मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ झाला मुदित । ऐकुनी माघ संकष्टीचें व्रत । म्हणे फाल्गुन संकष्टीचा वृत्तान्त । वसिष्ठा मजसी सांगावा ॥१॥
तेव्हां वसिष्ठ वृत्तान्त सांगत । पौलस्त्य रावण प्रख्यात । तप सुदारुण तो करित । वर सुयोग्य लाभला ॥२॥
त्रिलोकींचे राज्य करित । महाबळ तो प्रभावयुत । प्रधानावरी सोंपवित । एकदा तो राक्षसश्रेष्ठ ॥३॥
निर्जन स्थळीं एकांतांत । जाऊन राहिला ध्यानस्थित । वेदोपनिषदांत जें उक्त । तें ब्रह्म ध्याई ज्ञानयोगें ॥४॥
ऐसा बहुत काळ जात । परी उत्तम ज्ञान न लाभत । तेव्हां जाहला खेदयुक्त । शंकराचें स्मरण करी ॥५॥
शंकरें नारद मुनीस पाठविलें । राक्षसानें त्याचे पाय धरलें । भक्तिभावें हात जोडले । प्रश्न तयासी विचारी ॥६॥
स्वामी योगिश्रेष्ठा ज्ञानप्रद । काही साधन करा विशद । ध्याननिष्ठ मी कष्टप्रद । प्रयत्न अविरत करीतसें ॥७॥
परी तें महान ज्ञान । मजसी महामुने न लाभून । मन झालें माझें उन्मन । आता उपाय सांगावा ॥८॥
नारद तेव्हां त्यास म्हणत । शिवें पाठविलें मजला तुजप्रत । राक्षसोत्तमा ज्ञानप्रदं वाक्य पुनीत । ऐक आतां उत्तम ॥९॥
चतुर्विध जगद्‌ब्रह्म संमत । संकष्ट ऐसें जगांत । त्याच्या नाशार्थ असे व्रत । संकष्टी नामक तें करी तूं ॥१०॥
ऐसें सांगून चतुर्थीची महती । नारदें कथिली तयाप्रती । ती ऐकून हर्ष चित्तीं । रावणाच्या दाटला ॥११॥
रावण म्हणे सांगा मजप्रत । गणाधीश हा कोण असत । त्याचें ज्ञान तैसें व्रत समस्त । चार पदार्थव्रत सांगा ॥१२॥
जें व्रत न करितां होत । चार पदार्थांचा नाश निश्चित । सर्व कार्यारंभी ख्यात । सर्व सिद्धिप्रदायक जें ॥१३॥
ऐसें ऐकून विनीत वचन । नारद त्यास म्हणे तोषून । रावणा गणेशाचें ज्ञान महान । वर्णन करण्या अशक्य प्राय ॥१४॥
परी उपाधि युक्त ते वर्णन करीन । गण समूहरुप असून । समूह ब्रह्मवाचक प्राचीन । ब्राह्मांतरादि योगें जन्मे ॥१५॥
देहदेहिमय ब्रह्म असत । गकाराधर वाचक ख्यात । संयोगें अयोगरुप वर्तत । ‘णकार’ अक्षर जगीं ॥१६॥
त्यांच्या योगें गणेश संमत । स्वामी सर्वत्र विश्वांत । त्यास सर्वभावें भजता तुजप्रत । शांति लाभ होईल ॥१७॥
ऐसें बोलून गणेशाचा मंत्र देत । दशाक्षरी तें रावणाप्रत । महायोगी तो विधियुक्त । त्यावेळीं सूचना त्यास करी ॥१८॥
जेव्हां तूं हा मंत्र त्यागशील । तेव्हां बुद्धिभ्रंश तुझा होईल । म्हणोनि गणेश मंत्र हा विमल । न त्याज्य सदा रक्षावा ॥१९॥
ऐसें सांगून अंतर्धान । पावला नारद मुनी महान । तदनंतर फाल्गुनी संकष्टी महान । आली प्रथम कालक्रमें ॥२०॥
रावणें त्या दिनीं हर्षयुक्त । आचरिलें विधियुक्त संकष्टीव्रत । व्रतपुण्याच्या प्रभावें लाभत । स्फूर्ती त्यासी तत्क्षणीं ॥२१॥
त्या दिनापासून अविरत । शुक्ल कृष्ण चतुर्थीचें व्रत । राक्षसाधिप आचरत । प्रजाजनांसही बोध करी ॥२२॥
त्यायोगें ज्ञान लाभत । रावण जें मनीं वांछित । तदनंतर स्वनगरींत । राज्य करी तो मदोन्मत्त ॥२३॥
दुष्ट संगतियोगें ज्ञान उत्तम । नष्ट झालें त्याचें सुकर्म । स्त्रीमांसादिकांत परम । रुचि जडली तयाची ॥२४॥
मी गणेशरुप असत । मज सम अन्य कोणी न जगांत । पापपुण्य भोक्तृत्व नसत । पूजन कोणाचें करावें म्हणे ॥२५॥
नंतर ज्ञानमदें त्यागित । सुखप्रद मंत्र तो गणेशव्रत । पुण्यपावन पूजा सोडित । तेणें ज्ञान नष्ट झालें ॥२६॥
द्विज असून राक्षस झाला । धर्मलोपीं रति त्याला । कर्मखंडन करिता जाहला । ऐशा बहु दोषें युक्त तो ॥२७॥
त्या दोषप्रभावें मारित । राम त्या रावणासी क्षणांत । राक्षस स्वजन पुत्रांसहित । विनाश झाला रावणाचा ॥२८॥
दशरथ विचारी वसिष्ठाप्रत । मी यातलें रहस्य न जाणत । तेव्हां वसिष्ठ त्यास सांगत । भ्रमनाशक तें ज्ञान ॥२९॥
प्रत्येक कल्पांत राम जन्मत । दशरथा तुझा होऊन सुत । रावणवीरास तो मारित । गाणपत्य बलान्वित ॥३०॥
आणखी एक चरित्र अभिनव । फाल्गुन संकष्टी व्रतोद्‍भव । सर्व पापहर पूर्ण अपूर्व । भुक्तिमुक्ति प्रदायक ॥३१॥
महाराष्ट्रांत द्विज असत । एक पापकर्मा अत्यंत । ब्राह्मणत्व त्यागून तो रमत । चांडाळीसह मोहानें ॥३२॥
चांडाळीशीं संबंध ठेवित । पुत्रपुत्री तिच्यापासून होत । तो मंदधी सदैव असत । मद्यमांसपरायण ॥३३॥
एकदा तो वनांत जात । द्रव्यलोभे जनांस मारित । महापापी परस्त्री लालसा युत । फाल्गुन चतुर्थी ते होती ॥३४॥
कृष्ण पक्षातील चतुर्थी वर्तत । तेव्हां तो ब्राह्मण पर्वतद्रोणींत । असतां कोणी नृप येत । चतुरंग सेना घेऊन ॥३५॥
त्याच्या भयें पर्वतगुहेंत । तो अधम ब्राह्मण त्यादिनीं वनांत । अन्नजळाविण राहात । ऐशापरी व्रत घडलें ॥३६॥
त्या राजाचें सैन्य महान । आक्रमणानें करी निर्गमन । दिवसाच्या अल्प भाग असता वन । संपूर्ण निर्भय जाहलें ॥३७॥
तेव्हां तो भयवर्जित । बाहेर पडून स्वगृहीं जात । त्या समयीं चंद्र उगवत । क्षुधातुर दुष्ट तो झाला ॥३८॥
स्वपुत्रांसह अन्न भक्षित । रात्रीं आपुल्या सदनीं निश्चित । साप चावूनी तो मरत । दुर्मती ब्राह्मण तदनंतर ॥३९॥
गणेशदूत त्यास नेती । स्वानंदक पुरीं अति प्रीती । विघ्नेश्वरा पाहून मुक्ति । ब्रह्मभूतरुपा त्या मिळाली ॥४०॥
न कळतां घडलें व्रत । विधिहीन परी लाभे फळ अद्‌भुत । पापी अधम मुक्त होत । ज्ञानी जनांची काय कथा ॥४१॥
ऐसे अनेक महाभाग झाले । व्रतपुण्यप्रभावें मुक्त भले । ब्रह्मभूतत्त्व ते पावले । ऐशा कथा असंख्य ॥४२॥
जरी अयुत वर्षे सांगेन । तरी ना संपेल हें चरित्र महान । माहात्म्य संक्षेपें कथिलें म्हणून । नृपा मीं तुज अल्पसें ॥४३॥
हें फाल्गुन चतुर्थीचें व्रत । कृष्णपक्षीं जो आचरत । ह्या व्रताचें माहात्म्य वाचित । ऐकेल त्यास सर्व लाभ ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाजनचरिते फाल्गुनकृष्णचतुर्थीवर्णनं नाम एकविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP