप्ति न होत । माझ्या रोमरोमांत । अनंत ब्रह्माण्डें विलसतीं ॥४१॥
गजमुखादि चिन्हांनी युक्त । महेश्वर मी जगत्‌ब्रह्ममय वसत । योगशांतिद जगांत । त्याच्या पूजनें सुपूजा ॥४२॥
जगताचें ब्रह्माचें । पूजन एकत्र करितां साचें । तेंच पूजन पूर्णत्वाचें । तीच माझी पूर्ण पूजा ॥४३॥
मज त्यागून मुनिजन । सर्वांदौ करिती मोहमुग्ध मन । ज्ञानमोहांत पडून । पूजन तुम्हां पंचदेवांचें ॥४४॥
आपणही मदसंयुक्त । तैसेचि झालात ज्ञानमोहित । म्हणोनी सिद्धिहीनता प्राप्त । ऐसें पुन्हा करु नका ॥४५॥
पूर्वीं भक्तिसंयुत । पूजन तुम्हीं केलेंत । तें आठवून सहन करित । अपराध तुमचा या वेळीं ॥४६॥
दर्शन दिधलें तुम्हांप्रत । कलांशमात्रें जरी पूर्ण तुष्ट जगांत । होतों तरी देहधारी होत । मी स्वयं कां सांगावें ॥४७॥
ऐसें बोलून विराम पावत । गणाधीश तें ते प्रणाम करित । स्वदोषाची क्षमा मागत । तेव्हां काय घडलें तें ऐका ॥४८॥
त्या समयीं शंकराच्या भाळीं विलसत । चंद्र होत काढून हसत । गणेशाचें रुप पाहून अविनीत । रुपगर्वे आपुल्या ॥४९॥
अत्यंत मोहित होऊन । गणनायका प्रणाम करुन । म्हणें हे विचित्र गजवक्त्र कां धरलें महान । पुनःपुन्हा हंसे ऐसे म्हणत ॥५०॥
तेव्हां गजानन कुपित । शशलांच्छना त्या शाप देत । जे तुज चंद्रा पाहत । ते होवोत पापी जन ॥५१॥
ते सदैव विघ्नसंयुक्त । माझ्या शापानुसार होत । यांत संशय तिळ ना असत । ऐसें बोलून हो अन्तर्धांन ॥५२॥
आपुल्या भार्यांसहित । गणेश ब्रह्मनायक अदृश्य होत । चंद्र नंतर मलिन पडत । शंभु आदि देव गर्वहीन ॥५३॥
तेव्हांपासून ते गाणपत्य होत । ब्रह्मदेवाच्या हृदयीं संस्थित । परि वेदज्ञा अहंकृति मदयुत । ब्रह्मा तेणें पुनः पुनः ॥५४॥
त्यानें सरस्वती गणेशास दिली । तिच्यासह वसती केली । ब्रह्मदेवाच्या हृदयीं भली । विघ्नपानें सर्वकाळ ॥५५॥
हृदयांत गणेश राहत । तरी नंतर कैसा मोहयुक्त होत । सदा त्या गणेशासी भजत । गाणपत्य भावें भक्तीने ॥५६॥
सर्वाची पोषणता निवसत । तैसीच विष्णूच्या हृदयांत । त्या सामर्थ्ये केशवासी होत । मोहजन्य गर्व सदा ॥५७॥
ती विश्व पोषिणी पृष्टी देत । विष्णु जेव्हां विघ्नराजाप्रत । तिच्यासह गणेशान विराजत । विष्णूच्या हृदयीं सर्वदा ॥५८॥
तोही गाणपत्य विचार निमग्न । नित्य करी गणेश भजन । हृदयांत असतां गजानन । मोह त्या कैसी होणार ॥५९॥
योगानें मोहहीनत्व असत । सदा शंभूच्या हृदयांत । त्या अहंकार भावें मानित । आपणांसी शंकर श्रेष्ठ पूर्वीं ॥६०॥
परी ती योगिनी जेव्हां देत । शिवप्रभु गणेशाप्रत । तेव्हां रमे तिच्यासवें हृदयांत । शंभूच्या तो सर्वदा ॥६१॥
गणेश हृदयांत स्थित । म्हणोनी मोह त्या न होत । सदा गाणेशक होऊन भजत । गणनायका तो विनमर ॥६२॥
वृष्टीनें दानप्रदान । करी दिवाकर तो महान । सर्वांच्या जीवनाचे धारण । ऐसें महाकर्म करी ॥६३॥
अहंस्वभावें तो वर्तत । संजीवन शक्ति अन्तःकरणांत । परी ती देतां विघ्नेश्वराप्रत । तिच्यासह राहे गणाधीश ॥६४॥
गणाधीश हृदयांत वसत । म्हणोनी राही गणेशभक्त । अनन्यभावें त्यास भजत । मोहास नसे संधि तेथें ॥६५॥
शक्ति सर्वमोहिनी देवी हृदयांत । होती ती अहंकारकारण निश्चित । ती विघ्नेश्वरा देतां तो राहत । शक्तियुक्त देवी हृदयांत तें ॥६६॥
शक्तियुक्त गणेश स्थित । जेव्हां देवीच्या हृदयांत । त्यायोगें गणेश भक्तिरत । क्रीडा करी ती देवी ॥६७॥
ऐश्या रेती अहंकार निर्मुंक्त । देवेंद्र जाहले समस्त । गाणपत्यप्रिय होऊन भजत । विघ्ननायका सर्वदा ॥६८॥
चिंतामणी चित्तांत राहून । प्रकृतिद्वारा क्रीडामग्न । मिथ्या अहंकारभावें बंधन । प्राप्त होतें जगतांत ॥६९॥
कर्ता करविता गणेश असत । यात संशय लवमात्र नसत । हृदिस्थ सारें त्यास अर्पित । त्यानें सुखीं पंच देव ॥७०॥
तें ऐकून दशरथराजा विचारित । त्या चंद्राची काय गति होत । ते सांगावें मजप्रत । मुद्‌गल दक्षा ती कथा सांगती ॥७१॥
वसिष्ठ म्हणती नृपाप्रत । गणेशशाप संयुक्त । चंद्र तें परतला स्वगृहाप्रत । दुःख अत्यंत मानसीं त्याच्या ॥७२॥
एकांतात बसून । विचार करी उन्मन । गणपतीचा देह महान । संप्रज्ञात स्वरुपमय ॥७३॥
असंप्रज्ञातरुप त्याचें शिर । त्यांच्या योगें प्रकट उदार । गणेश हा भक्तानुग्रहकर । देहधारी स्वयं जगीं ॥७४॥
वेदांत जें कथिलें रुप अद्‌भुत । परमयोगप्रद पुनीत । तें न जाणिलें मी मोहयुक्त । गजानना क्षमा करी ॥७५॥
चित्तग अपराधाची क्षमा करी । मज दीनातें उद्धरी । ऐसी विज्ञप्ती चंद्र करी । विघ्नेशाच्या ध्यानीं लीन ॥७६॥
गंगा तीवारावरी बैसून । तप करी तो उत्तमोत्तम । अष्टादश अक्षरमंत्र जपून । विघ्नपाचें तप करी ॥७७॥
चंद्र लीन जग समस्त । दुःखपूर्ण ते होत । सूर्याच्या तेजें दग्ध रसहीन वर्तत । चराचर हें उद्विग्न ॥७८॥
तेव्हां देवगण सारे भयभीत । शंभु विष्णु मुख्य तप करित । षडक्षरविधानें हृदयांत । ध्यान करिती गजाननाचें ॥७९॥
भक्तियुक्त ते महेश्वर तोषविती । ऐसी शंभर वर्षे जाती । तेव्हां गणाधिप प्रकटती । चंद्रापुढतीं वरदानार्थ ॥८०॥
तोवरी देवेशांचें तप होत । एक वर्षभर सतत । एकाच वेळीं उभय स्तवित । देवेश आणि चंद्र तें ॥८१॥
अथर्वशीर्ष जपून तोषवित । आदरें तें ढुंढीस विनीत । संतुष्ट होऊन तें म्हणत । ब्रह्मनायक गणेश त्यांना ॥८२॥
देवेशांनो मागा सत्वर । सफळ करीन मनोरथ सर्व । गणेशवचन हें ऐकून सुंदर । हात जोडती देव सारे ॥८३॥
प्रणाम करुन स्तवन करिती । नम्रपणें त्यास म्हणती । जरी प्रसन्न तूं आम्हाप्रती । वरद तूम गजानन ॥८४॥
चंद्रासी करी दोषमुक्त । नाथा तुज आम्हीं नमित । तेव्हां त्यासी गजानन सांगत । भक्तीनें संतुष्ट मीं तुमच्या ॥८५॥
चंद्रास जो उःशाप दिला । त्यास शाप देतों या वेळा । भाद्रपद शुक्ल चतुर्थीला । न घ्यावें चंद्रदर्शन कोणी ॥८६॥
त्या दिवशीं हसला मजला । त्या दोषें अपराधी झाला । म्हणोनी त्या दिनीं तयाला । पाहूं नये कोणी जगीं ॥८७॥
अन्य दिनीं त्याचें दर्शन । घेतलें तरी दोषहीन जन । ऐसें वरदान देऊन । गणेश अंतर्धान पावला ॥८८॥
देव जाहले अति हर्षित । चंद्रासी तें सांगण्या जात । तेथ चंद्राच्या पुढयांत । गणपति ते प्रकटला ॥८९॥
त्या पाहून करी नमन । घाली साष्टांग नमस्कार प्रसन्न । विधियुक्त पूजा करुन । कृतांजली स्तवन करी ॥९०॥
विघ्नपालासी गणेशासी । परमात्म्यासी ब्रह्मेशासी । स्वभक्तां ब्रह्मभूयप्रदासी । अनामयासी नमन असो ॥९१॥
सर्वादिपूज्यासी शिवात्मजासी । देवासी विष्णुपुत्रासी । ब्रह्मपुत्रासी सूर्यपुत्रासी । विघ्नहारका तुज नमन ॥९२॥
शक्तिपुत्रासी शेषपुत्रासी । सर्वपुत्रासी सर्वेशासी । सर्व मातृपितृरुपासी । परेशा नमन तुला असो ॥९३॥
परात्परतरासी सिद्धिबुद्धिपतीसी । सिद्धिबुद्धिप्रचालकासी । हेरंबासी महेशांच्या महेशासी । परमात्म स्वरुपा तुज नमन ॥९४॥
स्त्रष्ट्रयासी पालकासी संहर्त्यांसी । सर्वासी वरदात्यासी । अनादिसिद्धासी देवासी । नमो नमः पुनः पुन्हा ॥९५॥
तुझ्या मायेनें मोहित । अपराधयुक्त मीं मदोन्मत्त । आतां शरण तुज विनीत । क्षमा करी माझ्यावरी ॥९६॥
पूर्वीं मज पाहून हर्षयुक्त । असती देवतादी जगांत । आतां मज पाहून दोषयुक्त । भयातुर ते सारे ॥९७॥
म्हणोनी मज न पाहती । पापी पापरुपी मीं जगतीं । निर्दोष करी विघ्नेशा सांप्रती । करुणालया नमन तुला ॥९८॥
विघ्नवारणा तुझें दर्शंन । सर्वदा घडो मज पावन नमन । त्यानें कृतकृत्य होईन । योगिसंमंत मीं सतत ॥९९॥
ऐसें बोलून भक्तियुक्त । देवा संन्निध नाचत । रोमांच अंगावरती उठत । डोळ्यांत दाटले आनंदाश्रू ॥१००॥
ते पाहून ढुंढी म्हणत । तूं रचिलेलें स्तोत्र असत । माझें आवडतें जगांत । अपराध सारे क्षम्य होती ॥१०१॥
सर्व सिद्धिप्रद पूर्ण होईल । नाना सुखकारक अमल । जो हें स्तोत्र वाचील । ऐकेल तया भक्तिभावें ॥१०२॥
जैसा पूर्वी तूं स्थित । तैसाचि चंद्रा राहे सांप्रत । परी ज्या दिनीं उपहारसयुक्त । तो दिवस निंद्य तुजसंबंधी ॥१०३॥
माझ्या ललाटीं भूषण । होई तू सेवापरायण । कृष्ण चतुर्थी व्रतांत पूजन । करितील माझे भक्त तुझें ॥१०४॥
मज पूजून तारेश तुजप्रत । अर्घ्य देतील भक्त । त्यांची इच्छा पूर्ण होत । व्रत तेव्हांचि पूर्ण होय ॥१०५॥
तुझी पूजा न करितां । चतुर्थी व्रताची न होय सांगता । आज द्वितीया सायंकाळ असतां । कृपा केली तुजवरी ॥१०६॥
या कारणें शुक्लद्वितीया तिथी । असता मान्य तूं होय जगतीं । द्वितीयेस प्रयत्न करिती । मानव तुजला नमस्कार ॥१०७॥
ऐसे जे व्रत करतील । त्यांचें महिन्या भराचे दूर होईल । दुःख भय चिंता मल । अन्यथा ना सिद्धि प्राप्ति ॥१०८॥
ऐसें बोलून गजानन । चंद्र पुनीत होतां अन्तर्धान । त्यावेळीं देवेश येऊन । चंद्रास सांगती वृत्तान्त ॥१०९॥
चंद्र त्यांचा सन्मान करित । आदरें तयांस पूजित । नंतर त्यांच्या समवेत । गणेशाची स्थापना करी ॥११०॥
ब्राह्मणां समवेत स्थापून । करी गणेशाचें तो पूजन । गणेशाच्या भाळीं विराजमान । जाहला तेव्हां पासून चंद्र ॥१११॥
भालचंद्र ऐसें नाम ख्यात । जाहलें तें जगतां त । देव ब्राह्मण पूजा करित । गणेशाची त्या समयीं ॥११२॥
चंद्रास निर्दोषत्व लाभत । तदनंतर देव स्वर्गी परतत । चंद्र स्वअंशरुपें राहत । दशरथा ते स्वर्गांत ॥११३॥
परी पूर्णरुपें विघ्नेशा सेवित । आदरें नित्य भक्तियुक्त । तो अत्रिसमुद्‌भव करित । गंगातीरावरी निवास ॥११४॥
विधु भालचंद्रासी सेवित । भक्तितत्पर जगतांत । एकदा देवांनी संप्रार्थित । हरि जन्मला यादवकुळी ॥११५॥
वासुदेव तो झाला । न कळत चन्द्रास पाहता झाला । भाद्रपद शुक्ल चतुर्थीला । दोषयुक्त तें होय ॥११६॥
त्याचे अन्तर्ज्ञान बळ लोपलें । चित्त नरतुल्य जाहलें । विघ्नही एक उद्‌भवलें । तेव्हां त्याच्या जीवनांत ॥११७॥
सत्राजित नाम एक नृपती । त्याची यादवांत ख्याती । राजर्षीच्यावरी त्या प्रीती । सूर्यनारायणें केली ॥११८॥
सूर्याचें तप शत संवत्सर । करिता कृपा लाभत अपार । सूर्ये दिधला होऊन उदार । आपुल्या गळ्यांतील मणि त्याला ॥११९॥
त्या मण्याचें नांव ख्यात । स्यमंतक हें जगांत । तें रत्न बांधीं गळ्यात । सत्राजित भक्तिभावें ॥१२०॥
अष्ट भार सोनें नित्य । तो स्यमंतक मणि अद्‌भुत । सूर्यतेजासम शोभत । यदुनंदनाच्या गळ्यांत ॥१२१॥
द्वारकेंत तो सूर्यभक्त । सत्राजित यादव निवसत । शुचिभावें पूजित । रत्न तें तो निरंतर ॥१२२॥
नंतर बहु काळ जात । तेव्हां कृष्ण दोषयुक्त । त्याच्या मनीं बुद्धि उपजत । स्यमंतकर्मणि लाभार्थ ॥१२३॥
एकदां सभेंत संस्थित । सत्राजितास कृष्ण म्हणत । विनयपूर्वक वचन लोभयुक्त । उग्रसेना राजा आम्हीं केलें ॥१२४॥
यादवांच्या त्या राजास । यादव पूजिती सविशेष । दिग्विजयांत लब्ध राज्यास । आम्हीं दिधलें आनंदें ॥१२५॥
तरी आता तूं देई मजप्रत । स्यमंतक मणि विशेषयुक्त । सुवर्ण जें मणि संभूत । तें तूं नित्य घेत जाई ॥१२६॥
तो मणि शोभेसाठीं गळयांत । बांधावा तूं ऐसें विनवित । तेव्हां सत्राजित क्रोधयुत । श्रीकृष्णासी सांगतसे ॥१२७॥
प्रसेनाला जो दिला । तो आता घेऊन बैसला । ऐसें बोलून परतला । सत्राजित स्वगृहासी ॥१२८॥
स्वानुजास मणि देत । स्ववृत्तांत त्यास कथित । पुढें एकदा कृष्णासहित । यदुनंदन जातीं मृगयेसी ॥१२९॥
तेव्हां अशुचि स्वभावें बांधित । प्रसेन तो मणि गळ्यंत । तोही त्यांच्या सर्व जात । वनांत मृगया खेळण्या ॥१३०॥
अशुचित्व दोषें वनांत । सिंह त्या प्रसेनासी मारित । अश्वासहित विदारित । मणि घेऊन पळाला ॥१३१॥
पुढें जांबवान त्या सिंहास । मारुन मणि नेई स्वगृहास । दाखवी आपुल्या पुत्रीस । तिजही तो आवडला ॥१३२॥
तेव्हां तो महाबळी तिज म्हणत । तुझा जो भर्ता होईल भाविकालांत । त्यास हा मणि देईन निश्चित । आजपासून मणि तुझा हा ॥१३३॥
सायाह्रीं सर्व यादव परतत । आपापल्या मंदिरांत । प्रसेनाविहीन त्यांस पाहत । सत्राजित तें क्रुद्ध झाला ॥१३४॥
अहो कृष्णें माझा भ्राता । मारिला यांत संशय न चित्तां । मणिल्भवशें पापी तत्त्वतां । ऐसें दुष्ट आचरला ॥१३५॥
पुरजन विश्वास ठेविती । उग्रसेनादि कृष्ण निर्भत्सती । तेव्हां कृष्ण दुःखित चित्तीं । ध्यान करण्या बैसला ॥१३६॥
परी सामान्य जनांसमान । कुंठित झाला जनार्दन । लुप्त झालें दिव्य ज्ञान । दोषकारण न सांपडे तया ॥१३७॥
नंतर तो अति दुःखित । होऊन विचार करी मनांत । अंतर्ज्ञानाचे बळ सांप्रत । कोठें गेलें कळेना ॥१३८॥
मी नरतुल्य कैसा झालों । जननिंदेला पात्र बनलों । वृथा लांछनें दूषित झालों । देहत्याग करीन आतां ॥१३९॥
तदनंतर जाऊन सभेंत । घेऊन यादव मुख्य जात । प्रसेनाचा शोध करण्या निश्चित । महाद्युती तो तेधवां ॥१४०॥
प्रसेनाची पाउलें उमटलीं । त्यानुसार शोध सरणि आखिली । तेव्हां अश्वासहित पाहिली । मृत मूर्ती प्रसेनाची ॥१४१॥
मणिहीन तो असत । सिंहें मारिला यादवसुत । ते सर्व पुढें जात । सिंहमार्गांचा घेत शोध ॥१४२॥
तेथ महावनीं दिसत । सिंहही पडला होता मृत । कोणा ऋक्षानें वधिला असत । परि तो मणि न सापडला ॥१४३॥
भयसंकुल ते पाहात । अस्वलाची पदचिन्हें विहित । त्यानुसार पुढती जात । यादव मुख्य ते सारे ॥१४४॥
तेव्हां एका घोर गृहांत । एक अस्वल प्रवेशत । तें पाहून कृष्ण प्रवेशत । त्या गृहेमाजीं सावध ॥१४५॥
अन्यांस बिलद्वारीं स्थापून । कृष्ण आंत प्रवेशून । लांच्छन दूर करण्या उद्युक्त मन । शोध घेऊं लागला ॥१४६॥
योजनमात्र बिळांत जात । तेव्हां प्रकाश पाहत । एक संस्थान शोभिवंत । सुविस्तृत तेथ दिसलें ॥१४७॥
पाळण्यांत त्याला दिसत । तेथ स्यमंतक मणि तो अद्‍भुत । तो पाहून हर्षयुक्त । हळुवारपणें पुढे गेला ॥१४८॥
एक शिशु पाळण्यांत । होता तेथें निद्रिस्त । जांबवंतपुत्री अकस्मात । बाहेर आली त्या वेळीं ॥१४९॥
अपरिचित पुरुषासी पाहत । तेव्हां ती भयग्रस्त । मोठयानें आक्रोश करित । ते रुदन ऐकलें जांबुवंतें ॥१५०॥
श्रीकृष्णास तो पाहत । येई बाहेर त्वरित । विष्णुसह त्वेषे लढत । एकवीस दिवस युद्ध झालें ॥१५१॥
यादव सारे वाट पाहून । आठव्या दिनीं गेले परतून । द्वारकेत वृत्तांत कथून । विह्रल झाले मानसीं ॥१५२॥
आम्हीं सात दिवस वाट पाहिली । परी आमुची निराशा झाली । श्रीकृष्णाची स्वारी न आली । गुहेबाहेरे त्या अवधींत ॥१५३॥
तो श्रीकृष्ण मृत वा जीवित । हें न कळे आम्हांप्रत । वसुदेवादि शोक त्वरित । स्त्रियांसहित दुःखानें ॥१५४॥
उग्रेसेनादी सर्व रडती । दुःख झालें त्यांना अती । आता शत्रु प्रबल होती । जरासंधादि निश्चित ॥१५५॥
यादवांनो आतां काय होणार । कृष्णरहित आम्हीं हरणार । शत्रूच्या हस्तें मरणार । सगळे यादव आपण ॥१५६॥
ऐसा विलाप ऐकत । बलराम तेव्हां सांत्वन करित । बहुविध युक्तिवाद करित । निःश्वास सोडिती नृप सारे ॥१५७॥
दुःखयुक्त भयातुर सत्राजिता निंदिती समग्र । तोही दुःखें ग्रस्त फार । भयसंकुल जाहला ॥१५८॥
तिकडे जांबवान कृष्णाप्रत । घनगंभीर स्वरें म्हणत । कोण तूं वीर तेजयुक्त । युद्ध करिसी माझ्यासवें ॥१५९॥
कृष्ण त्यास सांगे प्रतिवचन । मी यदुवंशी उत्पन्न । माझें नांव कृष्ण जाण । महामते तूं जांबवाना ॥१६०॥
तें ऐकता खेद होऊन । जांबवान करी नमन । रामानें जें रम्य वचन । पूर्वी दिलें तें सत्य झालें ॥१६१॥
तो तूं विष्णु देव आलास । मी असे तुझा दास । करुणानिधे तूं या दासास । क्षमा केली पाहिजे ॥१६२॥
अज्ञानानें शक्तिगर्व होऊन । युद्ध केलें हा दोष महान । तो आता क्षम्य करुन । कृपा करी तूं मजवरी ॥१६३॥
नंतर स्तुति करुन । त्यानें पूजिला कृष्ण भगवान । वृत्तान्त सारा सांगून । सांत्वन करी कृष्ण त्याचें ॥१६४॥
तेव्हां जांबवान कृष्णा देत । मणि तो कन्येसहित । त्या दोघांचा स्वीकार करित । कृष्ण तेव्हां आनंदें ॥१६५॥
नंतर द्वारकेंत परतत । कृष्णा पाहून हर्षयुक्त । सर्वही यादव उत्सव करित । सत्राजिता बोलाविती ॥१६६॥
सर्वांच्या देखत तयाप्रत । स्यमंतक मणि परत देत । सत्राजित मानसीं निंदित । आपुल्या देहासी त्या वेळीं ॥१६७॥
कृष्णाचा विरोध मीं केला । अविचारें आळ घातला । म्हणोनी घे प्रायश्चित्ताला । सत्राजित त्या समयीं ॥१६८॥
सत्यभामेसहित मणि अर्पित । महात्म्या श्रीकृष्णप्रत । आणि सासरा होऊन विनवित । जावयासी तो वीर ॥१६९॥
सूर्यभक्ति समन्वित । रक्षण करी मणि तूं सतत । दौहित्र तुझे घेतील भविष्यांत । अद्‌भुत हा महामणि ॥१७०॥
त्या वेळीं वृत्तान्त ऐकत । यादव लाक्षागृहांत । कुंतीसह दग्ध अवचित । तें ऐकून यादव रडती ॥१७१॥
पुरोचन हा वृत्तान्त । जेव्हां यादवांस निवेदित । तेव्हां बलरामासहित । कृष्ण गेला हस्तिनापुरीं ॥१७२॥
धृतराष्ट्रादि दुःखित । शोकसंकुल रुदन करित । शतधन्वा अक्रूर कृतवर्मा संगत । क्रोधयुक्त ते सारे ॥१७३॥
सत्राजितें कन्यार्थ आमंत्रित । आपण यादव वीर भूतकाळांत । आम्हांस त्यागून कृष्णाप्रत । अर्पण केली कन्या त्यानें ॥१७४॥
कृष्ण पांडवांच्या शोकें आर्त । तेथेच राहिला असत । आतां तिघांनी अवचित । एक कार्य करुं या ॥१७५॥
आपण तिघे सत्राजिता मारुन । मणि बळकावूं महान । ऐसा विचार करुन । रात्रीं गेला शतधन्वा ॥१७६॥
सत्राजितास ठार मारुन । मणि घेतला हिरावून । तो तैलद्रोणींत टाकून । कृष्णाकडे तो गेला ॥१७७॥
आपुला श्वशुर झाला हत । हें ऐकून कृष्ण कुपित । शतधन्वा तें जाणून जात । अक्रूरासमीप त्या वेळीं ॥१७८॥
अक्रूर त्याचा त्याग करित । तेव्हां कृतवर्म्यासमीप जात । तोही त्याचा पक्ष न घेत । पुन्हा अक्रूरापाशी आला ॥१७९॥
मणि तेथेच टाकून । भयसंकुल गेला पळून । चपल घोडीवर बसून । शतयोजन वेग जिचा ॥१८०॥
शतधन्वा जाय पळून । वृत्तान्त हा जाणून । संकर्षणासह पाठलाग करुन । पकडण्या धावला रथारुढ ॥१८१॥
शतयोजनें जाऊन । घोडी पडली मरुन । शतधन्वा भयभीत मन। पळू लागला पायांनी ॥१८२॥
तो पायीच धावत । हें जेव्हां कृष्णास कळत । तोही रथ सोडून करित । पाठलाग तयाचा ॥१८३॥
शतधन्व्यासी गाठून । चक्र फेकून त्यास मारुन । शोधिला स्यमंतक मणि उत्तम । परी त्याला तो न मिळाला ॥१८४॥
म्हणून शोकसमायुक्त । बलभद्रासी तो म्हणत । शतधन्वा मणियोगें हत । माझ्या हातून अग्रजा ॥१८५॥
तेव्हां रोहिणीसुत कोपयुक्त । म्हणे कृष्णासी संतप्त । महाखला तूं मिथ्या सांगत । मणि लपविला आहेस तूं ॥१८६॥
अग्रजासी मणि लागेल द्यावा । हया लोभें तूं असत्याश्रय घ्यावा । हें निंद्य कृत्य केशवा । सर्वथैव मज वाटे ॥१८७॥
नंतर केशव सान्त्वन करित । अग्रजाचें विनययुक्त । द्विज देव गाईंची शपथ घेत । हें चौर्यकर्म मी न केलें ॥१८८॥
परी त्याचा तिरस्कार करुन । बलराम गेला निघून । राजनीतिज्ञ नृपतीस भेटण्या उन्मन । विदर्भात तो गेला ॥१८९॥
नंतर अतिदुःखसंयुक्त । कृष्ण परम व्यथा भोगित । बलभद्रा स्मरुन रडत । पुनःपुन्हां आवेगानें ॥१९०॥
ज्ञानदृष्टीनें पाहत । परी कृष्णास मणि न दिसत । म्हणोनि तो अति दुःखित । रडू लागला पुनःपुनः ॥१९१॥
अहो माझें दिव्य ज्ञान । कुठें लुप्त झालें महान । नरतुल्य झालों देव असून । धिक्कार असो जीवनाचा ॥१९२॥
रथांत बैसून द्वारकेंत । महायश तो नंतर जात । उग्रास सारे वृत्त सांगत । विस्तारपूर्वक विषादें ॥१९३॥
तेव्हां यादव मुख्य त्यासी निंदिती । कृष्ण सत्राजिताची उत्तरक्रिया करिती । देशोदेशींचे नृप करिती । निंदा श्रीकृष्णदेवाची ॥१९४॥
दुष्ट बुद्धीनें केलें । कृष्णानें हें नीच कर्म असलें । समर्था बलभद्रा त्यजिलें । दुर्मती त्या मणिलोभ्यानें ॥१९५॥
महापापी तो असत । विश्वासपात्र न जगांत । लोक न वंदिती द्वारकेंत । श्रीकृष्णासी त्यामुळें ॥१९६॥
सर्वांनी परित्यक्त दुःखित । श्रीकृष्ण व्यथा  अनुभवित । जाहला क्षीण तो अत्यंत । अस्थित्वचा मात्र उरला ॥१९७॥
ऐसा होता स्वसदनांत । नारद त्यास भेटण्या येत । पाहोनियां सुविस्मित । श्रीकृष्ण म्हणे तयासी ॥१९८॥
मज सर्व लोकांनी त्यागिलें । म्हणोनी एकलेपण आलें । आता दुःख आश्रया आलें । घरांतच घालवितों वेळ ॥१९९॥
परी परम भाग्य असत । म्हणोनि दर्शन तुझे घडत । तें ऐकून विचारित । नारद श्रीकृष्णासी प्रश्न ॥२००॥
कां त्यजिलें लोकांनी तुला । सर्व वृत्तान्त सांग मजला । तेव्हां श्रीकृष्णांनी तयाला । सांगितलें घडलेलें सर्व ॥२०१॥
नंतर नारद ध्यान लावित । दिव्य दृष्टीनें पाहत । देहत्यागोत्सुका कृष्णा म्हणत । ऐक कारण या दुःखाचें ॥२०२॥
भाद्रपद शुक्ल चतुर्थीस पाहिला । चन्द्र तूं कृष्ण हा दोष घडला । त्या चंद्रासी शाप मिळाला । पूर्वी त्या विघ्नराजाचा ॥२०३॥
त्यायोगें तुज दुःख प्राप्त । आतां देह त्याग करुं नको संतप्त । गणेशासी भज भावयुक्त । संकष्टीचें व्रत तूम करी ॥२०४॥
तेणें चोरीचा आळ टळेल । अन्यथा मुक्ति न मिळेल । तो सज्ञान समर्थेस अमल । त्या विघ्नेशा शरण जाई ॥२०५॥
ऐसें सांगून महायोगी जात । गणेशगान प्रेमें करित । वीणावादनीं लालस भक्त । नारद सोडून त्या स्थळा ॥२०६॥
तदनंतर प्रहर्षानें युक्त । कृष्ण विघ्नेशाचें पूजन करित । आदरें ध्यान आचरित । दशरथा एकाक्षर मंत्रानें ॥२०७॥
संकष्टीचें व्रत आचरित । रात्री ध्यानमग्न होत । तेव्हा गणराज प्रकटत । भक्तापुढें तो सुखप्रद ॥२०८॥
कृष्णास जागें करित । ब्रह्मनायक तो गणेश उदात्त । वरती उठून नमित । श्रीकृष्ण पूजी आदरानें ॥२०९॥
पुनःपुनः प्रणाम करुन । सामगायनें स्तुति करुन । स्तोत्र अष्टक संज्ञ म्हणून । आनंदानें नाचला ॥२१०॥
रोमांचित कृष्णास पाहून । गणेश तेव्हां बोले वचन । हृदयवांच्छित वरदान । माग कृष्णा मी प्रसन्न ॥२११॥
गणेशाचे ऐकून वचन । महायश कृष्ण खिन्नमन । भक्तियुक्त तो बोले वचन । विघ्नेशा तुझी भक्ति देई ॥२१२॥
जरी तूं मजवरी तुष्ट असत । दृढ भक्ति दे मजप्रत । भाद्रपद शुक्ल चतुर्थीस चन्द्र पाहत । ते जन होवोत शापहीन ॥२१३॥
मी आसन्न मरण झालो । ज्ञानवर्जित दुःख पावलों । अन्यांची कार्यवार्ता उमजलों । म्हणून प्रार्थी तुजला मी ॥२१४॥
तेव्हां गणनाथ भक्तिमोहित । त्या श्रीकृष्णासी म्हणत । माझी दृढ भक्ति तुझ्या चित्तांत । अनघा सदैव राहील ॥२१५॥
स्यमंतकाचें महिमान । तुला जें आलें लांच्छन । हे सर्व जो ऐकेल मन । लावून वरदान त्यास लाभेल ॥२१६॥
हें जो भावबळें वाचील । मजला हृदयीं ठेवील । तो दोषहीन होईल । त्यांत संशय अन्य नसे ॥२१७॥
श्रीकृष्णा तुझा दोष सरेल । आळ खोटा जाईल । यश पूर्ववत पसरेल । ऐसें माझें वरदान ॥२१८॥
ऐसें सांगून गणेशान । कृष्णास भक्तिपरायण प्रसन्न । जाहला झणीं अंतर्धान । कृष्ण तेथेचि राहिला ॥२१९॥
संपूर्ण जागरण करुन । पंचमीस गणेश पूजन । विशेषें देई बहुविध दान। तेणें गणेशकृपा लाभत ॥२२०॥
अंतर्ज्ञान परत लाभत । अक्रूरकृत मणिचौर्य जाणत । सभेंत जाऊन अक्रूराप्रत । आवाहन तेव्हां त्यानें केलें ॥२२१॥
त्यास प्रणाम करुन । महाभागास बोले हसून । शतधन्व्यानें मणि तो महान । तुझ्या घरीं टाकिला असे ॥२२२॥
बलभद्रासाठी मानदा दाखव । मणि तो आम्हां अभिनव । तेव्हां अक्रूर आणी भययुक्त भाव । मणि तो सभेमध्यें तदा ॥२२३॥
तें पाहून उग्रसेन मुख्य प्रशंसित । जनार्दनासी पूजित । अक्रूर विदर्भांत जात । हलधरासी मणि द्यावया ॥२२४॥
त्यास मणि देऊन । सन्मानें परत आणून । जेव्हां सभेंत बसविला प्रसन्न । तेव्हां सर्वां मोद झाला ॥२२५॥
महावीर तो समागत । पाहून केशव हर्षयुक्त । द्वारकानिवासी आदर करित । निर्दोषत्व पटून कृष्णाचें ॥२२६॥
नानादेशनिवासी मुदित । तैसेचि राजे मित्रयुक्त । आनंदोत्सव तेव्हां मानित । आळ सरला श्रीकृष्णाचा ॥२२७॥
सर्वांच्या हृदयीं संस्थित । बुद्धिनायक हा गणेश जगांत । त्याच्या कृपेनें दुर्लभ नसत । कांहींही गणेशभक्तांना ॥२२८॥
म्हणोनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस । चन्द्रदर्शन वर्ज्य करावें विशेष । परी होता दर्शनास । हें चरित्र भक्तीनें वाचावें ॥२२९॥
त्यायोगें दोषविहीन होईल । अन्यथा भ्रष्टभाव नरकीं जाईल । स्यमंतक मणि चरित्र विमल । ऐकतां चन्द्रदर्शन दोषहरती ॥२३०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराण्नोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते भाद्रपदशुक्लचतुर्थी चन्द्रदर्शन दोषहरणचरितवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP