मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढें सांगती । सर्व देव विचार करितो । शंकर ब्रह्मदेवा प्रार्थितो । स्नेह जोडण्या त्या पुरुषासवें ॥१॥
त्या ब्रह्मदेवास तो पुरुष पाहत । तत्क्षणीं क्रोधें मुसळ दावित । तेव्हां घाबरुन पळत । पितामह ब्रह्मदेव ॥२॥
पळता पळता त्यास सांगत । आम्ही आलों द्विज समस्त । पुत्रा शस्त्रहीन होऊन तुजप्रत । प्रस्ताव ऐक आमुचा ॥३॥
परी तो पुरुष न जाणित । क्रोध आपुला न सोडित । तेव्हां ब्रह्मा जाऊन तो वृत्तान्त । शंभूस सर्व सांगतसे ॥४॥
नंतर विष्णुसह शंभु जात । क्रोधें त्याचे नयन आरक्त । संग्रामार्थ तो त्वरित । तो पुरुषहि मुसळ करीं घेतसे ॥५॥
पुढें सरसावून हृदयीं हाणित । शंभूस तो यमासम भासत । त्रिशूल तें गळून पडत । शिव व्याकुळ जाहला ॥६॥
तदनंतर विष्णु लढत । गदेनें त्या पुरुषास ताडित । तेवढयात शंकर छेदित । त्रिशूलाघातें शिर त्याचें ॥७॥
तो पुरुष तेथ मरण पावत । तें ऐकून पार्वती रुष्ट । कोपयुक्त ती नवकोटी निर्मित । शक्ति नानाविध तत्क्षणीं ॥८॥
त्या सर्वांसी महादेवी आज्ञापित । करा संहार जगाचा समस्त । त्या चालून येतां पाहत । देव भयभीत जाहले ॥९॥
शंकरें नारदादि द्विज पाठविले । अंतरिक्षचरही जमले । समस्तांनी वंदन केलें । पार्वतीस त्या वेळीं ॥१०॥
ते अंतरिक्षचर सर्व नमिती । पार्वतीस भक्तिभावें स्तविती । रक्षण कर जगदंबे ही विनंती । हें सर्व जग तूं निर्मिलें ॥११॥
समस्त द्विज ऐसें स्तविती । तेव्हां क्रोधभरें म्हणे सती । माझा पुत्र कां मारिला जगतीं । सुरेश्वरांनी मिळून ॥१२॥
त्यास पुनरपि करा जीवित । अन्यथा संहारीन मीं जग समस्त । तिची आज्ञा स्वीकारुन जात । शंकराप्रती ते द्विजगण ॥१३॥
नऊ कोटी शक्ति स्तंभित । झाल्या पार्वतीच्या आज्ञेनें त्वरित । सर्व देवांसह शंकर जात । पुरुषासी त्या शोधाया ॥१४॥
त्या मृत बालकाचें शिर न सापडत । तेव्हां शिव आपुल्या गणा आज्ञा देत । बाहेर जाऊन जो प्रथम दिसत । त्याचें शिर येथ घेऊन या ॥१५॥
तेव्हां गजासुर नारदप्रेरित । एकाएकीं लढण्या येत । सर्व देव मारण्या उद्युक्त । महाबळी पराक्रमी ॥१६॥
तदनंतर सर्व देव मुनिगण धावत । दशदिशां भयपीडित । शंभू शूलाघातें मारित । तत्क्षणीं त्या गजासुरासी ॥१७॥
त्याचें मस्तक छेदून । त्या बालपुरुषाच्या धडावरी बैसवून । प्रजानाथा दक्षा पुनरपि जीवन । घालू पाहती त्या शरीरांत ॥१८॥
परी सर्वही निराश होत । तेव्हां ब्रह्मा तेथ येत । जीवित करण्या त्या पुरुषा पाहत । परी त्याचाही यत्न व्यर्थ ॥१९॥
विष्णुही नंतर प्रयत्न करित । स्वविद्येनें करण्या जीवित । परी तो बालपुरुष जिवंत । झाला नाहीं हें दुःख सर्वां ॥२०॥
नंतर शिव स्वयं यत्न करित । सजीव करण्या त्या बाळा त्वरित । परी त्यासही अपयश येत । दुःख फार सर्व देवासी ॥२१॥
त्या समयीं सर्वजण स्तविती । विश्वेश्वरासी भावभक्ती । भावसिद्धीस्तव विनीतमती । अथर्वशीर्ष म्हणूनिया ॥२२॥
ऐसें शंकरादि देव स्तविती । निर्विघ्न करी आम्हां हे गणपति । सांप्रत विश्वचि हें बुडेल निश्चिती । बाळ हा सजीव जर ना होई ॥२३॥
गणेशस्मरणें देवांची बुद्धि जागृत । वेदमंत्रे ते प्रणवास बोलवित । ॐकार मंत्रें आकर्षित । तत्क्षणीं तेथ प्रकटला ॥२४॥
त्या बाळाच्या शवांत प्रवेशून । त्यास देई तो जीवन । बालक पुरुष बसला उठून । सजीवत्व त्यासी लाभतां ॥२५॥
नंतर देव झाले ज्ञानयुक्त । विघ्नविहीन ते सर्वही होत । त्या गजवक्त्रा पाहून नमत । प्रणवाकृती पुरुषासी ॥२६॥
देवदेवेशा ते स्तवित । नाना स्तोत्रें तें म्हणत । सर्वप्रथम त्यास पूजित । सर्वादि स्वमूळ त्यास मानिती ॥२७॥
दक्ष विचारी मुद्‌गलाप्रत । ओंकाररुप गणेश साक्षात्‍  । यात संशय कांहीं नसत । तो कैसा जन्मला मुळातून ॥२८॥
दैत्याचें मस्तक कैसें धरित । हें मम बुद्धीस न उकलत । संशय माझ्या मनांत । दूर करावा तो सांप्रत ॥२९॥
माहात्म्य कथा ऐकून । ज्ञानयुक्त मीं व्हावें पावन । मुद्‌गल सांगती स्पष्टीकरण । दक्ष प्रश्नांचें त्या वेळीं ॥३०॥
दक्षगृहीं जी दग्ध झाली । ती सती शैलजा जन्मली । हिमाचलीं शंभूने केली । तपश्चर्या जें अत्युत्तम ॥३१॥
तेथ ती पार्वती देवी शुश्रूषारते । प्रजापते सेवाभाव निरत । तिज पाहता शंभू स्मरत । पूर्व वृत्तान्त तियेचा ॥३२॥
माझ्या आज्ञेवाचून । ही जी गेली दक्षगृहीं अविचारें करुन । म्हणोनि मी आता न वरीन  । पुनः शैलसुतेसी कदापि ॥३३॥
तारकासुराच्या भयें त्रस्त । देव कामदेवास प्रार्थित । तो शंकरांच्या आश्रमीं जात । मोहविण्या त्यास गर्वभरें ॥३४॥
त्यास जाळून टाकित । महेश हिमगिरीवर जात । तेव्हां देवी खेदयुक्त । दुःख फार करती झाली ॥३५॥
मनीं ज्ञानमार्गानें जाणून । शंभूचें चरित अति महान । तप करण्या उद्युत मन । वनांत जाऊन अर्चीशिवासी ॥३६॥
ऐसी शंभर वर्षे जात । उपासना करी गौरी विनीत । त्या परी प्रसन्न तो होत । शंभुदेव तियेसी ॥३७॥
नंतर ती विघ्नराजास ध्यात । एक वर्ष तप केलें अविरत । तेव्हां हेरंब प्रसन्न होत । पार्वतीसी वर देई ॥३८॥
शिवबुद्धीचा भेद करित । बुद्धिधारक तो दयायुक्त । शंभू गौरीसन्निध जात । बटुरुपधारा त्या प्रभावें ॥३९॥
शंकरास तो स्वयं निंदित । नाना वाक्यें अर्थगर्भित । आपणांसी निर्भर्त्सित । परीक्षा पाहण्या गौरीची ॥४०॥
ती शिवनिंदा ऐकत । गौरी तेव्हां क्रोधें कापत । शंकराचें सांगे महान चरित । परी तो बटू निंदी पुन्हा ॥४१॥
त्या वेळीं ती जागा सोडून जात । गौरी अन्यत्र अवचित । परी तो द्विज तेथ अनुसरत । अन्तीं दाविले निजरुप ॥४२॥
नंतर ती त्या प्रणाम करित । विविध परीनें स्तुति गात । गणेशासी ध्याई मनांत । म्हणे देवा सिद्धि देई ॥४३॥
तिची प्रार्थना ऐकत । शंकर प्रसन्नमनें वर देत । तिजला पाहून आश्चर्य करित । म्हणे गौरी ऐक आतां ॥४४॥
महादेवि तुझ्या वश मी असत । तुज निष्पापें मी निवडित । तपें भक्तिभावें जगांत । आपुला वियोग न होवो ॥४५॥
धूलिधूसर तुझें अंग झालें । शिरही जटायुक्त शोभलें । म्हणोनि तुझ्या अंगीच्या मळा आलें । सर्वपुण्यत्व पुनीतत्व ॥४६॥
ऐसें बोलून अंतर्धान । शंकर पावले तत्क्षण । पार्वती प्रेमसंयुक्त होऊन । स्वगृहासी परतली ॥४७॥
आपुल्या भक्ताच्या रक्षणास्तव । शिवाचें रक्षण करण्य अभिनव । गौरीच्या अंगमलापासून देव । गजानन हा जन्म देई ॥४८॥
गजाननाहून अन्य कोणी नसत । सर्वपूज्य महामते जगांत । गणेश वरदानें होत । वाचासिद्धियुत पार्वती आदी ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते शक्तिमलमाहात्म्यवर्णनं नाम षट्‌चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP