मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल पुढची सांगती । लोभासुर भेटला मातापित्याप्रती । प्रणाम करुन तयांप्रती । भेटला मित्रांस आपुल्या ॥१॥
महिषासुराची सुता रुपवती । तृष्णा नामा मोहक अति । तिज वरिलें हर्षचित्तीं । तेव्हां जाहला लोभासुराच्या ॥२॥
ऐशा परी नाना भोग भोगित । सुहृदांना आनंद घेत । जाहला बलशाली मदयुक्त । पृथ्वीवरी अवतरला ॥३॥
दानव त्यास राजा मानिती । एक नगर त्यास्तव निर्मिती । विषयवर्धन सदा अति । सुखद नाम ठेविलें त्याचें ॥४॥
नंतर नामा दिशांतून । आले दैत्यगत महान । त्या सर्वांसह जाऊन । नमिला शुक्र लोभासुरें ॥५॥
तेव्हां शुक्राचार्य प्रेरणा देत । दैत्य सारे नगरीं परतत । देवांतक वृत्र बलि जृभं असत । नरांत्क प्रहेति होते त्यांत ॥६॥
विप्रचिती इत्यादि असुर । जमले होते असंख्य अनिवार । त्या सर्वां समक्ष असुर गुरुवर । करी अभिषेक लोभासुरासी ॥७॥
ब्राह्मणांच्या करें अभिषिक्त । दैत्य साम्रराज्यीं लोभास स्थापित । सर्व दानव आनंदयुक्त । घोष करिती विजयाचा ॥८॥
लोभासुराचा जयजयकार । करुन गेले स्वगृहांसी सर्व ।  ऐसा काळ उलटता नंतर । दूत पाठवून बोलावी ॥९॥
समस्त असुर आज्ञा पाळून । जमले राजासमोर प्रसन्न । लोभासुरें तयास स्तवून । स्वागत केलें सर्वांचे ॥१०॥
नंतर तयांस म्हणे वचन । विप्रचित्यादिकांनो सावधमन । ऐका तुम्हीं लक्ष देऊन । योजना माझी दैत्यहितकर ॥११॥
पुण्ययोगें आपुल्या जिंकीन । लीलया मी सकल जग महान । इच्छां सांगा मनापासून । आज्ञा पाळीन तुमची सदा ॥१२॥
आपण वृद्ध श्रेष्ठ बलवंत । सांगा आपुलालें मत । ऐसें वचन ऐकून हर्षित । दानवोत्तम सर्व झाले ॥१३॥
भावगंभीर स्वरें त्या म्हणत । छान शोभन  ही योजना वाटत । तुझ्या प्रसादें जिंकूं त्वरित । विष्णुप्रमुख सर्व देव ॥१४॥
पराक्रमाची तुलना नसत । आपुल्या महाभागा जगांत । ऐसें बोलून सर्व अगणित । शुक्राचार्यांस त्या स्थानीं ॥१५॥
त्याची आज्ञा घेऊन होत । सज्ज सारे दानव क्षणांत । गजासुर विप्रचित्ति प्रतापवंत । देवांतक तैसा नरांतकही ॥१६॥
तार प्रहेति हेहि येत । बलि जृंभ तैसे अन्य जमत । आपापल्या सेनांसहित । नाना वाहनधारी निघाले ॥१७॥
गजारुढ रथारुड । नाना वाहनी होऊन आरुढ । महाअसुर शस्त्रपर गूढ । लोभासुराप्रत गेले ॥१८॥
त्यांच्या समवेत महाबाहु निघत । पृथ्वीजयार्थ उद्यत । होऊनियां मनी हर्षित । काळासही कंप सुटला ॥१९॥
ऐसे महावीर जेथ एकवटत । सुसज्ज सर्वशस्त्रास्त्रयुक्त । क्षुद्र मानव त्यांसमवेत । युद्ध काय करणार? ॥२०॥
जे राजे युद्ध करण्या येत । त्यांतले काही झाले मृत । दारुण संग्राम चालत । कांहीं शरण गेले असुरा ॥२१॥
ऐसें पृथ्वींवरी युद्ध करुन । सप्तसमुद्रांकित धरा जिंकून । असुर समस्त महान । सार्वभौम बळी झाले ॥२२॥
जे राजे झाले मृत । त्यांच्या सुतांसी स्थापित । राज्यावरी करदाते मांडलिक भक्त । दानवोत्तमांनी त्या वेळीं ॥२३॥
जे शरण असुरांस आले । त्यांनाही राज्य परत दिलें । त्या असुरांसी पूजिते झाले । अन्यही राजे त्या समयीं ॥२४॥
वार्षिक करभार ठरवून । त्यांची पूजा करुन । शेषनागही गेला परतून । पाताललोकीं नम्रपणें ॥२५॥
दैत्य लढण्यां जात स्वर्गांत । लोभासुर विजयें आनंदभरित । महाकाय महाबलंवत । तें पाहून इंद्र म्हणे ॥२६॥
बृहस्पतीस प्रणाम करुन । इंद्र म्हणे लोभासुर येत चालून । वरिष्ठ दानवांस घेऊन । त्यासह युद्ध करण्या जातों ॥२७॥
आपण आज्ञा द्यावी मजप्रत । तेव्हां निःश्वास सोडून बृहस्पति म्हणत । देवेंद्रा ऐक रहस्य जें ज्ञात । मजसी त्या लोभासुराचें ॥२८॥
शंकराच्या वरदानें युक्त । दैत्यनायक तो अजिंक्य असत । नानारुपें धारण करित । म्हणोनि शरण जो विष्णूसी ॥२९॥
तो महाबुद्धी करील हित । ऐकोनि गुरुचें वचन हितयुक्त । सुरेंद्र तें शोकसंयुत । वैकुंठात गमन करी ॥३०॥
स्वर्गांतील देवस्थानें रिक्त । पाहुनी दैत्यगण समस्त । आनंदलें मनांत । अमरावतींत प्रवेश करिती ॥३१॥
दैत्यराज तो लोभासुर प्रवेशत । इंद्रपुरींत प्रतापवंत । महेंद्राच्या आसनीं बसत । स्वर्गराजा तो जाहला ॥३२॥
सर्व दैत्यांचा सन्मान करुन । त्यांसी दिलीं पदें महान । दैत्येंद्र भोगिती भोग प्रसन्न । नानापरीचे स्वर्गांत ॥३३॥
अप्सरांसहित सेवित । गंधर्व त्या महादैत्यास विनीत । विद्याधरादीही प्रणत । जाहले महादैत्यांसमोर ॥३४॥
दैत्य देवांच्या उद्यानांत । स्वेच्छेनें हिंडती मोदयुक्त । लोभामुरास ते नमित । म्हणती यासम हा ॥३५॥
हया लोभासुरासम । त्रिभुवनांत नसे कोणी अधिराम । ऐसें परस्परांसी सांगून । विजयोत्सवीं दंग झाले ॥३६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते लोभासुरस्येन्द्रपदप्राप्तिवर्णन नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाजनार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP