मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय १९ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय १९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मलमासशुक्लचतुर्थीचरितवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दशरथ विनवी वसिष्ठासी । चतुर्थी येत जी मलमासी । त्या वरदेचें चरित्र मजसी । सर्वसिद्धिप्रद सांगावें ॥१॥वसिष्ठ तेव्हां कथन करित । पुरातन इतिहास तयाप्रत । आंध्रप्रांतीं राजा असत । सुषेण नामें धार्मिक ॥२॥चंपक नामक नगरींत । धर्मनीतीनें तो राज्य करित । विविध शस्त्रास्त्रीं पारंगत । दानशूर यशस्वी तो ॥३॥व्रतपरायण तो भक्त । देवप्रिय अतितिपूजेंत रत । भूमंडळ जिंकून राज्य करित । सर्व राजे करभार देती ॥४॥परी त्याच्या राज्यांत । एक भयंकर आपत्ति येत । साप चावती जनांप्रत । क्षुब्ध सर्प सर्वत्र फिरती ॥५॥जेथ जेथ प्रजाजन जाती । तेथ तेथ सर्पही असती । झाली त्यांची अगतिक गती । कोठें रहावें समजेना ॥६॥वनांत अथवा गृहांत । सर्पदंशाचें भय सतत । राजा जाहला दुःखार्त । महाभयपरयाण ॥७॥पंचमीचें व्रत करिती । होण्या नागांची शांती । परी नाग न शमती । परम दारुण ते तथापि ॥८॥नाना पुण्यतीर्थयात्रा करिती । प्रजाजन परी न होय मुक्ती । क्रूर नाग ते सर्वत्र विचरती । भूमिवरी दशरथा ॥९॥तेव्हां तो राजेंद्र शरण जात । जैमिनीगुरुस श्रद्धायुक्त । त्यास प्रणाम करुन राहत । ओंजळ जोडून त्याच्यापुढे ॥१०॥आसनादी देऊन त्यास तोषवित । आगमन कारण मुनि विचारित । सुषेण तेव्हां निःश्वांस सोडित । सांगे सकल वर्तमान ॥११॥स्वामी सर्प झाले अपार । चावती प्रजेस अनिवार । भय संकुलित समग्र । राहण्या स्थान ना उरलें ॥१२॥स्वामी नाना उपाय केलें । परी ते सारे व्यर्थ ठरले । सर्पांचें भय ना शमलें । म्हणोनि तुजला शरण आलों ॥१३॥सर्पगणांची व्हावी शांति । म्हणोनि काय करावी कृती । हे सारें जरी न सांगाल मजप्रती । तरी मी प्राण त्यागीन येथ ॥१४॥वसिष्ठ कथा पुढें सांगती । जैमिनी तेव्हां नृपास म्हणती । स्वशिष्यासी निंदिती । तो वृत्तान्त ऐक आतां ॥१५॥अरे पाप्या तुझ्या राज्यांत । चतुर्थीचें भ्रष्ट झालें व्रत । त्या योगें मरणोत्तर जाल नरकांत । सर्वही तुम्हीं निःसंशय ॥१६॥चार पुरुषार्थांची दायिका । ऐसी चतुर्थी वरदा एका । संकट हरी ती संकष्टी सुखकारिका । ऐसें रहस्य जाणावें ॥१७॥जरी हें चतुर्थीचें व्रत । कार्यारंभी न करित । तरी चार पुरुषार्थहीन होत । ऐसें कर्महीन जाण ॥१८॥ऐसें सांगून महिमान । चतुर्थींचे केलें कथन । तें ऐकून सुषेण प्रसन्न । विचारी प्रश्न उत्सुकतेनें ॥१९॥कैसा हा गणेशान देव असत । ज्याचें हें व्रत अद्भुत । त्याचें स्वरुप मजप्रत । सांगा त्याची भजेन मी ॥२०॥जैमिनी देई उत्तर । गणेशस्वरुप वर्णनाचे पार । तथापि उपाधियुत स्वरुप सुंदर । ढुंढीचे मी वर्णितों ॥२१॥मीं पूर्वी शांतिलाभार्थ जात । व्यासाची शरण सुविनीत । तेव्हां तो साक्षात् नारायण जें सांगत । तेंचि तुज मी सांगेन ॥२२॥तूं माझा शिष्य परी अधम । म्हणोनि विसरलास व्रत अनुपम । गणेशाचें जें जगीं परम । सर्वसिद्धिप्रदायक ॥२३॥देहदेहिमय सर्व असत । गकाराक्षरें निवेदित । ‘ण’कारवाचक ब्रह्म वर्तत । संयोगायोगरुप ॥२४॥त्यांचा स्वामी गणेश ख्यात । महामते ऐसें वेद सांगत । चित्तांत निवास करी अद्भुत । म्हणोनि चिंतामणि नाव ॥२५॥चित्तरुपा स्वयंबुद्धि असत । भ्रांतिरुपा ती सिद्धि वर्तत । त्यांच्यायोगें प्राप्त होत । त्या उभयतांचा जो पति ॥२६॥ऐसें सांगून नृपास देत । षडक्षर गणेशमंत्र पुनीत । सुषेणासी विधियुक्त । यथान्याय सविशेष ॥२७॥नंतर मुनीची अनुज्ञा घेऊन । सुषेण स्वनगरांत परतून । व्रत करण्या उत्सुक मन । तें प्रथम आला मलमास ॥२८॥मलमासांत वरदाख्य येत । शुक्ल चतुर्थीचें व्रत । तें सुषेण नृप आचरित । भक्तिभावें त्या वेळीं ॥२९॥आपुल्या समस्त प्रजेकडून करवित । राजा हें व्रत अद्भुत । नगरजन ग्रामस्थही करित । विधिपूर्वक सर्वत्र ॥३०॥राजा जें परमादरें करित । प्रजा तें करी हर्षयुक्त । त्या व्रतपुण्यानें अंतर्हित । सर्प झाले त्या राज्यांत ॥३१॥लोक जाहले सर्पभयमुक्त । तैसेचि रोग वर्जित । पुत्रपौत्रादि संयुक्त । धनधान्य समन्वित ॥३२॥वृद्ध होता स्वपुत्राप्रत । सुषेण आपुलें राज्य देत । वनांत जात स्त्रीसमवेत । विघ्नेशाचें पूजन करी ॥३३॥अंतीं स्वानंदलोकीं जात । व्रतप्रभावें ब्रह्मभूत । सर्व लोकही व्रतसंस्थित । शुक्ल कृष्ण चतुर्थी करिती ॥३४॥तेही अंती क्रमें होत । व्रतप्रभावें ब्रह्मभूत । दुर्लभ कांहींच नुरत । व्रत हें महा अद्भुत करितां ॥३५॥आणखी एक कथा असत । मलमास चतुर्थीच्या संभंधांत । शुक्लचतुर्थीचें जें व्रत । पुण्यकारक श्रवणेंही ॥३६॥कोणी एक हस्तिनापुरांत । होता क्षत्रिय भयंकर पापरत । बाल्यापासून दुष्ट आचरित । विविधरीती क्रू कर्म ॥३७॥द्रव्यलोभार्थ जनकास मारित । परस्त्रीलालस अत्यंत । चौर्यकर्मीं होता आसक्त । दुर्मती तो पापी नर ॥३८॥एकदा हिंडत होता वनांत । पांथस्थासी ठार मारित । त्यानंतर सर्पदंश त्यास होत । भयोद्विग्न जाहला तें ॥३९॥स्वगृहा परतण्या वांछित । परी विषप्रभावें संतप्त । तेथेच जल अन्नरहित । देहपात त्याचा झाला ॥४०॥तो दिवस होता पुनीत । शुक्लपक्ष मलमास चतुर्थीयुत । त्या दिवशीं नकळत घडत । उपवासव्रत त्या पाप्यासी ॥४१॥चतुर्थीस उपवास घडत । पंचमीस तो झाला मृत । महाखल तो त्या घोर वनांत । अंतीं गेला स्वानंदलोकीं ॥४२॥तेथ गणपतीस पाहत । स्वयं झाला ब्रह्मभूत । ऐश्याचि परे नाना लोक लाभत । ब्रह्मभूत पदवीसी ॥४३॥येथ अखिल भोग भोगत । अंतीं तें मुक्त होत । ऐसें हें मलमास चतुर्थीचें अद्भुत । माहात्म्य जो ऐकेल ॥४४॥अथवा जो हे वाचील । त्यास सर्वलाभ होईल । मृत्यूनंतर तो पावेल । शाश्वत गणेशसायुज्य ॥४५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते मलमासशुक्लचतुर्थीचरितवर्णन नाम एकोनविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP