मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ विनवी वसिष्ठाप्रत । आतां चैत्र कृष्ण चतुर्थीचें व्रत । माहात्म्यासह सांगावें मजप्रत । गणेशकथांत अवीट गोडी ॥१॥
वसिष्ठ सांगती पुरातन । इतिहास त्यासंबंधी महान । कलिंग देशांत उग्रसेन । राजा कोणी धर्मतत्पर ॥२॥
तो यज्ञ याग करी सतत । दानधर्मही देई अविरत । धर्मात्मा तो शस्त्रास्त्र कुशल असत । धीमंत सत्यवाक्‍ नीतियुक्त ॥३॥
अन्य नृपांस जिंकून । राज्य करी तो महान । ऐसे होतें सुखमय जीवन । परी अकस्मात संकट आलें ॥४॥
त्या उग्रसेनाच्या राज्यांत । वाघ पिसाळले अत्यंत । ते प्रजाननां भक्षित । नृप यत्नपर व्याघ्रवधीं ॥५॥
परी व्याघ्रांचें ना शमन होत । लोक सार संपीडित । राजासी ते दूषण लावित । पापकर्मा हा राजा ॥६॥
जेव्हां राजा धर्मयुक्त । तेव्हा प्रजेस लाभे सुख सतत । दुष्ट राजा होतां जगांत । प्रजेनें काय करावें? ॥७॥
दूतमुखांतून ऐकत । प्रजेचें हे मर्मभेदी मत । तेव्हां प्रधानावरी टाकित । राज्यभार उग्रसेन ॥८॥
स्वतः वनांत जाऊन एकांतांत । उत्तम तप तो आचरत । सूर्यास सौर गाऊन ध्यात । निराहार राहून तो ॥९॥
ऐसे एक वर्ष जात । अस्थिपंजर राजा उरत । तथापि तप न सोडित । ब्राह्मणरुपें तें सूर्य आला ॥१०॥
राजा करी तयाचें स्वागत । पूजा करुन यथोचित्त । फळें नैवेद्यार्थ अर्पित । तेणें तोषला तो ब्राह्मण ॥११॥
म्हणे राजसत्तमा तप करिसी । कां आपुला देह पीडिसी । उग्रसेन विनीतभावें तयासी । निःश्वास सोडून दुःख सांगे ॥१२॥
नीतियुक्त मी राज्य करित । परी माझ्या राज्यांत । क्रू व्याघ्रगण प्रजेस भक्षित । उपाय थकले सर्वही ॥१३॥
अन्तीं त्यांचें व्हावें शमन । म्हणोनि करी हें तप महान । ऐसें त्याचें वचन ऐकून । विप्ररुप रवि म्हणे त्यासी ॥१४॥
अरे नृपा तूम महापापी अससी । चतुर्थीचें व्रत न करिसी । सर्वप्रथम करील तयासी । लाभते सर्व इच्छित फळ ॥१५॥
चतुःपदार्थांचे साधन । ऐसें हें व्रत महान । तुझ्या राज्यांत व्याघ्रपीडा दारुण । त्या व्रताच्या अभावें ॥१६॥
ऐसी निर्भर्त्सना करुन । चतुर्थी माहात्म्य कथून । त्या नृपासी बोधप्रद वचन । त्या विप्रानें कथियेलें ॥१७॥
तो बोध ऐकून विस्मित । प्रणाम करुन राजा विनवित । काय आश्चर्य तूं साक्षात्‍ । रवि आलास मज भेटाया ॥१८॥
धन्य झालों मी दर्शन घेऊन । आतां सांगावें करुणामनें प्रसन्न । गणेशाचें स्वरुप पावन । जें भजेन मी विशेषें ॥१९॥
तेव्हां विप्ररुप सूर्य सांगत । गणेशाचे स्वरुप पुनीत । भुक्तिमुक्तिप्रद तयाप्रत । जें चित्तीं आठवावें ऐसें ॥२०॥
पंच चित्तांचा प्रचालक । चिंतामणि चित्ती सुखदायक । पंचवृत्ति निरोधे उपासक । प्राप्त करी त्यास योगसेवेनें ॥२१॥
असंप्रज्ञांत संस्थ वर्तत । महामते गजशब्द पुनीत । तेंच ज्याचें मस्तक असत । देह सर्वात्मक झाला ॥२२॥
भ्रांतिरुपा महामाया संश्रित । सिद्धि वामांगीं विलसत । भ्रांतिधारक बुद्धि प्रकटत । दक्षिणांगी जयाच्या ॥२३॥
त्या सिद्धिबुद्धींचा स्वामी खेळत । हा गणेश मायायुक्त । त्यास विधानें भज तूं सतत । तरीच कल्याण तुज लाभेल ॥२४॥
ऐसें बोलून तयासे देत । दशाक्षर गणेशमंत्र विधियुक्त । तदनंतर अन्तर्धान पावत । सूर्य जो आला विप्ररुपें ॥२५॥
राजा स्वनगरांत परतत । प्रधान करिती त्याचें स्वागत । तयांसी तो सर्व वृत्तान्त । सांगे नृप सुखकारक ॥२६॥
चैत्रकृष्णा चतुर्थी येत । तदनंतर ती आचरित । विधानपूर्वक श्रद्धायुक्त । गणेश भक्तिपूर्वक तो ॥२७॥
नगरांत तैसे ग्रामांत । सर्व प्रजानन संकष्टी करित । तेव्हांपासून प्रख्यात । जाहलें हें व्रत तेथें ॥२८॥
कोणी जन भयानें करिती । कोणी श्रद्धापूर्वक आचरती । परी त्याची फलश्रुती । व्याघ्रनाशांत जाहली ॥२९॥
महाउग्र ते वाघ समस्त । अंतर्धान पावले त्वरित । रोगादींतून विनिर्मुक्त । सर्व प्रजा सुखावली ॥३०॥
राजा उग्रसेन सतत । गणपतीस तेव्हांपासून भजत । गुरुरुपें भानूस पूजित । ऐसी गेली संवत्सरें ॥३१॥
तदनंतर राज्यभार सुतावर । टाकून निवृत्त झाला नृपवर । गणेशाच्या भजनीं समग्र । समय लावीं तेधवां ॥३२॥
अंतीं स्वानंद लोकांत । जाऊन जाहला ब्रह्मभूत । त्याचे प्रजाजनही समस्त । क्रमें मुक्त होऊन गेले ॥३३॥
ऐसें व्रताचें महिमान । अल्पांशे कथिलें जाण । आणखी एक वृत्तान्त पावन । ऐक आतां महाभागा ॥३४॥
द्राविड देशीं भिल्ल वसत । क्षत्रिय संस्कारहीन अत्यंत । द्रव्यलोभी तो वनांत । पांथस्थासी लुटित असे ॥३५॥
एकदा तो दुरात्मा पाहत । कोणी नर धनवंत वनांत । त्याचा पाठलाग तो करित । शस्त्र हातीं उगारुन ॥३६॥
तेव्हां तो नर भयत्रस्त । प्राणभयें द्रुतवेगें पळत । त्यामाजीं एक आस्वल येत । बलयुक्त त्यांच्या मध्यांत ॥३७॥
त्यानें रोधिलें त्या पाप्यास । तेव्हां फेकुनिया शस्त्रास । तो दुरात्मा करी विद्ध त्यास । पाडवी ऋक्षासी भूतलीं मध्यांत ॥३८॥
परी त्या ऋक्षानें नखें लावून । भिल्लास पीडिलें दारुण । तोही वनांत पडला दमून । अति दारुण विलाप करी ॥३९॥
दैवयोगें चैत्रसंकष्टी होती । त्या दिवशीं तो दुर्मती । जलान्नहीन राहून अन्तीं । चंद्रोदयीं सावध झाला ॥४०॥
तेव्हां तो पापी क्षुधाक्रान्त । समीप कांही फळें पाहत । तीं खाऊन शमवीत । क्षुधा आपुली आनंदें ॥४१॥
ऐसा तो दिन उमटत । पंचमी तिथी उजाडत । त्या समयीं तो जाहला म्रुत । ऋक्षपीडेनें सुदारुण ॥४२॥
मुत्युनंतर ब्रह्मभूत । तो पापी झाला निश्चित । अजाणता त्यास घडत । जरी हें व्रत संकष्टीचें ॥४३॥
ऐशापरी नाना जन । व्रतप्रभावें मुक्त होऊन । इहलोकीं भोग भोगून । अंतीं ब्रह्मपद लाभले ॥४४॥
दहासहस्त्र वर्षे वर्णन केले । तरी माहात्म्य वर्णन ना पुरें झालें । ऐसें हें व्रत भलें । सर्वार्थप्रद सर्वकाळ ॥४५॥
अजाणता करिती व्रत । तरीही जर फल लाभत । तरी जाणून जे तप आचरत । त्यांचें भाग्य किती वर्णावें ॥४६॥
ऐसें हें चैत्रसंकष्टी महिमान । वाचील किंवा ऐकल जो प्रसन्न । भक्तिभावें तया पावन । अभीप्सित सर्व प्राप्त होय ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते चैत्रकृष्णचतुर्थीचरितवर्णनं नाम द्वविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP