मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । वसिष्ठ दशरथासी सांगती । आश्विन शुक्ल चतुर्थीची महती । पुरातन इतिहास जो जगतीं । सर्वांर्थसाधक सर्वदायक ॥१॥
रैवतांतरीचा एक नृपती । जगांत होती ज्याची कीर्ति । धर्मधर नामें ख्यात । शास्त्रपारंगताची ॥२॥
देव ब्राह्मण अतिथींचे पूजन । पुत्रवत्‍ करी प्रजापालन । पंच यज्ञ परायण । नीतिज्ञ तो स्वहितरत ॥३॥
त्याची भार्या गुणान्वित । सर्व लक्षण संयुक्त । पतिव्रता ती असत । विप्र देव अतिथि प्रिय ॥४॥
त्या नृपतीच्या राज्यांत । गज अश्व रथ असंख्यात । धनुर्धारीं पदाती अगणित । समृद्धि नानाविध होती ॥५॥
सप्त द्वीपयुता पृथ्वीचें पालन । देवादींचे करी साहाय्य प्रसन्न । असुरयुद्धांत विजय मिळवून । कीर्ती आपुली वाढवी तो ॥६॥
परी एक न्यून होतें । पुत्राचें सुख त्यास नव्हतें । पुत्रार्थ नाना प्रयत्ने केले होते । सर्वही परी ते निष्फळ ॥७॥
तीर्थयात्रा बहुविध करीत । अनुष्ठानें व्रते असंख्यात । बहुविध पुण्य जरी मिळवित । तरी त्यासी सुत न झाला ॥८॥
तेव्हां राज्य त्यागून वनांत । पत्नीसह राजा जात । भ्रमण करता महावनांत । राजर्षि तो प्रवेश करी ॥९॥
सिंह व्याघ्रादींनी युक्त । प्राणिमात्रांस भयप्रद असत । ऐशा त्या वनांत । सौभरि मुनिश्रेष्ठ तप करी ॥१०॥
धर्मधर राजा त्यास पाहत । विनयपूर्वक प्रणाम करित । भार्येसहित स्तवन करित । कर जोडोनि त्या वेळीं ॥११॥
सौभरि त्याचें स्वागत करित । उत्तम आसन बसण्या देत । म्हणे या उग्र वनांत । किमर्थ कोण तूं आलास? ॥१२॥
तेव्हां महिपाल त्यास सांगत  कीर्तिमान नांवेहीं जो ख्यात । सर्व धर्मज्ञ विनीत । व्यथा आपुल्या मनांतली ॥१३॥
द्रविड देशांत मी वसत । तेथ सार्वभौम राज्य करित । परी दैवयोगें मज नसत । पुत्रलाभाचें सुख ॥१४॥
पुत्रार्थ बहुविध व्रतें केलीं । नाना तीर्थस्नानें झालीं । परी तीं सर्व व्यर्थ ठरलीं । म्हणोनि त्यागिलें मीं राज्य ॥१५॥
पुत्रकामनेनें प्रेरित । संचार करता या वनांत । जाहलें तुमचें दर्शन प्राप्त । सर्व सिद्धिप्रद असे ॥१६॥
तुमच्या दर्शनमात्रें सफल जन्म । मातापिता धन्य परम । आता पुत्रप्राप्तीचा उपाय अभिराम । सांगून कृपा करावी मजवरी ॥१७॥
आपल्या आज्ञेंत मी राहीन । जैसे सांगाल तैसा वागेन । या जन्मीं पाप केलें नसून । मजला हें दुःख कां मिळालें? ॥१८॥
धर्माची भीती मनीं ठेवून । देवाचा आदर करुन । राज्य केलें मी नियम पाळून । तरीही वंध्यत्व कां आलें? ॥१९॥
पूर्वजन्मीचें पाप असत । तरी तें मज ना ज्ञात । आपण ज्ञानी पुण्यव्रत । ज्ञानदृष्टी लावून पहा ॥२०॥
आपण योगींद्र महातेजयुत । साक्षात्‍  ब्रह्म मूर्तिमंत । माझें पूर्वजन्मीचें पाप ज्ञात । करुन मजसी सांगावें ॥२१॥
वसिष्ठ दशरथास सांगती । सौभरि मुनि तेव्हां म्हणती । कीर्तिमान नृपा ऐक प्रचिती । तुझ्या पापाची सांप्रत ॥२२॥
गणपप्रिय जें सांगत । तें ऐकण्या नृप उत्कंठायुक्त । सौभरि म्हणती पूर्वजन्मांत । पाप तुझें कांहीं नसे ॥२३॥
अरे अधमा याच जन्मांत । तुझ्या राज्यीं पाप घडत । महामूर्खा चतुर्थीचें व्रत । पर मोत्तम तें लय पावलें ॥२४॥
जो मानव चतुर्थीव्रत । आद्यतम हें न आचरित । त्याचीं अन्य व्रतें निष्फळ होत । ऐसा निर्णय शास्त्राचा ॥२५॥
नाना पुण्यकर्मे केलीस । परी चतुर्थीस विसरलास । म्हणोनी वंध्यत्व पावलास । कारण हें जाणून घेई ॥२६॥
चतुर्विध पदार्थांची दात्री । वरदा चतुर्थी संकष्टहर्त्री । सर्वसुखांची ती कर्त्री । ऐसा महिमा चतुर्थीचा ॥२७॥
राष्ट्राकडून पाप होत । तें राजा भोगित । व्रतहीन जन समस्त । म्हणून तूं घोर पापी ॥२८॥
आतां पापाची मूर्ति । तूच अससी जगतीं । नराधमा म्हणून अपत्यप्राप्ती । तुजलागी न झाली ॥२९॥
सौभरीचें ऐकून वचन । राजा म्हणे कर जोडून । चित्तीं भयभीत होऊन । विनयनम्र त्या वेळीं ॥३०॥
मी अजाणतां कर्म केलें । म्हणोनी पाप मज लागलें । आता विप्रा तें व्रत भलें । सांगावें मज सविस्तर ॥३१॥
पुत्रप्राप्ती मज व्हावी । पापाची जोड नष्ट व्हावी । ऐशी ज्या व्रताची थोरवी । तें करुन मी होईल सुखी ॥३२॥
सौभरि तेव्हां त्यास सांगत । चतुर्थीचे संपूर्ण व्रत । सर्व प्रजाजनांसह आचरित । तरी तूं होशील पापमुक्त ॥३३॥
जें अज्ञानाने पाप घडत । तें या आद्यव्रतें नष्ट होत । पुण्यभाग प्राणी होत । निष्पाप त्या संसारीं ॥३४॥
तदनंतर व्रताचें महिमान । विस्तारपूर्वक करी कथन । कीर्तिमान राजा कर जोडून । विनयें तदनंतर विचारी ॥३५॥
हा गणाधीश कैसा असत । ज्याचें चतुःपद हें व्रत । ब्रह्मभूयकर ऐसें ख्यात । त्यासी भजेन मी विशेषें ॥३६॥
तेव्हां तो सौभरि कथित । गणनाथमाहात्म्य तयाप्रत । शांतियोगप्रद असत । जें तारक या भवार्णवीं ॥३७॥
सौभरि पूर्वे तिहास सांगत । म्हणें मी एकदा तप आचरित । नाना छंदपरायण अत्यं । देव भयभीत तें झाले ॥३८॥
तपःप्रभावें हा द्विजोत्तम । सर्व जिकील उत्तमोत्तम । कोणतें श्रेष्ठपद वांछितो हा विप्रोत्तम । आम्हांसी हें मुळी न कळे ॥३९॥
म्हणोनी सुरेंद्र पाठवित । कामदेवासी स्त्रीसहित । तपोभंग करण्या माझा त्वरित । कामदेवही त्वेषें आला ॥४०॥
उर्वशी प्रमुख अप्सरांसहित । मधुमासासी संगें आणित । बाण मारुनी पीडा देत । मजसी तेव्हां कामदेव ॥४१॥
परी मी तपःप्रभावें जिंकित । कामासी त्या स्त्रियांसहित । मोहहीन राहून तप आचरित । सुदृढ निश्चये त्या वेळीं ॥४२॥
माझ्या उग्र तपानें दाहयुक्त । होतां पळून कामदेव जात । इंद्रासी सर्व वृत्तांत । सांगता झाला विषण्णमनें ॥४३॥
नंतर मी योगमार्गे होत । अन्तर्निष्ठ जड उन्मत्त । ऐशा मार्गांत संस्थित । योगप्रभावाकारणें ॥४४॥
पुढे शुक महायोगी येत । थोर गाणपत्य माझ्या आश्रमांत । मज पाहून विचारित । काय इच्छिसी या घोर तपानें ॥४५॥
तेव्हां मी होऊन प्रणत । माझे दोन्ही कर जोडून म्हणत । माझें श्रेष्ठ भाग्य असत । म्हणोनि तूं भेटलासी ॥४६॥
आतां महायशा मज सांगावें । महायोग्या शांतिरहस्य आघवें । जें जाणून शांत व्हावे । चित्त माझें निरंतर ॥४७॥
शुक हें ऐकून मज सांगत । चित्त पंचविध असत । तें त्यागून तन्मय होत । शांतिलाभाचा साधक ॥४८॥
चित्तभूमीचा निरोध होत । तेव्हां शांतिसौख्य लाभत । चिंतामणीस भज तूं निश्चित । एकाक्षर मंत्रानें ॥४९॥
त्यानें तुझें होईल दृढ चित्त । चिंतामणीवरी अविरत । जडादिक मार्ग सोडून आसक्त । होई तूं शमदम परायण ॥५०॥
गणनाथास भज तूं भक्तियुक्त । महाभागा यत्नें सतत । ऐसा उपदेश करुन जात । शुकयोगी स्वेच्छापरायण ॥५१॥
गणेश नामाचें संकीर्तन । करी तो जपही विशेष पावन । तदनंतर मी गणपतीस भजून । आराधना केली यथोपदेश ॥५२॥
पुढयांत मूर्तो स्थापून । केलें एकाक्षर विधान । स्वल्प काळांत शांति लाभून । आनंद मजला वाटला ॥५३॥
तथापि गणनायक पूजनांत । राहिलों मी सदैव सक्त । ऐसीं दहा वर्षे जात । तेव्हां विघ्नेश प्रकटले ॥५४॥
मी त्यांची पूजा करित । विविध स्तोत्रें स्तवन करित । मज गाणपत्य पद देत । नंतर गेले स्वानंदक पुरासी ॥५५॥
तेव्हांपासून गणपास मी भजत । ब्रह्मनायकास सतत । ऐसें सांगून तो राजर्षि देत । षडक्षर मंत्र राजयासी ॥५६॥
कीर्तिमान नृप जें परतत । आश्विन शुक्ल द्वितीया तें असत । त्याच मासीं शुक्ल चतुर्थीव्रत । आरंभिलें त्या नृपानें ॥५७॥
सर्व प्रजाननांसमवेत । उपोषण करुन व्रत आचरित । माध्यान्हीं गणपतीस पूजित । विधिपूर्वक तो राजा ॥५८॥
रात्रीं जागरण करित । बालवृद्धांच्या संगतींत । नरनारी जन समस्त । करिती तें व्रत यथातथ्य ॥५९॥
जे जे नर माझ्या राज्यांत । शुक्ला चतुर्थीचें व्रत । करित नाहीत त्यांप्रत । घोर शासनें ताडावें ॥६०॥
ऐसी घोषणा राज्यांत । सर्व स्थळीं तो करवित । त्यायोगें हें व्रत भूमंडळांत । प्रसिद्ध फार जाहलें ॥६१॥
पुढें त्या कीर्तिमान नृपतीस लाभत । पुत्र मनोवांछित । तो पुत्र येतां वयांत । त्यास समर्पिलें राज्य सर्व ॥६२॥
आपण वनांत जाऊन । स्त्रीसहित करी गणेशाचें भजन । अंतीं स्वानंदलोकीं जाऊन । ब्रह्मभूत तो जाहला ॥६३॥
ऐसाच वृत्तान्त अद्‌भुत । आश्विन शुक्ल चतुर्थीचा असत । दशरथा तो सांगेन तुजप्रत । ऐकावा लक्ष देऊनियां ॥६४॥
भीम नामा महाव्याध असत । पापकर्म परायण तो अत्यंत । लोकांस गाठून आडमार्गांत । ठार मारुनी धन चोरी ॥६५॥
एकदा तो भीम वनांत । होता कोण्या ब्राह्मणां मारण्या उद्यत । तो ब्राह्मण भयग्रस्त । पळूं लागला वनांतरीं ॥६६॥
तेवढयांत कोणी अश्वारुढ नर । धावत आला शस्त्रधर । भीमास पकडून सत्वर । ब्राह्मणासी भयमुक्त करी ॥६७॥
तो द्विज आपुल्या आश्रमांत । तदनंतर सुखें जात  । तो वीरपुरुष पकडून नेत । भीमास राजासमोर ॥६८॥
तो त्या दुष्ट व्याधास ठेवित । चतुर्थी दिनीं त्या कोठडींत । आश्विन शुक्ल पक्षांत । घडला उपवास व्याधाला ॥६९॥
पंचमीस त्यास वधित । त्या पुण्यें तां ब्रह्मभूत होत । ऐसे नानाविध भक्त जगांत । चतुर्थीव्रतानें तरुन गेले ॥७०॥
ते सर्व स्वानंदस्थ होत । त्यांचे वर्णन शब्दातीत । जो हें शुक्ल आश्विनी व्रत आचरित । ऐके त्यास सर्व सिद्धिलाभ ॥७१॥
जो हें व्रतमाहात्म्य वाचित । त्यास भुक्तिमुक्ति लाभत । पुत्रपौत्रादींचा लाभ होत । मित्रपरिवार सुख लाभे ॥७२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते शुक्लाश्विनीचतुर्थीव्रतवर्णनं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP