मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल म्हणती दक्षाप्रत । शुक्रवचन ऐकून आश्चर्ययुक्त । लोभासुर त्यास प्रणाम करित । म्हणे करीन मीं ऐसेंचि ॥१॥
आपणासहित जाऊन । करीन मी गजानना त्या नमन । हित माझें साधीन । गुरु तुमचें वचन अटळ ॥२॥
त्या कवीस घेऊन जात । तदनंतर गजाननाप्रत । शरण जाण्या उत्सुक चित्त । लोभासुराचें त्या समयीं ॥३॥
नगराच्या वेशीपाशी येत । तों तें महास्त्र पाहत । समीपस्थ दानवां जाळित । त्या अस्त्रासी प्रणाम करी ॥४॥
गजाननाचा परशु ज्वलंत । पाहता लोभासुर भयभीत । गर्व सोडुनी हात जोडित । स्तुतिस्तोत्र तें गायिलें ॥५॥
शस्त्र राजासी ब्रह्मरुपासी । नाना शस्त्रांच्या आधारासी । प्रलयाग्निसम स्वरुपधारकासी । अनंतवीर्ययुक्ता तुज नमन ॥६॥
भास्करासम अमित तेजासी । दृश्यादृश्यमयासी सर्वदर्पहरासी । धर्मसंस्थापकासी । नानारुपधरा नमन ॥७॥
साक्षात्‍ गजाननाचे जें वीर्य नियत । तेंच तूं महाशस्त्र अद्‍भुत । कैसी स्तुति करुं मीं सांप्रत । शरणागत पालका तुज नमन ॥८॥
सदा स्वानंद संस्थितासी । नमन परशो माझें तुजसी । भयभीत मीं शरण तुजसी । रक्षण करी माझें आतां ॥९॥
ऐशियापरी लोभासुर स्तवित । तें काव्यही त्या शस्त्रा प्रार्थित । तदा शांतिधारण करुन जात । पुनरपि परशू गजाननकरीं ॥१०॥
तदनंतर शुक्राचार्या सहित । लोभासुर विघ्नेश्वरा भेटण्या जात । त्या महादैत्या पाहून विस्मित । देवर्षि झाले त्या समयीं ॥११॥
परस्परांकडे पाहती । कुतुहल आनंद व्यक्त करती । गजाननासी प्रणाम करिती । लोभासुर तैसा शुक्राचार्य ॥१२॥
त्याची पूजा शुक्रहस्तें करवित । प्रणाम पुनः पुन्हा करित । हात जोडून प्रभूस नमित । स्तवन करी भक्तिभावें ॥१३॥
गजवक्त्रासी बुद्धिचालकासी । नाना सिद्धिप्रदात्यासी । ब्रह्मासी हेरंबासी । स्वानंदवासीसी तुज नमन ॥१४॥
परात्परतरासी विघ्नेशासी । सुरासुरप्रियकर्त्यासी । सुरासुरमया तुजसी । नमस्कार माझा असो ॥१५॥
विधर्मस्थांचा नाशकर्त्यासी । देवांच्या पालकासी । दैत्यांच्या संरक्षकासी । सर्वांचा दर्पहर्त्यास नमन ॥१६॥
गणेशासी लंबोदरासी । देवेशासी दैत्येशासी । मूषक ध्वजासी अनादीसी । सर्वांधिरुपा तुज नमन ॥१७॥
आदिमध्यांतहीनासी । आदिमध्यांतस्वरुपासी । ब्रह्मेशासी ब्रह्मासी । महेश पालका तुज नमन ॥१८॥
ब्रह्मदात्यासी सदा शांतिधरासी । शांतीच्या शांतिरुपासी । योगासा एकदंतासी । सर्वेशा वक्रतुंडा तुज नमन ॥१९॥
महोदरासी पूर्णासी । पूर्णानंदासी सर्वमूळबीजासी । मात्यापित्यासी ज्येष्ठराजासी । ज्येष्ठपालका तुज वंदन ॥२०॥
ज्येष्ठांच्या पालकासी । बीजरुपासी गणाधीशासी । जगतांच्या ब्रह्मासी । गजचिन्हें उपलब्धासी नमन ॥२१॥
बोधहीनासी रुपासी । सदा सांख्यमयासी । विदेहासी प्रत्यक्ष रुपधरासी । गणाधीशा तुज नमन ॥२२॥
तुझें स्तवन करण्या न शक्त । वेद योगि आदि बलवंत । तेथ पामर मी काय स्तवूं सांप्रत । नमन करितों वर देई ॥२३॥
तुझ्या दर्शनाचें हें महिमान । कीं मी केलें अल्प स्तवन । आतां अभयद होऊन । हया दासाचें रक्षण करी ॥२४॥
ऐसी प्रार्थना करुन । लोभासुर करी वंदन । त्या भक्तासी बोले वचन । दयासिंधु भक्तपालक ॥२५॥
महालोभा माग वर । देईन मी तो तुज सत्वर । तुझ्या काव्यें भक्तीनेंही फार । संतोष मजला जाहला ॥२६॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र उत्तम । पुरवील वाचितां अर्थकाम । हे जो वाचील वा ऐकेल मनोरम । त्यास पीडा तूं न करी ॥२७॥
ऐसा वाचक अथवा पाठक । पुत्रपौत्रादियुक्त निःशंक । भोग भोगून ऐहिक । अंतीं स्वानंदलोकीं जाय ॥२८॥
ब्रह्मभूत तो होईल । जो या स्तोत्रेम मज स्तवील। सर्वदा माझी मान्यता पावेल । यांत संशय कांहीं नसे ॥२९॥
तो असुरस्वभावहीन होईल । सुख सात्त्विक पावेल । तुज मारण्या आलों सबल । निःसंशय मीं क्रोधयुक्त ॥३०॥
परी आतां तूं शरणागत । दानवोत्तमा सांप्रत । म्हणोनि मारणार नाहीं तुज निश्चित । अभय तुला देत असे ॥३१॥
गजाननाचें हें वरदान । ऐकतां लोभासुर प्रसन्न । भक्तिभावें बोले वचन । महाबुद्धी तो ब्रह्मनायकासी ॥३२॥
गजानना वर ऐसा मजप्रत । देई तूं सुखद उदात्त । तुझ्या भक्ति स्वरुपें लाभत । गाणपत्य प्रियता ऐसें करी ॥३३॥
मज देई शाश्वत स्थान । तैसी वृत्ति दे ठरवून । माझें कार्य मज सांगून । करवून घेई तें प्रभो ॥३४॥
गजानन म्हणे तयाप्रत । माझी परमाद्य भक्ती मनांत । तुझ्या होईल दृढ सतत । महामते लोभासुरा ॥३५॥
गाणपत्यांत तुझा स्नेह पावेल । वृद्धि सर्वदा अमल । आपुल्या स्थानीं स्थिर सबल । भक्तियुक्त तूं होशील ॥३६॥
जेथ माझें न होय पूजन । स्मरण तैसेंचि मनन । जेथ कर्मदींत प्रारंभीं उद्धत मन । तें तेथ कर्म तूं हरण करी ॥३७॥
जैसे मज देव प्रिय असत । तैसाचि तूं लाभो सांप्रत । माझे जे भक्त ख्यात । त्यासी रक्षी विशेषें तूं ॥३८॥
माझ्या भक्तीचें रुप चित्तांत । लोभा तूं वागवी सतत । ऐसें ऐकून वचन उदात्त । लोभासुर प्रणाम करी ॥३९॥
गजाननासी वंदून । शुक्रासहित करी गमन । आपुल्या नगरीस परतून । विचार करी स्वमानसीं ॥४०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते लोभासुरशांतिवर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP