मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । आषाढ संकष्टीचें व्रत । महिम्यासह सांगा मजप्रत । ऐसें दशरथ प्रार्थित । वसिष्ठ तेव्हां म्हणे त्यासी ॥१॥
ऐक इतिहास पुरातन । आचरितां व्रत हें पावन । सर्वसिद्धिलाभ होत महान । नृपात्मजा या जगतांत ॥२॥
एकदा वृत्रासुरानें पीडित । महेंद्र जाहला चिंताक्रान्त । राज्यादिक सोडून वनांत । भयभीत तो राहिला ॥३॥
श्रुतिहीन मुनी भ्रष्टाचार । भयोद्विग्न सर्व वर्ण अनिवार । कर्मखंडित होऊन अमर । परम विव्हल झाले होते ॥४॥
तयांसी उपोषणे घडत । हविर्भाग ना मिळत । सर्व मरणोन्मुख दुःखार्त । गिरिगुहांत राहती ॥५॥
तेथ योगिगुरु गुत्समद येत । त्यास साष्टांग ते नमित । इंद्रमुख्य देव समस्त । पूजन करुनी सत्कारिती ॥६॥
तदनंतर इंद्र पार्थित । धन्य माता पिता आमुचें व्रत । धन्य यज्ञ ज्ञानादिक वाटत । तुमच्या अंध्रिदर्शनानें मनीं ॥७॥
तुमच्या दर्शनमात्रें होईल । कल्याण आमुचें निश्चल । साक्षात योगीश्वर प्रबल । सर्वसिद्धिप्रद तुम्हीं ॥८॥
वृत्रासुर दुष्ट मजला । त्यानें स्वर्गलोक जिंकिला । आमुचा पराभव झाला । राज्य त्यागून वनीं राहतों ॥९॥
पशूसम आमुची स्थिती । कर्मनाशें उपास घडती । आता मरण ओढवेल निश्चिती । ऐसें भय वाटतसे ॥१०॥
तथापि पुण्ययोगें प्राप्त । जाहलें तुमचें दर्शन पुनीत । आतां दया करुन आम्हांप्रत । वृत्रनाशाचा उपाय सांगा ॥११॥
जग सर्व भ्रष्टाचारी असत । संहार समीप आला वाटत । ऐशा समयीं योगींद्रा दिसत । भविष्य काय तुम्हांसी ॥१२॥
गृत्समदं तेव्हां सांगत । वाटोनिया दया मनांत । विश्व रक्षणार्थ उद्यत । दुष्टनाशकर वचन ॥१३॥
देवेन्द्रं तूं व्रतभ्रष्ट झालास । राज्य मिळतां विसरलास । चतुर्थीच्या उत्तम व्रतास । म्हणोनि कष्ट पावलासी ॥१४॥
ज्ञानमदानें त्यजिलास । विघ्नेशाचा मंत्र सुरस । होवोनियां मदलालस । म्हणोनि राज्यहीन झालासी ॥१५॥
ऐसें बोलून उपदेशित । चतुर्थीचें माहात्म्य पुनीत । गणेशमंत्र पुन्हां देत । मुनिश्रेष्ठ तो इंद्रासी ॥१६॥
तदनंतर तो मुनी परत । जेव्हां आपुल्या स्थानाप्रत । इंद्र तेव्हा व्रत आचरित । पूजन करी गणेशाचें ॥१७॥
त्यानंतर आषाढी संकष्टी येत । इन्द्र ती परमादरें आचरित । गणेशाची मनीं ध्यात । ऐसें संपूर्ण व्रत केलें ॥१८॥
दधीचीच्या अस्थींपासून । घडविलें होतें वज्र महान । तें दिव्य आयुध करी धरुन । वृत्रासह लढण्या गेला ॥१९॥
चतुर्थीव्रताच्या प्रभावें मारित । वज्रराघातें वृत्रसुरासी रणांत । महाघोर त्याचें युद्ध चालत । अन्तीं विजय इन्द्राचा ॥२०॥
महावीरा वृत्रासुरासी मारित । तदनंतर शतक्रतु परतत । अन्य देवां समवेत । अमरावतींत आनंदें ॥२१॥
तेव्हांपासून देवगण समस्त । शुक्लकृष्ण चतुर्थीचें व्रत । आपापल्या स्थानीं आचरित । सर्वसिद्धिकर महान ॥२२॥
मन्वंतर जेव्हां होत समाप्त । तेव्हां इंद्र स्वानंदलोकीं जात । विघ्नेश्वरासी पाहत । ब्रह्मभूत जाहला ॥२३॥
पृथ्वीवरी नर समस्त । चतुर्थीचें व्रत करित । व्रतपुण्यं ते मुक्त होत । गणेशसायुज्य लाभले ॥२४॥
ऐसाचि दुसरा वृत्तान्त । या व्रतसंबंधीं असत । पापकंचुकाचा नाश होत । ऐकता तो भक्तीनें ॥२५॥
एक ब्राह्मण गुर्जर देशांत । बाल्यापासून पाप करित । परस्त्रीयांसी भोगित । जीवहत्या बहु केली ॥२६॥
एकदां आपुली बहीण एकान्तीं । पाहूनी तो दुष्टमती । मदाप्रभावें तिच्या संगती । रममाण तो जाहला ॥२७॥
अभक्ष्यभक्षण तो करित । वनामाजी संचार करित । द्रव्यलोभीं तो द्विजां मारित । पशुपक्षीही असंख्य ॥२८॥
नित्य यवनांसह भोजन । करी तो दुष्ट दुश्चितमन । त्याचीं पापें करण्या वर्णन । अशक्य असे सर्वथा ॥२९॥
एकदां हिंडत होता वनांत । परी देवशभरी त्यास अन्न न मिळत । अति दुःखार्त तो भटकत । पर्वतावरी क्षुधार्थ ॥३०॥
परी खावया कांहीं न लाभत । म्हणोनि दुःखी होत मनांत । सायंकाळी गृहीं परतत । तेथही अन्न जल त्यास न मिळे ॥३१॥
यवनीस आलिंगोनी घालवित । आपुला समय तो क्षुधार्त । चंद्रोदय होता अवचित । कोणी अन्न आणून दिलें ॥३२॥
ते त्यानें भक्षिलें सूतांसमवेत । मायेनें मोहित तो अत्यंत । नंतर होत ज्वरग्रस्त । पापी भोगी फार पीडा ॥३३॥
यवनी त्यास स्पर्श ना करित । पंचमी तिथीस तो मरत । गणेशदूत त्यास नेत । आनंदलोकी तत्काळ ॥३४॥
तदनंतर तो ब्रह्मभूत । गणेशसायुज्य लाभत । ऐशापरी महापापी उद्धरत । व्रतप्रभावें चतुर्थीच्या ॥३५॥
अजाणतां घडता व्रत । जरी एवढे पुण्य लाभत । तरी ज्ञानपूर्वक जे करित । वर्णनातीत लाभ त्यासी ॥३६॥
विधियुक्त व्रत जें नर करिती । त्यांच्या दर्शनानें जन तरती । ऐशापरी या जगतीं । असंख्य झाले ब्रह्मभूत ॥३७॥
त्यांची चरित्रें अनंत । वर्णन करण्या अशक्य असत । आषाढी संकष्टीचें व्रत महिमान असत । अद्‌भूत पावन या जगीं ॥३८॥
जो हें ऐकेल अथवा वाचील । त्यास सवार्थाचा लाभ होईल । अन्तीं तो विमुक्त होईल । यांत संशय कांहीं नसें ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते आषाढकृष्णचतुर्थीव्रतवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP