मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । वसिष्ठ गुरो ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीचें व्रत । आता सांगावें मजप्रत । वैशाख चतुर्थीचें महिमान पुनीत । ऐकून उत्सुक माझें मन ॥१॥
वसिष्ठ तेव्हां कथा सांगत । आंध्रप्रांती शेषपुरांत । कर्दम नाम नृप असत । नानाधर्म परायण ॥२॥
तो शस्त्रास्त्रनिपुण नीतियुक्त । भूमंडळ स्ववश करित । समुद्र वलंयांकित पृथ्वी असत । तयाच्या प्रबल शासनाखालीं ॥३॥
दैवयोगे त्यास जडत । प्रमेह रोग अति दारुण जगांत । अग्निसम तो त्यास जाळित । पापप्रेरित तो रोग ॥४॥
त्या रोगानें अति पीडित । राजास मूत्रोत्सर्गी दाह होत । बहुधा मूत्रोत्सर्ग बंदही होत । कर्दम रडे त्या दाहानें ॥५॥
नाना उपाय तो करित । परी तो रोग ना होय शांत । तेव्हां राज्य सोडून सस्त्रीक जात । वनांत कर्दम दुःखभरे ॥६॥
या वनांतून त्या वनांत । सिंहवाघादींनी युक्त । तो सतत हिंडत । मृत्युसम दारुण पीडा भोगी ॥७॥
तेथ एकदा भरद्वाज येत । महायश विप्रेंद्र अवचित । त्यास पाहून विनीत । सस्त्रीक प्रणाम कर्दम परी ॥८॥
हात जोडून तेथ् स्थित । अति दाह होऊन पीडित । धरणीवरती पडत । आक्रंदन करी विवशमनें ॥९॥
त्याचे ती अवस्था पाहत । तेव्हां ध्यान लावून बघ । योगींद्र भारद्वाज जाणत । कारण त्याच्या पीडेचें ॥१०॥
दया येऊन कर्दमास म्हणत । राजेंद्रा ऐक हितयुक्त । वचन माझें तरी त्वरित । दुःखविहीन तूं होशील ॥११॥
चतुर्थीचें व्रत नष्ट झालें । तुझिया राज्यीं म्हणून घडलें । पाप जें भयंकर तेणें अनुभविलें । अति दारुण दुःख तूं ॥१२॥
म्हणोनि प्रजाजनांसहित । महामने तूं करी हें व्रत । त्या पुण्यें दुःखरहित । होशील तूं राजेंद्रा ॥१३॥
भरद्वाजाचें ऐकून वचन । नृप करी त्यास वंदन । व्रतचरणाचा विधि पावन । विनम्रपणानें विचारी ॥१४॥
सर्वज्ञ अशा भगवंता । मजवरी कृपा करी आता । अनुकंपा वाटली जरी चित्ता । तरी माहात्म्य सांगा व्रताचें ॥१५॥
भरद्वाज तेव्हां त्यास सांगत । संकष्टी वरद चतुर्थीचें व्रत । चार पुरुषार्थ जेणें लाभत । कार्यारंभीं हें करावें ॥१६॥
हें व्रत जे न करिती । ते चतुर्विध पुरुषार्था मुकती । अंतीं नरकांत जाती । यांत संदेह कांहीं नसे ॥१७॥
चतुर्थीचें माहात्म्य ऐकत । नृप गणेशाच्या स्वरुपज्ञानीं उद्यत । तेव्हां भरद्वाज त्यास सांगत । वेदादिकही येथ असमर्थ ॥१८॥
तथापि सुखप्रद अल्प सार । सांगतों तुजला मोदकर । माझेंच आचरण उग्र । तपश्चर्यामग्न होतें पूर्वीं ॥१९॥
उग्र तप मीं आचरित । तेव्हां अंर्तज्ञान शक्ति लाभत । तप सोडून मीं तें होत । शमयुक्त दमदिपर ॥२०॥
जडोन्मत्तादि मार्गांत । राहिलों मी योगस्थित । अंती क्रमानें स्वानंदात । संपूर्ण शांति प्राप्त झाली ॥२१॥
त्यापासून पुढें भेदादिक संजात । तें पाहून मीं क्षुभित । शांतिहीन जाहलों तें अकस्मात । रैवत योगी तेथ आले ॥२२॥
माझ्या आश्रमीं ते येत । मीं त्यांसी प्रणाम करित । पूजोनियां बैसवित । उचित आसनीं महामुनीसी ॥२३॥
म्हणे आज कृतकृत्य वाटत । जन्म माझा धन्य जगांत । आपुलें दर्शन लाभलें पुनीत । योगशांति मज सांगा ॥२४॥
योगींद्राचे गुरु आपण । सांगा शांति साधन महान । ज्याचें करता अनुष्ठान । शांतियोगधारक मी ॥२५॥
रैवत तेव्हां मज सांगत । स्वानंद पंचधा ख्यात । सदसत्सम नेतीत । चारांच्या संयोगे स्वस्वरुप ॥२६॥
अयोग स्वस्वरुपांत । तैसाचि स्वरुप होतही संमत । त्यांच्या योगे भरद्वाजा होत । योग शांतिप्रदायक ॥२७॥
स्वसंवेद्य गकार असत । ‘ण’कार योग नामें ख्यात । त्यांचा स्वामी हा गणेश वर्तत । ब्रह्मणस्पति वाचक ॥२८॥
त्यास भज तूं महाभागां सतत । तेणें शांतिलाभ तुजप्रत । अन्यथा शेकडों वर्षें तूं भ्रयुक्त । सार कदा न जाणसी ॥२९॥
ऐसें रैवत मुखातुन ऐकून । ज्ञान तें परम महान । त्यापरी करिता अनुष्ठान । शांति लाभ मज झाला ॥३०॥
गाणपत्य मी दृढव्रत । आता संचार करी जगांत । ऐसें सांगून मज देत । एकाक्षर मंत्र गणेशाचा ॥३१॥
विधियुक्त न्यासादिसंयुत । मीं तो भक्तिभावें स्वीकारित । रैवताची पूजा करित । नंतर तो स्वेच्छा स्थळीं गेला ॥३२॥
मी भरद्वाज गणेशासी भजत । अनन्य मनें सतत । अंतीं शांति लाभली पुनीत । भजनीं रत तें गणेशाच्या ॥३३॥
ऐसीं दहा वर्षे जात । तेव्हां विघ्नेश मजपुढें प्रकटत । त्यास पाहून पूजा करित । अष्टनामास्तोत्रें स्तुति केली ॥३४॥
तेव्हां मज गाणपत्य करुन । तो स्वानंदलोकीं गेला निघून । गणेशासी तेव्हांपासून । भजतों मी भक्तिभावें ॥३५॥
ऐसें सांगून कर्दंमास देत । अष्टाक्षरमंत्र विधियुक्त । नंतर जाहला अंतर्हित । भरद्वाज महामुनी ॥३६॥
कर्दम स्वगृहीं जात । गणेशास पूजी हर्षयुक्त । तदनंतर ज्येष्ठ शुक्ला येत । चतुर्थी तो आचरितसे ॥३७॥
समस्त नागरांसमवेत । राजा करीतसे तें व्रत । वरदा संकष्टी उभय सतत । प्रमेहरोग त्याचा दूर झाला ॥३८॥
जाहला तो दुःख निर्मुक्त । पुढें पुत्रास राज्य देत । आपण वाटिकेंत राहून निवृत्त । सस्त्रीक भजे सर्वभावें ॥३९॥
गणेशासी तन्मयता पावत । त्याचें प्रजाजनही होत । ब्रह्मभूत ते समस्त । व्रतपुण्यप्रभावानें ॥४०॥
दशरथा अन्य कथा तुजप्रत । सांगेन सिद्धिप्रद ती जगांत । गौडदेशीं विप्र असत । महापापी अत्यंत ॥४१॥
तो वनांत जाऊन लोकांस वधित । द्रव्य त्यांचे सारे लुटित । योनिलंपटभावें दूषवित । अनेक स्त्रिया तो महादुष्ट ॥४२॥
वनांत एकाकिनी पाहून । ब्राह्मणी क्षत्रिया व वैश्या प्रसन्न । तैसीच शूद्रा पाहून । आलिंगून त्यांसी उपभोगी ॥४३॥
ऐसें नानाविध पाप करित । तो ब्राह्मण सतत । तेव्हा एकदा त्या समीप येत । मारण्यास कोणी बळी ॥४४॥
पापी ब्राह्मण भयें पळत । हाहाकार मुखें करित । तो नाद ऐकून येत । पाच पुरुष स्थळीं ॥४५॥
त्यांनी त्यास विद्ध करुन । शस्त्राघातें जर्जर करुन । धरणीतलावर दिला फेकून । ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीला ॥४६॥
त्या दिवशीं उपोषण घडत । दैवयोग त्या द्विजाप्रत । दारुण पीडेनें होऊन त्रस्त । पंचमीस तो मृत झाला ॥४७॥
अज्ञानपणें घडलें व्रत । तरीही तो होत ब्रह्मभूत । चांडाळही तर ज्ञानीजन पुनीत । त्यांची महती काय वर्णूं ॥४८॥
ऐसे बहुविध जन । व्रतप्रभावें भोग भोगून । ऐहिकानंतर स्वानंदांत निमग्न । अपार महिमा या व्रताचा ॥४९॥
हें ज्येष्ठ चतुर्थीचें व्रत । तैसेंचि त्याचें माहात्म्य अद्‌भुत । जो ऐकेल अथवा वाचित । त्याचे मनोरथ पूर्ण होती ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते ज्येष्ठशुक्लचतुर्थीमाहात्म्यवर्णन नाम षोडशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP