मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ म्हणे ऐकिलें । वसिष्ठा महा व्याख्यान चांगलें । वेदवेत्या तुझ्यापासून भलें । उभय चतुर्थीचें माहात्म्य ॥१॥
तथापि मजसी हें व्रत । वर्णावें पृथक्‍ रीत्या अद्‌भुत । याचेंच मग्न चरित । कोणी केव्हां हें केलें? ॥२॥
यापासून सिद्धि कोणती । कोणा लाभला गणपती । व्रताची ऐकून महती । तृप्ति पावेन आदरानें ॥३॥
मुद्‌गल सांगती दक्षाप्रत । तेव्हा वसिष्ठ दशरथा सांगत । प्रजानाथा ऐक सुखद व्रत । शंभु आदींनी पूर्वी उपासिलें ॥४॥
कृष्ण शुक्ल चतुर्थीव्रत । उपोषणपर तें आचरित । नंतर ब्रह्मादिदेव करित । सर्व अर्थसिद्धिद हें व्रत ॥५॥
तदनंतर सर्व मुनिगण करिती । अन्य वर्णस्थलोक आचरिती । आतां या व्रताची उत्पत्ती । पृथक्त्वें तुज सांगेन ॥६॥
या व्रताचें माहात्म्य सर्वद । पुण्यकारक तें सुखद । संक्षेपें ऐक हे पुण्यप्रद । पूर्वी भरत नाम राजा होता ॥७॥
तो भरत दुष्यन्तसुत । तेजस्वी वीरमुख्य प्रतापवंत । वीरमुख्येश भूमंडळी सर्व जिंकित । सार्वभौमपद मिळवी ॥८॥
सप्तद्वीपा वसुधा पाळित । भरत नृप तो धर्मसंयुत । त्याच्या देशीं अनावृष्टि होत । दैवयोगें सुदारुण ॥९॥
सर्व लोक भयभीत झाले । चराचर व्यथेनें पीडलें । तें पाहून ठरविलें । महायश भरत नृपानें ॥१०॥
कण्व मुनिवरा शरण जात । शांतासी त्या प्रणाम करित । महात्म्यासी पूजित । भक्तिपूर्वक कर जोडी ॥११॥
त्याच्यापुढे विनम्र स्थित । तेव्हा कण्व महायोगी म्हणत । गाणपत्य जो ख्यात । राजसत्तमा भरतासी ॥१२॥
कां केलेस आगमन । कुशल आहेत ना प्रजाजन । देशांत सर्वत्र प्रसन्न जन । आहेत ना सांग मजला ॥१३॥
त्या उत्तम आसनीं बसून । सर्व सांग विश्वासून । कण्वाचें वचन ऐकून । हर्षयुक्त तो महीपती ॥१४॥
मुनिदत्त आसनीं बसत । हात जोडूनी त्यास प्रार्थित । वेदवेत्त्या महात्म्या कण्वाप्रत । राजनीतिज्ञ भरत एं ॥१५॥
भक्तियुक्त तो म्हणत । कण्वा आपुल्या प्रसादें असत । योगींद्रा कुशल माझें जगांत । दैवयोगें परी दुःख झालें ॥१६॥
नित्य स्वधर्मयुक्त करित । पृथ्वीचे पालन मी धर्मरत । देवव्रत अतिथि प्राज्ञा तोषवाया झटत । योगिसत्तमा मी सर्वदा ॥१७॥
वर्णाश्रमाचार जन पाळिती । परी पापज दुःखाची स्थिती । कां माझ्या राज्यांत पीडा ती । समजेना हें मजला ॥१८॥
पाऊस पडेना राज्यांत । सर्वत्र चिन्ता पसरत । चराचर भयोद्विग्न होत । रसहीन सर्व झालें ॥१९॥
त्यासाठीं महायोग्या शरण । आलों विशेषें उन्मन । आपुल्या दर्शनाचे लाभलें पुण्य । सफल माझा जन्म झाला ॥२०॥
आतां पापाचे स्वरुप सांगावें । तें मी सत्वर दूर करावें । त्यायोगें नभ वर्षावें । मानदा माझ्या राज्यांत पूर्ण ॥२१॥
मुनिसत्तम त्या नरशार्दूलाप्रत । कण्व तेव्हां दयायुक्त । ऐकून तो वृत्तान्त समस्त । अनावृष्टीचें कारण सांगे ॥२२॥
ऐक राजा तुझ्या राज्यांत । महत्‍ पाप असे घडत । त्या योगें पाऊस न पडत । दुःख महान सर्वां झालें ॥२३॥
तुझें राज्य चार पुरुषार्थविहीन । होईल यांत संशय नसून । सुशील सर्वही जन । पाप घोर त्यांनी केलें ॥२४॥
तूंही पापशीलभावें वर्तसी । धर्मार्थकाममोक्षहीन अससी । पुरुषाधमा विसरलासी । चतुर्थीव्रत सर्वार्थसिद्धिद ॥२५॥
शुक्लकृष्ण चतुर्थीचें व्रत । तुझ्या राज्यीं नष्ट होत । स्थूलसूक्ष्मभावें वर्तत । चतुर्विध जग तें संकष्ट ॥२६॥
जी चतुर्विध संकष्ट हरी । ती संकष्टचतुर्थी खरी । सांगतली कृष्णा तुज दुःखहरी । परी तूं ती न केलीस ॥२७॥
जी चतुर्विध फळ देत । ती शुक्ला चतुर्थी वरदा ख्यात । जरी नसले संचित तरी देत । व्रतकारी जनास ती ॥२८॥
ऐसें सांगून विस्तारें वर्णित । चतुर्थीचें माहात्म्य अद्‌भुत । स्वशिष्यासी भरतासी पुनीत । शिष्यप्रेमें तदनंतर ॥२९॥
अन्य व्रतें चतुर्थीहीन । होती सर्वही निष्फळ अपावन । तें समजतां प्रणाम करुन । भरत म्हणे हर्षयुक्त ॥३०॥
स्वामी गणेशाचें हें व्रत । सांगा पुनरपि मजप्रत । करीन मी तें भावयुक्त । सर्वसिद्धिप्रत जें असे ॥३१॥
तेव्हां कण्वमुनी त्यास सांगत । क्रतु ब्रह्मपुत्र मज कथित । पूर्वीं हें परम पुनीत । व्रत तें तुज मी सांगतों ॥३२॥
ऐक राजा गणेशमहिमा पुनीत । एकदा मी होतों स्वाश्रमांत । तपाचें आचरण करित । वायु भक्षून रहात होतों ॥३३॥
माझ्या महा तपें व्याप्त । जाहलें चराचर समस्त । तथापि योगाश्रयें सतत । विशेषें मी राहिलों ॥३४॥
कण्व सांगे भरताप्रत । ऐसी कथा ही अद्‌भुत । प्रजापति आला साक्षात । तदनंतर आश्रमीं माझ्या ॥३५॥
ऋतु योगींद्रवंद्यं तो येत । गाणपत्य महायशा पुनीत । त्यास प्रणाम करुन मी पूजित । हात जोडून पुढें उभा ॥३६॥
तेव्हां तो भक्तवत्सल म्हणत । आसनावरी या बैस अचकित । तुझी इच्छा सांग त्वरित । ती मी ताता पूर्ण करीन ॥३७॥
त्याचें तें वचन ऐकून । मीं चित्तीं हर्षित होऊन । आसनावरी बसून । विनयपूर्वक प्रार्थिलें ॥३८॥
तुमच्या दर्शनमात्रेम सांप्रत । जाहलों कृतकृत्य मी शांत । आता शांतिदयोग पूर्णत्वे मजप्रत । दयानिधे मज सांगा ॥३९॥
क्रतु म्हणती कण्वा उत्तम । श्रेष्ठ प्रश्न केलास अभिराम । महाभागा सांगेन मनोरम । वृत्तान्त कथिला जो ब्रह्मदेवें ॥४०॥
तप सोडून योगमार्गीं परायण । मी अशांत झालों जाण । योगभूमीचें प्रसाधन । नित्य नेमें जरी केलें ॥४१॥
नंतर ब्रह्मदेवाप्रत जात । सर्वज्ञा त्या पित्यास सांगत । व्यथा माझी मी विनयान्वित । योगशांति कैसी लाभेल ॥४२॥
ऐसें विचारी तयाप्रत । शांतिप्रद ब्रह्म कैसें असत । कोणत्या योगें तें प्राप्त । तें सर्व सांगा मजला ॥४३॥
ब्रह्मा तेव्हां मज सांगत । योगशांतिप्रद ब्रह्म तुजप्रत । पुत्रका गणेशपर पुनीत । विशद करीन सर्वही ॥४४॥
मनोवाणीमय सर्व त्यागावें । योगाच्या सेवेनें भजावें । मनोवाणीविहीन जें आघवें । तें सर्व शांतिब्रह्म ॥४५॥
मी गणेश असुनी न भिन्न । ब्रह्मनायक परम पावन । मनोवाणीमय ‘ग’ कार असून । मनोवाणीविहीन‘ण’ कार ॥४६॥
वेद ऐसें सांगतात । तेंचि असे सर्वसंमत । त्यांचा स्वामी गणेश असत । गकार णकार यांच्या योगें ॥४७॥
गणांचा पति तो गणपति । तो समाधि योगे लाभें जगतीं । गकाराक्षरग ज्ञान चित्तीं । वेदवादें जाणावें ॥४८॥
जें महामते चित्तानें न लाभत । तं णकार जाण पुनीत । ज्ञानाज्ञानमय चित्त । तें त्यागितां शांतिलाभ ॥४९॥
हेंच परम गुह्य असत । शांतिप्रद भज तूं भावसंयुक्त । एकाक्षर महामंत्राचें व्रत । महामते तूं घेई ॥५०॥
ध्यानयोगें तूं प्राप्त करशील । विघ्नेशासी विमल । ऐसें बोलून महामंत्र निर्मल । दिला त्याने मजलागीं ॥५१॥
त्यास प्रणाम करुन । मी गेलों वनांत निघून । केलें योगाचें साधन । क्रमें त्यजिली चित्तभूमि ॥५२॥
चिंतामणीवर माझें चित्त । मी केलें पुत्रा आक्षिप्त । तद्रूप भाव होतां जगांत । योगींद्रवंद्यता मी पावलों ॥५३॥
गणेशध्यानसंयुक्त । त्याच्या भक्तिकामनने होत । तेव्हां विघ्नपति साक्षात । दर्शन मज देता झाला ॥५४॥
त्याची स्तुती मीं करित । तेव्हां तो स्वभक्ति मज देत । तेव्हांपासून गाणपत्य दृढचित्त । सर्ववंद्य मी झालों ॥५५॥
म्हणून तूंही गणराजास । योगकामनेनें भज सुरस । ऐसें सांगून त्या समयास । महायोगी मज मंत्र देई ॥५६॥
एकाक्षर मंत्र यथान्याय देऊन । योगी पावला अंतर्धान । कण्व म्हणे मी तेव्हापासून । गणेशाची साधना करितों ॥५७॥
जरी मज शांति लाभली । तरी उपासना नेमें केली । अनन्यमनें जोपासली । अखंडित मीं अद्यापीही ॥५८॥
म्हणून तूंही राजेंद्रा भजावें । त्या विघ्नपतीस भक्तिभावें । चतुर्थीव्रत नेमें करावें । तेणें होशील ब्रह्मभूत ॥५९॥
नंतर एकाक्षर मंत्र देत । कण्व मुनि त्या नृपाप्रत । कण्वास प्रणम करुन परतत । राजधानींत तेव्हां तो ॥६०॥
तदनंतर शुक्ला भाद्री चतुर्थी येत । नगरस्थ जनांसह ती आचरित । नृप तो अत्यंत श्रद्धायुक्त । घोषणा करी स्वनगरांत ॥६१॥
शुक्ल कृष्ण चतुर्थी न करतील । ते जन दंडनीय ठरतील । पीडा तयांसी होईल । म्हणोनी सर्वजन व्रत करिती ॥६२॥
त्या पुण्ययोगें वृष्टि होत । राजर्षीच्या राज्यांत । हृष्टपुष्ट जन समस्त । नृपात्मजा तेथ झाले ॥६३॥
रोगादि दोषहीन होऊन । ते करिती गणनायकाचें भजन । भरत करी अनन्यभावें पूजन । गाणपत्यप्रिय तें झाला ॥६४॥
तो पुत्रास राज्य देऊन । वनांत अतीं करी गमन । स्वानंदग व्रताचरणें होऊन । ब्रह्मभूत जाहला ॥६५॥
क्रमें भूमिसंस्थ जे जन । चतुर्थीपुण्ययोगें पावन । होऊन योगपरायण । स्वानंदग ते येथ होती ॥६६॥
भरताच्या स्पर्शनमात्र होत । कीटादिक पुण्यरुप जगांत । अंतीं स्वानंदांत लीन होत । ऐसा तो नृप पुण्यशाली ॥६७॥
त्यानें यज्ञ करुन बहुत । सर्व धरा केली चित्रीत । पुण्यकारी त्या भरतासम नसत । कोणी राजा भूतलावरी ॥६८॥
ज्ञाने यशें धर्मशालिनतेंकरुन । भरत अपूर्व नृप महान । भाद्रपद शुक्ल चतुर्थीचे महिमान । कथिलें तुज दशरथा ॥६९॥
जो हें माहात्म्य ऐकत । अथवा भक्तिभावें वाचित । त्यास चतुर्वर्ग फळ लाभत । ब्रह्मभूयप्रद अन्तीं ॥७०॥
भाद्रपदी शुक्ल पक्षांत । चतुर्थी तिथी पुनीत । त्या दिनीं प्रकट होत । शंकरहृदयीं गजानन ॥७१॥
मध्यान्हीं तो व्यक्त होत । ध्यानजात तो सुत । तेव्हांपासून ती तिथि लाभत । मुखत्व गणेशजन्मानें ॥७२॥
ही ब्रह्मभूयप्रदा संशयातीत । सृष्टीय्च्या प्रारंभी स्थापित । पंच देवेश मयूर क्षेत्रांत । गणनाथाची मूर्ति उत्तम ॥७३॥
मध्यान्हीं भाद्रपद शुक्लपक्षांत । चतुर्थी तिथि ती पुण्ययुक्त । भाद्रपदमासीं तो होत । मयूरेशाचा अवतार ॥७४॥
शंकरगृहीं अवतार झाला । सर्वांसी परम पूजनीय भला । त्याची आठवण राहण्याला । मृन्मय मूर्ति प्रतिवर्षी ॥७५॥
मोरयाची ऐशीं मूर्ती । शंकरमुख्य देव पूजिती । महोत्सव आनंदे करिती । विघ्नहीन ते सर्व ॥७६॥
ऐसें जे जन पूजिती । ते सुखभोगी होती । अंतीं स्वानंदपद पावती । ब्रह्मभूतत्व त्यांस लाभे ॥७७॥
गणेशाचे माध्यान्हीं पूजन । विशेषें करिती कथन । चतुर्थी तिथीस उपोषण । पंचमीस करावी पारणा ॥७८॥
द्विजांसह भोजन करुन । करावी ती मृन्मयी मूर्ति विसर्जन । जळांत सोडूनियां मन । लावावें गणेशस्मरणांत ॥७९॥
चतुर्थीस मृन्मय मूर्ति । जे जन ना पूजिती । त्यांची सर्व कर्मे होतीं । निष्फळरुप या जगतांत ॥८०॥
अशांचे घेऊ नये दर्शन । आत्महित जे इच्छिती त्यांनी कदाचन । ते पतित ऐसें शास्त्रवचन । नरकांत जाती पापी ते ॥८१॥
जे मृन्मय मूर्ति न पूजिती । ते विघ्नें पीडित होती । नाना रोगांनी संतप्त चित्तीं । दारिद्रयादि समायुक्त ॥८२॥
महा पापी त्यास मानिते । ऐसी शास्त्रासी उक्ती । म्हणोनी सर्ववर्णस्थ पूजिती । भाद्रपद चतुर्थीस गजानन ॥८३॥
मृन्मय मूर्ति पूजित । ते नर विघ्नहीन होत । त्यांची कामें साफल्ययुत । ऐसें माहात्म्य या चतुर्थीचें ॥८४॥
भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रत । ऐसें हें आद्य कथिलें तुजप्रत । अन्य इतिहास पुरातन वर्णित । चतुर्थीच्या व्रताचा ॥८५॥
द्रविड नगरांत चांडाल असत । कोणी एक कुष्ठ रोगार्त । परस्त्रीलंपट पापयुक्त । त्याची कथा ऐक आतां ॥८६॥
भाद्रपद चतुर्थी शुक्लांत । असतां तो चांडाळ ज्वरें पीडित । दैवयोगें त्यास न मिळत । अन्नोदक त्या दिनीं ॥८७॥
संपूर्ण दिवस उपवास घडत । पंचमीस तो मृत्यु पावत । तेव्हां दिव्य विमान येत । त्यास न्यावया गणेशलोकीं ॥८८॥
त्यांच्या अंगस्पर्शे जो वायु वहात । तो यमलोकीं पोहोचत । त्यायोगें तेथले नर होत । नरकांतलेही पुनीत ॥८९॥
ते सर्वंही यांनी बसत । स्वानंदक पुरींत जात । गणपतीचें दर्शन लाभत । ब्रह्मभूत तो चांडळ झाला ॥९०॥
अजाणता हें व्रत केलें । तरी तें पुण्यप्रद जाहलें । यथाविधि जर व्रत केलें । तर फळ मिळे यांत न आश्चर्य ॥९१॥
चतुर्थीचें हें महिमान । सर्वथैव अशक्य वर्णन । चार पुरुषार्थांचा लाभ होऊन । अंतीं व्रत हें मुक्ति देई ॥९२॥
वसिष्ठाचें ऐकून वचन । दशरथ म्हणे विनीत मन । महाभागा दक्षा प्रसन्न । पुढील कथा ऐक आतां ॥९३॥
दशरथास कुतुहल वाटत । दोषी चांडाळ मृन्मय मूर्ति पूजित । गजाननाची तें ब्रह्मभूत । त्वरित कैसा जाहला ॥९४॥
वसिष्ठ सांगत्री तयाप्रत । उत्तम विचारिलेंस मजप्रत । लोकोपकारक ज्ञान पुनीत । सांगेन संशय नाशकारी ॥९५॥
चांडाळास चतुर्थीचें ज्ञान नव्हतें । परी दुरात्मा न जाणतां व्रत करी तें । तेणें त्यास स्वानंदपद लाभतें । ऐसा प्रभाव गणेशाचा ॥९६॥
इहलोकीं नाना जन । पावोनि विविध सुखें प्रसन्न । अंतीं स्वानंदांत निमग्न । चतुर्थीव्रतानें जाहले ॥९७॥
त्यांतील एकाचें चरित । पूर्णतः वर्णन अशक्य असत । दशसहस्त्र वर्षें वर्णित । तथापि संपूर्ण न होय ॥९८॥
म्हणोनि संक्षेपें वर्णन केलें । भाद्रपद शुक्ल चतुर्थीचें भलें । ज्यानें बहुत लोक तरले । भवसागर लीलेनें ॥९९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गली महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते भाद्रपदशुक्लचतुर्थीव्रतवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP