मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ५२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष विचारी मुद्‌गलाप्रत । गजाननाचें क्षेत्र सांगा निश्चित । कोठें असे तें प्रतिष्ठित । माहात्म्य सांगा संक्षेपे ॥१॥
मुद्‌गल सांगती वृत्तान्त । नैऋत्य कोणी दिशांत । देवमुनि आदरें स्थापित । गणनाथ गजवक्त्रधर ॥२॥
द्वीपांत स्वस्व खंडांत । विभु नैऋत कोणी वसत । मानव सारे तयासे पूजित । देवमुनिही समस्त ॥३॥
भाद्रपद शुक्ल चतुर्थीस स्थापित । गणनायक ते श्रद्धायुत । मध्याह्रकाळीं उत्सवसहित । त्या वेळीं जन यात्रा करितो ॥४॥
भक्ति परायण जन । त्रिलोकवासी विशेषें करुन । नाना सिद्धि प्राप्त होण्या महान । यात्रा करिती मनोभावें ॥५॥
दहा योजनांचा विस्तार । विभु क्षेत्राचा थोर । मूषक त्या चतुरस्त्रासमोर । सदैव उभा राहतो ॥६॥
सिद्धि तयाच्या वामांगीं असत। दक्षिणांगीं बुद्धि विराजत । प्रजानाथा आठ दिशांत । आठ सिद्धि निवसती ॥७॥
त्यामागें आठ वर्तत । त्या मते आठ भैरव ख्यात । सशस्त्र दिक्पाल दशदिशांत । स्थापिले असती प्रभूनें ॥८॥
मुनि शेषादि पृष्ठभागीं व्यवस्थित । भक्त मुद्‌गल प्रमुख पुढें वर्तत । स्तुति बहुविध करित । त्रैलोक्यमुख्य तेथ जमले ॥९॥
अंशानें आपुल्या देवसेवेस्तव । स्वाधिकारी विराजती सर्व । तीर्थांत स्नान करिती अपूर्व । भक्तिसंयुत सागरीं ॥१०॥
स्वनामांकित स्थानीं वसत । स्वस्वदेहधर जगांत । परस्परांसी सांगत । गजाननाचें चरित्र ते ॥११॥
नाचती हसती चेष्टापरायण असती । गणेशतीर्थाची ख्याती । तेथ जे स्नान करिती । ते नर सिद्धि पावती ॥१२॥
कृतकृत्य ते होतात । यांत संदेह नसत । मनोवांछित फल लाभत । जे यात्रा तेथ करितो ॥१३॥
चतुर्विध असत । ही क्षेत्रयात्रा पुनीत । धन्य ते पुरुष लोकांत । कृतकृत्य होतील ॥१४॥
ते कुठेही निवसोत । गजानन परायण ते वर्तत । ब्रह्मभूत ते ख्यात । दर्शनें त्यांच्या पापें जळती ॥१५॥
अन्य देवांचे जे भक्त । या क्षेत्रीं पंचत्व पावत । ते मरणोत्तर पावत । लोक आपापल्या देवाचा ॥१६॥
ब्रह्मभूत ते भोगत । विविधपरीचें भोग शाश्वत । तदंती गणनाथाप्रत । जाती ब्रह्मसिद्धिस्तव ॥१७॥
तेथ सिद्धिलाभ ज्यास होत । ऐसे नाना नरनारी असत । त्यांचें पूर्ण चरित्र तुजप्रत । मला सांगणें अशक्य वाटे ॥१८॥
यात्रा करितां चतुर्विध । फळ लाभेल विशद । मरणानंतर ब्रह्मभूत मोदद । होईल तो नर निश्चित ॥१९॥
मीं संक्षेपें तुज कथिलें । विस्तारें वर्णन असंभव झालें । हें गजाननाचें चरित्र भले । सर्वसिद्धिप्रद सर्वदा ॥२०॥
नाना आख्यांनानी युक्त । सांगितलें तुज मीं चरित । प्रजापते दक्षा जो हें भक्तीनें वाचित । ऐकेल त्यासी सिद्धि लाभे ॥२१॥
यासम अन्यपावन । कांहीं नसे या जगतीं महान । ब्रह्मदायक पुण्यवान । सर्व शास्त्रांत भुक्तिमुक्तिप्रद ॥२२॥
सुवर्ण सहस्त्रभार दान देत । त्याचें जेवढें पुण्य लाभत । तें लाभे मर्त्य निश्चित । या चरित्राच्या वाचनानें ॥२३॥
भक्ति युक्त गोदानें देत । त्यांचें जें फळ लाभत । त्याच्या सहस्त्र पटीनें फळ पावत । या चरित्राचें वाचन करितां ॥२४॥
नाना दानें विधियुक्त देत । ब्राह्मणासी जो श्रद्धायुक्त । त्या पुण्याचें फळ भोगित । परी अंतीं जन्मे भूवरी ॥२५॥
याच्या केवळ वाचनें लाभत । भोग सारे मनोवांछित । ते उपभोगून अंतीं होत । ब्रह्मभूत स्वानंदलोकीं ॥२६॥
नाना यज्ञादिक कर्म करित । त्यामुळें जें फळ लाभत । तें याच्या कलांशही नसत । चरित्रवाचनें जें लाभें ॥२७॥
जन्ममृत्युप्रद सकल कर्मे वर्तत । परी हें सर्वप्रद ख्यात । अंतीं ब्रह्मप्रदायक ज्ञात । संक्षेपें तुज कथिलें मीं ॥२८॥
सुखद हें परम गजानन महिमान । पुन्हां ऐकू इच्छिशील प्रसन्न । अद्यापि न धालें का तुझें मन । सांग मजला तूं दक्षा ॥२९॥
सूत कथा शौनकादीस सांगत । ऐसें सांगून मुद्‌गल थांबत । हें सर्व ऐकून संतोषित । दक्षही झाला मुनिसत्तमा ॥३०॥
सूत म्हणती शौनकादिप्रत । मीही सांगितलें तुम्हांप्रत । सर्व माहात्म्य सिद्धिप्रद तें जगांत । मुद्‍गलानें जैसें कथिलें ॥३१॥
धन्य मीं कृतकृत्य असत । आपुला संगम झाला जगांत । गणेशामृत देण्या हें पुनीत । प्रवृत्त झालों सर्वभावें ॥३२॥
गणेशाहून श्रेष्ठ न किंचित । सर्वाधी तोच स्मृत । सर्वपूज्य तो विप्रर्षे असत । ब्रह्मेश श्रेष्ठ ब्रह्मद तो ॥३३॥
महाभागा ब्राह्मणांसहित । शास्त्रकोविदांच्या समवेत । ऐकलेंस तूं हे पुनीत । आणखी काय ऐकूं इच्छिसी ॥३४॥
ऐसें सूत विचारित । खंड चवथा येथ संपत । गजाननाचे चरित्र अपरिमित । आणखी पाचव्या खंडांत ॥३५॥
सीताराम शर्म्यानें अनुवादिलें । यथामति हें चरित्र भलें । त्या गजाननचरणीं वाहिलें । सर्वांस तो सुखी करी ॥३६॥
चवथ्या खंडांत वर्णिले गजाननचरिते । पाचव्यांत लंबोदर महिमा पुनीत । तो वर्णन करण्या मजप्रत । बळ देवो गणपति ॥३७॥
ओमिति पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते चरितमाहात्म्यवर्णन द्विपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

॥ इति श्रीमुद्‌गलपुराणे चतुर्थः खंडः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP