मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ राजा वसिष्ठांस प्रार्थित । ऐकून कथा हर्षलों चित्तांत । आतां मार्गशीर्ष शुक्लचतुर्थीचें व्रत । सविस्तर मज सांगावें ॥१॥
वसिष्ठ तें मान्य करुन । इतिहास सांगती पुरातन । ह्या दिवशीं जो घडला महान । तया दशरथ नृपासी ॥२॥
काशीराजा अजातशत्रू असत । पुण्यकीर्ति सर्वशास्त्रपारंगत । नाना धर्मपरायण उपासत । देवद्विज अतिथींसी ॥३॥
प्रजेचें पालन यथाशास्त्र करित । त्यास भेटण्या एकदा अवचित । आले नारद मुनी त्यास नमित । भक्तिभावें पूजी तया ॥४॥
स्वतःत्यांचे पाय चुरित । हर्षभरें नारदा म्हणत । धन्य माझा जन्म वाटत । पुत्रादि राज्य कंटकरहित ॥५॥
धन्य माझे मातापिता । तुमच्या अंघ्रियुगाचें दर्शन होतां । आतां सर्वसार सांगून चित्ता । योगशांति ज्ञान द्यावें ॥६॥
ज्या ज्ञानानें या संसारांत । दुःखमुक्त मानव होत । ऐसें सांगा ज्ञान अद्‍भुत । तेव्हां बोले नारद ॥७॥
गाणपत्य अग्रणी तो योगी सांगत । वचन तेव्हां हर्षयुक्त । योग्य प्रश्न तूं मजप्रत । केलास नृपा ऐक आतां ॥८॥
सर्वांसी ब्रह्मपद शांतिदायक । सांगेन तुज योग निःशंक । ब्रह्म नानाविध पावक । वेदांत वर्णिलें पात्रभेदें ॥९॥
त्यांत ब्रह्मभूतत्व मुख्य असत । ब्रह्मणस्पति नामें विराजत । गणेशास भज तूं भावयुक्त । चित्तवृत्ति निरोधानें ॥१०॥
चिंतामणि स्वयें होशील । मीच गणेश हें जाणशील । संदेह जेव्हां न संभवेल । संयोग अयोगात्मक ॥११॥
तेव्हां शांति तुज लाभेल । तुझ्या राज्यांत अमल । चतुर्थीचें व्रत सबल । नष्ट जाहलें सांप्रत ॥१२॥
त्यायोगें राज्य नष्ट होत । तेव्हां तूं पडशील नरकांत । जरी व्रताचें या आचरण घडत । तरी होशील पापमुक्त ॥१३॥
धर्मार्थ काममोक्षप्रद । ऐसें हें चतुर्थी व्रत सुखद । संकटहारक वरद । जें करतां सिद्धि सर्वत्र ॥१४॥
नाना कर्मे सिद्धिस्तव करिती । परी चतुर्थी व्रता विसरती । प्रयत्न त्यांचे निष्फळ होती । म्हणोनी करी चतुर्थी व्रत ॥१५॥
करुणायुत महायोगी सांगत । माहात्म्य त्या नृपाप्रत । चतुर्थीसंभव अद्‍भुत । तें ऐकून नृप म्हणे ॥१६॥
गणेशाचें उपासन । सांगावा मार्ग हा शोभन । ब्रह्मणस्पतीचें महिमान । ऐकून सांप्रत तोषलों मीं ॥१७॥
नारद तेव्हां नृपास म्हणत । एकाक्षर विधानें भक्तियुक्त । ढुंढि विनायका भज एकचित्त । तेणें साध्य तो होईल ॥१८॥
प्रत्यक्ष दर्शन तुज घडेल । म्हणोनि त्या नृपास अमल । एकाक्षर मंत्र सुनिर्मल । सांगोपांग त्या वेळीं ॥१९॥
नंतर मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी येत । ती यथाविधि तो नृप आचरित । आपुल्या प्रजाजनांसमवेत । सर्वसुखप्रदायिनी ॥२०॥
सदैव हें व्रत करित । आपुल्या राज्यांत दवंडी करित । जे नराधम हें न आचरित । शुक्लकृष्ण चतुर्थी व्रत ॥२१॥
त्यांसी दंड होईल महान । परी जे करतील व्रत पावन । त्यांसी गणराजाचें वरदान । लाभेल सुख शाश्वत ॥२२॥
नृपाध्यक्ष नित्य पूजित । ढुंढिराजासी भक्तियुक्त । ऐसा बहुत काळ जात । तेव्हां प्रकटले गजानन ॥२३॥
त्या नृपास ते म्हणत । वर माग राजा मनोवांछित । नृप प्रणाम करुन स्तवित । ढुंढिराजासी पूजिनियां ॥२४॥
अजात शत्रूस गाणापत्य करित । ईप्सित वर देऊन अंतर्हित । ढुंढिराजासी भजत । अनन्यचित्त तो राजेंद्र ॥२५॥
अंतीं नागरिकांसमवेत । गणपासमीप तो जात । सर्वांसह ब्रह्मभूत होत । योगिसंमत तो नृप ॥२६॥
अन्यही एक कथा असत । तीही सांगतों तुजप्रत । एका वेश्येसी लाभत । हया व्रतानें गणेशमुक्ती ॥२७॥
कोणी एक नरमोहिनी । मिथिला रगरीं वेश्या कामिनी । आली तेव्हां तिज पाहोनी । मोहित झाले सर्व जन ॥२८॥
राजानें तिचा संमान । केला दिलें बहुत धन । तेथ करुनियां निवास शोभन । तीर्थयात्रा तिनें केल्या ॥२९॥
ऐसीच एकदा तीर्थाप्रत । गेली होती वेश्या तेथ येत । राक्षस कोणी दुष्ट अत्यंत । पकडून नेलें तिला तें ॥३०॥
तिज बंदी करुन नेत । आपुल्या घराकडे हर्षयुक्त । त्यास पाहून विलाप करित । भयोद्विग्न ती वेश्या ॥३१॥
राक्षस तिचें सांत्वन करीत । परी ती शोक न सोडित । मार्गशीर्ष चतुर्थी शुक्ली येत । मार्गांत तेव्हां काय घडलें ॥३२॥
अतिशोकें ती वेश्या न घेत । अन्नजलादिक कांहीं मुखांत । त्या उपोषणायोगें मरत । पंचमीस ती भयभीत ॥३३॥
तेव्हां गणेशदूत नेत । स्वानंदपुरीं तिज क्षणांत । ब्रह्मभूत ती वेश्या होत । व्रतपुण्याच्या प्रभावें ॥३४॥
जरी अज्ञानानें घडत । वरदाख्य हें व्रत । तरीही ब्रह्मसायुज्य प्राप्त । जाणून करितां लाभ किती? ॥३५॥
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी व्रत । जो नर भावें आचरित । त्यास सर्वार्थ लाभत । कथा ऐकतां वाचितांही ॥३६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजानन चरिते मार्गशीर्षशुक्लचतुर्थीवर्णन नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP