मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय १४ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय १४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत चैत्रशुक्लचतुर्थीव्रतवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दशरथ म्हणे वसिष्ठाप्रत । ऐकिलें फाल्गुनी चतुर्थीचें माहात्म्य पुनीत । तरीही चित्त ना झालें तृप्त । म्हणोनी सांगा आणखी पुढें ॥१॥चैत्रशुक्ला चतुर्थीचें वृत्त । वर्णन करावेम मजप्रत । वसिष्ठ तेव्हां तें सांगत । बंगाल नगरीची कथा ॥२॥त्या बंगाल नगरांत । चंद्रप्रिय राजा प्रख्यात । शत्रुसंघास जिंकून राज्य करित । सागरान्त धरित्रीवर ॥३॥अन्य नृपांसी वश करित । सामंत राजे आज्ञारत । सर्व प्रजा स्वधर्म परायण वर्तत । राजा स्वयं परम धार्मिक ॥४॥वर्णाश्रमाचें रक्षण करित । हीन दंडयासी दंड करित । चोरांचे भय ना राज्यांत । परि एक न्यून्य होतें ॥५॥नर नारी त्या राज्यांत । रोगग्रस्त झाले समस्त । वंध्यादि दोषांनी पीडित । म्हणोनि गेले नृपाकडे ॥६॥नागर नृपासी सांगती । आम्ही धर्म आचरितों नीती । आपुल्या आज्ञा पाळितों जगतीं । आपणही परम धार्मिक ॥७॥तथापि रोगदोषें पीडित । वंध्यादि दोष समस्त । धनधान्य विहीन वर्तत । आम्हीं सर्व कां राज्यांत ॥८॥पृथिवी जाहली रसहीन । वृक्षही सर्व फलहीन । गाइ झाल्या दुग्धहीन । तुझ्या राज्यांत महामते ॥९॥धर्मशील राजा असत । तरी प्रजानन असावे सुखयुक्त । परी तुमच्या राज्यांत । विपरीत सर्व घडत असे ॥१०॥म्हणोनि भूपाला आम्हा रक्षावें । रोगादीचें हरण करावें । आपणाची आम्हां द्यावें । उत्तमोत्तम बळ या वेळीं ॥११॥त्यांचें वचन ऐकून । चंद्रप्रिय राजा दुःखी होऊन । प्रधानांवरी राज्य धुरा ठेवून । वनीं जाण्याची वांछा करी ॥१२॥तितुक्यामाजी तेथ येत । अष्टावक्र महायोगी अकस्मात । त्यांस पाहून विनययुत । चंद्रप्रिय राजा प्रणाम करी ॥१३॥पूजून तयास भोजन देत । पादसंवाहनीं झाला रत । नंतर म्हणे दुःखसंयुत । चंद्रप्रिय राजा अष्टावक्रासी ॥१४॥धन्य माझेमातापिता । धन्य जन्म तप यश ज्ञानादि तत्त्वतां । आपुल्या पदकमलांचे दर्शन होतां । धन्य सारें वाटे मज ॥१५॥परी एक असे दुःख महान । ऐसें बोलून करी कथन । वृत्तांत सारा तो ऐकून । अष्टावक्र म्हणे राजासी ॥१६॥राजा तुझ्या राज्यांत । महत्पाप घडत । तेणें सर्व प्रजा होत । दुःखपूर्ण निःसंशय ॥१७॥चार पुरुषार्थांचा लाभ घडवित । ऐसें चतुर्थींचें व्रत । तें नष्ट झालें तुझ्या राज्यांत । म्हणोनि पीडा भोगिती सारे ॥१८॥अंती जातील नरकांत । सर्व प्रजाजन तुझ्यासहित । हें ऐकता चंद्रप्रिय प्रार्थित । स्वामी दयानिधे मज तारावें ॥१९॥तें सांगावें उत्तम व्रत । कोणत्या देवाचें प्रिय असत । तेव्हां कृष्णशुक्ल चतुर्थी व्रत । सविस्तर सांगे अष्टावक्र ॥२०॥सर्व कार्यारंभी हें व्रत । करावें धर्मकामार्थ जेणें लाभत । अंतीं भक्त होत मुक्त । ऐसें माहात्म्य चतुर्थी व्रताचें ॥२१॥सर्व चरित्र ऐकून प्रार्थित । गणराजाचें स्वरुप अद्भुत । सांगावेम आतां मजप्रत । तेणें भजेन सर्वभावे ॥२२॥अष्टावक्र तेव्हां म्हणत । गणेशस्वरुपाच्या वर्णनीं मीं अशक्त । तथापि सांगतों अल्प तुजप्रत । जेणें जाणशील त्यास भूपाळा ॥२३॥पूर्वीं मी एकदां तप करित । यत्नपूर्वक एकाग्रचित्त । तेव्हां सुरुप अप्सरा येत । माझें मन विचलित करण्या ॥२४॥त्यांचा अत्याग्रह पाहून । जाहलों मी कुपित मन । त्यांसी शापिलें तत्क्षण । मृत्युलोकीं तुम्हीं पडाल ॥२५॥तेथ चोरांनी ग्रस्त । तुम्ही अप्सरा व्हाल अत्यंत । ही माझी शापवाणी ऐकत । तेव्हां भयभीत त्या सर्व ॥२६॥त्यांनी मज विनविलें । परोपरीनें प्रार्थिलें । तेव्हां माझें मन द्रवलें । उःशाप त्यांसी मी दिला ॥२७॥म्हणालों विष्णु जेव्हां यादवांत । अवतरेल कृष्णावतारांत । तेव्हां त्याच्या पत्न्या होऊन । घोर भयातून मुक्त व्हाल ॥२८॥अप्सरा नंतर निघून जाती । मीं तप आचरिलें भावभक्तीं । त्या तपप्रभावें माझ्या चित्तीं । अंतर्ज्ञान परम स्फुरलें ॥२९॥तेव्हां तप सोडून मी आचरित । शमदमादि योगरत । समाधि साधून मोदयुक्त । अंतीं स्थिरावलों स्वानंदीं ॥३०॥परी समरुपा विलोकित । जेव्हां मोह मीं अवचित । तेव्हां मीं सुविस्मित । शांतिलाभार्थ उत्सुक झालों ॥३१॥अकस्मात ऋभु योगी तेथ येत । वर्णाश्रमविहीन जो असत । त्यास पाहून हर्षसमन्वित । प्रणाम करुन पूजिलें ॥३२॥महामुनेस म्हणालो सांप्रत । जाहलें तुमचें दर्शन पुनीत । धन्य माझें उग्र तप वाटत । जन्मज्ञानादिक सर्वही ॥३३॥तुमच्या पदस्पर्शे कृतकृत्यता वाटत । हें ऐकून मुनि म्हणत । काय वांछिशी महाप्राज्ञा मनांत । सांग तें मीं पुरवीन ॥३४॥तेव्हां कर जोडून विनीत । म्हणे योगशांति सांगा मजप्रत । योगींद्रसत्तमा जेणें होत । चित्ताचें या समाधान ॥३५॥ऋभु तेव्हां मज सांगत । संयोग पंचधा जगतांत । सद् असत् सम नेतित । स्वसंवेद्ययोगें तो लाभेल ॥३६॥अयोग पाचांनी हीन । निवृत्तीनें पावती जन । त्यांच्या योगे सत्ययोग साधून । शांतिमार्गे कार्य सिद्धि ॥३७॥त्याच गणराजा जाणून । तूं भज महामते प्रसन्न । तेणें शांतिभव सौख्य लाभून । समाधानी होशील ॥३८॥त्याविण अन्य उपाय नसत । संयोगच गकार वर्तत । णकार अयोगवाचक असत । त्याचा स्वामी गणेशान ॥३९॥ऐसें वेद वर्णिती । महामते हयाची घ्यावी प्रचीती । मीही पूर्वीं ऐश्या रीतीं । नानायोगांत मग्न होतों ॥४०॥परी मनांत होतो भ्रांत । सहज भ्रांतीनें युक्त । त्या भ्रांतीचें स्वाधीनत्व पहात । सुविस्मित मी झालों ॥४१॥तेव्हां शंकरासी गेलों शरण । योगकामें मी भक्तिपरायण । शंकरें उपदेश करुन रक्षण । माझें केलें करुणेनें ॥४२॥गणेशाचें भजन सांगत । एकाक्षर विधान उपदेशित । त्यापरी मीं उपासना करित । शांतिलाभ मज झाल ॥४३॥ऐसें सांगून ऋभुमुनि देत । गणेशमंत्र मजप्रत । मीही एकाक्षर मंत्र जपता जगांत । शांतिप्राप्तीनें धन्य झालों ॥४४॥अष्टावक्र नंतर चंद्रप्रियाप्रत । द्वादशवर्ण मंत्रराज देत । विधिपूर्वक मंत्रराज अद्भुत । गणेशाचा परम पुनीत ॥४५॥तदनंतर अंतर्हित । अष्टावक्र तेथून होत । चंद्रप्रिय राजा होत । विघ्नेश्वर भजनीं निमग्न ॥४६॥त्यासमयीं प्रथम जी येत । शुक्लचतुर्थी चैत्रमासांत । ती नगरजनांसहित । आचरिली त्यानें यथाविधी ॥४७॥तेव्हांपासून घोषणा करवित । आपुल्या प्रजाजनांत । शुक्लकृष्नचतुर्थी व्रत । विशेषें करावेम सर्वांनी ॥४८॥त्या व्रतप्रभावें रोगादिहीन । जाहले पुत्रसंपन्न जन । नानादोष दूर होऊन । आनंदें विहार ते करिती ॥४९॥चंद्रप्रिय पूजी अनन्यचित्त । गणेशातें अविरत । अंतीं पुत्रास राज्यीं बैसवित । आपण गेला वनांत ॥५०॥स्त्रीसहित तेथ राहत । स्वल्प काळ तप करित । अंतें गणपाप्रत जात । स्वानंदलोकीं ब्रह्मभूत ॥५१॥क्रमानें जे भूमिसंस्थ असत । ते व्रत पुण्याईनें युक्त । ब्रह्मभूत ते समस्त । गणपतीच्या दर्शनें ॥५२॥आणखी एक असे वृत्तान्त । चैत्रशुक्ली चतुर्थी संबंधांत । माळव्यांत शूद्रज पापी राहत । कोणी एक दुष्ट नर ॥५३॥तो द्रव्य लोभी पांथस्था मारित । सर्वस्व त्यांचें लुटित । त्याच्या पापांची संख्या नसत । वर्णिता ग्रंथविस्तार होय ॥५४॥एकदां तो वृक्षाग्रीं बैसत । शस्त्र घेऊन करांत । लोकांस गाठून वनांत । मारण्याचें व्रत त्याचें ॥५५॥परी त्या दिनीं सर्प चावत । म्हणोनी झाडाखाली उतरत । विषवेगें भयभीत । स्वगृहासी परतला ॥५६॥विषप्रभाएं झाला मूच्छित । दैवयोएं त्या दिनीं असत । चैत्रशुक्ल चतुर्थी पुनीत । अन्नविवर्जित तो पापी ॥५७॥तैसाच तो पडला शूद्र गृहांत । पंचमीस झाला मृत । अंतीं त्या पुण्यें जात । स्वानंदक पुरींत तो ॥५८॥अज्ञानें घडे जरी व्रत । तरी ऐसे नाना जन मुक्त होत । जे जे झाले ब्रह्मभूत । त्यांचे वर्णन करणें अशक्य मज ॥५९॥हें चैत्रचतुर्थीचें व्रत महिमान । जो ऐकेल वाचील प्रसन्न । तो सर्व ईप्सित काम लाभून । अंतीं गणेश सायुज्य लाभे ॥६०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुरानोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाजनचरिते चैत्रशुक्लर्थीवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP