मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय १७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ विचारी वसिष्ठाप्रंत । आषाढ शुक्ल चतुर्थीचा महिमा अद्‌भुत । वसिष्ठ तेव्हां त्यास सांगत । मैथिल प्रांतांतील कथा ॥१॥
गंडकी नाम महानगर । मैथिल प्रांतांत सुंदर । तेथ भद्रसेन नृपवर । अमित तेज राज्य करी ॥२॥
शस्त्रास्त्रांत निपुण असत । तो भूमंडळ सर्व जिंकित । परराष्ट्रांचें अवमर्दन करित । सार्वभौम तो भद्रसेन ॥३॥
समुद्रवलयांकित अवनीवर । राज्य करी तो धर्मधुरंधर । नीतिनिष्ठ अति उदार । विनीत द्विजदेव अतिथिप्रिय ॥४॥
त्याच्या वश नृप समस्त । नराधिपास त्या सेवित । अपार सेना त्याची असत । अन्य नृप त्यास कर देती ॥५॥
परी त्याच्या राज्यांत । पोपट टोळ उंदीर भक्षित । धान्य वस्त्रादिक समस्त । तेणें विनाश ओढवला ॥६॥
त्यांच्या नाशार्थ यत्न करित । भद्रसेन प्रतापवंत । अस्त्रांनी यत्नपर मारित । बहुत शुकशलभे मूषकांसी ॥७॥
अग्न्यस्त्रांनी त्यांसी जाळित । परी ते पुनःपुन्हा उत्पन्न होत । भद्रसेन विस्मित चित्तांत । काय करावें त्या न कळे ॥८॥
घरोघरीं शलभादी संचरत । नगरजन त्रस्त बहुत । धान्य वस्त्रादी विनष्ट । असमर्थ नृप प्रतिकारार्थ ॥९॥
तेव्हां तो जात वनांत । मानसीं अतीव दुःखित । उपोषण करी तप आचरित । शिवशंकराचें स्मरण करी ॥१०॥
रौद्रभावें पूजित । स्तुति उत्तमोत्तम करित । ऐसें एक वर्ष जाता येत । बकदाल्भ्य त्या स्थळीं ॥११॥
तो महायोगी दैवयोगें भेटत । राजा त्याचें पूजन करित । भोजनादी त्यास देत । विनययुक्त त्यासमयीं ॥१२॥
नंतर दुःखयुक्त चित्तें म्हणत । स्वामी माझिया राज्यांत । मूषक शलभशुक अत्यंत । पीडा देती सर्वांसी ॥१३॥
ते धान्य वस्त्रादिक भक्षिती । विनाशाची ना गणती । त्यांच्या उपायांची परिणती । नैष्फल्यात जाहली ॥१४॥
म्हणोनि राज्य सोडून वनांत । दुःखें मी निवसत । शंकराचें भजन करित । तें दर्शन आपुले जाहलें ॥१५॥
माझ्या तपप्रभावें दर्शन । महामते जाहलें तुमचें पावन । आता उपाय सांगून । कृपा करावी मजवरी ॥१६॥
वसिष्ठ म्हणती दशरथाप्रत । ऐकून भद्रसेनाचें प्रार्थित । महायश गाणपत्य तो सांगत । बकदाल्भ्य त्या नृपासी ॥१७॥
शिवशंकरें मज पाठविलें । तुजसाठीं ऐक वचन भलें । दुःखनाशकर जें शिवें बोलिलें । राजसत्तमा भद्रसेना ॥१८॥
तुझ्या राज्यांत व्रत । चतुर्थीचें विनष्ट असत । म्हणोनी हें विघ्न नाडित । सांप्रत तुजला नृपवरा ॥१९॥
प्रजा भयोद्विग्न समस्त । राजाच्या दोषानें होत । तूं राज्यकर्ता पापी असत । अंतीं जाशील चरकांत ॥२०॥
म्हणोनि सर्व कार्यांरंभांत । तें करावें भक्ति भावें व्रत । चार पुरुषार्थ तें देत । विघ्नहरण करीतसे ॥२१॥
जरी हें चतुर्थीचं व्रत । केलें नाही श्रद्धायुक्त । तरी सर्व कर्म व्यर्थ होत । चतुःपदार्थहीनत्वें ॥२२॥
ऐसें बोलून महिमान । बलदाल्भ्यक भद्रसेनासी सांगून । राजाची विनंति सन्मानून । गणाधीश स्वरुप सांग त्यासी ॥२३॥
आपुला जो पूर्व वृत्तान्त । तोच त्यास कथन करित । जो ऐकता गणराज ज्ञानांत । सुनिपुण होशील म्हणे ॥२४॥
पूर्वी मीं वायुमात्र प्राशून । केलें तप महान । तेव्हां चराचर भयातुर उन्मन । माझ्या तपःप्रभावें ॥२५॥
तथापि मीं तप ना सोडिलें । पुढें मज विश्वरुप दर्शन झालें । तेणें ज्ञानभाव उदेले । तप सोडून योग आचरी ॥२६॥
जडोन्मत्तादिकींरत । शमदमपर योग आचरत । मनीं निग्रह ठेवित । अत्यंत निष्ठा ठेवून ॥२७॥
तदनंतर मीं अतिमोहें पहात । स्वाधीन रुप शून्य साक्षात । सहज ब्रह्माण्त होतो स्थित । जरी मी हर्षपूर्ण सर्वदा ॥२८॥
तें शून्य पाहून झालों भ्रांत । म्हणे हें कैसे आलें ब्रह्मांत । म्हणोनि शंभूस शरण जात । स्तवन करी विविध परीनें ॥२९॥
शंकर जाहले तेव्हां प्रसन्न । म्हणे हात जोडून । योगस्वरुप जाणण्या गहन । तें विशद सांगा मजला ॥३०॥
सत्य असत्य समान । सहजयुत स्वानंदापासून । उद्‌भवती तीं जाणून । निजात्मबोधें नंतर ॥३१॥
संयोगांत स्वस्वरुप जाणावें । वेदवादानुसार आघवें । अयोग होता नष्ट होय स्वभावें । सर्व संयोग ॥३२॥
संयोग अयोगांचा योग होत । योगशांतिप्रद अत्यंत । ऐसें योगिजन सांगत । योग सेवेनें योगमार्गी ॥३३॥
योग शांतिमय ब्रह्मनायक वर्तत । गणेश हाचि देव अद्‌भुत । त्यास भज तूं विधानयुक्त । ब्रह्मभूत तें होशील ॥३४॥
संयोग तो गकार । योग वाचक णकार । त्यांचा स्वामी हा थोर । गणाधीश ऐसी वेदोक्ती ॥३५॥
ऐसें सांगून मजसी देत । एकाक्षर गणेश मंत्र मजप्रत । विधियुक्त सुयोगपद पुनीत । तो स्वीकारुन मी वंदन केलें ॥३६॥
नंतर वनांत होऊन । केलें गणराजाचें ध्यान । जप ध्यानपरायण प्रसन्न । शांतिलाभ झाला गणेशकृपेनें ॥३७॥
तरीही पूजनीं आसक्त । सदैव चित्तानें त्यास ध्यात । तेव्हां मज दाखवित । शुंडाविराजित स्वरुप ॥३८॥
आनंदें मी प्रणाम केला । गणराज स्तविला । मज भक्तिभाव देऊन झाला । गणाधीश अन्तर्धान ॥३९॥
तेव्हांपासून गाणपत्य ख्यात । भद्रसेना मी जगांत । ऐसें सांगून पंचाक्षर मंत्र देत । नंतर अंतर्धान पावला ॥४०॥
बकदाल्भ्य होत अन्तर्धान । भद्रसेन स्वपुरीं जाऊन । शुक्ल कृष्ण चतुर्थीचें व्रत महान । करु लागला श्रद्धेनें ॥४१॥
त्यायोगें शुक मूषक शलभ नष्ट होत । लोक झाले धनधान्यसुत । दुःखें दूर होऊन समस्त । अंती गेलें स्वानंदलोकीं ॥४२॥
ते सर्व ब्रह्मभूत । राजा स्वपुत्रासी राज्यीं स्थापित । सपत्नीक वनीं जात । तेथ भजे गणराजासी ॥४३॥
अंतीं तोही स्वानंदलोकांत । सपत्नीक व्रतप्रभावें जात । अन्यही असे एक चरित । पुण्यकारक तें ऐक ॥४४॥
आषाढी वरदा चतुर्थीचें व्रत । सुखप्रद असे अत्यन्त । एक तरुण वंग देशांत । वाणिज होता पापकर्मा ॥४५॥
स्वधर्म सोडून दुष्ट कर्मांत । सदैव तो दुष्ट रमत । द्यूत खेळत मदिरा पीत । नित्य हिंसा करीतसे ॥४६॥
बळेंच परस्त्रियांस पकडून । जरी वश न झाल्या त्या खिन्न । प्रतिदिनीं भोगी आणून । नृप पित्यास हें न रुचें ॥४७॥
पिता करी तिरस्कार । परी तो दुराचार । जनकासचि विष देत उग्र । त्यायोगें पिता मरण पावला ॥४८॥
नंतर मातेप्रती जाऊन । घेतलें काढून सर्व धन । लोकांसि कळतां वृत्त उन्मन । झाले दुःखित सकळ ॥४९॥
त्या दुष्टाचें चरित । ऐकून जाणून तें त्वरित । श्रेष्ठजन तेव्हां जात । राजासमीप सर्व मिळून ॥५०॥
त्या वाण्याचा वृत्तान्त । ऐकून नृप झाला क्षुभित । त्यांस पकडण्या पाठवित । अधिकारी जनांसी ॥५१॥
तेव्हां नृपाधिकारी जाती । त्या वाण्यासी पकडिती । अपराधांची झाली गणती । नृपे दिधला निर्णय ॥५२॥
म्हणे ह्यास चढवा सुळावर । अविलंबित आजचि सत्वर । नृपाज्ञा ती भयंकर । तैशापरी सेवक करिती ॥५३॥
दैवयोग ती होती । आषाढी शुक्ला चतुर्थीतिथी । निराहार जलहीन लटकत दुःख अती । फांसावरी त्या दुष्टासी ॥५४॥
पंचमीदिनीं पीडेनें युक्त । तो दुर्जन मरत । अज्ञानें पुण्यव्रत घडत । तेणें स्वानंद लोकीं गेला ॥५५॥
स्वानंदी गणपास पहात । स्वयं होत ब्रह्मभूत । ऐशा प्रकारें व्रतप्रभावें लाभत । अन्य जनही ब्रह्मपद ॥५६॥
अनेक वर्षयुत वर्णन । केलें तरी असंभव मान । इतुकें असंख्यात महिमान । चतुर्थी व्रताचें हें असे ॥५७॥
जरी योगपूर्वक साधित । देवी चतुर्थी प्रसन्न होत । वरदा साधकास ब्रह्मप्रद होत । यांत नवल कोणतें ॥५८॥
जो हें आषाढी वरदेचें चरित । ऐकत किंवा वाचील भक्तियुक्त । त्यास ईप्सित फळ लाभत । पुरुषार्थ चतुष्टयाचें ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते आषाढशुक्लचतुर्थीचरितवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP